‘आज भी खरे हैं तालाब’ : आपला संपन्न जलवारसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019   
Total Views |


 

समाजातल्या प्रत्येक जातीने यात आपापला वाटा कसा उचलला याची सविस्तर माहिती देणारं 'संसार सागराचे खरे नायक' हे संपूर्ण प्रकरण या पुस्तकात आहे. तलाव बांधणीशी संबंधित किती प्रकारची कामं होती आणि ती समाजाच्या एकेका हिश्श्याने कशी वाटून घेतली होती, हे यातून लक्षात येतं.

 

रोज वर्तमानपत्र उघडावे आणि दुष्काळाच्या बातम्यांनी मनावर मळभ यावे, असे दिवस आहेत. टँकर हा आता अपवाद राहिला नसून जणू व्यवस्थेचा एक भागच झाला आहे की काय असं वाटू लागलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच गावोगाव टँकर फिरू लागतात. वर्षानुवर्षे कोरड्या असणाऱ्या जमिनीच्या सिंचनाची सुयोग्य व्यवस्था अजूनही न झाल्याने तालुकेच्या तालुके तहानलेले आहेत. सरकार आपली कामं करत नसेल, तर नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अंग झटकून कामाला लागावं असं सर्वत्र घडत नाही. झाडं लावणे, पावसाच्या पाण्याच्या साठवणीकरिता प्रयत्न करणे, याचं महत्त्व अजूनही लोकांच्या ध्यानात येत नाही. कदाचित हे म्हणणं कोणाला आवडणार नाही, पण अनेक ठिकाणी लोक जलव्यवस्थापन ही आपलीही जबाबदारी आहे हे अजूनही समजूनच घेत नाहीत. तात्कालिक उपायांपेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांची खूप गरज आहे. ‘पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘जनकल्याण समिती’ अशा संस्थांच्या पुढाकाराने काही प्रमाणात सकारात्मक बदल घडतो आहे खरा; पण अजून जास्त प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. ही अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. सर्व जबाबदारी राज्यकर्त्यांवर टाकून आपण निवांत राहणे, ही आपली परंपरा नव्हती. जलव्यवस्थापन, जलसंधारण ही जनतेची चळवळ कशी होती आणि त्यात समाजाच्या प्रत्येक घटकाचा वाटा कसा होता याची माहिती देणारं एक अनोखं पुस्तक मराठीत आलेलं आहे\ आणि त्याचं नाव आहे 'आज भी खरे हैं तालाब'. हे पुस्तक आपल्या जलपरंपरेचे फक्त तांत्रिक तपशील देत नाही, तर तिचा गौरवही करतं. या लिखाणाला भावनेचा ओलावा आहे म्हणून ते मनामध्ये अधिक रुजतं.

 

तलाव बांधणीतील लोकसहभाग

 

