इतिहासकार सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |
 
 
 
एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जेवढे योगदान आहे, तेवढेच सावरकरांचे इतिहास लेखकया नात्याने मराठी साहित्यक्षेत्रात योगदान आहे. त्याविषयी...
 

॥ हरी अनंत, हरी कथा अनंता कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता ॥

अशा शब्दांमध्ये श्रीहरींचं वर्णन संत गोस्वामी तुलसीदासांनी केलं आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही चौपाई स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतदेखील लागू होते. भाषाशुद्धी, अस्पृश्यता निवारण क्रांतिकार्य, साहित्य, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत सावरकरांनी केलेले कार्य केवळ अद्वितीयअसेच म्हणता येईल. या सर्वांमध्ये इतिहासकारम्हणून सावरकरांनी मराठी साहित्याला दिलेले योगदानदेखील ठळकपणे उठून दिसते.

 

जन्मभूमी भगूरला असलेली नाशिकसारख्या पौराणिक शहराची पार्श्वभूमी आणि खुद्द सावरकरांच्याच घराण्याला असलेला इतिहासाचा वारसा, या घटकांमुळे सावरकरांना इतिहासाची गोडी लहान वयातच लागली, यात नवल असं काहीच नव्हतं! सावरकरांच्या पूर्वजांना पेशव्यांकडून भगूरजवळ राहुरी गाव इनामम्हणून मिळालं होतं. त्या परिसरात जमीनदारम्हणूनच ते ओळखले जात असत. इतिहासाशी त्यांचा नजीकचा संबंध आला तो असा!

 

घरातल्या सुसंस्कृत वातावरणामुळे त्यांच्यातला इतिहासकार जोमाने घडत गेला. त्यांच्या मातोश्री हरिविजय’, ‘पांडवप्रताप’, ‘शिवलीलामृतअशा अनेक ग्रंथांचे पारायण करीत. त्यामुळे इतिहास-पुराणे यावर सावरकरांचे प्रभुत्व लहानपणापासूनच होते. अज्ञात इतिहास जाणून घेण्याबद्दलची त्यांची ओढ त्यांच्या बालपणीच्या एका प्रसंगात दिसून येते. लहानपणी घरामध्ये शॉर्ट हिस्टरी ऑफ द वर्ल्डया पुस्तकातील अरबांचा इतिहास सांगणारा भाग त्यांना घरात सापडला. परंतु, त्याचे पहिले पान शोधूनही न सापडल्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी अज्ञात इतिहासाला समर्पित एक काव्यपंक्ती उत्स्फूर्तपणे रचली (जी पुढे सप्तर्षीया त्यांच्या महाकाव्यात वाचायला मिळते)

 

‘’जे भौमिक त्यांचा न शक्य सकलांचा,

विश्वेतिहास लिप्से तुजसी वेध

अकाट्य विकलाचा,

कल्प विमानीही की,

तु तार्‍यांचे जिने करुनी नभी,

जाशील उंच शोधित शोधित

कितीही जरी धरुनी नभी,

इतिहासाचे पहिले पान न मिळणे

कधी पहायाते,

आरंभ तुझा दुसर्‍या

पानापासुनी शाप हा याते

 

इतिहासाबद्दलची सावरकरांची ही समंजस भूमिका बालवयातच तयार झाली होती. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी श्रीमंत सवाई माधवरावांचा फटकालिहिला होता-

 

धन्य कुलामधी धनी सवाई

भाग्य धन्यची रायांचे

सेवक हाती यशस्वी असती

पुण्य किती त्या पायांचे

 

यानंतर तानाजीचा पोवाडा, चापेकरांवरील फटका, शिवरायांची आरती अशा काव्यात्मक रचनेतून त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटत गेले. खरंतर काव्यरचनात्मक ललित साहित्य हे इतिहासाच्या चौकटीत बसवून सावरकरांना इतिहासकारम्हणणे कदाचित घाईचे ठरेल. कारण, इतिहासातील समकालीन पत्रव्यवहारांचा अभ्यास, फारसी, अरबी, डच आदी भाषांचा अभ्यास, आवश्यक त्या संदर्भग्रंथांची उपलब्धता या निकषावर त्यांच्यातल्या इतिहासकाराला कदाचित इतिहासाचार्य राजवाडे, रियासतकार सरदेसाई इत्यादींच्या तुलनेत कमी गुण मिळतील. तथापि, अंदमानच्या काळकोठडीत दीर्घकाळ भोगलेला तुरुंगवास, तसेच रत्नागिरीतील स्थानबद्धता लक्षात येतात. सावरकरांच्या इतिहास लेखनाला असलेल्या मर्यादा समजून घेता येऊ शकतात. खुद्द सावरकरांनीदेखील ही गोष्ट कधीच नाकारली नाही.

