छाया दुष्काळाची... गरज एकत्रित प्रयत्नांची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2019   
Total Views |



टेकड्यांवर वसलेले नाशिक शहर. ‘धरणांचा जिल्हा’ म्हणून असणारी ओळख, पूर्वीचे ‘गुलशनाबाद’ अशी ख्याती. अगदी मराठवाड्याचीदेखील तहान भागविणारा नाशिक जिल्हा आज जीव हेलावून टाकणाऱ्या दुष्काळाचा सामना करताना दिसत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.


नाशिक जिल्ह्यात अर्जुनसागर, केल्झार धरण, गंगापूर धरण, गिरणा धरण, चणकापूर धरण, लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, करंजवन, तिसगाव, ओझरखेड, वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण इत्यादी धरणे आहेत. तरीही आज नाशिक जिल्हा पाण्याला मुकत असल्याचे चित्र आढळते. या पार्श्वभूमीवर एकत्रित प्रयत्न करून दुष्काळावर उपाययोजना करण्याची गरज आहे. निसर्गचक्रात मानवाने हस्तक्षेप केला की, त्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. अनेकविध कारणांनी बहरलेल्या वृक्षांची करण्यात आलेली बेमालूम कत्तल यामुळे नाशिकचे पर्यावरणाचे गणित निश्चितच बदलले आहे. पुण्या-मुंबईइतके औद्योगिकीकरण झालेले नसतानाही नाशिकमध्ये वाढणारा उष्मा आता खरोखरच चिंतनाचा विषय झाला आहे. वनतोडीवर नसणारे निर्बंध आणि वनसंवर्धनाची झालेली उपेक्षा यांची परिणीती म्हणजे २०१८ मध्ये नाशिकमध्ये झालेले कमी पर्जन्यमान. यासाठी स्थानिक कारणांशिवाय राज्य ते वैश्विक स्तरावरील अनेक कारणे कारणीभूत असतील, यात शंका नाहीच. मात्र, स्थानिकांनी आपल्या हातात असणारे आपण गमावले आहे का, याचा विचार मात्र नक्कीच करावयास हवा. तर, २०१८ च्या कमी पर्जन्यमनाची परिणीती म्हणजे सन २०१९ मध्ये जिल्ह्यात जाणवत असणारा प्रचंड दुष्काळ. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, नांदगाव, मालेगाव, येवला, देवळा, इगतपुरी, चांदवड, बागलाण आणि नाशिक या नऊ तालुक्यांत गंभीर आणि मध्यम अशा दोन्ही स्वरूपांचा दुष्काळ जाणवत आहे. पाण्यासाठी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात रिकामे हंडे, बादल्या घेऊन चातक पक्ष्याप्रमाणे पाण्याची वाट पाहात मैलोन्मैल लागलेल्या नागरिकांच्या रांगा, मन हेलावून टाकणारे पशुधनाचे हंबरडे, सुकलेल्या चाऱ्यावर गुजराण करणारे पशुधन, पशुधनास तो सुकलेला चार अगतिकपणे खाऊ घालणारा पशुपालक असे चित्र सध्या नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. भेगाळलेली जमीन, जळणारी पिके, बोडके झालेले डोंगरमाथे आणि भविष्याची शाश्वती नसणारा बळीराजा म्हणजे नाशिक जिल्हा, ही आजची नाशिक जिल्ह्याची ओळख आहे.

 

