‘सावरकर’ आज का वाचावे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |




आज सावरकरांवर व्याख्याने देताना मला जाणवतं, गावागावांत ‘सावरकर’ जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सावरकरांचा अभ्यास करणारी सशक्त पिढी उभी राहते आहे, ऑडिओ बुक्स, नाटक, गीतपर कार्यक्रम यातून सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीदेखील तुम्ही स्वत: वाचल्याशिवाय तुम्हाला ‘उत्तम, उदात्त आणि महन्मधुर’ म्हणजे काय आहे, ते कळणार नाही.

 

सावरकरहा केवळ एक शब्द नाही, ‘सावरकर’ हे केवळ आडनाव नाही, ‘सावरकर’ ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ‘सावरकर’ हा ‘कृतियुक्त विचार’ आणि ‘विचारशील कृती’ आहे. ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ असा उच्चार झाल्यावर मनासमोर उभी राहते ती एक ‘अर्पणपत्रिका!’ पुस्तकाच्या आधी लेखकाने ‘अर्पणपत्रिका’ लिहिलेली असते. ते पुस्तक कोणाला तरी अर्पण केलेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे ‘सावरकर’ नावाचा हा महान ग्रंथ फक्त आणि फक्त देशासाठी अर्पण झाला. अगदी जळालासुद्धा. मात्र, राखेतूनही ‘सावरकर’ नावाचा ‘विचार’ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घेताना दिसत होता, दिसत आहे आणि पुढेही राहणार आहे.

 

सावरकरांवर तुम्ही प्रेम करू शकता किंवा त्यांचा तिरस्कार, द्वेष करू शकता. तुम्ही स्वीकारू शकता किंवा धिक्कार करू शकता. तुम्ही या ‘विचारा’चा विचार करून स्वत:मध्ये बदल घडवून आणू शकता किंवा विचार न करता वाट्टेल ते बरळू शकता. तुम्ही सावरकर कृतीत उतरवू शकता किंवा सावरकर सोडून देण्याची कृती करू शकता. पण, तुम्ही सावरकरांना ‘टाळू’ शकत नाही. ‘ब्रिटिश ते स्वतंत्र भारताचे नागरिक’ आणि ‘इंग्लंड ते भारत’ असा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. परंतु, हा ‘इतिहास’ आज वाचण्याची गरज आहे का? इतिहासातून भविष्याचा वेध घेण्याच्या सावरकरांच्या कार्यपद्धतीचे आज अवलंबन करण्याची गरज आहे का? १८८३ मध्ये जन्माला आलेल्या आणि १९६६ मध्ये हे जग सोडून गेलेल्या या माणसाच्या नव्हे, तर एका ‘कृतिवीरा’च्या संपूर्ण जीवनसंग्रामाचा आढावा घेणं, त्याच्या साहित्याचा अभ्यास करणं, त्याच्या लेखनावर चर्चा करणं, वाद घालणं, प्रबंध लिहिणं, नवनवीन संशोधन करणं, हे करण्याची आज गरज आहे का? साध्या-सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर पुन्हा एकदा या झंझावती, पण झगमगीत दुनियेपासून लांब गेलेल्या, प्रसिद्धीपासून वंचित राहिलेल्या इतिहासाचा धांडोळा घेण्याची गरज आज आहे का, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. आज एकविसाव्या शतकात वावरताना, आयटी तंत्रज्ञान, स्पर्धेचं जग यामध्ये फिरताना ‘इतिहास’ या विषयाचा पुन्हा एकदा अभ्यास करावा का? आणि का करावा? असा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो. मात्र, एक गोष्ट आपण ध्यानात ठेवायला हवी, की ‘इफ यू डोन्ट नो युवर पास्ट, यू हॅव नो फ्युचर!’

 

सन १८८३ मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तेव्हापासून ते १९६६ मध्ये त्यांच्या आत्मार्पणापर्यंत, म्हणजे ८३ वर्षांच्या या वादळाचा अभ्यास करताना लक्षात येतं, ‘सावरकर काय होते’ याहीपेक्षा ‘काय नव्हते’, हे सांगणं कदाचित सोपं असावं. कारण, इतिहासापासून विज्ञानापर्यंत, स्वातंत्र्यापासून सामाजिक कार्यापर्यंत, कवितांपासून ते कोलू फिरवण्यापर्यंत, अंदमानापासून स्थानबद्धतेपर्यंत, ‘जयोऽस्तुते’पासून’ने मजसि ने’पर्यंत, बॅरिस्टरच्या कोटपासून ‘ऊ’ असे इंग्रजी अक्षर लिहिलेल्या कैद्याच्या वेषापर्यंत, बॅरिस्टरपासून राजबंदीपर्यंत, परदेशी कापडाच्या होळीपासून ते ब्राउनिंग पिस्तुले भारतात पाठवण्यापर्यंत, मदनलाल धिंग्रापासून ऐन तारुण्यात पदार्पण करूनही जीव देशावर ओवाळून टाकणाऱ्या अनंत कान्हेरेपर्यंत, चाफेकर बंधूंपासून ते सेनापती बापटांपर्यंत, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या दंडापासून ते गांधी अभियोग खटल्यापर्यंत, मोठ्या भावाच्या निधनापासून ते लहान भावाच्या मृत्यूपर्यंत, इंग्रजांच्या छळापासून स्वकीयांच्या उपेक्षेपर्यंत आणि शत्रूस मारिता मारिता मरेतो झुंजेन’ या शपथेपासून ते ‘धन्योऽहं, धन्योऽहं’ या उद्गारापर्यंतचा हा प्रवास. उपेक्षांचे कढ पचवत, अपमान सहन करून स्वत:चं आणि स्वत:च्या देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठीचा हा झगडा. आपण अनुभवू शकलो नाही. किमान वाचू शकतो ना?