 

सावरकरांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांच्या जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी भूमिकेतून आलेला असला तरी त्यांच्या लिखाणातून त्यांनी इतिहासकाराला अभिप्रेत असलेला तटस्थपणा पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथ व पुराणातील कथा कितीही सुरस वाटल्या तरी सावरकरांनी इतिहासलेखनाचा प्रारंभ करताना बुद्धकाळापासूनच सुरुवात केली. आपल्या सहा सोनेरी पानेया ग्रंथात ते लिहितात की, “इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनांतील नि घटनांतील स्थल नि काल ही जवळजवळ निश्चितीने सांगता आली पाहिजेत आणि त्यातील घटनांना परकीय वा स्वकीय अवांतर पुराव्यांचे शक्यतो पाठबळ मिळत असले पाहिजे. अशा कसोटीस बहुतांशी उतरणारा आपला प्राचीन कालचा वृत्तांत हा बुद्धकाळापासून मोजता येतो. यास्तव अनेक भारतीय नि पाश्चात्त्य प्राच्यविद्यावेत्ते आपल्या भारताच्या इतिहासाचा आरंभ या बुद्धकाळापासून सध्या समजत आहेत. या प्राच्यविद्यावेत्त्यांच्या सतत चालणार्‍या परिश्रमामुळे आज आपण ज्याला पौराणिक कालम्हणतो, त्यातलाही काही भाग नवीन संशोधन झाल्यास या इतिहासकाळात समावेशता येईल. पण, तोपर्यंत तरी बुद्धकाल हाच आपल्या इतिहासाचा आरंभ म्हणून समजणे भाग आहे.

 

आपल्या लंडनमधील वास्तव्यात असताना त्यांनी शिखांचा इतिहासदेखील लिहिला होता. तशा प्रकारचे आधुनिक काळात प्रथमच लेखन झाले होते. पण, दुर्दैवाने ते जगापुढे येऊ शकले नाही. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी सावरकरांनी त्यांना उपलब्ध झालेली सर्व साधने अभ्यासली होती. एका उल्लेखानुसार, त्यांनी गुरुमुखीचेसुद्धा अध्ययन केले होते. तथापि, सदर ग्रंथाची एक प्रत भारतात पाठवली असता ती गहाळ झाली, दुसरी प्रत एका भारतीय चित्रकाराला भारतात पोहोचविण्यासाठी दिली होती. परंतु, झडती होईल या भीतीने त्याने ती समुद्रात टाकून दिली. तिसरी प्रत मादाम कामा यांच्याकडे होती. परंतु, त्यांच्याकडील प्रतीचे काय झाले, याची माहिती उपलब्ध न झाल्याने तो ग्रंथ अप्रकाशित राहिला.

 

सहा सोनेरी पाने’, ‘हिंदुपदपादशाही’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘जोसेफ मॅझिनीचे चरित्रअशा विविध लेखनातून सावरकर एक इतिहासकारम्हणून आपल्यासमोर येत गेले. सावरकरांचे इतिहासलेखन कित्येक समकालीन क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले.

 

आपल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमरया ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात सावरकर म्हणतात, “जेव्हा एखादा लेखक प्रचंड क्रांतिरचनेचा इतिहास देताना त्या क्रांतीची ती भव्य व विशाल इमारत तोलण्यात मूलभूत असा पाया कोणता होता, याची मीमांसा करत नाही किंवा ते प्रचंड क्रांतिमंदिर एखाद्या गवताच्या काडीवर उभारलेले होते, असे बरळत सुटतो, तेव्हा तो वेडगळ तरी असतो किंवा भामटा तरी असतो किंवा या दोहोंतून तो कोणत्याही विशेषणास पात्र असला, तरी इतिहासलेखनाच्या पवित्र कृत्यास सर्वथैव नालायक ठरतो.इतिहासलेखनाच्या बाबतीत सावरकरांचा दृष्टिकोन इतका स्पष्ट व रोखठोक होता. ऐतिहासिक क्रांतीच्या इतिहासलेखकाने त्या क्रांतीतील वरवर असंबद्ध दिसणार्‍या प्रसंगांना किंवा तिच्या अद्भुततेला पाहून तिथेच स्तिमित होऊन न बसता तिच्या उगमाकडे शोध करीत गेले पाहिजे, ही भूमिका ते सातत्याने मांडताना दिसून येतात.

