बुरख्यावर बंदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019
Total Views |



जे मुस्लीम देश अथवा स्थानिक मुस्लीम समाज कट्टरतेकडे वळले आहेत त्यांनी महिलांना पायघोळ पोषाख आणि डोळेसुद्धा जाळीमागे दडविण्यास भाग पाडणारा, शिवलेला नखशिखान्त बुरखा घालण्याची सक्ती अंमलात आणली आहे. ते महिलांच्या शरीर स्वास्थ्यासाठी कितपत योग्य आहे, याचा विचार धर्ममार्तंड करण्यास तयार नाहीत. त्याचवेळी वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंग झाकून घेण्याची आवश्यकता भारतासारख्या उन्हाचा चटका बसू शकणाऱ्या देशात सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात पडते आहे. या गोष्टी लक्षात घेता बुरख्याआड धार्मिक कारण देत स्वतःची ओळख पटविली जाण्यासाठी अडथळा करणारा बुरखा घालू नये, असे अपेक्षित आहे. त्याला धार्मिक कारण बनविणे अयोग्य आहे.


श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट व लगेच झालेल्या अतिरेक्यांबरोबरच्या चकमकींमध्ये आत्मघातकी हल्ले करून स्वतःलाच उडवून घेणाऱ्यांमध्ये एका महिलेचा समावेश होता. हे लक्षात घेता श्रीलंका सरकारने नव्हे, तर श्रीलंकेच्या ‘ऑल सिलोन जमिय्याथुल उलामा’ या प्रमुख मुस्लीम संघटनेने एक निवेदन काढून स्थानिक मुस्लीम नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी बुरखा, नकाब इ. न घालता सुरक्षा दलांच्या बरोबर सहकार्य करावे (इंडियन एक्सप्रेस, दि. २७ एप्रिल, २०१९). याचवेळी श्रीलंका सरकारने आणीबाणी जाहीर केल्याने कोणाही व्यक्तीची तपासणी करण्याचे अधिकार सुरक्षा दलांना मिळाले. त्यात त्या व्यक्तीने बुरखा घातला असल्यास तो बाजूला सारून स्वतःची ओळख पटवून देण्याचे बंधन आपोआप त्यात आले. मध्य-पूर्वेत इसिसचा उदय झाल्यावर त्यापासून प्रेरणा घेऊन युरोपातील अनेक देशांत स्थानिक मुस्लिमांनी हल्ले घडवून आणले आणि ते करून बुरख्याच्या आड पळून गेल्याचा संशय असल्याने अनेक पश्चिम युरोपातील देशांनी बुरखा घालण्यावर बंदी घातली. बुरखा घालणे ही अनेक पंथांच्या मुस्लीम समाजातील प्रस्थापित रूढी जरी असली तरी, धार्मिक स्वातंत्र्य देणाऱ्या सेक्युलर असणाऱ्या त्या युरोपातील देशांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे समर्थन केले. ती बंदी अजूनही सुरूच आहे. श्रीलंकेत तर खुद्द प्रमुख मुस्लीम संघटनेनेच एका दृष्टीने बुरखा न घालण्याचा फतवा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने भारतातही एका वृत्तपत्राने-दै. ‘सामना’ने बुरख्यावर बंदी घालावी, असे प्रतिपादन केल्याने वादविवादांचा गदारोळ सुरू आहे. सध्याच्या निवडणुकीच्या धुराळ्यात त्याने भर घातली आहे. ‘बुरखा घालणे’ ही धार्मिक आज्ञा आहे काय? कुराण आणि हदीस या ग्रंथांमधून काय सांगितले गेले आहे? त्या प्रथेची सुरुवात कशी झाली इ.चा तपशील पाहिल्यास ‘बुरखा बंदी’ असावी काय याबाबत योग्य निर्णय घेता येऊ शकतो.

