प्रदर्शनप्रवृत्ती आणि पर्यावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2019   
Total Views |



प्राण्यांच्या बाबतीत शारीरिक सौंदर्य आणि सुदृढता हा जोडीदार मिळवण्यासाठी जसा प्राथमिक निकष ठरतो, तसाच माणसाच्या बाबतीत 'श्रीमंती' हा प्राथमिक निकष बनला आहे. वस्तूंचा अमर्याद वाढलेला उपभोग आणि त्यामुळे संसाधनांची होणारी अपरिमित हानी यामागे ही 'प्रदर्शनप्रवृत्ती' कारणीभूत आहे.


आमच्या घराच्या मागच्या दारी एक प्राजक्ताचं मोठं झाड आहे. अलीकडे दरवर्षी पावसाळ्यात एक नवरंग पक्षी (Indian Pitta) या झाडावर साधारण महिनाभर वास्तव्यास असतो. दिसायला अत्यंत मोहक! महिनाभर त्याचा एकच उद्योग. दिवसभर अखंड ओरडत राहणे. कोकीळसारखाच स्वर, पण तेवढा प्रदीर्घ नाही, अशा तारसप्तकातल्या स्वरात त्याचं 'केकाटणं' सुरू असतं. 'पक्षीही सुस्वरें आळविती' हे कितीही जरी खरं असलं तरी, रोज रोज आपल्या घराजवळ दिवसभर मोठ्या आवाजात कोणी पक्षी ओरडत राहिला, तर आपल्यालाही त्याची 'कटकट' होते! जून-जुलै महिन्यात पाऊस जरा स्थिरावला की हा नवरंग प्राजक्ताच्या झाडावर येऊन गळा काढायला सुरुवात करतो. सकाळी ९-१०च्या सुमारास त्याचं जे 'केकाटणं' सुरू होतं ते संध्याकाळी ४-५ वाजेपर्यंत अखंड सुरू! मग स्वयंपाकघरात जेवण करणारी माझी आई मध्येच वैतागून बाहेर डोकावून त्याला म्हणते, “मेल्या, दिवसभर ओरडून ओरडून तुझं तोंड नाही का रे दुखत? अजून तुला बायको नाही का मिळाली?” अशी करमणूक काही दिवस सुरू असते. काही दिवसांनी एका पक्ष्याच्या आवाजाऐवजी दोन पक्ष्यांचे आवाज यायला लागतात. या नवरंगाने आवाज केला की लगेच तसाच आवाज लांबवरून ऐकायला येतो. अगदी प्रतिध्वनी असल्यासारखा! असं काही दिवस चालतं आणि दोन्ही आवाज अचानक बंद होतात. पुढच्या वर्षीपर्यंत! बेंबीच्या देठापासून, घसा फुटेस्तोवर केकाटणाऱ्या या नवरंगाला अखेर त्याची जोडीदारीण मिळते. त्याचं अविश्रांत 'केकाटणं' सार्थकी लागतं.

 

केवळ 'मुलगी (मादी) पटवण्यासाठी' त्या नराला एवढी सगळी ऊर्जा खर्च करावी लागते. अर्थात, हा निसर्गाचा नियमच आहे. जोडीदाराच्या निवडीचं स्वातंत्र्य प्रत्येक प्राण्याला आणि पक्ष्याला निसर्गाने दिलेलं आहे. काही अपवाद वगळता बहुतांश प्राणी-पक्षी प्रजातींमध्ये मादी नराची निवड करते आणि ती फार काळजीपूर्वक करते. मादीला आकर्षित करण्यासाठी नराला अथक प्रयत्न करावे लागतात. कोकीळ, नवरंग असे पक्षी आणि बेडकासारखे प्राणी आवाजाने मादीला आकर्षित करतात. काही नरांना विणीच्या हंगामात रंगीबेरंगी तुरे येतात, काही पक्ष्यांचा रंग बदलतो. काही पक्षी मादीसमोर नृत्य करतात. अशा विविध प्रकारे नर आपल्या गुणांचं प्रदर्शन करतात. सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्याकडे मादी आकर्षित होते. उदा. गवताळ प्रदेशांत 'तणमोर' नावाचा पक्षी आढळतो. विणीच्या हंगामात हे तणमोर उंच उंच उड्या मारतात. त्यांच्यात 'उंच उडीची' स्पर्धा लागते. सर्वात उंच उडी मारणाऱ्याला मादी पसंत करते. 'Bower Bird' नावाचा पक्षी घरटं बांधताना घरट्याच्या अवतीभवती पानं, फुलं, काटक्या यांची सजावट करतो. त्या सजावटीकडे मादी आकर्षित होते. अनेकदा दोन नरांमध्ये मारामारी लागते आणि मादी त्यांचं निरीक्षण करते. लढाईत जो जिंकतो त्याला मादी पसंत करते. तात्पर्य काय, तर 'बायको मिळवण्यासाठी' नर प्राणीपक्ष्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

