क्रुद्ध अश्वत्थामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2019
Total Views |



गुरू द्रोणाचार्य यांचा अचानक झालेला अंत पाहून दुर्योधन खूप दु:खी झाला. द्रोणाचार्यांनी त्याच्यावर अतोनात प्रेम केले होते आणि त्याच्याकरिता खूप काही केले होते. त्यांच्या मृत्यूमुळे कौरवांची शक्तीच जणू नष्ट झाली. घाबरून गेलेली कौरव सेना माघार घेत होती. त्याचवेळी अश्वत्थामा आपले सैन्य घेऊन पुढे आला. त्याला काहीच माहिती नव्हते. त्याला कळेना की सैन्यात एवढी घबराट का पसरली आहे?

 

दुर्योधनाच्या फिक्कट पडलेल्या तोंडाकडे बघून तो म्हणाला, “याचा अर्थ काय?, तुम्ही सगळे युद्ध हरल्यासारखे का दिसत आहात? तुमचा कोणी जवळचा मारला गेला आहे का? माझे पिताश्री सेनापती असताना असे कसे होऊ शकते? काय घडले आहे? मला कोणी सांगेल का?” दुर्योधन कृपाचार्यांना म्हणाला, “तुम्हाला त्याला सांगावेच लागेल, त्याला दु:खात लोटण्याची माझी हिम्मत होत नाही.” मग हळुवारपणे कृपाचार्यांनी अश्वत्थाम्यास त्याच्या पित्याचे निधन कसे झाले, ते सांगितले. तो हे ऐकून खूप संतापला व म्हणाला, “युधिष्ठिराचा खोटेपणा पाहून मला खूप चीड आली आहे. ज्याने माझ्या पित्याला असे खोटे बोलून मारले, त्याला मी सोडणार नाही. मी सूड घेईन. त्याच्या पापाची फळे त्याला भोगायलाच लागतील. धृष्टद्युम्न आणि युधिष्ठिर यांच्या रक्ताने ही भूमी माखली जाईल. मी असे वादळ निर्माण करेन की एका क्षणात होत्याचे नव्हते होईल.

 

माझ्याकडे नारायणास्त्र हे महान अस्त्र आहे. दुर्योधना, सारे पांडव ठार झालेले तू लवकरच पाहशील. तू काही क्षणांतच या जगाचा स्वामी होशील, याची खात्री बाळग. माझ्या पित्याच्या मृत्यूचा मी बदला घेईन. कृष्ण आणि अर्जुन पाताळात जरी दडून बसले तरी मी त्यांचा नाश करेन.” त्याचा हा पवित्रा पाहून कौरव सैन्यात पुन्हा चैतन्य संचारले.

 

युधिष्ठिराला शंख आणि तुतारी यांचे आवाज ऐकून आश्चर्य वाटले. अर्जुनाने मात्र युधिष्ठिराची निर्भर्त्सना केली. “दादा, आज तू सत्याचरणाचा त्याग करून आपल्या पितृतुल्य अशा गुरूच्या वधाला कारणीभूत झालास. धृष्टद्युम्न आणि तू दोघांनी अत्यंत अयोग्य कृत्य केले. विजय मिळवण्यासाठी तुम्ही असत्याचा आश्रय घेतला. यासाठी तुम्हाला नरकवास भोगावा लागेल. तुमच्या नावाला कायमचा कलंक लागेल.”

 

त्याचे असे कठोर बोल ऐकून भीम रागाने लाल झाला, तो म्हणाला, “अर्जुना तू क्षत्रिय नाहीस, एखाद्या ब्राह्मणासारखा तू आता बोलत आहेस. अरे सत्याचा मार्ग तर कौरवांनी सोडला, खोटेपणा करून आपल्याला वनवासात धाडले, द्रौपदीला दरबारात खेचत आणली, तिचा घोर अपमान केला, तरीही या युधिष्ठिराने सदाचरण सोडले नाही, त्याने केवळ पाच गावांची मागणी केली.

 

तो काय भेकड होता म्हणून? या सदाचारी माणसाला युद्धाचा तिटकारा होता. तूच तर म्हणत आलास की युद्ध सुरू झाल्यावर आपण कौरवांनी जो अन्याय केला आहे, त्याचा बदला घेऊ आणि आम्ही सारे तुझ्या भरवशावर राहिलो. आता तू अचानक सदाचरणावर बोलू लागला आहेस.”

 

धृष्टद्युम्न अर्जुनास म्हणाला, “अर्जुना, तुझे गुरू द्रोण महान होते कशावरून? त्यांनी ब्राह्मणाची सहा कर्तव्ये तर पाळलीच नाहीत. ना यज्ञ केले ना वेदांचे अध्यापन, त्यांनी त्या पापी दुर्योधनासाठी जीव दिला. ते तर सदाचरणी क्षत्रियदेखील नव्हते, त्यांनी अधर्माने युद्ध करून अस्त्रे वापरून निरपराध सैनिकांची हत्या केली. द्रोणाचा वध करण्यासाठीच मी जन्म घेतला. तू माझे अभिनंदन करायचे सोडून मला दूषणे देत आहेस. तू अभिमन्यू वधाचा सूड उगवलास, तोही अधर्म होता.तो सूर्यास्ताचा आभास काही चांगला नव्हे. तू तर जयद्रथाला फसवून मारले आणि तू सदाचरणाच्या गोष्टी करतोस?”

 

धृष्टद्युम्नाचे हे वक्तव्य ऐकून सात्यकीला चीड आली. आपल्या गुरू अर्जुनाचा अपमान त्याला सहन झाला नाही आणि तो धृष्टद्युम्नाच्या अंगावर धावून आला. पण भीम आणि सहदेव मध्ये पडले आणि त्यांनी दोघांना समजावून भूतकाळातील गोष्टी आता उगाळू नका म्हणून त्यांना वेगळे केले. मोठ्या कष्टाने पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आणि सर्व एक होऊन अश्वत्थाम्याला कसे तोंड द्यावे, याचा विचार करू लागले.

 

- सुरेश कुळकर्णी

[email protected]

9821964014

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@