काँग्रेससमोर पर्याय मर्यादितच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2019
Total Views |



खरेतर काँग्रेसची आजची अवस्थासमोर अंधारच अंधार पसरला आहे,’ अशी झाली आहे. त्यांना या पराभवाचे नीट आकलनही होऊ शकत नाही आणि खुल्या मनाने मोदींना त्यांच्या यशाचे श्रेय देण्याची दानतही त्यांच्याजवळ नाही. औपचारिकता म्हणून त्यांनी पराभव स्वीकारला असेलही, पण जेव्हा ते कालांतराने पुन्हा तलवारी उपसून बाहेर पडतील, तेव्हा मोदींचा विजय किती बोगस होता, हे रसभरीत वर्णन करून सांगायला विसरणार नाहीत.


२०१९च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड पराभवानंतर आज काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचाली कुणाला ‘नाटक’ वाटतील किंवा कुणाला त्यातून वेगळा अर्थही काढता येईल. पण, कसाही विचार केला तरी ‘काँग्रेससमोर आज अतिशय मर्यादित पर्याय आहेत,’ या निष्कर्षाप्रतच यावे लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या निवडणुकीत मोदींचा एवढा नेत्रदीपक विजय होईल, असे कुणालाच वाटत नव्हते. अगदी मोदीसमर्थकांनाही नाही. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर तर त्यांना पराभवाची धास्तीसुद्धा वाटत होती. त्या काळात नागपुरात काँग्रेस पक्ष हा ‘डीएमके’ (दलित-मुस्लीम- कुणबी) फार्म्युला वापरत आहे, अशी वार्ता जेव्हा वृत्तपत्रांच्या माध्यमातून पसरली, तेव्हा ते ‘डेडली कॉम्बिनेशन’ ऐकून भल्याभल्यांच्या उरात धडकी भरली होती आणि नागपुरातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान पाहिले तर त्याची प्रचितीही येते. नागपुरात भाजपचे सहाही आमदार असताना, ते सक्रिय असताना, राज्याचे मुख्यमंत्रीही नागपूरकर असताना आणि गडकरींच्या कामाचा झपाटा, त्यांची लोकप्रियता यांची यथातथ्य जाणीव असतानाही, या शहरात काँग्रेसला उत्तर नागपूरमध्ये आघाडी कशी मिळू शकते व इतर मतदारसंघांत नाना पटोले बाहेरचे ‘पार्सल’ असतानाही त्यांना इतकी मते कशी मिळू शकतात, हे एक आश्चर्यच आहे. समाधानाची बाब एवढीच आहे की, भाजपने शतप्रतिशत मतदानासाठी निकराचे प्रयत्न केले, गडकरींचे कामही कामी आले आणि भाजपच्या यंत्रणेत अतिआत्मविश्वास निर्माण झाला नाही. म्हणून गडकरींना हा विजय मिळाला. मला तर असे वाटते की, ‘डीएमके फार्म्युला’ अतिआत्मविश्वास निर्माण न होऊ देण्यास कारणीभूत ठरला व तेथेच काँग्रेसचा तो फार्म्युला गारद झाला. हीच परिस्थिती स्थानपरत्वे थोड्याफार फरकाने इतरत्रही निर्माण झाली होती. कुणी पहिल्या दोन वा तीन फेऱ्यांमधील भाजपच्या यशाचे प्रमाण व उर्वरित फेऱ्यांमधील यशाचे प्रमाण याचा तुलनात्मक अभ्यास केला, तर तथ्य दृष्टीस पडू शकेल. पण, निवडणुकीच्या विश्लेषणासाठी मी हे लिहिले नाही. पहिल्या दोन फेऱ्यांमधील वस्तुस्थिती काँग्रेसच्या आशा पल्लवित करणारी कशी होती, हे सूचित करण्यासाठीच मला हे अधोरेखित करायचे आहे. तिसऱ्या फेरीपासून वातावरण बदलले. त्याचा प्रत्यय मोदींना आला व तेव्हापासून त्यांनी जे आक्रमण सुरू केले, ते शेवटपर्यंत कायम ठेवण्यात यश मिळविले, म्हणून हा निकाल आला. त्यात मोदींच्या परिश्रमांचे जेवढे योगदान आहे, तेवढेच काँग्रेसच्या मूर्खपणाचेही योगदान आहे. ते कसे, हे मी मागील लेखातचं सांगितले आहे. तरीही जनमत चाचण्यांचे येणारे परिणाम मोदींना एवढ्या प्रचंड प्रमाणात विजय मिळेल, हे दाखवत नव्हते. दरम्यान, माध्यमांची भूमिकाही मोदीविरोधाकडेच कलत होती. ती मोदींना प्रसिद्धी देत होती, पण त्यांच्या विरोधात वातावरण कायम राहील, याची काळजीही घेत होती. त्यामुळे राहुल गांधींचा आत्मविश्वास वाढत होता व हे सगळे आपल्या ‘चौकीदार’ मोहिमेचे यश आहे, असे समजून तो मुद्दा ते तारसप्तकात वाजवत होते. काँग्रेसचे प्रवक्ते तर मोदी आणि भाजपला खाऊ की गिळू करीत होते. सगळे वातावरण चुरशीच्या लढतींचेच होते.

