स्वा. सावरकर आणि डॉ. हेडगेवार एकाच अमृताचे दोन कलश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


 

संघ आणि सावरकर संबंधांची चर्चा जर आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाबाराव सावरकर या अनुषंगाने केली तर? शेवटी संघ परिवार असो वा हिंदू महासभा किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना, त्यांचं लक्ष्य एकच आहे, या देशाला परमवैभव प्राप्त करून देणे.

 

२०१४ नंतर ‘हिंदू’ आणि ‘हिंदुत्व’ या दोन शब्दांना प्रवाहातील सो कॉल्ड प्रमुख माध्यमांनी आणि काही तथाकथित ल्युटियन्स विद्वानांनी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. अर्थात, या मुखंडांनी ‘हिंदू’ किंवा ‘हिंदुत्व’ हा विषय गांभीर्याने घेतला म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित होते, अशातला भाग नाही. पण, खरंच ‘नरेंद्र मोदी’ या एका हिंदुत्ववादी नेत्याच्या नेतृत्वात पूर्ण बहुमतातील सरकार सत्तेत आलं म्हणजे हिंदुत्वाचा परीघ पूर्ण झाला, असे म्हणता येईल? स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार किंवा त्यांच्यानंतर आलेल्या संघ परंपरेतील कितीतरी आत्म्यांनी जेव्हा आपल्या आयुष्याची समिधा या हिंदुत्वाच्या धगधगत्या अग्निकुंडात अर्पण केली, तेव्हा कुठे आज ‘मला गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका,’ या नाऱ्यापासून सुरू झालेला हिंदूंचा प्रवास ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या नाऱ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. बाहेरच्या लोकांचं सोडा, पण हिंदुत्व मानणाऱ्या लोकांमध्येदेखील काही गोष्टींवर चर्चा होत असते, ज्यात प्रामुख्याने विषय येतो हिंदू महासभा, रा. स्व. संघ आणि सावरकर व संघ संबंध. अर्थात, कुठल्याही जिवंत असणाऱ्या संस्थेत चर्चा ही व्हायलाच हवी, पण कुठलीही चर्चा शेवटी लक्ष्यपूर्तीसाठी होत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे.

 
१९२४ सालची घटना असेल. बाबाराव सावरकर नागपूरला त्यांचे नातेवाईक आणि जे डॉ. हेडगेवार यांचे चांगले मित्र होते, त्या विश्वनाथराव केळकर यांच्याकडे आले होते. काही दिवस डॉ. हेडगेवार यांना बाबाराव सावरकरांचा सहवास लाभला. बाबाराव तेव्हा ‘तरुण हिंदू सभा’ नावाचे हिंदू तरुणांचे एक संघटन चालवायचे. त्यांच्या मनात जेव्हा ‘तरुण हिंदू सभे’ची नागपूर शाखा सुरू करण्याची योजना आली, तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे धडाडीचे तरुण नाव म्हणून एकच नाव पुढे आले, अर्थातच डॉ. हेडगेवार यांचे. संघाची स्थापना १९२५ सालची. त्याआधी डॉक्टरांवर बाबाराव सावरकर, ‘तरुण हिंदू सभा, नागपूर’ची जबाबदारी देऊन मोकळे झाले होते. पुढे १९२५ सालच्या विजयादशमीला जेव्हा डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, त्या सुमारास बाबाराव सावरकरदेखील डॉक्टरांच्या या कार्याला आशीर्वाद द्यायला नागपूरला उपस्थित होते. हिंदू हितासाठी झटणारी अजून एक संस्था सुरू झाली, याचा बाबाराव यांना आनंद झाला होता. पुढे १९३१ साली अशा काही घटना घडल्या की, तब्येतीच्या तक्रारी सुरू झालेल्या बाबारावांना आता ‘तरुण हिंदू सभे’चे काम त्याच उत्साहात आणि संपूर्णपणे झोकून देऊन बघणे जवळजवळ अशक्यप्राय वाटू लागले. तेव्हा वैद्यकीय उपचारांसाठी काशीला आलेल्या बाबारावांनी डॉ. हेडगेवारांना काशीलाच बोलावून घेतले. तिथे जवळपास तीन आठवडे बाबारावांची शुश्रूषा, त्यांनी सांगितलेली ‘तरुण हिंदू सभे’ची कामे यात डॉक्टर व्यस्त होते. एके दिवशी बाबारावांनी डॉक्टरांना आपल्या कक्षात बोलावून सांगितले की,“आजपासून मी माझी ‘तरुण हिंदू सभा’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विलीन केलीय. यापुढे मी माझ्या शुभेच्छा आणि माझी यथाशक्ती संघकार्याला देऊ इच्छितो.” इतकेच नव्हे, तर बाबाराव यांनी ‘तरुण हिंदू सभे’च्या सगळ्या शाखांना संघ शाखेत विलीन केले. ज्या काशीत गंगा आणि यमुना या दिव्य नद्यांचा संगम आहे, त्याच काशीत हिंदूंच्या दोन श्रेष्ठ संघटनांचा संगम झाला होता! पुढे १९३२ साली बाबाराव यांनी डॉक्टरांना पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची सूचना केली. डॉक्टरांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर त्यांच्याबरोबर बाबाराव पूर्णपणे कार्यरत होते. त्यांच्याच सूचनेनुसार आणि तेथील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने संघ शाखांची मुहूर्तमेढ पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर अशा भागांत रोवली गेली. मुंबईची पहिली शाखा बाबाराव यांचे कनिष्ठ बंधू, जे डॉ. हेडगेवारांचे घनिष्ठ मित्र होते, त्या डॉ. नारायणराव सावरकर यांच्या क्लिनिकमध्ये सुरू झाली. पुढे नारायणराव संघाचे मुंबई प्रांताचे संघचालकदेखील झाले. डॉ. हेडगेवार आणि बाबाराव सावरकर यांनी संघटनेच्या कामाने पार कराचीपर्यंत प्रवास केला. बाबाराव सावरकर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघाच्या पाठीशी उभे होते. डॉ. हेडगेवारांनंतर सरसंघचालक झालेले गोळवलकर गुरुजी यांनादेखील संघटनेशी संबंधित मोलाचं मार्गदर्शन बाबाराव यांनी केलं. जेव्हा जेव्हा हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांकडून ‘हिंदूंच्या दोन संघटना कशाला हव्या?’ अशी टीका व्हायची, त्या त्यावेळी बाबाराव सावरकर खंबीरपणे संघाच्या पाठीशी उभे राहात.
 

