नव्यापेक्षा जुन्या ‘कार मार्केट’ची आगेकूच का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019   
Total Views |




जुन्या ४० लाख गाड्या २०१८-१९ यावर्षी विकल्या गेल्या. यापैकी १८ टक्के गाड्या संघटित क्षेत्रात विकल्या गेल्या. ३२ टक्के गाड्या ग्राहकांच्या थेट समोरासमोर विकल्या गेल्या. १६ टक्के गाड्या असंघटित क्षेत्रात विकल्या गेल्या, तर ३४ टक्के निम्म संघटित क्षेत्रात विकल्या गेल्या. संघटित डिलर्स शोरुममध्ये व्यवहार करतात. निम्मे संघटित डिलर्स प्रामुख्याने गॅरेजमध्ये व्यवहार करतात.

 

गेले काही महिने नवीन चारचाकी गाड्यांची विक्री मंदावलेली आहे. पण, जुन्या गाड्यांच्या विक्री ही नव्या गाड्यांच्या विक्रीपेक्षा जास्त वृद्धी दाखवत आहे. २०१८-२०१९ या वर्षी ३६ लाख नव्या चारचाकी गाड्या विकल्या गेल्या, तर जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण ४० लाख इतके होते. नवीन गाड्यांच्या विक्रीला देशात असलेल्या आर्थिक मंदीमुळे बे्रेक लागला आहे, असे या विषयातील तज्ज्ञांचे मत आहे. २०१८-२०१९ या वर्षांत नवीन गाड्यांच्या विक्रीत फक्त २.७० टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या चार वर्षांतील हा नीच्चांक आहे.

 

प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशात चार चारचाकी गाड्यांमागे तीन जुन्या गाड्या विकत घेतलेल्या असतात, तर फक्त एक नवीन गाडी विकत घेतलेली असते. वापरलेल्या गाडीचा घसारा फार मोठ्या प्रमाणावर होतो. काही मॉडेलच्या बाबतीत तर पहिल्या वर्षाखेरीस मूळ किंमतीच्या ५० टक्के घसारा होतो. त्यामुळे गाडी ही कमी किंमतीत मिळते. तसेच गाडीच्या विम्याच्या हप्ताही कमी भरावा लागतो. जुन्या गाड्यांच्या बाबतीत मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो आणि अर्थशास्त्राचा नियम आहे की, जेथे मागणीपेक्षा पुरवठा जास्त तेथे वस्तूच्या किंमती कमी असतात. नवीन गाड्यांची ही परिस्थिती नाही. दहा वर्षांपूर्वी नवीन विकत घेतलेली गाडी ही गाडीचा मालक आठ ते दहा वर्षे वापरून विक्रीस काढत असे. आता तीन ते पाच वर्षांनंतर गाड्या विक्रीस काढल्या जातात.

 

तीन वर्षांनंतर विक्रीस काढलेल्या अनेक गाड्या या नव्या गाडीप्रमाणेच असतात. आपली अर्थव्यवस्था जेव्हा बंदिस्त होती, तेव्हा भारतात प्रामुख्याने लालचंद हिराचंद समूहाची ‘फियाट’ व बिर्ला समूहाची ‘अ‍ॅम्बेसिडर’ या दोनच गाड्या उपलब्ध होत्या. त्यामुळे गाडीच्या मालकांना आपली गाडी वर्षांनुवर्षे वापरावी लागे. त्याकाळात गाडी मालकांची संख्याही कमी कमी होती. नंतर भारतात सार्वजनिक उद्योगात ‘मारूती’चे आगमन झाले व ‘मारूती’ने गाड्यांच्या उद्योगात क्रांती घडवली. ‘योग्य किंमत’ व ‘कमी देखभाल खर्च’ हे ‘मारूती’चे वैशिष्ट्य. ‘मारूती’ आल्यावर भारतात गाडी मालकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. भारताने अर्थव्यवस्था मुक्त केल्यानंतर बर्‍याच परदेशातील वाहन उत्पादन कंपन्यांनी भारतात मुसंडी मारली व अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर कॉल सेंटरमधील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या, संगणक माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील प्रचंड पगार देणार्‍या नोकर्‍या यामुळे भारतात नव श्रीमंत वर्ग वाढला.