 

गेल्या निवडणुकीत भाजपला उत्तर व पश्चिम भारतात कमालीचे यश मिळाल्याने व त्याच पट्ट्यात विरोधी ऐक्याचा निर्देशांक वाढलेला दिसल्याने तेथे भाजपची पिछेहाट होईल आणि काँग्रेस वा तिसरी आघाडी बाजी मारून जाईल, असे चित्र निर्माण करण्यात माध्यमे यशस्वी झाली होती. सपा-बसपा यांनी गोरखपूर व अलाहाबाद पोटनिवडणुकीत मिळविलेल्या यशाने भाजपला उत्तर प्रदेशात ३०च्या वर जागा द्यायला कुणीही तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर जेव्हा त्या मंडळींचा एवढा प्रचंड पराभव झाला, त्यामुळे वैफल्य येणे स्वाभाविकच होते. विशेषत: एक्झिट पोल्सचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर व ‘एबीपी-नेल्सन’सारख्या संस्थांनी भाजप व विरोधक यांच्यात ‘नेक टू नेक’ संघर्ष झाला असल्याचा संकेत दिल्यानंतर विरोधकांना चेव आला नसता तर ते नवल ठरले असते. त्यामुळे ते एवढे आक्रमक बनले होते व त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला असे लक्ष्य केले होते की, ते मतमोजणी तरी शांततापूर्ण वातावरणात होऊ देतील की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यातच बिहारमधील उपेंद्र कुशवाह नावाच्या नेत्याने रक्तपाताची भाषा वापरल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. खरेतर मतमोजणीच्या वेळी अपेक्षेप्रमाणे ‘नेक टू नेक’ लढती झाल्या असत्या, तर तसेही घडणे अशक्य नव्हते. पण, भाजपचाच विजय होणार, हे मतमोजणीच्या पहिल्या तीन टप्प्यांतच स्पष्ट झाल्याने विरोधकांनी काढता पाय घेतला व पुढील प्रकार टळला. अर्थात, उपेंद्र कुशवाह यांच्या भूमिकेचा काँग्रेसने तत्काळ जाहीर इन्कार केल्याने शांततापूर्ण मतमोजणीचे श्रेय त्या पक्षाकडेही जाते, हे नाकारता येणार नाही. पण, त्यामुळे विरोधकांच्या दृष्टीने मोदींचा एवढा प्रचंड विजय त्यांच्यासाठी अनपेक्षित होता, या वस्तुस्थितीत फरक पडत नाही. त्यावरून विरोधकांमध्ये किती प्रचंड प्रमाणात वैफल्य आले असेल, याची कल्पना आपण करू शकतो व त्याच अंगाने काँग्रेसमधील घडामोडींचे आकलनही होऊ शकते. खरेतर काँग्रेसची आजची अवस्था ‘समोर अंधारच अंधार पसरला आहे,’ अशी झाली आहे. त्यांना या पराभवाचे नीट आकलनही होऊ शकत नाही आणि खुल्या मनाने मोदींना त्यांच्या यशाचे श्रेय देण्याची दानतही त्यांच्याजवळ नाही. औपचारिकता म्हणून त्यांनी पराभव स्वीकारला असेलही, पण जेव्हा ते कालांतराने पुन्हा तलवारी उपसून बाहेर पडतील, तेव्हा मोदींचा विजय किती बोगस होता, कपटमार्गाने मिळविला होता, त्यात इव्हीएमचे किती योगदान होते, हे रसभरीत वर्णन करून सांगायला विसरणार नाहीत. त्यांचे दुर्दैव असे आहे की, आज ते तेही सांगू शकत नाहीत. अक्षरश: किंकर्तव्यमूढ अशी त्यांची अवस्था झाली आहे. काँग्रेसला १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १८० जागांवर खातेही उघडता येणार नाही, याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. त्यामुळे निकाल जाहीर होताच राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटला असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे. आम्ही पराभवाची चिकित्सा करीत आहोत, त्याची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, एवढे दाखविणे फक्त त्यांच्या हातात होते व ते तेच करीत आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक, राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनामा, त्यांची परोपरीने विनवणी, त्यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदभार वाहण्यास दिलेली मान्यता या सगळ्या औपचारिकता पार पाडणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे; अन्यथा पराभूत म्हणूनच त्यांना लोकांसमोर यावे लागेल, जे त्यांना परवडणार नाही.

