समिधा : येसूवहिनी आणि माई सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |

 

ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आयुष्यातील यश हे त्यांच्या स्वकर्तृत्वाचेच द्योतक असले तरी तात्यारावांच्या जीवनप्रवासात वहिनी येसू सावरकर आणि पत्नी माई सावरकर या दोघींचाही सिंहाचा वाटा आहे. घर, कुटुंब, समाजकार्य अशा सगळ्याच कसोट्यांवर उत्तुंग ठरलेल्या येसूवहिनी आणि माई सावरकर...

 

ती पारतंत्र्याची भयाण भीषण काळरात्र होती. अवघा समाज, अवघा देश निद्रिस्त होता. अशावेळी स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन काही स्वयंप्रकाशी तारे देशाच्या नभांगणात तळपत होते. असेच एक तारकामंडल म्हणजे नाशिक - भगूरचे सावरकर कुटुंब!

 

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुहागरजवळचे पालशेत हे या घराण्याचे मूळ गाव. या परिसरात सावरीची पुष्कळ झाडे असल्याने लोक त्यांना सावरवाडीकरम्हणू लागले व कालौघात त्याचे सावरकरझाले. थोरले नानासाहेब पेशवे यांच्या काळात नारायणराव सावरकर-दीक्षित यांनी अतिशय पराक्रम गाजवला. त्यावर खुश होऊन नानासाहेब पेशव्यांनी त्यांना नाशिकजवळील भगूर व राहुरी गावची जहागिरी दिली. नारायणरावांपासून दामोदरपंत हे सातवे वंशज होते. मॅट्रिक झालेले दामोदरपंत पिढीजात जहागिरी आणि सावकारी सांभाळून होते. दामोदरपंतांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. उभयतांना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकी प्रथम दोन बालपणीच मृत झाली.

 

त्यानंतर १३ जून, १८७९ रोजी गणेश उर्फ बाबाराव, २८ मे, १८८३ रोजी विनायक उर्फ तात्याराव, १८८५ च्या सुमारास माई (काळे) आणि २५ मे, १८८८ रोजी नारायण उर्फ बाळाराव अशी अपत्यप्राप्ती झाली. अशातच राधाबाईंचा अकाली मृत्यू झाला आणि चारही अपत्यांची सारी जबाबदारी एकट्या दामोदरपंतांवर येऊन पडली. थोरल्या बाबारावांनी धाकट्या भावंडांच्या संगोपनात पूर्णपणे योगदान दिले. ही सारेच भावंडे हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, दीर्घोद्योगी आणि अत्यंत लाघवी स्वभावाची होती. वडिलांच्या हाताखाली बुद्धीबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्यबाण, तलवार, बंदूक खेळणे यांत निपुण होत होती. दामोदरपंत स्वत: उत्तम काव्यरचना करत असत तसेच राधाबाईंचे बंधूही कवी होते. हा काव्यगुण तात्यारावांनी तर गाय, बैल, कुत्रा पाळणे, बागबगिचा करणे हा दामोदरपंतांचा गुण थोरल्या बाबारावांनी घेतला होता. आईच्या अकाली निधनानंतर बाबारावच घरी स्वयंपाक करीत असत.

 

जानेवारी १८९६ मध्ये बाबाराव विवाहयोग्य झाल्यावर दामोदरपंतांनी त्यांचा विवाह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील फडके कुलोत्पन्न यशोदानामक कन्येशी लावून दिला. अत्यंत गोड आवाजाची, भरपूर गाणी पाठ असलेली, टापटिपीची आवड असलेली, अतिशय नम्र आणि सुगृहिणीची सारी लक्षणे असलेली ही कन्या होती. विवाहापश्चात त्यांचे नाव सरस्वतीबाईअसे ठेवले. परंतु, स्वत: बाबारावांसकट सारेजण त्यांना माहेरच्याच येसूया नावाने हाक मारत. सरस्वतीबाई वयाच्या जेमतेम १३ व्या वर्षी दोन धाकटे दीर अन् एक धाकटी नणंद अशा तिघांच्या येसूवहिनीझाल्या. निरक्षर वहिनींना तात्यारावांनी अक्षरओळख करून दिली आणि त्यांना सरस्वतीच्या दरबाराचे दरवाजे उघडून दिले.