डॉ. हेडगेवार पर्यायाने संघाचा ऋणानुबंध फक्त बाबाराव किंवा नारायणराव यांच्यापुरताच सीमित नव्हता. हिंदुहृदयसम्राट विनायकराव उर्फ तात्यारावांशीदेखील त्यांचा तितकाच घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचा संबंध होता. डॉक्टर तत्कालीन कलकत्ता शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांची भेट तात्यारावांचे कनिष्ठ बंधू नारायणराव यांच्याशी झाली, नव्हे तर त्यांची मैत्रीदेखील झाली. डॉक्टरांना आधीपासून तात्यारावांविषयी विलक्षण आकर्षण होते. कलकत्त्यात वैद्यकीचा अभ्यास करतानादेखील महाविद्यालयात कधी तात्यारावांनी लिहिलेले ‘मॅझिनी’, ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ अशी पुस्तके लपूनछपून वाचत, तर कधी या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम तरुणवर्गात घेत. हे असे अनेक उपक्रम डॉक्टर त्यांच्या वसतिगृहात घेत. सावरकरांनी रत्नागिरीच्या कारावासात लिहिलेला ’हिंदुत्व’ ग्रंथ गुपचूप बाहेर आपले नातेवाईक नागपूरचे विश्वनाथराव केळकर यांच्याकडे पाठवला. हे केळकर डॉक्टरांचे मित्र होते. त्यामुळे अर्थातच डॉक्टरांना तो वाचायला मिळाला. तात्याराव आणि डॉक्टर यांच्या हिंदुत्वाविषयीच्या विचारात इतके साम्य होते की, जणू काही कुणा एका व्यक्तीच्या डोक्यातूनच या कल्पना जन्माला आल्या की काय अशी शंका यावी. डॉक्टरांनी तात्यारावांच्या काही लेखांचे प्रकाशन करून संघ कार्यकर्त्यांमध्येदेखील वाटले. डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्या मित्रांनी १९२३च्या मध्यात ‘स्वातंत्र्य’ नावाचे दैनिकदेखील सुरू केले. ज्या परिस्थितीत ते सुरू झाले होते, ते बघता ते दैनिक पुढे एक वर्षभर चालले. त्याचा एकमेव अंक नंतर ज्यांनी डॉक्टरजींचं चरित्र लिहिले त्या ना. ह. पालकर यांना मिळाला. पालकरांनी डॉक्टरांच्या चरित्रातदेखील त्याचा उल्लेख केला आहे, ‘स्वातंत्र्य’ दैनिकांत सावरकरांच्या लेखांची, पुस्तकांची माहिती छापून येत असे.

