आर्य चाणक्य आणि सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |


 
 
हिंदुत्व, धर्मसुधारणा, हिंदुराष्ट्र या सर्वांच्या हक्काचं रक्षण करणारी लोकशाही याची सुयोग्य सांगड घालणारी राष्ट्राच्या प्रगतीची नीती सावरकर आपल्याला सांगत होते. अशीच तत्त्व श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्या त्या काळात सांगून ठेवली होती आणि आचरून दाखवली होती.
 

भारतीय राजकारणातल्या १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामधला यंदाचा सर्वात लक्षवेधी मुद्दा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा! आजवरच्या वाटचालीत जितका महत्त्वाचा तितकाच दुर्लक्षित! हिंदुस्थानच्या भूतकाळात फार फार खोलवर डोकावून जाऊन पाहिलं तर आपल्याकडे परराष्ट्रनीती, कूटनीती, सुरक्षा या सगळ्याच बाबतीतले दिग्गज होऊन गेले. देवत्वाचा विचार जरा बाजूला ठेवून एक मुत्सद्दी राजकारणीम्हणून थेट श्रीकृष्णाकडे पाहा! त्याच परंपरेत पुढे आपण चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव यांच्यासह थेट गेल्या शतकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत येऊन पोहोचतो.

 

प्रजेला त्रास देणार्‍या कंसाचा वध करण्यासाठी कृष्णाने थेट त्याच्या दरबारातला अक्रूरनावाचा सरदार आपला हेर म्हणून गळाला लावला आणि त्याच्याकरवी गुप्त बातम्या मिळवून कंसाचा काटा काढला. (कंस त्याचा मामा असूनही!) भीष्मासाठी त्याने शिखंडीची योजना केली. कर्णाजवळची सामर्थ्यवान अस्त्रे संपवून टाकण्यासाठी भीमपुत्र घटोत्कचाला बळी दिले. कारण, कदाचित त्याच्या आसुरी शक्तीमुळे पुढे पांडवांनाच अपाय होण्याची शक्यता होती. वेळोवेळी त्याने आपले निष्ठावान खबरी पेरले आणि कौरवांच्या सगळ्या योजना जाणून घेतल्या. तो एक उत्तम व्यूहनीतीज्ञ होता. त्याचीच काही तत्त्वं चाणक्याने अंगिकारलेली दिसतात. राज्य उभे करण्यासाठी, ते उत्तम प्रकारे चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा त्यांनी ओळखल्या आणि राजनीतीचे अर्थशास्त्र (Political Economy) आपल्यासमोर मांडले. ते आज जगभर शिरोधार्ह आहे. आदर्श राज्यव्यवस्था चालविण्यासाठी येणार्‍या आव्हानांबद्दल त्यांनी यात सविस्तर सिद्धांत मांडले, राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही मूलभूत विचार दिले, जे कुठल्याही काळात कुठल्याही राज्यव्यवस्थेसाठी आचरणशील आहेत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात याचा अवलंब केलेला दिसतो. पुढे इंग्रजांना परतवून लावताना सुमारे सव्वाशे वर्षांनंतर भारत एक राष्ट्रम्हणून जगाच्या नकाशावर उदयाला येणार होते. या काळातली अनेक आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलली होती. जगाच्या नकाशावर अनेक राष्ट्रे शस्त्रसज्ज होत होती आणि या सगळ्या स्पर्धेत एक स्वतंत्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी देशाला एका शक्तिशाली नीतीची, धोरणाची गरज होती आणि ही नीती सांगणारे एकमेव नेते आपल्याकडे होते, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर!

 

