भागानगरचा नि:शस्त्र प्रतिकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


 

स्वा. सावरकरांनी भागानगरचे आंदोलन अधिक तीव्र केले. राज्यात नागरिकांच्या अधिकाराची स्पष्ट मागणी केली. सर्व भारतीयांना निजामाविरुद्ध उभे करून जातीयवादी हुकूमशाही नष्ट करून सामान्य लोकांचं राज्य आणण्याची इच्छा सावरकरांना होती. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचे जत्थे हैदराबाद (भागानगर) कडे निघाले होते. १० महिन्यांत चार हजार स्वयंसेवक तुरुंगात गेले होते. तेव्हा, भागानगरचे आंदोलन आणि सावरकरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

. १९४७ पर्यंत साधारण ५६५ संस्थाने भारतात होती. या संस्थानिकांना ब्रिटिशांनी मर्यादित स्वायत्तता दिली होती. यात सर्वात मोठे निजामाचे हैदराबाद (भागानगर) संस्थान होते. स्वातंत्र्याच्यावेळी निजामाने आपले संस्थान स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबादमधील जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात ८८ टक्के हिंदू, ११ टक्के मुस्लीम आणि १ टक्के इतर लोक होते. निजामाच्या अन्यायी, अत्याचारी सत्तेपुढे सर्व जनता हैराण झाली होती. निजामाच्या जहागीरदार, जमीनदार आणि सरंजामशाहीविरुद्ध हळूहळू चळवळ उभी राहू लागली. या चळवळीत दलित, साम्यवादी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदू महासभा, केशवराव कोरटकरांचा आर्य समाज हे अग्रभागी होते. हैदराबादमधील दलित चळवळ ही डॉ. आंबेडकरांच्या विचाराने कार्यान्वित होती.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ११ ऑक्टोबर, १९३८ रोजी हैदराबाद (भागानगर) नि:शस्त्र प्रतिकार मंडळाच्या स्थापनेची घोषणा पुण्यातील शनिवारवाडा येथील सभेत केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भागानगरच्या नि:शस्त्र लढ्याचे नेतृत्व करावे, अशी वाय. डी. जोशी व आ. गो. केसकर यांनी इच्छा व्यक्त केली होती. या नि:शस्त्र प्रतिकार मंडळाच्या अध्यक्षपदी ग. वि. केतकर तसेच सचिवपदी नथुराम गोडसे होते. अन्य सभासदांमध्ये शंकर दाते आणि मसुरकर महाराज होते. नि:शस्त्र प्रतिकार मंडळाच्या सदस्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी गावात, प्रमुख शहरांत जाऊन नि:शस्त्र प्रतिकार लढ्याची पत्रके वाटली, तसेच आंदोलन अधिक तीव्र होण्यास प्रारंभ केला. यासोबत लढ्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याचेही काम सुरू झाले. भागानगर आंदोलनासंबंधी पुण्यात झालेल्या निर्णयानुसार स्वा. सावरकरांनी अनेकांना पत्रे पाठवली. त्यापैकी एक पत्र वर्णाश्रम स्वराज्य संघाचे विश्वासराव डावरे यांना पाठवले. त्यात त्यांनी लिहिले की, “आता वर्णाश्रम संघाच्या धर्माभिमान्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा. निजामी राज्यात सर्व प्रजेवर अन्याय होत असून सर्वधर्मीय चळवळ असे स्वरूप ठेऊन काहीच अर्थ नाही. मशिदी बांधायला अनुमती मिळत असून केवळ मंदिरांनाच अनुमती नाकारली जात आहे. ‘स्टेट काँग्रेस’ ही तेथील मुस्लीम धर्मीयांची शाखा आहे. सध्या निजाम त्या काँग्रेसला आतून पाठिंबा देत असून तिला हिंदूंचे नेते देऊन तिच्याशीच नंतर काहीतरी तडजोड करायची आणि हिंदू आंदोलन दडपून टाकायचे, असा त्यांचा कुटिल डाव आहे. तसे नसते तर दोन वर्षांपूर्वी काँग्रेसने हे आंदोलन का चालू केले नाही? पण, आता आपला क्रांतिकारक पक्ष आगगाडीच्या यंत्राप्रमाणे डबे खेचू लागताच मवाळ पक्ष डब्याप्रमाणे मागे येत आहे. प्रत्येक चळवळीचा हा नियम आहे. काँग्रेसला यश मिळायचे तर त्याससुद्धा आपण सर्वशक्तीनिशी आंदोलन केले पाहिजे, याच दृष्टीने सत्य परिस्थिती निर्भयपणे सांगून आपण राष्ट्रनिष्ठेच्या स्वतंत्र ध्वजाखालीच हे आंदोलन चालवले पाहिजे. दबल्या गेलेल्या हिंदू नेत्यांनी आपल्या आंदोलनाला नाकारले, साह्य देण्यास नाकारले तरीही आपण आपल्या शक्तीच्या बळावर हे आंदोलन चालूच ठेवले पाहिजे. या दृष्टीने आता आर्य समाजाने वाटाघाटीच्या जाळ्यात न फसता आंदोलनाच्या दृष्टीनेच सिद्धता केली पाहिजे.” या पत्रावरून सावरकरांचा भागानगर काँग्रेसच्या चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. सावरकर हिंदू सभेच्या चळवळीला असे प्रोत्साहन देत होते आणि भागानगरचे हिंदू तरुणही आंदोलनास सिद्ध होत होते. २१ ऑक्टोबर, १९३८, स्थान गवळीगुडा राम मंदिर भागानगर संस्थानातील पहिला सत्याग्रह शासनाचा बंदीहुकूम मोडून मिरवणूक काढायची, पत्रके वाटायची आणि सरकारी धोरणाविरुद्ध घोषणा द्यायच्या, असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. २७ ऑक्टोबर, १९३८ ला स्वा. सावरकरांनी स्वत:च्या स्वाक्षरीने एक पत्रक काढले. त्यात भागानगर संस्थानातील धर्मछळापायी ज्या आपल्या हिंदू बांधवांवर संकटे कोसळली, त्यांना साहाय्य करण्यासाठी गणपती उत्सवाच्या आधी काढलेला निधी आता बंद करण्यात येत आहे. त्यातही आता भागानगरच्या चळवळीने निर्बंध भंगाचे (कायदेभांगाचे) आणि नि:शस्त्र प्रतिकाराचे स्वरूप धारण केले आहे आणि त्या कार्यासाठी ग. वि. केतकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या मंडळाने ‘भागानगर हिंदू सत्याग्रह निधी’ या नावाने निराळा निधी काढण्याचे ठरवले आहे, असे पत्रकाद्वारे सांगण्यात आले.

