‘एव्हरेस्ट’ नावाची कचराकुंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019   
Total Views |



निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि निसर्गभाव जोपासणाऱ्या पर्यटकांपेक्षा ऐपत आहे म्हणून शेखी मिरवणारे हौशी पर्यटक नेपाळमध्ये जास्त येताना दिसतात आणि याचा पुरावा म्हणजे या परिसरात साचणारा कचरा.


घरातील कचरा किंवा शहरातील कचरा साठविण्यासाठी कचरापेटी आणि कचराभूमी अस्तित्वात असते. मात्र, जगाच्या पटलावर आता एक नवीन संकल्पना उदयास येत आहे. ती म्हणजे ‘एव्हरेस्ट’ नावाची कचराकुंडी. या कचराकुंडीत एकट्या नेपाळचा नव्हे तर, संपूर्ण जगाचा कचरा साठविता येणार आहे आणि तो साफ करणे ही जबाबदारी नेपाळ सरकारची असणार आहे. कचरा करणे हे तिथे जाणाऱ्या पर्यटकांचे कामच असणार आहे. ही उपरोधिक संकल्पना मांडण्याचे कारण इतकेच की, असे प्रत्यक्षात नुकतेच घडले आहे. नेपाळ सरकारने नुकतेच एव्हरेस्टच्या शिखरांवर आणि आसपासच्या परिसरातून तब्बल तीन हजार किलो कचरा गोळा केला आहे. यासाठी गरीब राष्ट्र असलेल्या नेपाळने सुमारे दीड कोटी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘कचरा करणे’ या सार्वजनिक कार्याची जबाबदारी तेथे जाणाऱ्या पर्यटकांनी उचलून आपले दिव्य कार्य पार पाडले आणि तो उचलून नेपाळ सरकारने आपले दायित्व निभावले, असे आवर्जून नमूद करावेसे वाटते. निसर्ग हा समस्त मानवाचा आहे आणि त्याची जोपासना करणे हे समस्त मानवजातीचे आद्य कर्तव्य. निसर्गातील भूरूपे कोणत्याही देशाच्या भूमीत वसलेली असली तरी, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांची जोपासना करणे, हे तेथे भेट देणाऱ्या पर्यटकाचे परम कर्तव्य आहे. या शिकवणुकीचे भान काही ‘एव्हरेस्टवीर’ मात्र चक्क विसरल्याचे या घटनेवरून दिसून येते. या मोहिमेदरम्यान नेपाळ सरकारला बेस कॅम्पजवळ चार मृतदेहदेखील सापडले असून आगामी काळात सरकारतर्फे अजून दहा हजार किलो कचरा येथून उचलण्याचे नियोजन आहे. तसेच, यंदाच्या मोसमात ५०० गिर्यारोहक आणि एक हजार नेपाळी सदस्य एव्हरेस्ट परिसराला भेट देणार आहेत.

 

गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर नागरिकांचा जीवनमानाचा स्तर हा उंचावला आहे. त्यामुळे वित्तीय स्थितीतदेखील सुधारणा होत आहे. अशातच पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळत आहे. त्यामुळे जागतिक ख्यातीच्या स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. यामुळे प्रतिवर्षी एव्हरेस्टला भेट देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे सातत्याने आढळते. निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि निसर्गभाव जोपासणाऱ्या पर्यटकांपेक्षा ऐपत आहे म्हणून शेखी मिरवणारे हौशी पर्यटक या परिसरात जास्त येताना दिसतात आणि याचा पुरावा म्हणजे या परिसरात साचणारा कचरा. कारण, निसर्गप्रेमी हा कधीही निसर्गाची हेळसांड होईल, असे कृत्य करणार नाही हेही तितकेच खरे आहे. नदी, हवा, वायू यांच्या प्रदूषणात उच्चांक गाठणारा मानव आता आपला कचरा जगातील सर्वात उंच ठिकाणीदेखील टाकायला कमी करत नसल्याचे सांगणारी ही घटना मानवी वृत्तीबाबत खरोखरच चिंता व्यक्त करायला लावणारी आहे. गिर्यारोहणात पर्यावरण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यांचे जतन करणे ही प्रत्येक साहसी वीराची नैतिकता आहे. गिर्यारोहकाची नैतिकता ही त्याची खाजगी बाब नसून ती निश्चितच सार्वजनिक बाब आहे. त्यामुळे या घटनेमुळे सार्वजनिक नैतिकता धोक्यात येत आहे का, हा प्रश्न आता निर्माण होऊ लागल्यास आश्चर्य नसावे.

 

एव्हरेस्टच्या मोहिमेवेळी नेपाळी व्यक्तीशिवाय इतर कोणी पर्यटक या मोहिमेवर असेल तर त्याच्यासमवेत एक देखभाल अधिकारी असतो. मात्र, या मोहिमेत पर्यावरणाची काळजी घेणे, त्याचे रक्षण करणे, एव्हरेस्ट परिसरात आपल्यामुळे काही बाधा निर्माण होणार नाही, याची सजगता बाळगणे आणि मुख्य म्हणजे कचरा न करणे ही त्या पर्यटकाची जबादारी असते. मात्र, ‘हे माझे काम नाही,’ अशी बेफिकीर वृत्ती येथील कचऱ्यास कारणीभूत ठरण्याची शक्यताच जास्त आहे. एव्हरेस्टवर दाखल होणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने आपल्याबरोबर आणलेल्या जिन्नसांचा वापर केल्यावर ते जिन्नस किंवा त्याचे आवरण जर स्वतःसोबत बाळगून खाली आणले आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली, तर अशा मोहिमांची गरज भासणार नाही. नेपाळसारख्या गरीब आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या राष्ट्राचे पर्यावरण केवळ ‘पाहुणे’ म्हणून आलेल्या कोणत्याही देशाच्या नागरिकाने बाधित करण्याचे काहीच कारण नाही, हे येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक देशाच्या नागरिकाने जाणले तर, आगामी काळात ‘एव्हरेस्ट’ नावाच्या कचराकुंडीचा जन्मच होणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@