त्यांच्या विचारांचा पाया श्रीकृष्ण आणि चाणक्य धोरणांकडेच लक्ष वेधणारा होता. धनानंदाची जुलमी सत्ता उखडून टाकण्यासाठी चाणक्याने चंद्रगुप्ताच्या सोबतीने मगध राज्यात जागोजागी सैन्य संघटित केले, गुप्त मंडळे निर्माण केली. सावरकरांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात तेच केले. स्वराज्यप्राप्तीसाठी गुप्त मंडळे, कट, सशस्त्र बंडाळी, निर्बंधभंग हे पुण्यप्रद असतात आणि ब्रिटिशांना येथून हाकलण्यासाठी हे करावेच लागेल,” असे सावरकर सांगत. रत्नागिरी स्थानबद्धता पर्वात हिंदू धर्मातील जातीभेद नाहीसा करा, असं सांगून पुढे त्यांनी एका सामर्थ्यशाली हिंदुत्वाची मांडणी केली, जे हिंदुत्व राष्ट्राला सशक्त करणारे होते. सुटकेनंतरच्या पहिल्याच अधिवेशनात माझी उर्वरित शक्ती हिंदुस्थानच्या संरक्षणाचा आणि स्वातंत्र्याचा लढा पुढे नेण्यासाठी आहे, असं मी मानतो.असं त्यांनी जाहीर केलं होतं. सैन्य, आरमार आणि वैमानिक दलात जास्तीत जास्त हिंदूंना सामील व्हायला ते सांगत होते. नवनवीन शस्त्रनिर्मितीच्या कारखान्यातून आपली माणसे शस्त्रनिर्मितीचे शिक्षण घेऊन त्याच्या निर्मितीला लागायला हवीत यासाठी तरुणांना सैनिकी शिक्षण सक्तीचे करा,” असेही सांगत होते. कितीही मोठ्या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी किमान एक कोटी सैन्य भारताच्या सीमा सुरक्षेसाठी तत्पर असायला हवे, हा विचार त्यामागे होता. चाणक्य म्हणाले होते, “कोशमूलोदंड: म्हणजेच सैन्य पैशावर अवलंबून असते.म्हणूनच सशक्त सैन्यासोबत संपन्न आर्थिक बळ हवंच! शक्य त्या नव्या तंत्राच्या आधारे स्वदेशी उत्पादन वाढवायला हवे, ज्या काळात हाती कसलीही योजना नसताना खेड्याकडे चलाअसं पोकळ आवाहन गांधी देशाला करत होते, तेव्हा देशातली शहरे अद्ययावत व्हावीत याबरोबरच शेतकरीवर्गाला नवशक्ती देण्यासाठी खेडी नुसती संपन्न होऊन चालणार नाही, तर त्यांचे नूतनीकरण व्हायला हवे, असा मूलभूत विचार सावरकर मांडत होते.

 

ज्या काळात दोन भयंकर जागतिक महायुद्धे होऊन गेलेली होती आणि कदाचित शीतयुद्धासंबंधीच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या, त्या काळात आमच्या राज्यकर्त्यांना मात्र लष्कर व शस्त्रविरहित देश असावा, असं वाटत होतं. आम्ही कुणावरही आक्रमण करणार नाही, आम्ही तटस्थ राहिलो तर आमच्यावर आक्रमण करणार कोण? आम्हाला काय गरज लष्कराची?” किती तो भाबडा प्रश्न! आम्ही तटस्थ राहू, अशी घोषणा चिमण्यांनी केली तरी ससाणे त्यांच्यावर झेप घेण्याचे सोडणार आहेत का?” हे त्यावर सावरकरांचे उत्तर! लोकशाही जर यशस्वी करायची असेल, तर तिच्या पाठीशी सामर्थ्यशाली सैन्यशक्ती उभी करावी लागते म्हणून नवनवीन, अद्ययावत शस्त्रास्त्रे जवळ बाळगा, बलसंपन्न व्हा आणि मग खुशाल सांगा,“आम्ही कुणावरही आक्रमण करणार नाही किंव्हा तटस्थ राहू.या शब्दांना तेव्हा काहीतरी अर्थ येईल. चाणक्य नेमकं हेच म्हणतात, “आत्मनि रक्षिते सर्वं रक्षितं भवति।आत्मरक्षण झाले तर इतर वस्तूंचे संरक्षण होते. दन्डनीत्यामायत्तमात्मरक्षणम् - आत्मरक्षणहेही दंडनीतिवर अवलंबून आहे. अमित्रो दंडनित्यमायत्त:।अर्थात शत्रू दंडनीतीनेच स्वाधीन ठेवता येतो. तुमचे परराष्ट्र धोरण कसे असेल?” असे विचारल्यावर सावरकर सांगतात, “कायमचे असे एकच परराष्ट्र धोरण असू शकत नाही, असू नये. एका शब्दात माझे परराष्ट्र धोरण सांगतो, ठशीळिीेलळीूं. म्हणजे जशास तसे.जे राष्ट्र आमच्याशी मित्रत्वाने वागेल, त्याच्याशी आम्ही मित्रत्वाने वागू, जो शत्रुत्वाने वागेल, त्याच्याशी आम्ही शत्रुत्वाने वागू, शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र असेल आणि शत्रूचा जो मित्र तो आमचा शत्रू असेल.

