फक्त नावातच ‘सीताराम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2019
Total Views |




आपला जनाधार टिकविण्यासाठी रामायण डोक्यावर घेऊन चालणारे सीताराम येचुरी आता रामायणातील हिंसेमुळे अस्वस्थ आहेत.

नावात ‘सीता’ आणि ‘राम’ असे दोन्ही असूनही अविवेकी वागण्याच्या स्पर्धेत पहिला येईल, असा इसम म्हणजे ‘सीताराम येचुरी.’ या देशातल्या राजकारण्यांना लोकसभा निवडणुकीत काय घडणार, हे पुरते कळून चुकले आहे. एखादा शहाणा इसम यातून बोध घेऊन आपल्या उर्जेची बचत करेल आणि घरीच थांबेल. येचुरींचा पक्ष डाव्यांपैकी नेमका कोणता, हा खरंतर अर्वाचीन वाटावा असा प्रश्न आणि २०१४ नंतर या पक्षाचे राजकीय अस्तित्व काय, हा त्याहून मोठा प्रश्न. हिंदीत एक मोठी मजेशीर म्हण आहे. ‘बंदर बुढा हो जाए लेकीन गुलाटी मारना नहीं भूलता.’ येचुरींना प्रदीर्घ संसदीय कामाचा अनुभव आहे. त्यांच्या पक्षाचे बरे दिवस असताना त्यांनी सरकारात प्रत्यक्ष सहभागी न होता सरकार कसे चालते, हेदेखील पाहिले आहे. राजकारणात खरे काय, खोटे काय हे अत्यंत कालसापेक्ष असते. अंतर्यामी मात्र राजकारण्यांना माहीत असते की, वास्तव काय आहे. हे महाशय सध्या भोपाळला जाऊन पोहोचले आहेत आणि आपल्या लाडक्या दिग्विजय सिंगांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. लोकशाहीत अशा सभा घेण्याला विरोध असायचे कारण नाही. कारण, घटनेने तसा हक्का सगळ्यांनाच दिला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी चांगला विरोधी पक्षही हवाच! खरंतर राहुल गांधींना वायनाडमध्ये सहकार्य करणार नसल्याचे डाव्यांनी स्पष्ट केल्यानंतर आणि अजून तरी त्या भूमिकेवर ते ठाम असल्यानंतर राहुल गांधी ज्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला त्यांनी जायला नको होते. मात्र, मजेशीर गोष्ट अशी की, हे सारे भेदाभेद अमंगळ मानून येचुरी भोपाळला पोहोचले. २०१४ नंतर उरल्यासुरल्या डाव्यांच्या आयुष्यातील एकमेव उरलेले काम म्हणजे मोदीद्वेष. आघाडी, महाआघाडी, महागठबंधन या सगळ्याच्या मागे आपल्याला जे दिसते, ते असे आहे. यातल्या कोणालाही देशाचे नेतृत्व करून भारतीयांसाठी काही करण्यापेक्षा मोदींना हरवायचे आहे. आपल्या साहित्य, कला, संगीत इथल्या भाई-बंधूंसह हे लोक कामाला लागले आहेत.

 

या सगळ्यांचा मूळ मुद्दा हा मोदीद्वेषाचा असला तरी हिंदुत्व मानणार्‍या मंडळींचा विद्वेष हाच या मंडळींच्या कृतीमागचा उद्देश आहे. येचुरी यापूर्वी कधीच काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कधीही उघडउघड फिरले नाहीत. ते भोपाळला पोहोचले आहेत, त्याचे कारण स्पष्ट आहे. दिग्विजय सिंग या निवडणुकीत जिंकणार नाहीत, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. पण, ज्या उमेदवाराला त्यांना हरवायचे आहे त्या आहेत साध्वी प्रज्ञासिंह. एका साध्वीला हरविण्यासाठी कोण कोण आणि कसे समोर येतील, त्याचा एक ट्रेलरच येचुरींनी सादर केला आहे. तिथे जाऊन हे जे काही बरळले आहेत, त्यावरून ही मंडळी कुठल्या थराला जातात, हे लक्षात येईल. “हिंदू धर्म हिंसक नसल्याचा दावा केला जातो. मात्र, रामायण आणि महाभारतात हिंसेचे दाखले आहेत. संघाचे लोक हे महाकाव्य आहे, असे सांगतात आणि लोकांची दिशाभूल करतात,” असा त्यांचा दावा होता. येचुरी काय बोलले, यापेक्षा ते का बोलले, हे अधिक महत्त्वाचे आहे. येचुरी जे म्हणतात, त्याला एका मोठ्या कटाचा वास आहे. हा कट होता हिंदूंना ‘दहशतवादी’ ठरविण्याचा. जगात अनेक ठिकाणी धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी स्फोट केले. यात तर काही आत्मघातकीही होते. ‘माणुसकीचे शत्रू’ म्हणावे अशी यांची कृत्ये होती.