प्रस्तुत पुस्तकात भारतामध्ये गेल्या शेकडो वर्षांमध्ये तलाव बांधण्याचं शास्त्र कसं कसं रुजत गेलं, बहरत गेलं यावर प्रकाश टाकला आहे. राजस्थानसारख्या अल्प-स्वल्प पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही पाणी साठवण्याच्या क्लृप्त्या शतकानुशतकं टिकून आहेत, हे लेखकं अनुपम मिश्र यांच्या लक्षात आलं. अधिक खोलात जाऊ लागल्यावर त्यांना फक्त राजस्थानच नाही, तर भारतातल्या अन्य प्रदेशांमध्येही पाणी साठवण्यासाठी वापरलेले जाणारे तंत्र-मंत्र माहिती होऊ लागले. हे पारंपरिक ज्ञान पिढीजात पद्धतीने संक्रमित होत गेलं आहे, याचं कारण सर्व समाजाने जलसंधारण ही आपली जबाबदारी मानली. समाजातल्या प्रत्येक जातीने यात आपापला वाटा कसा उचलला याची सविस्तर माहिती देणारं 'संसार सागराचे खरे नायक' हे संपूर्ण प्रकरण या पुस्तकात आहे. तलाव बांधणीशी संबंधित किती प्रकारची कामं होती आणि ती समाजाच्या एकेका हिश्श्याने कशी वाटून घेतली होती, हे यातून लक्षात येतं. बांधकामाचे संपूर्ण नियोजन करणारे 'गजधर,’ दगड फोडणारे 'सिलावट (पाथरवट),’ माती खोदणारे व विटा पाडणारे 'मटकुट,’ गावातल्या जमिनीची आणि आधी बांधलेल्या विहिरी आणि तलावांची इत्यंभूत माहिती असणारे 'बुलई,’ तलाव बांधल्यावर त्यात कमळं, कुमुदिनी लावणारे व तलावाचं रक्षणही करणारे 'माळी' अशा कित्येक जातींचं तलाव बांधणीच्या कामातलं योगदान यात नोंदवून ठेवलं आहे. समाजाच्या सर्व स्तरातली माणसं तलाव बांधणीशी संबंधित काही ना काही योगदान द्यायचीच. राजस्थानातील पालीवाल ब्राह्मण पाणी अडवण्याच्या कामात तज्ज्ञ होते, तर दक्षिणेत पाणी वितरणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी 'नीरघंटी' हे पद होतं जे फक्त दलितांना दिलं जायचं. अशी कामं करणाऱ्यांचा गावाकडून सन्मान केला जायचा, कधी गावात थोडी जमीन दिली जायची. हे वाचताना आपला इतिहास फक्त वर्गसंघर्षाचा, जातीसंघर्षाचा होता हे बिंबवण्याचा प्रयत्न किती एकांगी आहे हे लक्षात येतं.

 

संस्कृतीशी जोडलेली नाळ

 

तलाव बांधणीचं काम आपल्या संस्कृतीशीही कसं जोडलेलं आहे, याची अनेक उदाहरणं पुस्तकात आहेत. पंचांगात तिथी, वार पाहून खोदाईच्या कामाला सुरुवात करणे, हस्ता’च्या पावसाच्या दिवशी साठलेल्या पाण्याचा आस्वाद घ्यायला जमणे, अवजारांची पूजा करणे, तलावाच्या रक्षणासाठी देवतेची स्थापना करणे अशा अनेक गोष्टींमुळे हे काम म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रमच होऊन जायचे. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला नगरातल्या सर्वात मोठ्या तलावावर सर्वांना 'ल्हास' खेळायला बोलावलं जायचं. त्या दिवशी स्वतः राजा, त्याचा परिवार, दरबार, प्रजा असे सर्वजण तलावावर जमून श्रमदान करायचे. राजाच स्वतः मातीत हात घालत असेल, तर ती जबाबदारी प्रजेने स्वतःच्या खांद्यावर घेतली नाही तरच नवल!

 

तलावाशी संबंधित अनेक संज्ञा आणि त्यांना असणारे पारिभाषिक शब्द यांनी पुस्तक समृद्ध केलं आहे. सर्वसामान्य माणसाला तलावाचा पाणी साठवणारा भाग आणि काठ एवढ्या दोनच गोष्टी माहीत असतात, पण पुस्तक वाचताना कळतं की तलावाच्या निरनिराळ्या भागांना स्वतंत्र नावं आहेत. पाल, नीव, आगर, आगौर, नेष्टा, डांट, मोखी इ. भाग हे जणू तलावाचे अवयवच आहेत. पुस्तकातली वर्णनं फक्त एवढ्यावरच थांबत नाहीत. विविध प्रांतात तलावाशी संबंधित संज्ञांना असणारे निरनिराळे प्रतिशब्द, एका ठिकाणच्या शब्दाचे दुसऱ्या प्रदेशात जाताना बदलणारे रूप, काळ पुढे जाईल तसतसे मूळ शब्दांचे होत जाणारे अपभ्रंश अशा अनेक अंगांनी शब्दांचा आणि पर्यायाने संस्कृतीचाही वेध घेतला आहे. ७० पानी असणाऱ्या या पुस्तकात माहितीचा अक्षरशः खजिना आहे.