 

चाणक्याच्या संदर्भात आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पाताळयंत्रीपणा. त्याने अवलंबलेली कूटनीती. शत्रूच्या गोटातील लोकांना फितवून घ्यावे, शत्रूची सगळी बलस्थाने ओळखून आपले हस्तक त्यांच्या देशात पेरावे,” असं चाणक्य नुसते म्हणाले नाहीत, तर धनानंदाच्या सैन्यशक्तीचा धांडोळा घेण्यासाठी त्यांनी चंद्रगुप्ताला थेट त्याच्या छावणीत पाठवलं. सावरकरसुद्धा शत्रूच्या शिबिरात थेट लंडनला जाऊन गुप्तपणे कार्य करू लागले. शत्रूच्या हाती सापडल्यानंतर गुलामम्हणून हाल सहन करण्यापेक्षा शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकून सुटका करून घेतली पाहिजे आणि यासाठी गरज पडल्यास वेषांतर करून, भुयार खोदून, शक्य असेल तर जलमार्ग वा कसलाही वापर करावा, पण आपली सुटका करून घ्यावी,” असं चाणक्य सांगतात. सावरकरांनी ब्रिटिशांना लिहून दिलेली पत्रे चाणक्यचे हे विचार डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली, असा भास होतो. त्यांची मार्सेलिसची उडीच सांगते की, ते भारतात त्यांच्यावर खटला भरण्यापूर्वीच पलायन करण्याच्या बेतात होते. लंडनला असतानाही असे प्रयत्न त्यांच्या सहकार्‍यांनी घडवून आणले होते. शत्रूच्या तावडीत राहून स्वत:चा शक्तीक्षय करून घेणे हा त्यांच्या नीतीचा भाग नव्हताच, हे जाणकारांनाच फक्त कळेल.

 

हिंदुत्व, धर्मसुधारणा, हिंदुराष्ट्र, राष्ट्राचे सैनिकी धोरण, अर्थनीती, परराष्ट्रनीती, अंतर्गत राज्यव्यवस्था, शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न, यांत्रिकीकरण, शहरीकरण, भाषिक अस्मिता आणि सर्वांच्या हक्काचं रक्षण करणारी लोकशाही याची सुयोग्य सांगड घालणारी राष्ट्राच्या प्रगतीची नीती सावरकर आपल्याला सांगत होते. अशीच तत्त्व श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्या त्या काळात सांगून ठेवली होती आणि आचरून दाखवली होती. जागतिक परराष्ट्रनीतीचा मुत्सद्दी हेन्री किसिंजर आपल्या ‘World Order’ ग्रंथात म्हणतो, “श्रीकृष्ण, चाणक्य, शिवाजी महाराज किंवा सावरकर यांना परिणामांची चिंता होती. राष्ट्राच्या हिताचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्याची त्यांची तयारी होती.थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘Ends Justify the means.’ हे त्याचं तत्त्व! अंतिम साध्य महत्त्वाचं, त्यासाठी कुठलीही साधनं वापरावी लागली तरी चालतील. पण, भारतातल्या विचारवंतांना खरेखुरे अनुयायी लाभले नाहीत, हे दुर्दैव! चाणक्याचं राजनीतिशास्त्र आज जगभर आदर्शवत आहे. पण, १९०४ सालापर्यंत आपल्याकडच्या लोकांना ते सापडतच नव्हतं. रामशास्त्र्यांनी त्याचा शोध लावल्यानंतरही काहींनी त्याला मिथ्याशास्त्रम्हणून त्याज्य ठरवलं. सावरकरांचंही तसंच झालं. त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांना भक्त खूप मोठ्या संख्येने लाभले. पण, त्याऐवजी एखादा तरी समर्थ अनुयायी राज्यकर्ता लाभला असता तर भारताची ७२ वर्षांची वाटचाल खूप वेगळी ठरली असती.

पार्थ बावस्कर

८२७५२०४५००, ९१४६०१४९८९

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@