 

२५ नोव्हेंबर, १९३८ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नि:शस्त्र सत्याग्रहाच्या आवश्यकतेवर भर देऊन सांगितले, “राज्यात हिंदूंनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न केलेत. पण, निजाम सरकारला हिंदूंच्या सुरक्षेबद्दलचे त्यांचे उत्तरदायित्व समजत नाहीय म्हणून नाईलाजास्तव सत्याग्रहाचं पाऊल उचलावं लागत आहे. राज्यात हिंदूंच्या होणाऱ्या मुस्कटदाबीवर आर्य समाजाने बाहेरच्या हिंदूंचं लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते जेलमध्ये डांबण्यात आलेत. काहींना तर मारून टाकण्यात आले आहे.” स्वा. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे २८ आणि २९ डिसेंबर, १९३८ रोजी हिंदू महासभेचं अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात भागानगरच्या नि:शस्त्र प्रतिकार मंडळाच्या आंदोलनाला मान्यता देण्यात आली. ग. वि. केतकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित मंडळ विसर्जित करून त्याची पुनर्रचना केली गेली. १९ जानेवारी, १९३९ पासून हे आंदोलन हिंदू महासभाअंतर्गत प्रारंभ करण्याचा निश्चय केला गेला. सर गोकुलचंद नारंग, भाई परमानंद, इंद्रप्रकाश आणि चांदकरण शारदा यांची एक समिती सावरकरांनी तयार केली. सावरकरांच्या निर्देशानुसार अनेक ठिकाणी हिंदू महासभेकडून आंदोलने करण्यात आली, तसेच स्वयंसेवकांसाठी शिबिरे घेण्यात आली. स्वा. सावरकरांनी धुलपेठ दंग्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी शंकर दाते, वि. स. मोडक, ग. स. काळे यांना पाठवले. त्यांच्या अहवालानुसार, स्वा. सावरकरांनी ११ जानेवारी, १९३९ रोजी हैदराबादचे प्रधानमंत्री अकबर हैदरी यांना पत्र लिहून राज्यात होत असलेल्या हिंदूंवरच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध तक्रार केली तसेच हे बंद होण्याविषयी सांगितले. ते असे, “मी तुम्हाला विश्वास देतो की, महासभेला राज्यातील मुसलमानांबद्दल किंवा निजामांबद्दल कुठलाही द्वेष नाही. महासभेला उलट असं वाटतं की, मुसलमान असो वा हिंदू, सर्वांना प्रगती साधण्याची समान संधी प्राप्त व्हावी, नोकरीत एखाद्या विशिष्ट वर्गाला स्थान न देता योग्यतेच्या निकषावर नोकरी मिळावी. न्याय व समानतेच्या तत्त्वावर कायद्याची रचना व्हावी. महासभा वैधतापूर्ण उपायांमार्फत सामंजस्य करण्याच्या पक्षात आहे. जर हा प्रस्ताव सरकार अमान्य करत असेल तर नाईलाजास्तव सत्याग्रह तीव्र करावा लागेल.”