 

उत्तम मांडणी

 

लेखक अनुपम मिश्र यांचा सखोल अभ्यास पानापानावर उमटलेला आहे. त्यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. पुस्तकाच्या वाचनीयतेचं श्रेय अनुवादक विश्वास भावे यांनाही द्यायला हवं. ते स्वतःदेखील या विषयाचे अभ्यासक असल्याचा अनुवाद करतेवेळी फायदा झाला आहे. अनेक ठिकाणी मूळ हिंदी अथवा प्रादेशिक शब्द त्यांनी तसेच ठेवल्याने पुस्तकाला मातीचा गंध प्राप्त झाला आहे. पुस्तकात उत्तरेकडच्या जलसंस्कृतीवर जास्त भर दिला आहे. दक्षिणेकडचे ‘भगीरथ प्रयत्न’ पुस्तकात अधिक प्रमाणात मांडले गेले असते, तर पुस्तक अधिक व्यापक झालं असतं असं वाटतं. पुस्तक छोटेखानी असलं तरी मांडणीच्या दृष्टीने लक्षवेधी आहे. मुखपृष्ठावरचे गोंदण, आतमधली बिंदुचित्रं पुस्तकाला अधिक उठावदार करतात.

 

 

व्यावसायिक फायद्या-तोट्याचा विचार न करता अशा वेगळ्या विषयावरचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशकांचे आभार मानायला हवेत.

 

हे सगळं वाचत असताना आपण विचारप्रवणही होत जातो. किंबहुना तोच लेखकाचा उद्देश आहे. तलाव बांधणीच्या तंत्राविषयी लिखित स्वरूपात काहीही उपलब्ध नसतानाही कित्येक शतकं, पिढ्यानपिढ्या हे ज्ञान कसं प्रवाहित होत आलं असेल याबद्दल आश्चर्य वाटत राहतं. एवढ्या विपुल ज्ञानाचा खजिना आपल्याकडे असतानाही आज पाणीप्रश्न का भेडसावतो, समाजाच्या एकेका घटकाने तलाव बांधणीच्या एकेका ज्ञानांगाचे जतन केले असूनही पुढे त्यांचा ऱ्हास का आणि कसा झाला, ब्रिटिशांच्या आगमनानंतर हे पिढीजात शहाणपण कसे मोडून काढण्यात आले, त्यांनी आणलेल्या तंत्राच्या आहारी जात आपण आपल्या पारंपरिक ज्ञानाला कसे दूर लोटत चाललो आहोत, अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह करत लेखक आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. अक्षरशः शेकडो-हजारो वर्षांचा इतिहास असलेले आणि अगदी १९८०च्या दशकापर्यंत बऱ्याच अंशी सुस्थितीत असणारे तलाव आपण आपल्या भौतिक प्रगतीच्या हव्यासापोटी कसे नष्ट करत चाललो आहोत, हे वाचून रुखरुख लागते. एकीकडे आपल्या परंपरेचा यथार्थ अभिमान जागृत करत असतानाच 'आज भी खरे हैं तालाब' चं रूपांतर नकळत 'आज बिखरे हैं तालाब' मध्ये होत असल्याची ठसठसती जाणीवही हे पुस्तक करून देत राहतं..

 

लेखक : अनुपम मिश्र

अनुवादक : विश्वास भावे

प्रकाशक : मंगेश र. वाडेकर (अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स, १२४३, सदाशिव पेठ, खुन्या मुरलीधराजवळ, पुणे

आवृत्ती : पहिली (२० नोव्हेंबर, २०१७)

पृष्ठसंख्या : ७२

किंमत : १०० रुपये

 

(टीप : हे पुस्तक कुठे आणि कसे मिळू शकेल यासंबंधी प्रकाशकांच्या कार्यालयीन क्रमांकावर (०२० - २४४७१०६१) अथवा ई-मेलवर ([email protected]) संपर्क साधून चौकशी करता येईल.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@