 

खरेतर काँग्रेसच्या या पराभवासाठी केवळ आणि केवळ राहुल गांधीच जबाबदार आहेत. कारण, त्यांनी स्वत:च प्रचारमोहीम स्वत:च्या नियंत्रणात ठेवून सामूहिक जबाबदारीला तिलांजली दिली होती. सगळे काही सुरजेवाला, दिव्या स्पंदना यांच्यासारख्या तरुण तुर्कांच्या हातात सोपविण्यात आले होते. वास्तविक निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मोदीकेंद्रित होणार नाही, मोदी विरुद्ध राहुल अशी तर होणारच नाही, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. पण, ती मोदीकेंद्रित करून त्यांनी मोदींची इच्छाच पूर्ण केली. कारण, राहुल गांधींना त्यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत कायम ठेवायचे होते. ते मोदींच्या पथ्यावर पडले आणि मग त्यांनी मागे पाहिलेच नाही. त्यातच सॅम पित्रोदा, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या वावदुकांची भर पडली. त्यामुळे काँग्रेसमध्ये ‘आधीच मर्कट त्यात...’सारखी परिस्थिती निर्माण झाली. हे सगळे राहुलमुळे घडले, याबद्दल कुणाही काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात शंका नाही. पण, राहुलशिवाय पर्यायही दिसत नाही, अशी त्यांची गोची झाली आहे. मुळात विचार केला तर आज निर्माण झालेली परिस्थिती स्वस्थ लोकशाहीसाठी पोषक आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, दमदार आणि जबाबदार विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाहीला अर्थच प्राप्त होऊ शकत नाही. पण, तसा विरोधी पक्ष निर्माण करणे स्वत: विरोधी पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे. विरोधी पक्ष जर आपण सत्तेवर बसण्यासाठीच जन्माला आलो आहोत, असा दुराग्रह धरणार असतील तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याशिवाय जनतेजवळ अन्य पर्याय राहत नाही आणि त्यामुळेच आज जे घडले त्याशिवाय दुसरे काही घडूच शकत नाही. योगायोगाने वा विरोधी पक्षांच्या करणीने नेमके तेच या निवडणुकीत घडले आहे. एक तर ते पुरेशा जबाबदारीने वागले नाहीत. आपल्या संघटनात्मक व वैचारिक ऐक्याची ग्वाही जनतेला देऊ शकले नाहीत आणि प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे, ही कोणत्याही सत्तारूढ पक्षाची जबाबदारी असू शकत नाही. त्यामुळे त्यांना या स्थितीतूनच पुढचा मार्ग काढावा लागणार आहे. तसे पाहिले तर भाजप, भाकप आणि माकप हे तीन पक्ष वगळले तर भारतात पक्ष म्हणावेत अशा राजकीय संघटनाच नाहीत. एकेकाळी काँग्रेसला तसे स्वरूप होते पण सत्ताप्राप्तीनंतर त्याने पक्ष म्हणून आपली रचनाच केली नाही. १९४७ पूर्वी ते स्वातंत्र्यप्राप्तीचे एक आंदोलन होते. त्यानंतर ते सत्ताप्राप्तीचे आंदोलन बनले, एवढाच काय तो फरक. काँग्रेसनेही पक्ष बनण्यासाठी विशेष कष्ट घेतले नाहीत. कदाचित त्यांना त्याची गरजही पडली नसेल. त्यामुळे स्वातंत्र्यआंदोलनाची पुण्याई संपेपर्यंत त्यांची चलती राहिली. पं. जवाहरलाल नेहरू, अल्पकाळासाठी का होईना लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्यांच्या हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या काळात राजीव गांधी यांच्यासारखे नेतृत्व मिळत गेले. नंतर ती स्वाभाविकपणे संपली. नरसिंहरावांनी काही प्रमाणात प्रयत्न करून पाहिला. पण, त्यांना सोनियांनी कधीच साथ दिली नाही. त्या सतत राहुलला पुढे आणण्याचा खटाटोप करीत राहिल्या. परिणामी, आज काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर ते आहे पक्ष बनण्याचे. राहुल गांधी जेव्हा त्या आव्हानाचा विचार करतात, तेव्हा ते गर्भगळीत होतात व राजीनाम्याशिवाय त्यांच्याजवळ अन्य पर्याय राहात नाही.

