दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |


 


कल्याण :सावरकरांचे दिव्य आणि दाहक असे सतीचे वाण असल्यासारखे शौर्य होते. पूर्ण विचारांती परिणाम आणि पडसाद याचे भान ठेवून केलेले त्यांचे लिखाण होते. अशा विचारवंताने काँग्रेससाठी काम करणे म्हणजे पाकिस्तानसाठी काम करणे आहे, असे म्हटले होते पण त्यांचे हे विचार आपल्याला २०१९ ला कळले; अन्यथा १९४७ साली आपल्याला सोन्याचे दिवस दिसले असते,” असे प्रतिपादन क्रांतिगीता महाबळ यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने ‘कालजयी सावरकर विशेषांक’ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून क्रांतिगीता महाबळ बोलत होत्या.

 

२८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकातील मराठा मंदिर सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कल्याण जनता बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, उद्योजक मिलिंद कुलकर्णी, भारतीय विचार दर्शनचे विश्वस्त सदानंद फणसे व कर सल्लागार सचिन हेजीब व ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांना वंदन करून करण्यात झाली.

 

ज्यांचे वाङ्मय प्रत्यक्षात प्रकाशित होण्यापूर्वीच जप्त करण्यात आले होते, परदेशी कपड्यांची निर्भयपणे प्रकट सभेत होळी करणारे, राष्ट्राच्या सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट विचार व्यक्त करणारा पहिला सशक्त क्रांतिकारक, ब्रिटिश न्यायालयाची अधिसत्ता भर न्यायालयात नाकारणारा पहिला नेता, दोन जन्मठेपेंची शिक्षा झालेला नेता, हिंदुस्थानचे संपूर्ण सर्वांगीण स्वातंत्र्य हेच भारतीय राजकीय चळवळीचे ध्येय बाळगणारा राजनैतिक पुढारी, अशी सावरकरांची गुणवैशिष्ट्येही महाबळ यांनी यावेळी सांगितली.

 

सावरकरांना संकुचित पद्धतीने सादर करण्यात आले. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व केवळ हिंदुत्वापुरते मर्यादित नाही, तर ते राष्ट्रहित पाहणारे व्यक्तिमत्त्व आहे. सावरकरांचा कालखंड आणि आताचा कालखंड हा इतका प्रदीर्घ कालावधी उलटलेला असताना त्यांच्या विचारांची गरज आजही भासावी, यातूनच सावरकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो,” असे मत किरण शेलार यांनी व्यक्त केले “आजच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा त्यांच्या विचारांचा विजय आहे,” असे मत सुरेश पटवर्धन यांनी व्यक्त केले.





 

गांधीजी जर नायक तर सावरकर हे प्रतिनायक : डॉ. सच्चिदानंद शेवडे


वसई :स्वातंत्र्यवीर सावरकर नायक की खलनायक, असा रंग देणार्‍यांनो हे लक्षात ठेवा की, गांधीजी जर नायक असतील तर सावरकर हे प्रतिनायक आहेत,” असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३६ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कालजयी सावरकर’ या विशेषांकाचे वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक मुकुंद भिडे, ज्येष्ठ वकील राजन जोशी, सनदी लेखापाल उमेश मेस्त्री यांच्या हस्ते वसई रोड पश्चिम येथील स्वामीनारायण मंदिरात प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसई जिल्हा संघचालक नरेंद्र पितळे, दै ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी आनंद वैद्य हे मंचावर उपस्थित होते.

 

डॉ. शेवडे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या निस्सीम देशभक्तीच्या धाडसाचे, सर्वस्व त्यागाचे व देशासाठी सोसलेल्या जीवघेण्या मरणयातनांचे किस्से आपल्या अमोघ वाणीने सांगताना श्रोत्यांना स्तब्ध केले. तसेच स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीदिनी अत्यंत उद्बोधक, वाचनीय विशेषांक छापल्याने दै. ‘मुंबई तरुण भारत’चे कौतुक करून देशाभिमान वाढविण्याचे कार्य ‘मुंबई तरुण भारत’कडून नेहमी होत असून हे दैनिक वाचकांच्या पसंतीचे असल्याचेही सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. हेडगेवार, भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते व कालजयी सावरकर या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.

 

प्रमुख वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यावेळी म्हणाले की, “कवी, लेखक, देव, देश आणि धर्मासाठी देह झिजवणारे असे अतुलनीय व्यक्तिमत्त्व सावरकरांचे होते. फिरंग्यांना सळो की पळो करणारे सावरकर, अंदमानात शिक्षा भोगतानाही देश सर्वस्व अंगात भिनणारे सावरकर, सुटकेनंतरही केवळ देशप्रेम, बंधुभाव व्यक्त करणारे सावरकर होते. राजकीय गोष्टीत भाग घेतल्याने शिक्षा व दहा रुपयांचा दंड लागलेले जगातील पाहिले विद्यार्थी सावरकर हेच होते,” अशा शब्दांत डॉ. शेवडेंनी आपल्या मंत्रमुग्ध वाणीने उपस्थितांसमोर सावरकरांचे आयुष्यच जणू काही साकारले. “ज्या क्रांतिकारकांनी ध्यास घेतला होता स्वराज्याचा, त्यांच्या नशिबी नेहमी अवहेलनाच आली. गांधी श्रेष्ठ की सावरकर?, हा वाद निर्माण करण्यापेक्षा स्वराज्यनिर्मितीमध्ये गांधींसह सर्व क्रांतिकारकांचे योगदान आहे, हे मान्य करायला हवे. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतील पण ध्येय एकच होते ते म्हणजे स्वराज्य,” असे शेवडे म्हणाले. सोबतच, “सावरकरांचे चरित्र एका व्याख्यानात समजू शकणारे नाही, वसईत सात दिवसांची व्याख्यानमाला करण्याची इच्छा आहे,” अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. जिल्हा संघचालक नरेंद्र पितळे यावेळी म्हणाले की, “आज आपण स्वातंत्र्यवीरांची तेजाची आरती करण्यासाठी जमलो आहोत.” दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मजा अभ्यंकर यांनी तर प्रस्तावना आनंद वैद्य यांनी केली.

 


 

पनवेल : पनवेलमध्येकालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. गिरीश गुणे, अरुण भिसे, महापौर कविता चौतमल, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक विवेक देशपांडे, वक्ते डॉ. परीक्षित शेवडे आणि मुंबई तरुण भारतचे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर.

 

बुधवारी मालेगावमध्ये कार्यक्रम

 

बुधवार दि. २९ मे रोजी मालेगावमध्ये हॅपी हॉल, लोढा मार्केट, सटाणा रोड या ठिकाणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मालेगाव शहर संघचालक अशोक कांकरिया व प्रदीप बच्छाव यांच्या हस्ते ‘कालजयी सावरकर विशेषांक’ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता होणार्‍या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सच्चिदानंद शेवडे उपस्थित राहणार आहेत.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@