 

सावरकरांच्या लेखणीने अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, लाला हरदयाळ, खुदीराम बोस हे त्यांच्या लेखनातून आणि वक्तृत्वातून प्रेरित झाले होते. नेताजींनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या सावरकरांच्या ग्रंथांची बंगाली भाषेतली आवृत्ती प्रकाशित केली होती. या ग्रंथांची दाहकता जबरदस्त आहे. आजवर भारतातील अनेक भाषांमध्ये विविध प्रकारच्या ३० आवृत्या या एकाच ग्रंथाच्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘माझी जन्मठेप,’ ‘काळे पाणी,’ ‘सावरकरांच्या कविता,’ ‘सहा सोनेरी पाने,’ ‘हिंदुत्व’ या ग्रंथांनांही उदंड लोकप्रियता लाभली आहे. मग हे सगळं अनुभवण्यासाठी सावरकर वाचणं क्रमप्राप्त ठरतं. सामान्यत: सावरकरांची भाषा जड आहे, जुनी मराठी आहे, संस्कृतप्रचूर आहे वगैरे वगैरे कारणे देऊन अनेक लोक सावरकरसाहित्य वाचण्याचा कंटाळा करताना दिसतात. ते काही अंशी खरं आहेसुद्धा. परंतु, ही सबब वाचन थांबवण्यासाठी देऊन काय साध्य होणार? त्यापेक्षा थोडं-थोडं वाचून, जाणकारांकडून समजावून घेतलं, शब्दकोशाचा आधार घेतला, तर भाषा कळेलच. शिवाय, त्या अत्यंत सुंदर आणि तितक्याच जाज्वल्य अशा भाषेचा आनंद घेता येईल. अत्तर ‘डायल्युट’ करता येईलही, पण या नादात त्याचा खरा, अस्सल सुगंध घालवून बसेल, त्याचं काय?

 

उदंड लिखाण, प्रचंड त्याग, सतत फक्त ‘राष्ट्राय स्वाह:’ असं म्हणून स्वातंत्र्याच्या यज्ञात स्वत:सह घरादाराच्या प्रत्येक क्षणाची आहुती दिल्यानंतरही सावरकरांवर आज वाट्टेल तसे आरोप होत आहेत. का? कधी कधी त्यांनाच सांगावंसं वाटतं की, तात्याराव तुमचा ‘ओव्हरऑल प्रॉब्लेम’ काय माहितीये? तुमचं उरणं! ‘उरणं’ हाच तुमचा प्रॉब्लेम होतोय. उरला नसतात, तर मिटवून टाकता आलं असतं तुम्हालाही दोन-चार पानाच्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यात, गाळलेल्या जागांमध्ये किंवा सरकारी दफ्तरांतल्या भिंतींवर फोटोंमध्ये ‘टांगून’ फक्त ‘पूजनीय’, ‘आदरणीय’ किंवा ‘वंदनीय’सुद्धा करता आलं असतं! किती सोपा मार्ग होता हा! मात्र, तुम्ही उरलात!

 

चित्रपट, नाटक, कादंबरी, कथा, भाषणं, पोवाडे, लेख, प्रबंध आणि अगदी ‘कॉन्फरन्स’मधल्या अनेक ‘पेपर्स’ना तुम्ही पुरून उरलात. आजही अनेक जण अभ्यास करत आहेत आणि दर वेळी सापडत आहे नवीन काहीतरी! रवींद्रनाथांना ‘नोबेल’ मिळाल्यानंतर तुम्ही त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं,

 

कवी कक्ष पूर्ण हा माझा,

परी उणीव तिथे जा जा, क्रांतीच्या बाष्पयंत्राचा, कक्ष जो..!’ 

जिथे उणीव होती, तिथे तुम्ही देहाचं इंधन करून देशाला अर्पण केलं!

उणीव भरून काढून तुम्ही उरलात तात्याराव! ‘निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश,’ असंही तुम्ही म्हणाला होतात ना... ‘हे तुमचं उरणं सांगतय, तुम्ही ठरलात ‘चिरंजीव वंश!’

तात्याराव, वाचलेल्यांना कळलचं असं नाही, कळलेल्यांना वळलचं असं नाही आणि वळलेल्यांना उमगलचं असं नाही. तुम्ही इतुके अगम्य, अनादी आणि अनंत आहात की, आमचे दरिद्री शब्द आणि भिकारडे विचार तुम्हाला फक्त ‘माफीवीर’ म्हणत आहेत.

