जिथे गुन्हेगारीला राष्ट्रभक्तीचे विचार संपवतात...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |


महाराष्ट्राच्या कारागृहांतील बंदिवानांसाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या राष्ट्रभक्ती विचारांवरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई ने यासाठी पुढाकार घेतला त्याविषयी...

 

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातील कारागृहात असताना त्यांनी बंदिवानांमध्येदेखील राष्ट्रभक्तीचे विचार बिंबवले आणि त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरित केले. आज स्वातंत्र्यवीर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आजही राष्ट्रभक्तीसाठी प्रेरित करणारे असून ते जर बंदिवानांमध्ये रुजले गेले तर निश्चितपणे त्यांच्यातील क्रयशक्तीचा उपयोग ते तिथून बाहेर पडल्यानंतर समाजहितासाठी तसेच राष्ट्रकार्यासाठी करतील. त्यामुळेच 'रामचंद्र प्रतिष्ठान' या संस्थेने हे विचार पुढे नेत त्यानुसार महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. गृह विभागाच्या विविध अधिकारी वर्गाशी संपर्क साधून त्यांना त्याचे महत्त्व समजावून देऊन, वेगवेगळ्या परवानग्या, सोपस्कार पूर्ण करत याबाबतची संमती कारागृह प्रशासनाचे महासंचालक यांच्याकडून मिळवली. यासाठी अशोक शिंदे तसेच नयना शिंदे यांनी विशेष प्रयत्न आणि आवश्यक तो पाठपुरावा केला.

 

ही परवानगी मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी या उपक्रमात सहभाग दिला आणि हा संपूर्ण उपक्रम पुरस्कृत केला. स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह डॉ. सुमेधा मराठे, स्वामिनी विक्रम सावरकर, स्नेहलता साठे, पृथ्वीराज सावरकर, अशोक शिंदे, नयना शिंदे आदींनी सक्रिय सहभाग घेत हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून यशस्वीपणे महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये राबविला आहे.

यंदा ही निबंध स्पर्धा येरवडा, मुंबई, ठाणे, तळोजा, नाशिक रोड, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अमरावती ही महाराष्ट्रातील सर्व मध्यवर्ती कारागृहे, रत्नागिरी विशेष कारागृह तसेच भायखळा, अलिबाग, लातूर, नांदेड, सोलापूर, सातारा जिल्हा कारागृहांमध्ये घेण्यात आली. त्याला २ हजारांहून अधिक महिला आणि पुरुष स्पर्धकांनी सहभाग दिला. मराठी, हिंदी तसेच इंग्रजी माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्तीपर निबंध लिहिले. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान पर्वावर, समाजसुधारणा तसेच हिंदुत्व विचारांवरील विषय तसेच १८५७ च्या क्रांतिकारकांपासून हौतात्म्य पत्करलेल्या राष्ट्रभक्तांचा समावेश असलेले विषयदेखील या निबंध स्पर्धेत दिले गेले होते. प्रारंभी या स्पर्धकांना दोन महिने अगोदर पुरेशी ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली गेली. तसेच त्या विषयाच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने कारागृहात बंदिवान असलेल्या स्पर्धकांमध्ये सावरकरांचे विचार भिनू लागले. त्यांना राष्ट्रभक्तीची जाणीव झाली.

स्वातंत्र्यवीर सावरकर कारागृहात कशासाठी आले होते आणि आपण कशासाठी आहोत, याची तुलना ते करू लागले आणि त्यांच्यात यापुढील काळात आपण स्वतःहून राष्ट्रकार्यासाठी तसेच समाजकार्यासाठी झोकून दिले पाहिजे, ही भावना निर्माण झाली. त्यांच्यातील वाईट प्रवृत्ती त्यामुळे आपोआप संपुष्टात येऊ लागली, त्यांच्या निबंधांतूनच त्यांचे हे विचार सर्वांसमोर आले. अंडा सेलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बंदीवानांचाही यात सहभाग होता. अनेकांचाकर्दनकाळ असलेल्या व्यक्ती, अट्टल व सराईतपणे कुकर्म केलेल्यांमध्ये सावरकर आणि त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार भिनू लागले. नवे कार्यकर्ते यातून सावरकर विचाराला मिळू लागले. उपेक्षित असलेल्या या घटकांमध्ये पोहोचल्याचा हा परिणाम होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'माझी जन्मठेप' या ग्रंथातील 'आत्महत्येचे आकर्षण' हे प्रकरण वाचल्यानंतर तर अनेकजण आत्महत्येपासून प्ररावृत्त झाले. आपल्या निबंधातून ही कबुलीच त्यांनी दिली.

अनेकजण स्पर्धेच्या दरम्यान किंवा पारितोषिक वितऱण कार्यक्रमात स्वतःहून आपले विचार व्यक्त करत आहेत. तसेच या स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल आणि त्यांच्यातील सकारात्मक बदलास कारणीभूत ठरल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असल्याचेही चित्र दिसू लागले आहे. काही स्पर्धकांनी तर तिथून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले, तसेच नवीन जीवनाला प्रारंभ करण्याची प्रेरणादेखील घेतली. स्मारकाच्या वतीनेही त्यांना प्रोत्साहित करण्यात येत असून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याची प्रेरणादेखील त्यांनी देण्यात आली. त्यामुळे समाजात एक नवे परिवर्तन घडून येत आहे. हे सारे अनुभव कारागृह प्रशासनाला भारावणारे असेच होते. त्यामुळे भूषणकुमार उपाध्याय, डॉ. विठ्ठल जाधव तसेच कारागृहातील शिक्षकवर्गदेखील या उपक्रमाकडे अत्यंत परिणामकारक व प्रभावी असल्याचे अभिप्राय देऊ लागला. गेल्यावर्षी हा उत्साह व मागणी पाहता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व रामचंद्र प्रतिष्ठान यांनी नियमितपणे हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्याचे ठरविले आहे. त्यातून समाजाने दुर्लक्षित केलेल्या या घटकांना मानाने व सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी केवळ ७ कारागृहांमध्ये राबविलेला हा उपक्रम यंदा १६ कारागृहांमध्ये राबविला गेला. पुढच्या वर्षीदेखील अधिक कारागृहे समाविष्ट करून बाहेरच्या राज्यांमध्येदेखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी अनेक मान्यवरदेखील सक्रिय सहभाग देत आहेत. मृत्युंजय मासिकाचे संपादक गणेश वढवेकर, अ‍ॅड. अभिजीत देवधर, शोभा नाखरे, विनायक काळे, राजश्री खुस्पे, शैलजा फणसे अशा अनेकांचा यात सहभाग मिळत आहे.

- राजेंद्र वराडकर
 

(लेखक स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई समितीचे कार्यवाह आहेत.संपर्क ९८२१३७४६२६, ०२२-२४४६५८७७)

 
@@AUTHORINFO_V1@@