 

बुरख्याची प्रथा

 

बुरख्याची आणि केस झाकून ठेवण्याची प्रथा तशी इस्लाम पूर्व आहे. बुरखा कसा असावा, मुस्लीम महिलांनी आपले शरीर कसे आणि कितपत झाकून घ्यावे याच्या संदर्भात रूढींची विविधता आहे. ती वाळवंटी प्रदेश असलेल्या अरबस्थानात आणि मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये फार पूर्वीपासून प्रचलित आहे. अत्यंत उष्ण आणि कोरडे वातावरण असलेल्या अरब देशांमध्ये महिलाच नव्हे, तर पुरुषसुद्धा पायघोळ पोषाखात वावरतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. अरब पुरुष केवळ चेहरा दिसणारा पोषाख घालतात. तिथे महिलांनी ही प्रथा कसोशिने पाळली, तर नवल वाटायला नको. गेल्या दोन-तीन दशकांपासून भारतातही उन्हाचा ताप वाढतो आहे. विशेषतः मुली व तरुण महिला उन्हातून जाताना आपले हात-पायच नव्हे, तर अर्धा अधिक चेहरा झाकून घेऊन फिरताना दिसतात. याचे कारण त्यांच्या त्वचेवर उन्हातील अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा काळी पडते, तेव्हा महिलांनी आपले शरीर चेहऱ्यासकट झाकून बाहेर पडल्यास वावगे ठरू नये. पण त्यातून व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर करण्यात येत असेल, तर ते राष्ट्र सुरक्षेच्या संदर्भात आक्षेपार्ह धरले जावे.

 

कुराणातील संदर्भ

 

कुराणात जेमतेम तीन-चार आयतांमधून महिलांच्या पोशाख विषयक निर्देश आले आहेत. सुरा (अध्याय) क्र. २४ अन् नुरमध्ये आलेल्या आयतांमध्ये प्रथम मुस्लीम पुरुषांनी कामुक नजरेने महिलांकडे पाहू नये आणि गुप्तांगे म्हणजे नाभी ते गुडघे हा भाग झाकून ठेवावा, असे दिले आहे (२४.३०). महिलांच्या बाबतीत हे पैगंबर श्रद्धावंत (मुस्लीम) स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्या आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आपला साज श्रृंगार दर्शवू नये, त्या व्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर ओढणीचा पदर घालून ठेवावा (प. कु. २४.३१). यानंतर मुस्लीम स्त्रियांनी कुटुंब परिवारातील कोणत्या सदस्यांसमोर साजश्रृंगार दाखविल्यास हरकत नाही याची यादीच दिली आहे. त्यात पती, पिता, सासरे, मुले-बाळे, ओळखीच्या महिला इ. समाविष्ट आहेत. ही आयत अर्थातच कुराणाच्या सर्वच भाषांतर आणि अभ्यासकांना महत्त्वाची वाटल्याने त्यावर खोलात जाऊन भाष्ये झाली आहेत. मला जे महत्त्वाचे आणि सर्व समावेशक वाटते त्या संपादक सय्यीद होसेन नस्रच्या भाष्यात दिल्याप्रमाणे ओढून घेण्याचे वस्त्र, खुमरिन(अनेक वचन) हे शिवलेले नसे. ते लांब ओढणीसारखे असल्याचे तो नमूद करतो. ही खीमर (एक वचन) डोक्यावरून घेण्याची पद्धती इस्लामपूर्व काळापासून होती. महिलांच्या वागण्यात उत्तानपणा दिसू नये यासाठी कुराणात वक्षस्थळांवरून घेण्याच्या वस्त्राचा समावेश झाला. लांब ओढणीचा उपयोग केस, वक्षस्थळे आणि पाठ झाकणे अशासाठी केला जातो. ही ओढणी शिवलेली नसते. ती भारतातही वापरली जाते. दुसऱ्या दोन आयता या प्रथमतः तर पैगंबर मोहम्मदांच्या पत्न्यांसंदर्भात आणि सर्वसाधारण मुस्लीम महिलांच्या संदर्भात आल्या आहेत. पैगंबर मोहम्मद मदिनेस आल्यावर त्यांच्या अनुयायांच्या संख्येत बरीच वाढ झाली. पैगंबरांच्या घरी त्यांचा राबता वाढला. एकत्र खाणेपिणे, सल्ला मसलती वाढल्या. त्यावेळी घरातील महिलांना उपसर्ग न व्हावा या संदर्भात त्या आयता आल्या आहेत. त्या अल् अहजाब (क्र. ३३) या सुरेत येतात. हे लोकहो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, नबी (स. पैगंबरांच्या)च्या घरांत विनापरवानगी प्रवेश करू नका. जेवणाच्या वेळेवरही नजर राखून असू नका, जर तुम्हाला जेवायला बोलाविले गेले तर अवश्य या. परंतु, जेवण उरकले की निघून जा. गोष्टी करण्यात लागू नका. तुमच्या या कृती नबी(स.) यांना त्रास देतात. परंतु, ते संकोचाने काही बोलत नाही, आणि अल्लाहला खरी गोष्ट सांगण्यास संकोच वाटत नाही. नबी(स.)च्या पत्नींपासून जर तुम्हाला काही मागायचे असल्यास पडद्याआडून मागत जा, ही तुमच्या आणि त्यांच्या हृदयाच्या निर्मळतेची अधिक उचित पद्धती आहे. तुमच्याकरिता ते कदापि वैध नाही की अल्लाहने पैगंबर(स.) यांना तुम्ही त्रास द्यावा आणि हेदेखील वैध नाही की त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नींशी विवाह करावा. हा अल्लाहजवळ फार मोठा गुन्हा आहे.(३३.५३)