 

परिणामी, गाड्या विकत घेणार्‍यांची संख्याही वाढली व गाड्यांची सध्या शेकड्यांनी मॉडेल्स भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांचा ‘चॉईस’ वाढला व एकच मॉडेल वर्षानुवर्षे वापरणे हा ‘ट्रेण्ड’ बदलला व लोक लवकरात लवकर असलेली गाडी विकून नवीन मॉडेलची गाडी विकत घेऊ लागले. ज्यांना जुन्या गाड्या विकायच्या असतात, ते जुन्या गाड्यांच्या वाढलेल्या मागणीचा फायदा घेऊ लागले. याबाबत केलेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, जुन्या गाड्या विकत घेणार्‍यांपैकी ४५ टक्के लोकांची चार ते पाच वर्षे वापरलेल्या गाड्यांना पसंती असते. तर ज्यांना गाड्या विकायच्या असतात, त्यापैकी ४६ टक्के गाडी मालक सहा ते आठ वर्षे गाडी वापरून झाल्यानंतर विक्रीस काढतात. जे नवे किंवा चांगले मॉडेल विकत घेण्यासाठी तीन ते पाच वर्षांत गाडी विक्रीस काढतात, ते जास्त पैसे मिळण्यासाठी जास्त घासाघीस करीत नाहीत. समजा, एखाद्याला २०१९ या चालू वर्षी गाडी विकून जर पाच लाख रुपये मिळणार असतील, तर २०२२ साली त्याने जर ती गाडी विकायला काढली तर पाच लाख रुपयांहून कमी रक्कम मिळेल. जेवढे गाडीचे आयुष्य जाते, तेवढी हातात पडणारी रक्कम कमी.

 

जुन्या गाडीविक्रीची बाजारपेठ वधारत असली तरीही बाजारपेठ असंघटित आहे. यातील १८ टक्के व्यवहार २०१८-१९ या वर्षी संघटित क्षेत्रात झाले. दोन वर्षांपूर्वी फक्त १५ टक्के व्यवहार संघटित क्षेत्रात झाले होते. गाडीविक्रेत्याला जर गाडीची योग्य किंमत हवी असेल, तर तो ‘व्हॅल्युएशन’ करून घेऊन निश्चित किंमत काढू शकतो. 'orangebookvalue.com' ही जुन्या गाड्यांच्या विक्रीची सेवा पुरविते. जर व्यवहारात पारदर्शकता असेल व जास्त मध्यस्थी नसतील, तर गाडीविक्रेत्याला चांगली रक्कम मिळू शकते. व्यवहारात जर मध्यस्थी जास्त असतील, तर त्यांच्यावर २० ते ३० हजार खर्च करावा लागतो. जुनी गाडी घेणार्‍याची अपेक्षा ही ती गाडी नव्या गाडीप्रमाणे असावी अशीच असते.

जुन्या गाड्या विकल्या जाण्यार्‍या बाजारपेठा जरी वाढत असल्या तरी, अशा गाड्यांसाठी कर्ज मंजुरीची प्रकरणे मात्र फार कमी आहेत. जुन्या गाड्या ज्या विकल्या जातात, त्यापैकी साधारणपणे ९६ टक्के गाड्यांना कर्ज मंजूर होते, तर नवीन गाड्यांबाबत हे प्रमाण ७५ टक्के आहे. जुन्या गाड्यांवरील व्याजदर हा नव्या गाडीवरील कर्जाच्या व्याजदरापेक्षा दोन ते पाच टक्के जास्त असतो, अशी माहिती ‘टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीच्या प्रवक्याने दिली. जुन्या गाडीसाठी मोजलेली रक्कम, त्यावरील कर्जाचे हप्ते व व्याज एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा, नवीन कार घेणे चांगले ठरेल. शक्यतो जुन्या गाड्या या कर्ज काढून घेतल्या जात नाहीत.