 

तत्कालीन परिस्थितीत इंग्रजी शिक्षणातून तयार झालेल्या ब्रिटिशधार्जिण्या कारकुनांनी लिहिलेला इतिहास, त्यांना कदापि मान्य नव्हता. भारताचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहासही समकालीन विचारवंतांनी मान्य केलेली विचारसरणी त्यांनी आपल्या लिखाणातून प्रभावीपणे खोडून काढली. आपण लिहिलेला इतिहास हिंदुत्वनिष्ठ भावनेतून लिहिला गेला आहे, या मताला त्यांनी कधीही नकार दिला नाही.

 

भारतभूमीचा इतिहास हा पराभूतांचा इतिहास असता, तर ही संस्कृती आत्तापर्यंत नामशेष झाली असती. पण, तसे झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाचा नेहमी गौरवास्पद भाषेतच,” असा त्यांनी उल्लेख केला. प्रख्यात चरित्रलेखक धनंजय कीर यांनी एकदा सावरकरांना त्यांचे चरित्र लिहिण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता, यावर सावरकरांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की, “गुरुचरित्र लिहू नका.या एका वाक्यातच इतिहासाकडे बघण्याची सावरकरांची दृष्टी दिसून येते.

 

इतिहास निरपेक्षपणे अभ्यासपूर्ण लिहायचा असतो, सावरकरांचे जीवनचरित्र पाहता, त्यांना उतारवयात स्मरणशक्तीच्या आधारावर लेखन करावे लागले. परिणामी, संदर्भांच्या बाबतीत सदोष असला तरी त्यामागची त्यांची निखळ भावना लक्षात येते. इतिहासलेखन म्हणजे व्यक्तिपूजन नव्हे, याची जाण त्यांना होती. त्यामुळे प्रसंगी व्यक्तीचे दोषही दाखविण्यात ते मागेपुढे पाहत नसत. आपल्या जात्युच्छेदक निबंधव इतर अनेक स्फुट लेखनातून त्यांनी हिंदू धर्मात बोकाळलेल्या अनेक अनिष्ट चालीरिती व परंपरा यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. वेद-पुराणातील अनेक दाखले देऊन त्यातला कोणता भाग कालबाह्य झाला आहे, याचेसुद्धा सावरकरांनी विश्लेषण केले आहे. भावनेच्या आहारी न जाता इतिहासातून बोध घेऊन पूर्वजांकडून झालेल्या चुका पुन्हा होऊ नये, याकरिता त्यांनी सातत्याने इतिहासातील दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडल्या. एकीकडे हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजालिहिणारे सावरकर आपण शिवरायांच्या गनिमी काव्याला आत्मसात करण्यात कसे कमी पडलो, यावर विचार करण्यास भाग पाडतात. बोलपट कसे पाहावेत?’ या निबंधातून त्यांनी तत्कालीन चित्रपटनिर्मात्यांनी इतिहासाच्या चालवलेल्या विटंबनेवर जे ताशेरे ओढले आहेत, ते आजही वाचण्यासारखे असून आजच्या काळातील चित्रपटांनादेखील लागू होतात.

 

एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जेवढे योगदान आहे, तेवढेच सावरकरांचे इतिहास लेखकया नात्याने मराठी साहित्यक्षेत्रात योगदान आहे. मराठी इतिहासलेखनात नवीन मापदंड रचणारे रियासतकार सरदेसाई हे एकदा सावरकरांच्या भेटीस गेले असता ते सावरकरांना म्हणाले की, “आम्ही फक्त इतिहास लिहिला, पण तुम्ही तो घडवला.हे एक वाक्यच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसे आहे. 

 
सौरभ रत्नपारखी
९८८१७८३४७४
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@