तुम्ही बोलू नकाच काही यावर. तुमची तीक्ष्ण नजर आणि धारदार डोळे रोखून बघा फक्त एकदा, तीच ‘माफी’ ‘माफी’चा खुळखुळा हलवणाऱ्याना ‘साफ’ करून जाईल आणि पुन्हा उरेलही. तुमच्यासारखीच अविचल, अमर, अभेद्य आणि अजिंक्य!

 

आज देशाचे जवान सीमेवर शत्रूला सडेतोड उत्तर देत असतानाच देश अंतर्गत राजकारणामुळे पोखरलेला दिसतो आहे. भीमा-कोरेगावपासून ते कोपर्डी हत्या प्रकरणापर्यंतच्या घटनांना जातीय रंग दिला जातो आहे. आसामपासून काश्मीरपर्यंतचे प्रश्न खितपत पडून आहे, अंधश्रद्धा आणि अतिश्रद्धा यामध्ये विवेक हरवतोय आहे. देशाच्या सुरक्षेचा धोरणावरही एकमत होताना दिसत नाही. टोकाची भक्ती किंवा टोकाचा द्वेषच सर्व महापुरुषांच्या अनुयायांच्या वागण्या-बोलण्यात दिसतो आहे. अशा अवस्थेत राष्ट्रनिष्ठेच्या पायावर उभी असलेली देशाची इमारत घडवण्यासाठीचा मूळ, भक्कम आणि आधुनिक विचार शोधण्यासाठी आज सावरकर नक्की वाचावे. सगळं पटणार नाही, पटूच नये, अन्यथा ती अंधभक्ती होईल, जी सावरकरांना कधीच मान्य नव्हती. मात्र, जे पटेल ते निश्चित आणि मार्मिकच असेल.

 

सावरकरांनी खरंच माफीनामे लिहिले होते का? लिहिले होते तर कशासाठी? ‘लेखण्या मोड्या हाती बंदुका घ्या,’ ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण,’ ‘एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो’ या घोषणा कोणत्या वेळी आणि का दिल्या होत्या? रत्नागिरीत पतितपावन मंदिराची उभारणी का केली होती? सावरकर-गांधीवाद नक्की काय होता आणि सावरकर-गांधी भेट कशी झाली होती? आझाद हिंद फौजेची उभारणी आणि बाहेरून देश स्वतंत्र करण्यासाठीचे प्रयत्न या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रयत्नांमागे सावरकरांची काय भूमिका होती? सावरकरांना ब्रिटिशांनी पेन्शन दिली होती का? स्वतंत्र भारतात लियाकत अली खान हा पाकिस्तानचा पंतप्रधान भारतात आल्यानंतर त्याच्या सुरक्षेला धोका नको म्हणून सावरकरांना १०० दिवस कैदेत का ठेवलं होत? गांधीहत्येमागे सावरकरांचा हात होता की नाही? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे इतिहासाचा आधार घेऊन स्वत:च्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहायचे असेल तर सावरकर वाचाच! समर्थन किंवा विरोध दोन्हीसाठी ते आवश्यक आहे. केवळ ‘पैसा’ या एकमेव उद्देशासाठी देश सोडून परराष्ट्रांत चाकरी करणाऱ्या तरुणांनी तरी अवश्य वाचावं. ‘जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा’ असं म्हणून देशासाठी ब्रिटिशांची सनद नाकारून, संपत्तीवर लाथ मारून भारतमातेचा ‘खटला’ चालवणारे सावरकर कसे होते?

 

आज सावरकरांवर व्याख्याने देताना मला जाणवतं, गावागावांत सावरकर जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सावरकरांचा अभ्यास करणारी सशक्त पिढी उभी राहते आहे, ऑडिओ बुक्स, नाटक, गीतपर कार्यक्रम यातून सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीदेखील तुम्ही स्वत: वाचल्याशिवाय तुम्हाला ‘उत्तम, उदात्त आणि महन्मधुर’ म्हणजे काय आहे, ते कळणार नाही. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ लिहिल्यावर शेवटी भावनावेग सहन न झाल्याने स्वातंत्र्यवीर टेबलवर डोकं ठेवून रडले होते. तात्या टोपे यांना उद्देशून ते म्हणाले होते, ‘‘तात्या, तात्या या दुर्दैवी देशात तुम्ही जन्माला का आलात? या नीच, महामूर्ख लोकांसाठी का लढलात? या दुबळ्यांच्या अश्रूंसाठी आपण रक्त सांडावे! कसला हा महागडा सौदा!” तात्याराव सावरकर यांनी तात्या टोपे यांच्याबद्दल काढलेले उद्गार आज पुन्हा तात्याराव सावरकरांबद्दल काढणं आपल्याकडून होऊ नये असं वाटत असेल, तर सावरकर वाचलेच पाहिजे. तेही डोळसपणाने! विवेकाने! कारण, न. चिं. केळकर म्हणाले होते त्याप्रमाणे “आता कसोटी ही सावरकरांची नसून, सावरकरांच्या अनुयायांचीच आहे!”

 
- मयूर भावे 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@