 

१९२५ साली जेव्हा डॉक्टरांनी संघ सुरू करायची योजना आखली, त्याआधी म्हणजे मार्च १९२५ मध्ये त्यांनी रत्नागिरीस जाऊन तात्यारावांना याविषयी कल्पना आणि एकूण त्यांची ‘संघ’ यामागची संकल्पना देखील सविस्तरपणे सांगितली होती. तात्यारावांकडूनदेखील त्यांनी याविषयी त्यांच्या संघटनेविषयीच्या सूचना आणि मार्गदर्शन घेतले. संघ स्थापन झाल्यानंतरदेखील डॉ. हेडगेवार नागपूरला येण्याचे निमंत्रण देण्यासाठी म्हणून सावरकरांना भेटायला रत्नागिरीनजीक शिरगावी आले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी सावरकरांना शिरगावला हलविले होते. त्या भेटीदरम्यान सावरकरांनी डॉक्टरांना दिलेला सल्ला खूप मोलाचा होता. “संघ ही संघटना केवळ नागपूर किंवा महाराष्ट्रापुरती सीमित न राहता तिला अखिल भारतीय स्वरूप द्यावे,” ही कल्पना सावरकरांनी डॉ. हेडगेवार यांना कळवली. ब्रिटिशांच्या पहाऱ्यामुळे सावरकर स्वतः नागपूरला येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून तात्यारावांनी डॉक्टर द. म. शिंदे यांना नागपूरला पाठविले आणि डॉक्टरांनी सावरकरांचे प्रतिनिधी म्हणून शिंद्यांना स्वागत प्रणाम दिला. रत्नागिरीतील पहिली संघ शाखादेखील सावरकरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या पतितपावन मंदिरात सुरू झाली. पुढे ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर डिसेंबर १९३७ साली सावरकरांनी मध्य प्रांताचा दौरा केला. त्यात नागपूर, चांदा, भंडारा, अकोला, उमरेड यांचा समावेश होता. १२ डिसेंबरला नागपूला संघाच्या शाखेतदेखील तात्यारावांचा प्रवास आणि मार्गदर्शन संघ स्वयंसेवकांना लाभले. याचा उल्लेख करताना डॉक्टर म्हणाले, “समुद्रमंथनाच्या वेळी जे अमृत बाहेर आलं, त्यावेळी जी ऊर्जा निर्माण झाली, ती ऊर्जा आज तात्यारावांच्या मार्गदर्शनामुळे स्वयंसेवकच नव्हे, तर समाजाला मिळाली आहे.” तात्यारावांना पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी भर पावसात मोठ्या संख्येने रेशीमबागेत उपस्थित राहून स्वागत प्रणाम दिला होता. अकोल्यातील प्रवासात डॉक्टरांनी तात्यारावांना एक विनंती केली होती. ती अशी की, “समस्त भारतातील हिंदू समाजाला एक ‘हिंदू’ म्हणून कुणीतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि ते तुमच्यापेक्षा (तात्यारावांपेक्षा) अधिक चांगले कोण करणार?” त्यामुळे तात्यारावांनी भारतभर प्रवास करून हिंदू जागृतीचे कार्यक्रम घ्यावेत, त्याकरिता जिथे जिथे संघाची ताकद आहे, तिथे तिथे संघ स्वयंसेवक यथाशक्ती मदत या राष्ट्रकार्यात सावरकरांना करतील आणि इतकेच नव्हे, तर सावरकरांच्या स्वप्नातील भारत, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही उभे करण्यास कुठलीही कसर सोडणार नाही.

 

११ मे, १९४० सालच्या संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या बैठकीला तात्यारावांनी हजेरी लावली होती. त्यात ते म्हणाले होते, “आज जी हिंदूंची दुरवस्था आहे, तिला दूर करायचे कार्य जर कुठली संस्था करू शकत असेल, तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे! देशाला संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.” डॉ. हेडगेवार यांचे देहावसान झाले, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाठविलेला शोकसंदेश होता, “डॉ. हेडगेवार निवर्तले, डॉक्टर हेडगेवार अमर रहे.” सावरकर कुटुंबीय आणि डॉ. हेडगेवार यांचा ऋणानुबंध हा इतका खोलवर रुजलेला होता. आज अनेकदा आपल्याच काही मंडळींकडून आपल्याच हिंदूंसाठी संघटन करणाऱ्या संस्थांवर आरोप-प्रत्यारोप बघितले की पीडा होते. हिंदू समाजासाठी झटणाऱ्या संस्था या असंख्य आहेत. सामाजिक आहेत, राजकीय आहेत, धार्मिकदेखील आहेत, किंबहुना सगळ्यांची अंतिम लक्ष्यपूर्ती एकच असावी, पण तरीही वाद का होत असावेत? सत्ताप्राप्ती हे अंतिम लक्ष्य मुळीच नाही, अंतिम लक्ष्य या देशाला परमवैभवावर घेऊन जाणे हेच आहे, हिंदूंची उन्नती पर्यायाने समाजाची उन्नती हेच आहे. हीच शिकवण सावरकर बंधू आणि डॉक्टरांनी आपल्याला दिली आहे. तेव्हा या सगळ्या महान आत्म्यांना शतशः वंदन करूयात आणि लक्ष्यपूर्तीसाठी अग्रेसर होऊयात.

 

वंदे मातरम्, भारतमाता की जय!

 
- प्रसाद देशपांडे 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@