 

व्हॅल्युअर गाडीचे व्हॅल्युएशन करताना गाडीचे मॉडेल, गाडीचे वय, गाडी चालविलेल्याचा इतिहास, गाडीची अवस्था, गाडीचा रंग, गाडी कुठे वापरली जाते इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन गाडीचे व्हॅल्युएशन केले जाते. कर्ज देणारी यंत्रणा व्हॅल्युएशन रिपोर्ट सादर केल्याशिवाय कर्ज मंजूर करणार नाही.गाडी विकणारा व गाडी घेणारा यांच्यात थेट समोरासमोर व्यवहार झाला, तर व्हॅल्युएशन रिपोर्टची गरज भासत नाही व मध्यस्थींनाही पैसे द्यावे लागत नाहीत. या बाजारपेठेत जास्तीत जास्त व्यवहार अशाच पद्धतीने होतात. तुम्ही जर संघटित क्षेत्रात हा व्यवहार केलात, तर गाडीच्या दर्जाबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकते, काही ‘वॉरंटी’ही मिळू शकते तसेच तुम्हाला कर्जही मिळू शकते.

 

तुम्हाला जर गाडीच्या नवनवीन मॉडेल्सचा शौक असेल, काही वर्षांनी वापरत असणारी गाडी विकायची असेल, तर गाडीची नियमित देखभाल व सर्व्हिसिंग करून घ्या. गाडीच्या दुरुस्तीच्या वेळी चांगल्या दर्जाचे ब्रॅण्डचे सुटे भाग वापरा. गाडीचा रंग चांगला दिसायला हवा. गाडी कुठेही दबलेली वगैरे असू नये. गाडी आतूनही स्वच्छ व आकर्षक दिसावयास हवी. गाडी किती किंमतीला विकली जाईल, हे गाडीच्या मॉडेलवर अवलंबून असते.

 

जुन्या ४० लाख गाड्या २०१८-१९ यावर्षी विकल्या गेल्या. यापैकी १८ टक्के गाड्या संघटित क्षेत्रात विकल्या गेल्या. ३२ टक्के गाड्या ग्राहकांच्या थेट समोरासमोर विकल्या गेल्या. १६ टक्के गाड्या असंघटित क्षेत्रात विकल्या गेल्या, तर ३४ टक्के निम्म संघटित क्षेत्रात विकल्या गेल्या. संघटित डिलर्स शोरुममध्ये व्यवहार करतात. निम्मे संघटित डिलर्स प्रामुख्याने गॅरेजमध्ये व्यवहार करतात. ‘असंघटित डिलर्स’ म्हणजे ‘ब्रोकर्स’ यांच्याकडे व्यवहार करण्यासाठी निश्चित जागा नसते. जुनी गाडी खरेदी करणार्‍याचे गाडी वापरण्याच्या कमी कालावधीला प्राधान्य असते. गाडी खरेदीदारांपैकी २० टक्के लोकांना एक ते तीन वर्षे जुन्या गाड्या खरेदी करण्यात स्वारस्य असते. ४५ टक्के लोकांना चार ते पाच वर्षे जुन्या गाड्या हव्या असतात, तर सहा ते आठ वर्षे दरम्यानच्या जुन्या गाड्या २८ टक्के खरेदीदार पसंत करतात. गाडी विक्रीस काढणार्‍यांपैकी १९ टक्के गाडीमालक एक ते तीन वर्षांनी गाडी विक्रीस काढतात.

 

३५ टक्के गाडीमालक चार ते पाच वर्षांनी विक्रीस काढतात, तर ४६ टक्के गाडीमालक सहा ते आठ वर्षांनी गाडी विक्रीस काढतात. गाडी विक्रीस काढणार्‍यांपैकी ११ टक्के गाडीमालक हे जास्त सुविधेची गाडी घेण्यासाठी वापरतात असलेली गाडी विक्रीस काढतात. गाडी जुनी झाली आहे व वरचेवर दुरुस्त करावी लागते, म्हणून १६ टक्के गाडीमालक गाडी विक्रीस काढतात. वापरात असलेली गाडी विकून परत एखादी जुनीच गाडी विकत घेणार्‍यांचे प्रमाण ४० टक्के आहे. काही वर्षांनी गाडी बदलणार्‍यांचे प्रमाण ११ टक्के आहे व अन्य कारणांसाठी गाडी विकणार्‍यांचे प्रमाण २२ टक्के आहे. जुनी गाडी विकत घेणे परवडणार्‍यांचे प्रमाण ६२ टक्के आहे. काही कालवधीसाठी जुनी गाडी विकत घेणार्‍यांचे प्रमाण २३ टक्के आहे. तेव्हा, गाडी खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना वरील गोष्टी ध्यानात ठेवल्यास नक्कीच त्याचा लाभ मिळू शकेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@