८४ वर्षांची परंपरा सैनिकी प्रशिक्षणाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019   
Total Views |



सैनिकी जीवन आणि सैनिकी शिक्षण याबाबत प्रत्येकालाच कमालीचे कुतुहूल असते. सैनिकी प्रशिक्षण आपणही घ्यावे, अशी आस मनाशी अनेकजण बाळगून असतात. मात्र, सुयोग्य प्रशिक्षण प्राप्त होणे त्यात अत्यंत महत्त्वाचे असते. नाशिक येथील ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ अर्थात ’सीएचएमईएस’ या संस्थेच्या माध्यमातून सलग ८४ वर्षांपासून भारतभरातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत सैनिकी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत असते. १ मे ते ३० मे या कालावधीत असणारे हे प्रशिक्षण सध्या गोदा तीरावर सुरू आहे. त्यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बेलगावकर यांनी खास दै. ‘मुंबई तरुण भारत’ ला माहिती दिली. यावेळी डॉ. बेलगावकर यांनी सांगितले की, “संस्थेच्या स्थापनेच्या वर्षी म्हणजे १९३७ मध्ये पहिले उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबीर नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. संस्थापक डॉ. बा. शि. मुंजे यांना सैनिकी शाळा ही मुलींसाठीदेखील सुरू करावयाची होती. मात्र, काही कारणाने ते जुळून आले नाही. म्हणून किमान उन्हाळ्याच्या सुट्टीत का होईना, मुलींना सैनिकी शिक्षण घेता यावे आणि देतादेखील यावे, या धारणेतून त्यांनी १९३७ पासूनच या शिबिरात मुलींसाठीदेखील प्रवेश देण्यास सुरुवात केली.” सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने मुले व मुली अशा दोहोंचे एकत्रित शिबीर हे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये होत असे. त्यानंतर मात्र, शिबिरार्थींच्या संख्येत कालपरत्वे वृद्धी होत गेली. त्यामुळे आजमितीस मुलींसाठीचे सैनिकी प्रशिक्षण शिबीर हे भोसला मिलिटरी महाविद्यालयात आयोजित करण्यात येते तर, मुलांसाठीचे शिबीर हे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आयोजित करण्यात येत असते. यावर्षीच्या या शिबिरात भारतभरातील ३५८ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे, हे विशेष.

 

स्थापनेच्या वर्षापासूनच संस्थेची असणारी मूल्य, शिस्त यामुळे येथे प्रवेशासाठी पालकांचा ओढा असे. मात्र, संस्थेने वर्षाकाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा, याचे धोरण आवश्यक ती संसाधने लक्षात घेऊन निर्धारित केले होते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण इच्छा असूनही घेता येत नसे. नेमकी हीच बाबा हेरून आणि अनेकांपर्यंत सैनिकी शिक्षण पोहोचावे यासाठी डॉ. मुंजे यांनी या शिबिराची आखणी करून हे शिबीर राबविण्यास सुरुवात केली. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, या शिबिरात असणारे रामदंडी आजमितीस आजी आजोबा झाले आहेत. मात्र, ते आपल्या आठवणी आणि या शिबिरातील मूल्य यांची शिदोरी आपल्या नातवंडांसाठी देत असतात व ’मीही या शिबिरात गेलो होतो, तूही जा,’ असे सांगत अनेक आजी-आजोबा आपल्या नातवंडांना या शिबिरात दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. गेली ८४ वर्षे या शिबिराने सातत्याने विश्वासार्हता जोपासली आहे. यातच या शिबिराची महती विशद होते.

 

भारताच्या भावी पिढीत निर्भयता, शिस्त, देशभक्ती आणि सामाजिक भान या चार बाबींची जोपासना व्हावी, या मुख्य उद्देशाने या शिबिराची आखणी करण्यात आलेली आहे. माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक नागरिक हा एक चांगला नागरिक म्हणून आपले जीवन व्यतीत करू शकेल, अशी मानवी मूल्यांची जोपासना या शिबिराच्या माध्यमातून करण्याचा ध्यास या शिबिरात बाळगला जातो. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना कठोर मिलिटरी प्रशिक्षण दिले जाते. नैमेत्तिक परेड, ड्रिल, मार्चिंग यांच्या माध्यमातून एकसंधता जोपासण्याच्या शिकवणुकीबरोबरच, शारीरिक सुदृढता आणि चालण्यातील लयबद्धता यांची जोपासना करण्यावर भर दिला जातो. तसेच, लाईव्ह वेपनच्या माध्यमातून गोळीबारीचेदेखील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. सैनिकी कार्यवाही आणि सैन्य सेवा यात सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक घटक असणारे मॅप रीडिंगचे शास्त्रीय प्रशिक्षण या शिबिरार्थींना प्रामुख्याने दिले जाते. याशिवाय जलतरण, घोडेस्वारी अशा विविध प्रशिक्षणाचा समावेश या शिबिरात असतो. सहभागी शिबिरार्थी हा धीट व्हावा आणि जीवनातील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची कुवत त्याच्यात निर्माण व्हावी, या उद्देशाने मानसिक आणि शारीरिक कस लावणारे प्रशिक्षण यात दिले जाते.

