राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2019
Total Views |

गेल्या १८ वर्षांपासून 'बाजीराव'चे उद्यानात अस्तिव

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीत नांदणाऱ्या 'बाजीराव' नामक एकमेव पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याचे वय १८ वर्ष होते. वृद्धापकाळाने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानातर्फे देण्यात आली.

 

राष्ट्रीय उद्यानाचे खऱ्या अर्थाने आकर्षण असलेल्या पांढऱ्या रंगाच्या 'बाजीराव' वाघाचा जीवनप्रवास शुक्रवारी संपला. २००१ मध्ये सिद्धार्थ आणि रेणुका या वाघांच्या जोडीने बाजीराव, आर्या आणि राजिया या बछड्यांना जन्म दिला होता. २००९ मध्ये आर्या आणि राजिया यांना बाणेरगट्टा प्राणिसंग्रहालयाला सिंहांच्या बदल्यात देण्यात आले होते. तर गेल्या १८ वर्षांपासून 'बाजीराव'चे वास्तव्य राष्ट्रीय उद्यानात होते. पांढरी त्वचा आणि निळ्याशार डोळ्यांमुळे तो पर्यटकांचे आकर्षण होता.

 



 

मात्र गेल्या चार वर्षांपासून बाजीराव आजारी होता. त्यामुळे त्याला पर्यटकांच्या दर्शनासाठी व्याघ्र सफारीत सोडले जात नव्हते. संधिवात आणि स्नायु दुखीने त्याला ग्रासले होते. यामुळे गेल्या १० दिवसांपासून त्याला चालणेही शक्य होत नव्हते. राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यक बाबींसाठी मार्गदर्शन करणाऱ्या तांत्रिक सल्लागार समितीतील तज्ज्ञांनी बाजीरावाच्या आरोग्याची पाहणी केली होती. त्याच्या वाढत्या वयाचा विचार करुन काही औपधोपचार सुचविण्यात आले होते. मात्र अखेरीस वृद्धापकाळाने त्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

या वाघाचे शवविच्छेदन मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील तज्ज्ञ पशुवैद्यक आणि राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यक अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले. तर टॅक्सीडर्मीस्ट डाॅ. संतोष गायकवाड यांनी बाजीरावची त्वचा जतन करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसून त्याचे टॅक्सीडर्मी करणे शक्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



 
@@AUTHORINFO_V1@@