मोदीपर्व २.० ची सुरुवात आज : नरेंद्र मोदी घेणार दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विक्रमी विजयानंतर नरेंद्र मोदी आज दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणार्‍या या शानदार सोहळ्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होणार आहे. २०१४ ला शपथविधीचा सोहळा ६ वाजता सुरू झाला होता, मात्र त्यासाठी प्रमुख पाहुण्यांचे, अतिथीगणांचे आगमन ४ वाजताच सुरू झाले. मे महिन्यात आग ओकणार्‍या सूर्यामुळे अंगाची काहिली होत होती. म्हणूनच यंदाचा शपथविधी ६ ऐवजी सायंकाळी ७ वाजता ठेवण्यात आला आहे, जेणेकरून अभ्यागतांना उकाड्याचा त्रास होणार नाही. सोबतच राष्ट्रपती भवनात पाहुण्यांसाठी मेजवानीचेही आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात निरनिराळ्या, देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांसाठी खास खास त्या त्या देशांतले खाद्यपदार्थही तयार करण्यात येत आहेत.

 

चोख सुरक्षा व्यवस्था

मोदींच्या शपथविधी सोहळ्यावेळी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजासत्तादिनी ज्याप्रकारे सुरक्षा व्यवस्था असते, तशीच आताही असणार आहे. लष्कर, हवाईदल आणि दिल्ली पोलिसांसह सुरक्षा दले आजच्या शपथविधी सोहळ्यावर करडी नजर ठेवणार आहेत, त्यामुळे राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे. महत्त्वाच्या इमारतींवर विमानभेदी बंदुकांसह, स्नायपर आणि एनएसजी कमांडो तथा दिल्ली पोलिसांच्या स्वॉट टीमला तैनात करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी दिल्लीमध्ये एक हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

 

फोर कोर्टमध्ये घेणार शपथ

नरेंद्र मोदींचा शपथविधी राष्ट्रपती भवनातील फोर कोर्टमध्ये होणार आहे. तत्पूर्वी असे सोहळे दरबार हॉलमध्ये आयोजित करण्याची परंपरा होती, पण तिथे केवळ ५०० लोकच बसू शकतात. यामुळे मोदींचा शपथविधी सोहळा फोर फोर्ट येथे ठेवण्यात आला आहे. कारण इथे ६ हजार लोक सहभागी होऊ शकतात.

 

देश-विदेशातून हजारो लोकांना निमंत्रण

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील ६ हजार पाहुणेमंडळी सहभागी होत आहेत. देशातल्या सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल, भाजपचे वरिष्ठे नेते, राज्यसभेचे सर्व सदस्य, माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपती, विरोधी पक्षांतील सर्व वरिष्ठ नेते आणि प्रादेशिक पक्षांचे प्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त बुद्धीजीवी, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, चित्रपट कलाकार आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

विदेशी पाहुण्यांमध्ये बिमस्टेक देशांचे प्रमुख म्हणजे बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंडच्या राष्ट्राध्यक्षांचा समावेश असून मॉरिशसचे पंतप्रधान, थायलंड आणि किगीर्र्स्तानचे राष्ट्रप्रमुखही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. शिवाय जगातील सर्वच प्रमुख देशांच्या राजदूतांसह १४ प्रमुख देशांतले बुद्धीजीवी, राजकीय कार्यकर्ते, चित्रपट कलाकार आणि अन्य गणमान्य व्यक्तींना शपथविधीचे निमंत्रण दिले गेले आहे.

 

किगीर्र्स्तानच्या राष्ट्रप्रमुखांची आज घेणार भेट

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आपली पहिली द्विपक्षीय बैठक किर्गीस्तानच्या राष्ट्रप्रमुखांशी करणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेचेे प्रमुख व किगीर्र्स्तानचे राष्ट्रपती सूरनबे जीनबेकोव गुरुवारी रात्रीच मायदेशी रवाना होणार असल्याने मोदी शपथविधीनंतर लगेच रात्री त्यांची भेट घेतील. तर अन्य राष्ट्रप्रमुखांची भेट मोदी शपथविधीच्या दुसर्‍या दिवशी घेणार आहेत.

 

शपथविधीचे ‘त्या’ कुटुंबाला निमंत्रण

नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी दुसर्‍यांदा विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बंगालमधील हिंसेत ठार झालेल्या मनू यांच्या मुलाने दिल्लीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. “तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या वडिलांना ठार केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही दिल्लीला जात आहोत.” आता आमच्या परिसरात शांतता असल्याचे मनू यांच्या मुलाने सांगितले. मनू हे भाजपचे कार्यकर्ते होते. भाजपकडून ५४ कार्यकर्त्यांच्या नातलगांना शपथविधीसाठी बोलाविण्यात आले आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. शपथविधीसाठी १६ जून २०१३ ते २६ मे २०१९ या कालावधीत राजकीय वादातून मरण पावलेल्या कार्यकर्त्यांच्या नातलगांना बोलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@