सावरकर आणि युद्धशास्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |



विनायक दामोदर सावरकर म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक सोनेरी नाव. चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. सावरकरांचे चरित्र म्हणजे स्वातंत्र्यसमराची यशोगाथाच आहे.
स्वतंत्र भारतहा त्यांचा श्वास होता. आपल्या आयुष्याचा क्षण अन् क्षण त्यांनी त्यासाठी वेचला. त्यांचे बोलणे, चालणे, वागणे आणि लिहिणे केवळ त्यासाठीच होते. त्यांनी प्रत्येक कृती त्यासाठीच केली. आपला देश सर्व क्षेत्रांत इतका सामर्थ्यशाली व बलसंपन्न व्हावा की, त्याच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्यास धजावणार नाही, ही त्यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या होती. विनायक दामोदर सावरकरहे नुसते नाव नाही, तर तो स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा तेराक्षरी चिरंजीवी मंत्रच आहे.

सावरकर आणि युद्धशास्त्रयाचा विचार हा व्यापक आणि दूरदृष्टीचा होता, हे त्यांचे चरित्र वाचताना प्रकर्षाने जाणवते. युद्धशास्त्राविषयीची सजगता ही तळमळ त्यांनी अनेक ठिकाणी प्रदर्शित केली, तर काही वेळा परखड शब्दांतूनही व्यक्त केली आहे.

हिंदू समाजाच्या अवनतीची मीमांसा करताना ऐक्याचा अभाव, बेशिस्त, जातीभेद, सद्गुणविकृती ही कारणे सांगितली जातात. परंतु, यापेक्षाही जर महत्त्वाचे कारण सांगितले, तर ते युद्धशास्त्राची भारतात झालेली उपेक्षा हे होय. देशसंरक्षण व युद्धशास्त्र यांना आवश्यक असणारी समाजाची मनोरचना करणे, हे सावरकरांचे मोठे कार्य आहे. ज्याने संरक्षणाकरिता शस्त्र हाती घेणे पाप मानले आहे, तो समाज मागासलेला आहे, अशी सावरकरांची धारणा होती. एखाद्या प्रदेशाचे युद्धशास्त्रीय महत्त्व परिस्थितीनुसार बदलू शकते, हे सावरकर जाणून होते.

सैनिकी सामर्थ्याविषयी सावरकर सांगतात, “इतिहासाच्या प्रत्येक पानातून अगदी अखेरच्या पानापर्यंत एकच गोष्ट सिद्ध झालेली दृष्टीस पडते, ती ही की, इतर अनेक गोष्टी जरी सारख्या असल्या तरी, जी राष्ट्रे सैनिकीदृष्ट्या सामर्थ्यवान ठरतील, तीच काय ती जगतील व जी कमकुवत असतील, ती गुलामगिरीत असतील किंवा नामशेष होतील.अंतिम उद्दिष्ट व साध्य कराव्या लागणार्‍या लढाया याविषयी सावरकरांनी मार्मिक विचार व्यक्त केले आहेत. युद्धात आणि राजकारणात सुसंबद्धता ठेवली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. युद्धशास्त्रात युद्धकौशल्याचे महत्त्व विशेष व निर्णायक असते. युद्धकौशल्यात युद्धतंत्र, युद्धनेतृत्व, व्यूहरचना, युद्धसामुग्रीचा सदुपयोग इत्यादींचा समावेश होतो. अनेक युद्धात हिंदूंचा जो पराभव झाला तो युद्धकौशल्याच्या उणीवेमुळे झाला, हे सावरकर जाणून होते. म्हणून पराक्रमास कोणत्या तरी दिव्य ध्येयाचे आणि युद्धकौशल्याचे साहाय्य हवे, असे ते आवर्जून सांगत.