 

काँग्रेस सोडून अन्य पक्षांचा विचार केला, तर त्या केवळ शीर्षस्थ नेत्यांच्या कौटुंबिक मालमत्ता बनल्या आहेत. त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची नामावली नजरेसमोर आणली तर अधिक बोलण्याची गरजच राहत नाही. राज्यशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास १९६७ पर्यंत आपल्याकडे जशी एकपक्षप्रधान राजकीय व्यवस्था होती तशी २०१४ नंतर पुन्हा निर्माण झाली आहे व २०१९ मध्ये तिलाच पुढची चाल मिळाली आहे. १९६७ ते १९९९ पर्यंतचा काळ हा संमिश्रतेच्या राजकारणाचा काळ होता. २००४ ते २०१३ पर्यंत त्याला जीवदान मिळाले होते. तसे आजही राजकारण संमिश्रतेचेच आहे. पण, तरीही त्याचे एकपक्षप्रधान स्वरूप नाकारता येत नाही. २०१९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला एकपक्षप्रधानतेकडे, पण संमिश्रतेच्या राजकारणाकडे जाता आले असते, पण ती संधीही काँग्रेसने गमावली आहे. या प्रतिपादनावरून विरोधी पक्षांसमोर व विशेषत: काँग्रेससमोर केवढे प्रचंड आव्हान उभे आहे, याची कल्पना येऊ शकते. त्यातही चुका करणारे नेतृत्व सत्तापक्षाकडे असते तर त्यांचे काम तुलनेने सोपे झाले असते. पण, त्यांच्या दुर्दैवाने सरकारचे नेतृत्व मोदींकडे आले. ते स्वत: चुका करीत नाहीत आणि कुणाच्या चुका सहनही करीत नाहीत. ‘मारता कम मगर घसीटता अधिक’ असा त्यांचा खाक्या आहे. शिवाय त्यांच्यासोबत तळागाळापर्यंत पोहोचलेले सुसंघटित असे मनुष्यबळ आहे. त्या स्थितीला जर आपल्याला काँग्रेस पक्षाला न्यायचे असेल तर काय करावे लागेल, याचा विचारही राहुल गांधी करू शकत नाहीत. ती त्यांची क्षमताच नाही. ‘ये नेता नही बन सकता’ असे बैतूलचे माजी खासदार गुफराने आजम यांनी सोनियाजींना परोपरीने सांगून पाहिले. पण, त्यांना बाहेरची वाट दाखविण्यात आली. आजही त्यापेक्षा वेगळे घडू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देणे व केव्हा तरी परत घेणे, एवढाच पर्याय त्यांच्यासाठी उरतो. अर्थात, ही स्थिती दीर्घकाळ राहू शकत नाही. ती तशी राहिली तर काँग्रेस पक्षच संपून जाईल. त्यासाठी परिस्थिती किती गंभीर आहे, एवढेच सूचित करण्याचा हा प्रयत्न. निसर्गाचा नियमच असा आहे की, पोकळीला त्यात स्थान असू शकत नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की, या गांभीर्याची काँग्रेसला जाणीव आहे काय व त्यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी आहे काय? राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या संदर्भात त्या पक्षात घडत असलेल्या घटना मात्र तसे सूचित करीत नाहीत. गांधी परिवाराशिवाय काँग्रेसला कुणीही तारू शकत नाही, अशी भावनाच त्यातून प्रकट होते. पराभवानंतरच्या पहिल्याच कार्यकारिणी बैठकीत राजीनामा देताना व नवा ‘नॉनगांधी’ अध्यक्ष निवडण्याचे आवाहन करताना राहुल गांधी यांनी ‘व्हाय वुई’ असा प्रतिप्रश्न केल्याचे समोर आले आहे. त्यातून त्यांना हेच सूचित करायचे आहे की, “काँग्रेसला वाचविण्याचा ठेका काय गांधी परिवारानेच घेतला आहे? आम्ही मोदींचे तडाखे सहन करणार आणि तुम्ही राज्यांचे मुख्यमंत्री होऊन, मुलांना तिकिटे मिळवून त्यांच्या विजयासाठी धडपडणार आणि मजा मारणार? हे चालायचे नाही. पक्षाला नॉन गांधी नेता मिळाला पाहिजे.” दुर्दैव हे आहे की, त्यांचे ते आव्हान स्वीकारण्याची कुणाही काँग्रेसवाल्याची तयारी नाही. हिंमतही नाही. ते गांधी परिवाराचीच अजीजी करणार, राहुलला राजीनामा मागे घेण्यास बाध्य करणार, राहुललाही काँग्रेसाध्यक्षपदाचे कवच हवेहवेसेच वाटणार. पण तोपर्यंत ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे सर्वकाही करणे आवश्यक आहे आणि तेच हल्ली सुरू आहे.

 

- ल. त्र्यं. जोशी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@