 

१८९९ मध्ये देशभरात प्लेगची साथ आली आणि त्यातच दामोदरपंतांचाही मृत्यू झाला. परंतु, तात्या आणि बाळ या धाकट्या दीरांना मात्र मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात येसूवहिनींना यश आले. ज्यावेळी जवळच्याच सर्व आप्तस्वकीयांनी पाठ फिरवली, तेव्हा तात्यारावांच्याच वयाच्या त्यांच्या वहिनीने आईच्या ममतेने धाकट्या दीरांची सारी सेवाशुश्रूषा केली. दामोदरपंतांच्या मृत्यूनंतर जहागिरीला आणि सावकारीला उतरती कळा लागली. आर्थिक ओढाताण सुरू झाली, तरीही धाकट्या दीरांच्या अभ्यासात खंड नको म्हणून वहिनींनी मंगळसूत्राखेरीज सारे सौभाग्यालंकार देऊन दीरांच्या ओंजळीत सरस्वतीचे दान घातले. आर्थिक विवंचना असतानाही तात्याराव बॅरिस्टर, तर बाळाराव डॉक्टर झाले याचे नि:संशय श्रेय मातृतुल्य येसूवहिनींच्या अतुलनीय त्यागाला आणि या कुटुंबाच्या जिद्दीला अन् बुद्धिमत्तेला आहे. अशावेळी अटल बिहारींच्या पुढील ओळींची साक्ष पटते,

 

सरस्वती की देख साधना, लक्ष्मी ने संबंध न जोडा, मिट्टी ने माथे का चंदन बनने का संकल्प न छोडा! बाबाराव आणि येसूवहिनींना दोन कन्यारत्नांचा लाभ झाला. परंतु,  दैववशात दोनही कन्या बालपणीच मृत्यू पावल्या. त्यानंतर येसूवहिनींनी आपल्या दोनही धाकट्या दीरांनाच पुत्रवत प्रेम दिले. बाबारावांना अंदमानवासाची शिक्षा झाल्याचे कळताच तात्यांनी लंडनहून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे,

 

जयासी तुवा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिलें, श्रीमती वहिनी वत्सले,

बंधू तुझा तो तुज नमी।

तू धैर्याची असशी मूर्ती, माझे वहिनी, माझे स्फूर्ती।

 

या एका काव्यपंक्तीतूनच तात्यांच्या किंबहुना संपूर्ण सावरकर परिवारातील येसूवहिनींचे अढळ स्थान लक्षात येते.

 

दि. १ जानेवारी, १९०० रोजी तात्यारावांनी राष्ट्रभक्त समूहया सशस्त्र क्रांतिकारी गुप्त संघटनेची स्थापना केली. याच समूहाचे पुढे मित्रमेळाअसे नामकरण करण्यात आले. यातूनच प्रेरणा घेऊन समवयस्क मुली महिलांसाठी येसूवहिनींनी आत्मनिष्ठ युवती समाजाचीस्थापना केली. तात्यारावांनी रचलेले पोवाडे, फटके, आर्या, ओव्या, देशभक्तीपर पदे स्वत: येसूवहिनी चाल लावून इतरांकडून म्हणवून घेत असत अन् याद्वारे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जाणीव-जागृती करण्याचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतले. १९०१ मध्ये तात्यारावांचा विवाह झाला. नाशिक जवळील जव्हारचे दिवाण चिपळूणकर यांची कन्या यमुना उर्फ माई यांच्याशी झाला आणि येसूवहिनींनी पाठच्या बहिणीप्रमाणे या धाकट्या जावेलाही आपलेसे करून घेतले अन् त्यांनाही या कार्यात सामावून घेतले. आत्मनिष्ठ युवती समाजातर्फे स्वदेशीचा पुरस्कार करणे, सुतकताई, देशभक्तीचा जागर करणे, देशभक्तीपर पदे गाणे ही प्रमुख कार्ये केली जात. याशिवाय इंग्रजांच्या अन्यायी राजवटीविरुद्ध केसरीमध्ये आलेले अग्रलेख वाचून दाखवले जात असत. क्रांतिकारकांच्या स्त्रियांची परिस्थिती अत्यंत वेदनादायी होती. पती कैदेत पडताच वा हुतात्मा होताच पांढर्‍या पायाची म्हणून सासरच्यांनी घराबाहेर काढलेल्या, ‘आम्हाला तू मेलीसअसं म्हणत माहेरची दारं बंद झालेल्या, जवळपास ९८ टक्के स्त्रिया निरक्षर, त्यात धुणीभांडी, स्वयंपाक-पाणी अशी कामेही कोणी देत नसत. कारण, क्रांतिकारकांच्या स्त्रियांना अशाप्रकारे आधार देणे म्हणजे सरकारविरोधात पेटता निखारा पदरात घेणे, अशा बिकट काळात या स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणे, स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्व समजावून देऊन त्यांचा चळवळीत सक्रिय सहभाग घेणे आणि त्यांना चालू राजकीय परिस्थितीचे ज्ञान आणि भान देणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. सभासद होताना शपथ घ्यावी लागे ती अशी, ‘मी श्रीभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून शपथ घेते की, मी आजन्म स्वदेशीचा वापर करेन अन् देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजेन.माई आणि बाई सारे घरकाम उरकून दुपारी अनवाणी पायी सगळीकडे हिंडत, स्त्रियांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळकळीने सांगत अन् प्रेमळ आग्रह करून समितीमध्ये घेऊन येत. त्याकाळात या युवती समाजाच्या जवळपास १२५ सभासद होत्या अन् त्यांचे नेतृत्व केले ते येसूवहिनी आणि माई यांनी!

