‘राजा’ तू तुझ्या मनाचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019   
Total Views |


वयाच्या पाचव्या वर्षीपासून हातापायांनी पूर्णपणे अधू असलेला राजा महेंद्र प्रताप वित्तशास्त्रात एमबीए करून आज आपल्या तिशीत ओएनजीसीमध्ये कार्यरत आहे. त्याच्या मनोधैर्याची ही विचारप्रवर्तक कहाणी...

 

नकारार्थी ‘अपंग’ या संबोधनाचे ‘दिव्यांग’ असे झालेले हे केवळ शाब्दिक रूपांतर नाही. कारण, अशा व्यक्तींचा एखादा अवयव जरी शारीरिकदृष्ट्या अधू असला तरी त्यांचा दुसरा अवयव अधिक कार्यक्षम आणि बुद्धीही तितकीच तल्लख असते. पण, केवळ आणि केवळ दिव्यांगांकडे समाजातील ओझे, अपूर्णत्व आणि अधुत्व या नकारात्मक चष्म्यातून न पाहता, त्यांच्याकडे सामान्य नाही, तर असामान्यत्वाच्या दृष्टिकोनातून पाहायला लावणारे दिव्यांगांचे कर्तृत्व सामान्यांनाही लाजवेल असे. त्यापैकीच एक म्हणजे राजा महेंद्र प्रताप. वयाच्या पाचव्या वर्षी मित्राच्या सांगण्यावरून उघड्या इलेक्ट्रिक वायर्सच्या जंजाळात त्याने चक्क लोखंडाचा दांडाच टाकला. त्या प्रचंड विद्युत झटक्याने त्याचे हात-पाय निकामी झाले. शरीरापासून कामयचे वेगळे करावे लागले. तेव्हापासून तब्बल १० वर्षं राजाचे आयुष्य घरातील चार भिंतीत कैद झाले. त्याच्या वडिलांनाही नातेवाईक, पाहुण्यांसमोर राजाला आपला मुलगा म्हणून घेण्यास लाज वाटू लागली.

 

या दहा वर्षांच्या काळात राजाच्या आजारपणातही डॉक्टरांना घरीच पाचारण करावे लागे. त्याचे घरच्या घरी केस कापणारा न्हावीही अगदी ठरलेला. त्यामुळे तब्बल दहा वर्षे घराबाहेरच्या जगाशी राजाचा संबंध नव्हता. इतकेच नाही तर राजा बोलू शकत नव्हता. कसेबसे रांगून तो नंतर चालायला शिकला. हात नसल्यामुळे वस्तू एका जागेवरून उचलून दुसर्‍या जागेवर ठेवणेही राजासाठी एका आव्हानासारखेच. पण, त्यावरही राजाने कालांतराने मात केली. तो हळूहळू चालू लागला, वस्तू न पाडता उचलायलाही शिकला. त्याची ही शारीरिक प्रगती आणि विकास केवळ आणि केवळ शक्य झाला तो राजाच्या सकारात्मक विचारांमुळे. राजाच्या या सकारात्मक विचारांना बळकटी लाभली, ती त्याच्या तीन मोठ्या बहिणींची.तिघीजणी राजाच्या पाठीमागे अगदी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांची अभ्यासाची पुस्तकं वाचून राजाने ज्ञानसाधनेत खंड पडू दिला नाही. एवढेच नाही, तर घरच्या घरी अभ्यास करून दहावी आणि बारावीची परीक्षाही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पुढे स्कॉलरशिप मिळवून राजाने चक्क अर्थशास्त्रात एमबीए केले.

 

आपल्या कोपरांच्या, तोंडाच्या साहाय्याने राजा आज सहज लिहू शकतो, कीबोर्डवर टायपिंगही तो अगदी लीलया करतो. सुरुवातीला राजाला नोकरी द्यायला कुणीही धजावले नाही. दिल्लीच्या नॅशनल हाऊसिंग बँकेने राजाला कामाची संधी दिली आणि ती त्याने सार्थ करून दाखविली. सामान्य कर्मचार्‍यांपेक्षाही व्यवस्थित आणि कालमर्यादेचे भान ठेवत राजाच्या कामाचा उरक बघून सगळ्यांनाच त्याचे अप्रूप वाटे. या पहिल्या नोकरीनंतर मात्र आपल्याच मुलाला घरकैदेत ठेवणार्‍या पित्याचे मनपरिवर्तन झाले व त्यांनी राजाला स्वीकारले. आज राजा अहमदाबादच्या ओएनजीसीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तो स्टाफ क्वार्टर्समध्ये एकटाच राहतो. त्याचे कुटुंबीय आंध्र प्रदेशात वास्तव्यास असून राजा समर्थपणे घरातील सगळी कामे चक्क स्वत:हून करतो. अगदी रुचकर जेवणही शिजवतो आणि मित्रमंडळी, पाहुण्यांचे आदरातिथ्यही करतो. स्वावबलंबनाचे गांधींजीचे तत्व त्याने पुरेपूर अंगिकारले आहे. राजाने कित्येक मोच्यांकडे त्याच्या शरीरबांधणीला पूरक ठरतील, अशी पादत्राणे बनविण्याची मागणी केली. चार पैसेही जास्त देऊ केले. पण, कित्येक मोच्यांनी राजाला यासाठी स्पष्ट नकार दिला. अखेरीस एक मोची मात्र राजी झाला आणि चक्क दोन दिवस घेतल्यानंतर राजाला हवी तशी पादत्राणे त्याने बनवून दिली.

 

एकदा राजाला कसला तरी फॉर्म भरायचा होता. तेव्हा, त्याच्या सहकार्‍यांनी तो फॉर्म भरून देण्यासाठी पुढाकार घेतला. पण, राजाने त्यांना स्पष्ट नकार देत तो संपूर्ण फॉर्म स्वत:च भरला. म्हणूच राजा म्हणतो, “तुम्ही मला कोणतंही काम सांगा, मी ते करायला सक्षम आहे. मला लोकांची सहानुभूती अजिबात नको. मला तुम्ही सामान्यांप्रमाणेच वागवा, मला त्याचा खूप आनंद होईल. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की, लोकांनी, समाजाने दिव्यांगांना आदरपूर्वक वागणूक द्यावी आणि त्यांना ते आहेत तसेच स्वीकार करावे.” राजाच्या म्हणण्यात १०० टक्के तथ्य असले तरी आपल्या समाजाची मानसिकता दिव्यांगांप्रती अद्याप बदललेली नाही. दिव्यांगांना नोकरी देणे, हा गुन्हा नाही किंवा त्यांच्यावर केलेले उपकारही नाही, याची जाणीवजागृती समाजात होणे गरजेचे आहे. कारण, बरेचदा दिव्यांगांना अमुक एक काम जमेल अथवा नाही, ते आपल्या सहकार्‍यांशी नीट जमवून घेतील की नाही, अशा शंकाकुशंकांमुळे दिव्यांगांना शिक्षित असूनही त्यांच्या कुवतीची नोकरी नाकारली जाते. पण, राजासारखे काही दिव्यांग मात्र आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर इतरांपेक्षा वेगळे ठरतात. राजाच्या याच ध्येय, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने ‘जागतिक दिव्यांग परिषदे’तही भारताचे नेतृत्व केले आहे. तेव्हा, लाखो दिव्यांगांसमोर ‘हम किसीसे कम नही’ म्हणत आपल्या कामाचा, स्वभावाचा आदर्श ठेवणार्‍या या ‘राजा’माणसाच्या कर्तृत्वाला सलाम!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@