 

पैगंबर मोहम्मदांनी जेव्हा झैनाब बिंत जहश या महिलेशी निकाह लावला त्यावेळी समारंभ उलटून गेल्यावरही तेथे रेंगाळणाऱ्या काही पुरूषांच्या संदर्भातही आयत आली आहे. या आयतीत पैगंबरांच्या पत्न्यांशी बोलताना पडदा पाळण्याची आज्ञा आहे. मागल्या शतकाच्या मध्यापर्यंत जुन्या पिढीतील स्त्रिया घरी आलेल्या अनोळखी पुरुषांशी दाराआडून बोलत असत किंवा पडद्याआडून बोलत असत. पैगंबरांना आपल्या अनुयायांना ते दुखावले जातील यासाठी जे स्पष्टपणे सांगता येत नव्हते ते या आयतीत सुचविले गेले आहे. हे नबी (महंमद), आपल्या पत्नी, मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की बाहेर पडताना आपल्या ‘जिल्बाब’ (चादरी) स्वतःवर आच्छादून ठेवा. ही अधिक योग्य पद्धत होय, जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये.(३३.५९) यात स्वतःला झाकून घेण्याचा मुद्दा रस्त्याने जाताना आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्याच्या संदर्भात आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, कोणत्याही आयतीत चेहरा पूर्ण झाकून घ्या. डोळेच फक्त दिसू द्या. डोळेसुद्धा जाळीने झाकून टाका व त्यासाठी शिवलेले वस्त्र चालेल इ. गोष्टींचा उल्लेख नाही. महिलांनी तसेच पुरुषांनीही तंग कपडे घालून प्रदर्शन करू नये, अशी यामागची दृष्टी होती. पुरुषांनीही पायघोळ ढिले कपडे घालावे अशीच प्रथा मुस्लीम देशात आहे. आपल्याकडे दोन दशकांपूर्वीपर्यंत ढिले-ढिले पठाणी कुर्ता-पायजामा घालणारे मुस्लीम पुरुष व बुरख्यात नखशिखान्त लपलेल्या मुस्लीम स्त्रिया कमी असत. पण अमेरिकेत २६/११ च्या हल्ल्यानंतर अल-कायदा आणि अतिरेकी संघटनांचे प्रस्थ वाढल्यावर जगभरात सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये स्वतःची ओळख वेगळी पटविण्याची चढाओढ निर्माण झाली. तिला भारतात खतपाणी घालण्याचे काम मुस्लिमांचे लांगूलचालन मतपेढीसाठी करणाऱ्या पक्षांनी केले. काही ठिकाणी मतदानासाठी ओळख पटविण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणीही मुस्लीम महिलांनी धर्माचे काऱण देत नकार देण्याच्या घटना घडल्या. अनेक अतिरेकी, बराच काळ लपून राहू शकतात. यामागे बुरख्यात लपण्याची युक्ती ते अवलंबवित असावेत. कारण, बुरख्यातील महिलेला कमीतकमी तोंडावरील आवरण काढून ओळख पटविण्यास भाग पाडावे यासाठी लागणारी इच्छाशक्ती पूर्वीचे प्रशासन आणि पोलीस खाते गमावून बसले होते. श्रीलंका काय किंवा भारतात काय बुरख्याच्या आडून देशविरोधी कारवाया, पळून जाण्याची वाट मिळू नये यासाठी बुरख्यावर बंदी घालणे श्रीलंका तसेच इतर अनेक देशांना भाग पडले ही वस्तुस्थिती आहे.