 

माईंबद्दल बोलावयाचे तर माहेरी साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती. अत्यंत लाडाकोडात वाढलेल्या माई सासरच्या स्वातंत्र्यविचारांनी भारलेल्या वातावरणातही समरसून गेल्या. अत्यंत नम्र, अदबशीर वागण्याने त्यांनी येसूवहिनींसकट सार्‍यांना जिंकून घेतले. गोड बोलणे, फुलांचे सुंदर हार करणे, सुबक रांगोळ्या काढणे यात माईंचा हातखंडा होता. परंतु, माहेरच्या श्रीमंतीचा ताठा त्यांनी कधीही दाखवला नाही. माहेरी रेशमी वस्त्राशिवाय दुसरे काहीही न वापरणार्‍या माई विवाहापश्चात स्वखुशीने स्वदेशी वापरू लागल्या. माहेरी गोडाधोडाचे जेवण नित्याचे असताना सावरकरांच्या कुटुंबात पिठलं-भात अन् प्रसंगी चटणी भाकरी खाऊनही आनंदाने राष्ट्रसेवेत रममाण झाल्या. विवाहानंतर तात्या शिक्षणासाठी प्रथम पुण्याला अन् त्यानंतर लंडनला गेले. त्याचवेळी १९०६ मध्ये त्यांच्या प्रथम पुत्राचा प्रभाकरचा मृत्यू झाला. सावरकरांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली, तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल, याची वाचकांनीच कल्पना केलेली बरी. परंतु, पती काळ्या पाण्याच्या शिक्षेवर असतानाही माईंनी स्वातंत्र्यव्रत सोडले नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही आत्मनिष्ठ युवती समाजामार्फत त्यांनी देशसेवेस स्वत:ला वाहून घेतले.

 

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने,

जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे!

या तात्यांच्या काव्यपंक्ती माई खरोखरीच जगल्या.

 

पुढे-पुढे येसूवहिनींना ज्ञानवायु झाला, त्यांना सतत बाबाराव अंदमानहून सुटून आल्याचे भास होऊ लागले. त्याकाळातही माईंनीच येसूवहिनींची सर्वतोपरी काळजी घेतली. अखेरीस बाबारावांच्या दर्शनाविनाच येसूवहिनींची प्राणज्योत मालवली अन् कुटुंबाचे कर्तेपण ओघानेच माईंकडे आले आणि ते त्यांनी समर्थपणे पेलले.