राष्ट्रीय शस्त्रबळाच्या उद्दिष्टाविषयी सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ज्या राष्ट्राचे सैन्यबळ उघडउघडपणे आक्रमणक्षमतेच्या पायावर नि प्रमाणावर रणसज्जतेत उभे असते, त्या राष्ट्रात संरक्षणक्षमता असतेच असते, हा त्यांचा विश्वास होता. देशसंरक्षण व युद्धशास्त्र यांना आवश्यक असणारी समाजाची मनोरचना करणे, हे सावरकरांचे मोठे कार्य आहे. एखाद्या युद्धविशारदाप्रमाणे सावरकर भौगोलिक व तत्कालिक परिस्थितीचा विचार करीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या सीमा निश्चित करण्यावर सावरकरांनी भर दिला होता. भारताने अणुबॉम्ब तयार करावा, हे सावरकरांचे सांगणे होते. भूसेना, नौसेना व वायुसेना या सैन्यदलाच्या तीनही शाखा सुसज्ज, प्रबल व अद्ययावत असाव्या, असा त्यांचा कटाक्ष होता.

इंग्लंडप्रमाणे संबंध भारतातील माध्यमिक शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण सुरू करावे, रायफल वर्गांना प्रोत्साहन द्यावे, भारतीय प्रादेशिक सेनांचा विस्तार करावा आणि भारतीय सैन्य हे भारताचे सैन्य आहे, असा विश्वास भारतीय जनतेमध्ये निर्माण करावा, असा विशेष आग्रह सावरकरांचा होता. भय आणि अविश्वासया दोन कारणांमुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारताला निःशस्त्र व निःसज्ज करून ठेवले होते. तेव्हा हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण करावे आणि लढाऊ जातम्हणून त्यांचे पुनरुज्जीवन घडवून आणावे, हे सावरकरांच्या युद्धविषयक धोरणाचे उद्दिष्ट होते.

लष्करी आक्रमणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ज्या राष्ट्रापाशी सशस्त्र आणि सुसज्ज सैन्य खडे नसेल, ते राष्ट्र आपले स्वातंत्र्य एक दिवसही टिकवू शकणार नाही, अशी सावरकरांची दृष्टी होती. युद्ध यशस्वी होण्यास सैन्य, शस्त्रसामुग्री व तंत्र यांच्या जोडीला कुशल युद्धनेतृत्व आवश्यक असते, हे सावरकर जाणून होते. हे नेतृत्व वेगवेगळ्या पातळ्यांवर असते, तसेच ते युद्धक्षेत्राच्या सर्व विभागांत लागते, हेही सावरकर जाणून होते. हिंदूंनी सचेतन व्हावे व एक लढाऊ जाती म्हणून त्याचा पुनर्जन्म व्हावा, ही सावरकरांची आकांक्षा होती आणि सावरकरांच्या सर्व चळवळी या आकांक्षेतून झाल्या होत्या. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या एफ-१६विमानांना जॅग्वारने उत्तर द्यावे की मिराजने, याची चर्चा जरी आज होत असली व प्रेमाने द्यावेकी हृदयपरिवर्तनानेअसा विचार जरी आज होत असला तरी, त्याचे सर्व श्रेय सावरकरांनाच जाते. शतकांत एकदाच जन्माला येणारे स्वातंत्र्यवीरम्हणजे सावरकर.

सावरकर म्हणजे ज्यांचे कर सदैव सावरण्यासाठी कटिबद्ध होते, असेच म्हणता येईल. सावरकरांचे संपूर्ण जीवन म्हणजे यज्ञकुंड. या यज्ञकुंडातून निघणार्‍या ज्वाला अजूनही अनेकांच्या मनात धगधगत आहे. या राष्ट्रजीवनात विनायक दामोदर सावरकरहे नाव वादळातील दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शक व दिशादर्शक आहे आणि राहील. दूरदृष्टी व व्यापक विचार यांना आपल्या प्रभावी शैलीत मांडण्याचे सामर्थ्य हे फक्त सावरकर यांच्याकडेच होते.

 

सर्वेश फडणवीस

९४०५३४७४६४
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@