शनिवार ३ मे १९१३...आणि आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2019
Total Views |

 

 

 
शनिवार ३ मे १९१३...


आजचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एक सुवर्णदिनच म्हणावा लागेल. कारण आजच्याच दिवशी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरीशचंद्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा मूकपट जरी असला तरी या चित्रपटाने भल्या भल्यांना बोलतं केलं. तसंच व्यावसायिक दृष्ट्या देखील हा चित्रपट यशस्वी ठरला आणि चलचित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटाची फक्त निर्मितीच नाही तर दिग्दर्शन, लेखन, संकलन, चित्रीकरण, कला-दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी केल्या होत्या. पूर्वी स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नसत, चित्रपटात काम करणं म्हणजे कमीपणाचं समजलं जात असे. अशावेळी काय करायचं हा देखील प्रश्नच होता. पण या सगळ्या संकटांवर मात करून दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरीशचंद्र' प्रदर्शित केला. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर १९१३ ते १९१८ या कालखंडात त्यांनी जवळजवळ २३ चित्रपटांची निर्मिती केली.

त्या काळातील चित्रपटाचं तंत्र अतिशय किचकट आणि मेहेनतीचं होतं. प्रत्येक वस्तू प्रचंड खर्चिक आणि मर्यादित असल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागत असत. एखादी फ्रेम चुकली किंवा एखादा सिन चुकला की त्याचं पुन्हा चित्रीकरण करणं म्हणजे तोट्याचं आणि तितकंच जिकिरीचं होतं. अशावेळी प्रत्येक गोष्ट तेवढ्याच परिपूर्णतेने होणं अत्यावश्यक होतं. कालांतराने १९३१ साली चित्रपटांबद्दल लोकांना माहिती व्हायला लागली आणि त्याचवर्षी 'आलम आरा' हा भारतातील पहिला बोलपट प्रदर्शित झाला. मग काही काळानंतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. १९४७ मध्ये सत्यजित राय यांच्या 'पाथेर पांचाली' या चित्रपटापासून एका नवीन युगाचा प्रारंभ झाला ते युग ७० च्या दशकातील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
 





...आणि आता


शेवटी चित्रपट म्हणजे समाजाची एक प्रतिमा, अशी सारासार व्याख्या आहे असं आपण म्हणू शकतो. सध्या सोशल मीडियाच्या जगात, डिजिटल भारताच्या युगात सगळ्याच गोष्टी आधुनिक आणि कल्पनेपलिकडच्या आहेत. सगळ्या प्रकारची साहित्य, सोयी,सुविधा, मनुष्यबळ या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध आहेत. मात्र त्याची किंमत ठेवायला आपण विसरत चाललो आहोत का असा प्रश्न आज मनात आला. आजकाल सगळं जग एका बोटाच्या क्लिक एवढं जवळ येऊन ठेपलंय. इतकं सगळं सुखकर असताना आपल्याकडून पूर्वीसारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? आजकाल आपल्याकडच्या तांत्रिक गोष्टी अतिशय आधुनिक आहेत. दरदिवशी एखादा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेला बघतो. मग त्याचा दर्जा वाईट आहे की चांगला याकडे बरेचदा दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं.

फक्त वाईट गोष्टी असं नाही पण सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय चित्रपटांमध्ये हाताळले जात आहेत. स्त्री पुरुष समानतेचा असो, तत्कालीन सरकारने केलेल्या घोटाळ्यांचा असो, असे अनेक विषय जे या आधी तितक्या उघडपणे बोलले गेले नाहीत. मात्र एक नक्की की, चित्रपटांइतकेच कलाकार आणि प्रेक्षक वर्ग सजग आणि प्रगल्भ झाला आहे. आणि म्हणूनच शनिवार ३ मे १९१३ हा दिवस आणि आजचा दिवस यामध्ये कित्येक वर्षांचा फरक असला तरी सुद्धा चित्रपटकर्त्यांमध्ये तीच उमेद, तोच उत्साह आणि तीच जिद्द कायम आहे की जाता जाता आपल्याला काहीतरी घडवायचंय...आणि ही खटपट अखंड सुरूच राहील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@