‘मोदीपर्व २’ची शानदार सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विराट विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार आणि दिमाखदार सोहळ्यात नरेंद्र मोदींसह ५७ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदींसह मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

 

फोर कोर्टमध्ये घेतली शपथ

नरेंद्र मोदींचा शपथविधी राष्ट्रपती भवनातील फोर कोर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी असे सोहळे दरबार हॉलमध्ये आयोजित करण्याची परंपरा होती, पण तिथे केवळ ५०० लोकच बसू शकतात. यामुळे मोदींचा शपथविधी सोहळा फोर फोर्ट येथे ठेवण्यात आला. कारण, फोरकोर्टमध्ये ६ हजारांपेक्षा अधिक लोक बसू शकतात. आजच्या मोदींच्या शपथविधी सोहळ्यालादेखील ६ हजारांपेक्षा अधिक पाहुणेमंडळी उपस्थित होते.

 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरन्यायाधीश रंजन गोगोई, लष्करप्रमुख बिपिन रावत, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, जदयूचे सर्वेसर्वानितीश कुमार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्योगपती रतन टाटा, रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, अभिनेता रजनीकांत आदी गणमान्य व्यक्ती मोदींच्या शपथविधीला उपस्थित होते.

 

शपथविधीपूर्वी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीपूर्वी पंतप्रधान हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. सकाळी नरेंद्र मोदी सर्वात प्रथम राजघाटवर पोहोचले. महात्मा गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शाहदेखील उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर नरेंद्र मोदींनी हुतात्म्यांनादेखील आदरांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनील लांबा आणि वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते.

 

संतोष गंगवार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

तब्बल आठ वेळा खासदार राहिलेले संतोष गंगवार हे १७ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. लोकसभेतील सर्व सदस्यांना शपथ देणे आणि त्यांचे स्वागत करणे आदी जबाबदारी हंगामी अध्यक्षांची असते. दरम्यान, संतोष गंगवार हे उत्तरप्रदेशमधील बरेली येथून निवडून येतात.

 

देश-विदेशातून हजारो लोकांना निमंत्रण

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील सहा हजार पाहुणेमंडळी सहभागी झाले होते. देशातल्या सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल, भाजपचे वरिष्ठे नेते, राज्यसभेचे सर्व सदस्य, माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपती, विरोधी पक्षांतील सर्व वरिष्ठ नेते आणि प्रादेशिक पक्षांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. याव्यतिरिक्त बुद्धिजीवी, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, चित्रपट कलाकार आणि कलाक्षेत्रातील मान्यवरही शपथविधीला हजर होते.

 

विदेशी पाहुण्यांमध्ये ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख म्हणजे बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंडच्या राष्ट्राध्यक्षांचा समावेश असून मॉरिशसचे पंतप्रधान, थायलंड आणि किर्गिझस्तानचे राष्ट्रप्रमुखही या सोहळ्याला उपस्थित होते. शिवाय जगातील सर्वच प्रमुख देशांच्या राजदूतांसह १४ प्रमुख देशांतले बुद्धिजीवी, राजकीय कार्यकर्ते, चित्रपट कलाकार आणि अन्य गणमान्य व्यक्तीही शपथविधीला उपस्थित होते.

 

चोख सुरक्षा व्यवस्था

मोदींच्या शपथविधी सोहळ्यावेळी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रजासत्तादिनी ज्याप्रकारे सुरक्षा व्यवस्था असते, तसाच बंदोबस्त आजच्या कार्यक्रमावेळीही तैनात करण्यात आला होता. लष्कर, वायुदल आणि दिल्ली पोलिसांसह सुरक्षादलांनी आजच्या शपथविधी सोहळ्यावर करडी नजर ठेवली, तसेच महत्त्वाच्या इमारतींवर विमानभेदी बंदुकांसह, स्नायपर आणि एनएसजी कमांडो तथा दिल्ली पोलिसांच्या ‘स्वॉट’ टीमचाही पहारा होता. वाहतूक नियंत्रणासाठी एक हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.

 

किर्गिझस्तानच्या राष्ट्रप्रमुखांची भेट

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी आपली पहिली द्विपक्षीय बैठक किर्गिझस्तानच्या राष्ट्रप्रमुखांशी केली. शांघाय सहकार्य संघटनेचे प्रमुख व किर्गिझस्तानचे राष्ट्रपती सूरनबे जीनबेकोव गुरुवारी रात्रीच मायदेशी रवाना होणार असल्याने मोदी शपथविधीनंतर लगेच रात्री त्यांची भेट घेतली. तर अन्य राष्ट्रप्रमुखांची भेट मोदी शपथविधीच्या दुसर्‍या दिवशी घेणार आहेत. दरम्यान, मोदी शपथविधीनंतर १५ दिवसांत किर्गिझस्तानात होणार्‍या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.

 

शपथविधीचे ‘त्या’ कुटुंबाला निमंत्रण

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@