 

कालांतराने तात्यारावांची अंदमानहून सशर्त सुटका झाली. त्यांना रत्नागिरीत स्थानबद्धेत राहण्याचा सरकारी आदेश झाला. तात्यांनी समाजसुधारणेचे व हिंदू संघटनेचे शिवधनुष्य हाती घेतले आणि त्यातही माईंनी सर्वार्थाने त्यांना साथ दिली. अखिल हिंदू सहभोजनाच्या कार्यक्रमात प्रसंगी स्वयंपाक करण्यापासून ते पंगतीत वाढेपर्यंत सारी जबाबदारी माई घेत. एकदा असेच केवळ स्त्रियांसाठी सहभोजन ठेवले असता, स्पृश्यास्पृश्य स्त्रिया एकमेकींशेजारी बसावयास तयार होईनात, तेव्हा माईंनी आपल्या डाव्या उजव्या हाताला स्पृश्यास्पृश्य स्त्रिया बसवून पंगतीची सुरुवात केली. अखिल हिंदू स्त्रियांच्या हळदी-कुंकवाच्या वेळीही माईंनीच पूर्वास्पृश्य स्त्रियांना हळदी-कुंकू लावून त्यांच्या ओट्या भरल्या आणि एक नवा आदर्श उभा केला. अनेक ठिकाणी तात्याराव स्वत: जाऊ शकत नसत, तेव्हा माई अशा सभांना जाऊन भाषणं करून तात्यारावांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत. गणपतीपूजन, नवरात्रोत्सव, विजयादशमीला शस्त्रपूजन, गुढीपाडव्याला गुढी उभारून, पंचांग आणि कुंडलिनी कृपाणांकित ध्वज उभारून त्याची पूजा करण्यात माईंचा पुढाकार असे. १९२७ मध्ये रत्नागिरीतच महात्मा गांधी तात्यारावांच्या भेटीला आले होते, त्यावेळी ते कस्तुरबांना म्हणाले, “आपल्या पतीला ५० वर्षे काळ्या पाण्याची खडतर शिक्षा झालेली असतानाही मनोधैर्य दाखवून, येणार्‍या सर्व संकटांना ज्यांनी धीराने तोंड दिले, त्या साध्वीला म्हणजेच तात्यारावांच्या अर्धांगिनी असलेल्या माईंना आपण वंदन करूया.

 

या स्थानबद्धतेच्या काळातच १९२५ मध्ये कन्या प्रभात, १९२७ मध्ये कन्या शालिनी अन् १९२८ मध्ये कनिष्ठ पुत्र विश्वास यांचा जन्म झाला, त्यापैकी कन्या शालिनी हिचा बाल्यावस्थेतच मृत्यू झाला. पुढे १९३८ मध्ये तात्यारावांनी मुंबईतील शिवाजी पार्कजवळ सावरकर सदननावाची स्वत:ची वास्तू बांधली आणि तात्या, माई, प्रभात, विश्वास आणि धाकटे बंधू डॉ. नारायणराव व त्यांच्या पत्नी शांताबाई आणि त्यांची मुले असे सर्व कुटुंब या वास्तूत एकत्र राहू लागले. माईंचा संसार सर्वार्थाने सार्थ झाला. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तो आनंदक्षण माईंनी अनुभवला. १९५० मध्ये पुणे हिंदू महिला समाजातर्फे माईंचा सत्कार करण्यात आला. दि. २४ डिसेंबर, १९६० रोजी मृत्युंजय दिनानिमित्त तात्या-माईंचा खास सत्कार करण्यात आला. परंतु, त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळली. आधी अस्थिक्षयाचा संसर्ग आणि नंतर रक्ताच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले.

 

शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर, १९६३ रोजी वयाच्या ७४ वर्षी माईंचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले. सावरकर बंधूंनी हिंदुस्थानात सशस्त्र क्रांतीचा यज्ञकुंड पेटविला आणि त्यात स्वखुशीने समिधा म्हणून स्वाहा झाल्या त्या येसूवहिनी आणि माई! स्वा. सावरकरांच्याच शब्दांत सांगायचे तर,

 

हे भारतीय अबला, बलतेज काही, अद्यापहि ह्या भरतभूमीत लुप्त नाही।

हे सिद्ध होईल असेंचि उदार, उग्र, वीरांगने तव सुवर्तन हो समग्र॥

सावरकर कुटुंबातील या धैर्यमूर्ती वीरांगनांना हा शब्दसुमनांचा हार सविनय सादर समर्पित!

 

सायली गोडबोले-जोशी

९७६७१७६०००

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@