समजदारास इशारा पुरेसा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2019
Total Views |


 

खान मार्केटच्या कॅफेटेरियात आता कॉफीच मिळते, असे गमतीने म्हटले जाते. मोदींचे मंत्रिमंडळ मोदींच्या इच्छेपूर्वी कुणालाही कळत नव्हते. त्यात बरेच अर्थ दडले आहेत.


अक्षय्य राजसत्तेचे प्रतीक असलेला जयपूर स्तंभ. त्यावर चारही दिशांवर डोळे रोखून पाहात असलेले गरूड पक्षी. दुसऱ्या बाजूला सांची स्तूपापासून प्रेरणा घेऊन उभे असलेले भव्य-दिव्य असे राष्ट्रपती भवन आणि त्याच्या मुख्य दारात असलेली भगवान बुद्धाची प्रतिमा. या दोन्हींच्या मध्ये रंगलेला नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. राष्ट्रपतींनी सुरू करून दिलेल्या शपथ कार्यक्रमानंतर कोण शपथ घेणार, याची चर्चा आणि उत्कंठा काही केल्या संपत नव्हती. बरोबर पाच मिनिटे आधी पंतप्रधान येऊन पोहोचले आणि व्यासपीठावर येऊन बसलेल्या लोकांमध्ये चैतन्याची लाट उसळली. मंत्रिमंडळात कोण असेल याची उत्कंठा शेवटपर्यंत ताणलेली राहिली, त्याचे मुख्य कारण म्हणजे, माध्यमांत किंवा कुठल्याही राजकीय पंडिताकडे कुठल्याही प्रकारची ठोस माहिती उपलब्ध नव्हती. साडेचारपर्यंत पंतप्रधान कार्यालयाकडून ज्यांना फोन केले गेले, तीच मंडळी पोहोचली. संध्याकाळी शेवटच्या दहा मंत्र्यांचे शपथविधी व्हायचे बाकी असतानाच, निरनिराळ्या वाहिन्यांवर चर्चा सुरू झाली, ती ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत, त्यांना का डावलले गेले याची. राजकीय पंडितांना या वाहिन्यांवर यायला लागते ते स्वत:च्या अस्तित्वासाठी. त्याचा ज्ञान, भाषा, राजकीय घडामोडींविषयीचे त्यांचे मत याच्याशी काहीच देणेघेणे नसावे, असे वागण्याची रीत इथे सुरू झाली. ‘सुषमा स्वराज यांना का डावलले?’ असा प्रश्न एका सह्भाकर्त्याने जाहीर केला आणि त्यातून पुढे जी काही चर्चा झाली, त्याला तोड नाही. बाकीच्या मंत्र्यांच्या नावेही असाच कांगावा सुरू होता.

 

मोदी कोणत्या प्रकारची कोडी या देशातील माध्यमांना घालत आहेत आणि ती सोडविण्यात ही मंडळी कशी फसत आहेत, हे समजून घेणे हे मोठे मजेशीर आहे. या सगळ्या प्रक्रियेत माध्यमांच्या हाती काहीच लागू न देण्यातून मोदींनी ज्या गोष्टी साधल्या, त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मंत्रिमंडळाचे विस्तार किंवा मंत्र्यांच्या नेमणुका या मोठ्या आर्थिक चलनवलनाचा विषय आहेत, याचा गौप्यस्फोट झाला होता तो नीरा राडिया टेप प्रकरणात. कशाप्रकारे कुणी खाजगी व्यक्ती आपण कुणाला मंत्री करू शकतो, याचा दावा करते आणि त्याच्याकडून आपली कामे कशी करून घेता येतील, याचेही प्रतिदावे करते, हे या टेपमधून पुढे आले होते. हा मामला फक्त इथे संपत नव्हता. यात पुढे देशातल्या एका मोठ्या चॅनलच्या पत्रकार महिलेचे नाव पुढे आले आणि नंतर त्याच मोठ्या चॅनलच्या ताळेबंदातून अनेक प्रकार पुढे यायला सुरुवात झाली. केवळ मंत्रिमंडळाची नेमणूक हा दिल्लीतल्या एका मोठ्या वर्गाला कसा शकुन ठरतो, त्याचे हे उघडकीस आलेले उदाहरण होते.