 

या पत्राच्या उत्तरात अकबर हैदरी यांनी हिंदूंवर अन्याय, अत्याचार होतात, हे अमान्य केले तसेच भेदभाव होतो, हेही अमान्य केले. यावर स्वा. सावरकरांनी आंदोलन अधिक तीव्र केले. राज्यात नागरिकांच्या अधिकाराची स्पष्ट मागणी केली. सर्व भारतीयांना निजामाविरुद्ध उभे करून जातीयवादी हुकूमशाही नष्ट करून सामान्य लोकांचं राज्य आणण्याची इच्छा सावरकरांना होती. या कार्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी भिडे आणि नथुराम गोडसे यांना दक्षिण महाराष्ट्रात, तसेच दाते आणि बाबुराव काळे यांना बार्शीला पाठविण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचे जत्थे हैदराबाद (भागानगर) कडे निघाले होते. १० महिन्यांत चार हजार स्वयंसेवक तुरुंगात गेले होते. पुणे, मुंबई, नागपूर, अकोला इ. ठिकाणी स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात होते. तसेच हैदराबाद, गुलबर्गा, बिदर, नांदेड, हदगाव, तुळजापूर, जालना, परभणी, औरंगाबाद, वैजापूर, पैठण या ठिकाणी सावरकरांच्या निर्देशानुसार सत्याग्रह होऊन तुरुंग भरले गेले. १३ सत्याग्रही तुरुंगामध्ये मृत्यू पावले. अनेक ठिकाणी रझाकार गुंडांनी सत्याग्रहींवर हल्ले केले. सावरकरांनी २४ एप्रिल, १९३९ रोजी सरकारला ठणकावून सांगितले की, सरकार जर शांतीपूर्ण मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींना गुंडांच्या हाती सोपवून आपल्या उतरदायित्वापासून विन्मुख होणार असेल, तर याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल. सत्याग्रहींचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, सरकारला सत्याग्रहींना हिंसा आणि दमदाटी करून त्यांना सत्याग्रह करण्यापासून परावृत्त करता येईल, असे वाटत असेल तर ती त्यांची चूक ठरेल आणि तसे केल्यास सत्याग्रह शिथिल न होता आणखी तीव्र होईल. हिंदूंच्या कष्टांचं उचित निराकरण हेच राज्यात स्थायी शांतता आणू शकते.

 

स्वा. सावरकरांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे समस्त हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. परकीय अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य, स्फुल्लिंग हिंदूंमध्ये निर्माण झाले होते. सावरकरांनी सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन करत हेही सांगितले की, “एखादा हिंदू नसणारा, पण तो निजामाच्या अन्याय, अत्याचाराला विरोध करून हिंदू धर्माचे रक्षण करणारा कार्यकर्ता राहील, तर त्याचे हिंदू महासभा अभिनंदन करेल.” सावरकरांचे हे आंदोलन सर्वदूर पोहोचले होते, त्याचा तसा परिणामही दिसत होता आणि म्हणूनच या आंदोलनात पुढे अनेक कार्यकर्ते जोडले गेले, हिंदू संघटन वाढत गेले, सावरकरांच्या हिंदूहितरक्षणाचे तत्त्व सर्वत्र पसरू लागले. यामुळे शेकडो कार्यकर्त्यांसोबत सावरकरांनी सुरू केलेले हे जनांदोलन यशस्वी झाले आणि याचा परिपाक म्हणून निजामाने हिंदू महासभेच्या बहुतांश अटी मान्य केल्या व आंदोलन यशस्वी झाले.

 
- किरण गोटीमुकूल 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@