नाशिक जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या गोदावरीचे उगमस्थान आहे. तसेच, गिरणा, मोसम, दारणा यांसारख्या महत्त्वाच्या नद्यादेखील येथूनच प्रवाहित होतात. त्यामुळे पाणी नाही, असे काही चित्र नाशिक जिल्ह्यात नाही. तरीही दुष्काळाची दाहकता नाशिक जिल्ह्याला जाणवत आहे, यामागे केवळ ‘योग्य नियोजनाचा अभाव’ हेच कारण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले, हे जरी खरे असले तरी, एवढी विदारक परिस्थिती यावी, इतकेदेखील पर्जन्यमान कमी झालेले नाही. मात्र, भूजलाची खालावलेली पातळी आणि भूजलातून करण्यात आलेला वारेमाप पाण्याचा उपसा याचे फळ म्हणून जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत आहे. भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याची विभागणी करावयाची झाल्यास पठारी आणि डोंगरमाथ्यावरील वनवासीबहुल प्रदेश अशी करावी लागेल. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, घोटी, पेठ हे पाच तालुके वनवासी तालुके आहेत. तर, उर्वरित सर्व १० तालुके हे पठारी भागात समाविष्ट होतात. यातील वनवासी तालुक्यांचा पाणीप्रश्न हा पठारी प्रदेशातील तालुक्यांपेक्षा वेगळा आहे. तिथे पर्जन्यमान मुबलक असले तरी, डोंगरउतारामुळे तेथे जलसंधारण होत नाही. तेथे उभारण्यात आलेल्या जलप्रकल्पांचा फायदा हा नजीकच्या राज्याला किंवा दूरवरील प्रदेशाला होत आहे. त्यामुळे येथे भूजल पातळी वाढेल, जलसंधारण होईल, अशा स्वरूपाचे कार्य केल्यास येथील दुष्काळी स्थितीचा सामना करणे सहजसाध्य आहे. तसेच, उर्वरित जो पठारी प्रदेश आहे. तेथे वनवासी क्षेत्रापेक्षा जास्त नागरीकरण झाले आहे. त्यामुळे उद्योगधंदे, कृषी, निवासी क्षेत्र यांची वाढदेखील या प्रदेशात झाल्याचे दिसून येते. वाढलेले नागरिकीकरण आणि त्या अनुषंगाने भासणारी इतर निकड यांची पूर्तता करण्यासाठी येथे भूजलाचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या भागाची भूजलपातळी कमालीची खालावलेली आहे. त्यामुळे या भागात भूजलपातळीत वाढ करणे आवश्यक असून त्या माध्यमातून येथील दुष्काळी स्थितीवर नियंत्रण मिळविता येणे सहज शक्य आहे.

 

पठारी भागातील मनमाडचा प्रश्न अजून वेगळाच आहे. मनमाडच्या जवळपास कोणतेही धरण नाही. त्यामुळे मनमाडचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावायचा असल्यास तेथे सक्षम पाईपलाईनशिवाय दुसरा पर्याय नाही. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सुयोग्य नियोजन असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेवखंडी भागात नुकतीच प्रथम पाण्याची टाकी बांधण्यात आली, मग पाईपलाईन टाकण्यात आली आणि शेवटी विहीर खोदण्यात आली. या उफराट्या क्रमाने काम केल्यावर लक्षात आले की, विहिरीला पाणीच नाही. त्यामुळे सर्व खर्च, वेळ आणि ऊर्जा वाया गेली. त्यामुळे दुष्काळाबाबत कार्य करताना त्याच्या नियोजनात संवेदनशीलता आणि विवेक यांचा संगमदेखील नाशिक जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्थांनीदेखील पाणी या विषयावर कार्य केले. त्यामुळे अनेक तालुके टंचाईमुक्त झाले आहेत. शासनदेखील सध्या आपले पालकत्व निभवत आहे. मात्र, जिल्हावासीयांनीदेखील जलसंधारणाची कामे हाती घेतल्यास सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नांतून यावर मात करता येणे सहज शक्य आहे. नाशिक जिल्ह्यात दोन ते पाच टक्के गावे सोडली तर, प्रत्येक गावात दोन ते तीन किमी अंतरावर एक तरी पाण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत लक्षात घेऊन जिल्ह्यात जलसंधारण करणे सहज शक्य आहे. दुष्काळी स्थितीत होणारे स्थलांतरण हेदेखील आव्हान असून भारताला महासत्तेच्या स्थानी पोहोचविताना आपल्याला केवळ भूजल पातळीत वृद्धी करूनच मार्ग काढता येऊ शकेल. ‘सर्व काही सरकार करेल’, असा विचार करण्यापेक्षा तरुणाईने आपल्या गावात जलसंधारणाची कामे हातात घ्यावी. तसे झाले तर निश्चितच येणारा पावसाळा हा जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीच्या दिशेने टाकलेल्या प्रयत्नांची नांदी ठरेल, यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@