संख्येने अल्पसंख्य असलेल्या या मंडळींना मतांसाठी खुश करण्यासाठी आपल्याच देशातील बहुसंख्य नागरिकांना ‘दहशतवादी’ ठरविण्याचा कट आणि उद्योग मात्र भारतातच शिजला आणि महत्त्वाचे म्हणजे, तो या देशातल्या सरकारनेच शिजवला. यासाठी ज्या अनेक यंत्रणा कामाला लागल्या, त्यांचे तपशील सर्वश्रुत आहेतच. तपासयंत्रणा, न्यायव्यवस्थांनी हिंदू दहशतवादाचे बळी असलेले आरोपी दोषी ठरविण्यापूर्वीच युपीए सरकारातल्याच चार-पाच मंत्र्यांनी हा विचारप्रवाह सिद्ध करण्याचे ठरविले आणि हिंदू दहशतवादाच्या नावाने बोंबा मारायला सुरुवात केली. वस्तुत: शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतानाच याची एक रंगीत तालीम झाली होती. मात्र, चिदंबरम, दिग्विजय सिंग, सुशीलकुमार शिंदे या सध्या स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत असलेल्या मंडळींनी त्याला शब्दबद्ध केलेे. मुंबईत झालेल्या १२ बॉम्बस्फोटांत १३वा बॉम्बस्फोट घालण्याचे काम ज्यांनी केले, ते होते शरद पवार. वस्तुत: शरद पवारांनी या १३व्या बॉम्बस्फोटाचे कर्तेधर्ते हिंदूंनाच ठरविले होते. कारण, एका मुस्लीम वस्तीत हा स्फोट झाल्याची थाप त्यांनी मारली होती. त्याला कायदा-सुव्यवस्थेचे उत्तम नाव त्यांनी दिले असले तरी उद्देश तोच होता. हा हिंदू दहशतवादाचा बुडबुडा सध्याच्या सरकारने फट्कन फोडला. या सगळ्या खटल्याची आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारीही दिली आहे. दिग्विजय सिंगांनी आता साळसूदपणे आपण ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग कधीच केला नसल्याचे म्हटले आहे. कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात, या न्यायाने या सगळ्या कावळ्यांनी कितीही काव काव केली तरीही साध्वी निवडून येणारच आहेत. साध्वींना तिकीट दिल्यानंतर देशभरात उत्साहाची जी लाट उसळली, तिचा प्रत्यय २३ मे ला आल्याशिवाय राहणार नाही.

 

मुद्दा उरतो, तो या बेशरम लोकांचा. सीताराम येचुरींसारख्या लोकांनी हिंसेवर आणि रामायणावर बोलावे, यापेक्षा मोठी चीड आणणारी गोष्ट नाही. ज्या भोपाळमध्ये त्यांनी हे अकलेचे तारे तोडले, त्याच भोपाळपासून जेमतेम ५०० किमीवर गडचिरोली आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षल्यांनी या ठिकाणी जे नृशंस हत्याकांड घडविले, त्याचा साधा निषेधही येचुरी किंवा त्यांच्या भाईबंदांनी केलेला नाही. खरंतर येचुरींना धर्म निषिद्ध, पण मागे केरळमध्ये डोक्यावर रामायण घेऊन चालत जाण्याची वेळ आली, तेव्हा आपला घटता जनाधार वाचविण्यासाठी या बेगडी धर्मनिरपेक्षांनी तेही केले होते. २०१४ची निवडणूक जशी काँग्रेसच्या अस्तित्वाला जोरदार धक्का देणारी होती, तशीच ही निवडणूक या सगळ्या पाखंड्यांना जोरदार धक्का देणारी व्हायला हवी, तरच या देशातला पाखंडांचा अध्याय संपेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@