 

बुरख्यावर बंदी असावी?

 

महिलांनी शरीर, अंगप्रत्यंग झाकण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यात डोक्यावर रूमाल गुंडाळून, केसही झाकून चेहरा उघ़डा ठेवणे असा पर्याय अनेक मुस्लीम देशांत प्रचलित आहे. जे मुस्लीम देश अथवा स्थानिक मुस्लीम समाज कट्टरतेकडे वळले आहेत त्यांनी महिलांना पायघोळ पोषाख आणि डोळेसुद्धा जाळीमागे दडविण्यास भाग पाडणारा, शिवलेला नखशिखान्त बुरखा घालण्याची सक्ती अंमलात आणली आहे. ते महिलांच्या शरीर स्वास्थ्यासाठी कितपत योग्य आहे, याचा विचार धर्ममार्तंड करण्यास तयार नाहीत. त्याचवेळी वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंग झाकून घेण्याची आवश्यकता भारतासारख्या उन्हाचा चटका बसू शकणाऱ्या देशात सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात पडते आहे. या गोष्टी लक्षात घेता बुरख्याआड धार्मिक कारण देत स्वतःची ओळख पटविली जाण्यासाठी अडथळा करणारा बुरखा घालू नये, असे अपेक्षित आहे. त्याला धार्मिक कारण बनविणे अयोग्य आहे. चेहरा पूर्णपणे झाकून ठेवण्याच्या प्रथेवर मात्र बंधन आणून कमीतकमी ओळख पटविण्यासाठी तो झाकू नये, अशी व्यवस्था निर्माण करता येईल. मी मलेशियात ती पद्धत पाळताना पाहिली. जाता जाता एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी आहे. असदुद्दीन ओवेसीसारख्या आगखाऊ नेत्याने बुरख्याच्या प्रश्नाला धार्मिक रंग दिला असला तरी, मल्लापुरम या मुस्लीम बहुल जिल्ह्यातील एक मुस्लीम शिक्षण संस्थेनेच विद्यार्थिनींनी बुरखा घालण्यावर बंदी घातल्याची बातमी दि. ३ मे रोजी प्रसारित झाली. तेव्हा नखशिखान्त बुरखाही घालूनच वावरणे ही धार्मिक बाब बनवता येणार नाही. या तऱ्हेचा नवा कायदा कायदा अथवा रूढी अंमलात आणायला मुस्लीम समाजालाही हरकत असू नये.

 

- प्रमोद पाठक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@