 

उत्क्रांतिशास्त्रामध्ये 'handicap principle' नावाचा एक सिद्धांत आहे. १९७५ साली अमॉत्झ झाहवी या इस्रायलच्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम 'handicap principle'चं गृहितक मांडलं. याचा सर्वसाधारण अर्थ असा की, मादीला आकर्षित करण्यासाठी नराला जी काही स्वतःची जाहिरात करावी लागते अथवा प्रदर्शन करावं लागतं, ते प्रत्यक्षात नराला खूप महाग पडणारं असतं. पण, त्याला ते करण्यावाचून काही पर्याय नसतो. मादी आकर्षित होण्यासाठी नरांमध्ये जे काही शारीरिक बदल होतात, त्यांचा प्रत्यक्षात त्यांना त्रास होत असतो. त्याची त्यांना खूप किंमत मोजावी लागते. उदा. मोराचा पिसारा. रंगीबेरंगी 'पिसारा' हे लांडोरीला आकर्षित करण्यासाठी मोराकडे असलेलं एक साधन आहे. मात्र, मोरासाठी प्रत्यक्षात ते ओझं असतं. पाठीवर पिसाऱ्याचं ओझं असल्यामुळे मोर जोरात पळू शकत नाही आणि रानकुत्री त्याची सहज शिकार करू शकतात. जी गोष्ट मोराची तीच सांबराची. सांबराच्या डोक्यावर असलेली शिंगं ही नुसती 'मिरवण्यासाठी' असतात. आपल्या डौलदार शिंगांचं प्रदर्शन करून सांबर मादीला आकर्षित करतं पण वाघ पाठीमागे लागला की ही शिंगं सांबरासाठी ओझं बनतात, पळताना एखाद्या झुडुपात अडकतात आणि ते शिकाऱ्याच्या भक्ष्यस्थानी पडतं. वास्तविक 'पिसारा' ही मोराची गरज नसते आणि 'शिंग' ही सांबराची गरज नसते. हे अवयव प्रत्यक्षात त्यांना उपद्रवी ठरतात. केवळ प्रदर्शन करण्याची आणि मादीला आकर्षित करण्याची ती साधनं असतात.

 

निसर्गातल्या या 'प्रदर्शनप्रवृत्ती'चा मानवी संस्कृती आणि तिच्या पर्यावरणीय परिणामांसंदर्भात अभ्यास होऊ लागला आहे. निसर्गातली असलेली-नसलेली सर्व संसाधनं ओरबाडून कल्पनाही करवत नाही इतक्या अमर्याद वस्तूंचं उत्पादन आज जगात केलं जात आहे आणि त्याचा उपभोग घेतला जात आहे. मात्र, वस्तूंचा उपभोग घेताना त्याची गरज लक्षात न घेता केवळ आपण किती श्रीमंत आहोत याचं प्रदर्शन करणं अथवा 'दुसऱ्याकडे ती वस्तू आहे म्हणजे माझ्याकडे असलीच पाहिजे' ही प्रवृत्ती जास्त आढळते. (तुलनेने) कमी उत्पन्नात, गरजेपुरत्या वस्तू आणि संसाधांमध्ये आनंदी जीवन जगता येत असूनसुद्धा आजच्या तरुण मुलाला 'बायको मिळण्यासाठी' ८० हजार रुपये पगार, शहरात स्वतःचा बंगला, स्वतःची गाडी, घरात टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन या सगळ्या वस्तू एवढी सगळी जमवाजमव करावी लागते. त्यासाठी आरोग्याची आणि पर्यावरणाची कितीही हानी झाली तरी बेहत्तर! प्राण्यांच्या बाबतीत शारीरिक सौंदर्य आणि सुदृढता हा जोडीदार मिळवण्यासाठी जसा प्राथमिक निकष ठरतो, तसाच माणसाच्या बाबतीत 'श्रीमंती' हा प्राथमिक निकष बनला आहे. वस्तूंचा अमर्याद वाढलेला उपभोग आणि त्यामुळे संसाधनांची होणारी अपरिमित हानी यामागे ही 'प्रदर्शनप्रवृत्ती' कारणीभूत आहे. अखेर मोराचा 'पिसारा' आणि सांबराची 'शिंग'च त्यांना भक्ष्यस्थानी पाडतात तशीच माणसाची प्रदर्शनीय सुबत्तेची हाव त्याला निसर्गाच्या भक्ष्यस्थानी पाडेल!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@