 

कोणतेही शिबीर म्हटले की त्याच्याकडे मनोरंजन, एक विरंगुळा म्हणून पाहिले जाते. शिबीर संपल्यावर त्यातील अर्जित ज्ञान हे खचितच शिबिरार्थींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असते. मात्र, या शिबिराचे वैशिष्ट्य असे की, या शिबिराच्या माध्यमातून प्रेरणा मिळाल्याने गेल्या ८४ वर्षांत अनेक शिबिरार्थी सैन्य दलात सामील झाले आहेत. तसेच, अनेक शिबिरार्थींनी या शिबिरानंतर आपले पुढील अध्ययन करण्यासाठी भोसलाला पसंती दिली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना सैन्य दलात जाण्याची आवड निर्माण व्हावी तसेच, सैन्य दलात जाण्यापूर्वी त्यांना आपली शारीरिक क्षमता आजमावता यावी, यासाठीदेखील हे शिबीर आपली उपयुक्तता सिद्ध करत असते. या शिबिराच्या माध्यमातून १०० किलो वजन असलेल्या विद्यार्थ्याचे वजन ३० ते ४० किलोने कमी झाल्याची उदाहरणे असल्याचे डॉ. बेलगावकर यांनी सांगितले. सकाळी ५.३० वाजता या शिबिराची सुरुवात होते. सकाळी एकत्रित प्रार्थनेनंतर ड्रिल व अनुषंगिक प्रशिक्षण सुरू होते. हे सर्व शिबीर रात्री १०. ३० पर्यंत चालते. तसेच, शिबिरार्थींमध्ये सांघिक वृत्तीची जोपासना व्हावी, तसेच, शारीरिक सुदृढता अंगी बाणावी यासाठी ४० किमी अंतरावर जाऊन येऊन चालणे, विविध मैदानी खेळ, ट्रेकिंग यांचादेखील समावेश या शिबिरात करण्यात येत असतो. तसेच, सर्वांगीण विकासासाठी इलोकेशन स्पर्धा, संगीत स्पर्धा, समारोपाच्या दिवशी देशभक्तीपर थीम आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मॉक सर्जिकल स्ट्राईक, मॉक कमांडो कार्यवाही, पासिंग आऊट परेड, यांचेदेखील शिबिरार्थी सादरीकरण करत असतात.

 

याशिवाय या शिबिरात मानसिक आणि शारीरिक सुदृढतेसाठी योग, जिम्नॅस्टिक यांचेदेखील शास्त्रीय प्रशिक्षण शिबिरार्थींना देण्यात येत असते. या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात दाखल होणाऱ्या शिबिरार्थींना शिबीर काळात म्हणजे महिनाभर टीव्ही, मोबाईल आदी साधने वापरण्याची कोणतीही परवानगी नसते. आजच्या युगात एक महिना या साधनांपासून दूर राहत आनंदी आणि प्रेरणादायी कालखंड हे विद्यार्थी येथे व्यतीत करत असतात. केवळ आठवड्यातून एकदा पालकांना भेटण्याची परवानगी या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली असते. त्यासाठी रविवारी पालक येथे दाखल होत असतात. पहिल्यांदा होमसीक असणारे विद्यार्थी महिनाभराच्या वास्तव्यानंतर कॅम्पसिक झाल्याचे चित्र येथे गेल्या ८४ वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. १५ ते २० वर्ष वयोगटाची मुले आणि मुली या शिबिरात असतात. त्या सर्वांचा विमा हा संस्थेच्या वतीने काढण्यात येत असतो. तसेच, आरोग्याची एखादी समस्या निर्माण झाल्यास संस्थेच्या बालाजी हॉस्पिटल आणि संस्था सलग्न असलेल्या श्रीगुरुजी रुग्णालयात शिबिरार्थींवर उपचार केले जात असतात. इतर संस्थादेखील असे प्रशिक्षण देत असतात. मात्र, आपले वेगळेपण काय असे विचारले असता डॉ. बेलगावकर सांगतात की, “येथे लष्करातील निवृत्त सैनिक आणि सरकारी संस्थांतून प्रशिक्षित मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.” आपल्या कार्यातून राष्ट्रभक्तीची ज्योत तब्बल ८४ वर्ष प्रज्वलित ठेवणाऱ्या सीएचएमईएस संस्थेचे हे शिबीर खऱ्या अर्थाने सैनिकी जीवनाची जोपासना करणारा अविभाज्य घटक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@