 

मोदींनी पहिला घाव घातला तो इथे. या सगळ्यांची दुकानेच इथे बंद झाली. कुठल्याही विद्यमान मंत्र्यांचा उपमर्द न करता प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मोदींनी दिली होती. आता आपल्या टीममध्ये कोण असावे, हे ठरविण्याचा अधिकार आपल्या संघाचा ‘कप्तान’ म्हणून निश्चितपणे मोदींचाच आहे. दिल्लीच्या राजकारणाला एक वेगळी सवय आहे. कोणीही इथे स्थिर झाला की, तो आपले बस्तान बांधायला पाहातो. मोदींनी ही ‘काँग्रेसी’ पद्धत मोडून टाकली. आता अशा प्रकारचे कॅम्प दिसत नाहीत. ते गेल्या पाच वर्षांतही फारसे पाहायला मिळाले नव्हते. हे कॅम्प मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाणघेवाण करायचे. त्याबदल्यात त्यांच्यावर वर्तमानपत्रात परिच्छेद छापले जायचे आणि हळूहळू कंत्राटे व इतर कितीतरी पद्धतीने कामे करण्यासाठी दलालांना फट सापडायची. कोणे एकेकाळी इंग्रजीतील ‘यू’ आकारात वसलेले हा बाजार निर्वासितांनी बांधलेल्या घरांसाठी ओळखले जायचे. मात्र, नंतर देशभरातून येणाऱ्या दलाल आणि दलालांना भेटू इच्छिणाऱ्या मंडळींचा भरणाच इथे झाला. इथली महागडी दुकाने, फळे, भाज्या, शोभेच्या वस्तू या एखाद्या विशिष्ट वर्गातील मंडळींनीच इथे पोहोचावी अशा प्रकारच्या किमतीला विकली जातात. मग इथे येणाऱ्यांचा वर्ग निश्चित होतो. दिल्ली हे केवळ राजकारणावरच चालणारे शहर आहे. तिथे राजकारणाची म्हणून जी जी काही उपअंगे आहेत, त्यांच्या आधारावर दिल्ली चालते. अन्य कुठल्याही राज्याप्रमाणे कृषी, उत्पादन, उद्योग ही दिल्लीची खासियत नाही. देशभरात चालणाऱ्या उद्योगांच्या करातून हे शहर चालते. ‘ल्युटंट दिल्ली’ म्हणून जे काही ओळखले जाते, त्याचा जीव खान मार्केटमध्ये दडलेला आहे.

 

मोदींनी आपल्या भाषणात कुचेष्टेने खान मार्केटचा उल्लेख केला होता. निरनिराळी हॉटेल्स आणि दुकानांनी सजलेले हे मार्केट गेल्या कितीतरी वर्षांपासून आपल्या मीटिंग पॉईंटसाठी प्रसिद्ध होते. दिल्लीतल्या खूप मोठमोठ्या सरकारी कंत्राटांची देवाणघेवाण इथे होते, असे सांगितले जायचे. आजी-माजी राजकारणी, सनदी अधिकारी, माध्यमविश्वातले मार्केटिंगचे लोक या सगळ्यांसाठी असलेला हा अड्डा म्हणजे खान मार्केट. असल्या उद्योगाचे एक समांतर चालणारे विश्वच इथे सक्रिय होते. ब्रिटनमधल्या मजूर पार्टीला गमतीने ‘शॅम्पेन सोशालिस्ट’ असे चिडविले जात असे. ‘खान मार्केट गँग’ हा देखील असाच काहीसा प्रकार. हा सगळा प्रकार आता बंद झाला आहे. ज्या प्रकारची शपथ शपथविधीमध्ये घेतली जाते, त्याचे तंतोतंत पालन सरकारात काम करणाऱ्या मंडळींच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे खान मार्केटमधल्या कॅफेटेरियात आता फक्त कॉफीच मिळते, असे गमतीने म्हटले जाते. ज्या ‘नव्या भारता’च्या चर्चा गेले काही महिने चालू आहेत, त्या आधी खान मार्केटसारखी ठिकाणे ज्या उद्देशासाठी निर्माण झाली आहेत, ती त्यासाठीच चालली पाहिजे. ज्या मंडळींना आज केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, ते पाहिले तर लक्षात येईल की, इथे कोणालाही पोहोचता येऊ शकते. कष्ट करायची तयारी असली पाहिजे आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रतापचंद्र सारंगींसारखी माणसं जेव्हा या मंत्रिमंडळात जाऊन पोहोचतात, तेव्हा समजणाऱ्यांना इशारा पुरेसा ठरतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@