‘जमात-ए-पुरोगामी’ आणि सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


 

 

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराने आलेली सूज्ञता, अभ्यासात पडत असलेली भर आणि मुळातून संदर्भ अभ्यासण्याची प्रवृत्ती वाढीला लागल्याने सध्याच्या काळात सावरकरद्वेषाचे हे उद्योग तग धरणारे नाहीत. मात्र, सर्वच सावरकरप्रेमी अभ्यासकांनी आपापल्या परीने योग्य संदर्भ देत आणि साक्षेपी लेखन करीत या ‘जमात-ए-पुरोगामी’चे पितळ उघडे पाडणे, ही काळाची गरज आहे.

 

एखाद्या देशाची वाटचाल, त्याचे भविष्य हे त्या देशातील शिक्षणव्यवस्था प्रामुख्याने ठरवत असते. याचाच अन्वयार्थ असा की, एखाद्या देशाला आपल्याला हवे तसे वळण द्यायचे झाल्यास आधी तेथील शिक्षणव्यवस्था आपल्या ताब्यात घेणे हा उत्तम मार्ग असतो. नेमकी हीच बाब मेकॉलेने हेरली होती आणि त्यानुसार भारतीय शिक्षणपद्धतीत इंग्रजधार्जिणे बदल करण्यात आले; ज्याचे परिणाम केवळ त्याच काळात नव्हे तर अगदी आजही जाणवतात. स्वातंत्र्योत्तर काळात तर ब्रिटिश गेले आणि देशी लोक आले इतकाच काय तो बदल झालेला. मात्र, मानसिकता तीळमात्र न बदललेल्या क्षेत्रांतील मुख्य क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रच होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना साम्यवादाबाबत असलेला कळवळा हे काही गुपित नव्हते. मात्र, याच कळवळ्यापोटी बहुतांशी प्रमुख शैक्षणिक संस्थांत डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा झाला. पंथनिरपेक्ष राष्ट्रात तसा भरणा होणे हेदेखील गैर नाही. मात्र, डाव्यांनी जिथे जिथे बस्तान बसवले त्या राष्ट्रांचा सत्यानाशच करण्याचे कार्य केले, हा आजवरचा इतिहास आहे. आपल्या देशातही काही वेगळे घडले नाही. डाव्यांनी आपल्या सोयीचा आणि कित्येकदा तर धादांत असत्य इतिहास पुढील पिढ्यांच्या माथी मारायला सुरुवात केली. यात भर पडली ती तथाकथित बुद्धीवाद्यांची. वरवर पुरोगामित्वाचा बुरखा ओढून या सार्‍यांनी मिळून प्रत्यक्षात मात्र देशाच्या संस्कृतीची मुळे कशी नष्ट करता येतील, याकडेच लक्ष दिले. या साऱ्या छद्म पुरोगाम्यांना आम्ही ‘जमात-ए-पुरोगामी’ असे म्हणतो. ‘जमात-ए-पुरोगामी’ म्हणजे ‘पोथीप्रामाण्य नाकारा’ असे ओरडून सांगतानाच; स्वतःच्याच असत्य पोथ्या बनवलेले आणि त्या रेटण्यास पुढील पिढीला भाग पाडणारे लोक. ‘जमात-ए-पुरोगामी’ म्हणजे आपल्या सोयीनुसार केवळ हिंदूंनाच झोडपण्यात, त्यांच्या संस्कृती-सणांची टिंगल करण्यात आघाडीवर असणारे; मात्र अन्य पंथीयांच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसणारे लोक. आपल्या आदर्शांबाबत कोणी काही बोलू नये, अशी त्यांची भूमिका असते. मात्र, त्याचवेळी अन्यांच्या आदर्शांबाबत आपणही तेच पथ्य पाळावे, असा विधिनिषेध मात्र त्यांना नसतो. त्यांना उत्तरे देता आली नाहीत वा त्यांचे असत्य उघड झाले की, समोरच्याला थेट ‘नथुरामवादी’ असे म्हणून पळ काढण्याचा स्वभाव असलेले हे लोक. सावरकरांसारखा प्रामाणिक बुद्धीवादी आणि पुरोगामी हा या दांभिकांच्या नजरेत खुपला नाही, तरच नवल!

 

स्वा. सावरकरांच्या विधानांचे विपर्यास करणे इथपासून ते त्यांच्यावर गलिच्छ टिप्पणी करून आपली पात्रता दाखविण्याचे प्रकार हे ‘जमात-ए-पुरोगामी’ सातत्याने करतात. सावरकरांना उद्देशून ‘माफीवीर’ हा शब्द वापरण्यात त्यांचे सात जन्माचे सार्थक होते. ‘सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती,’ असे हे लोक गळ्याच्या शिरा ताणून बेंबीच्या देठापासून कोकलत असतात. ‘कुठे मागितली माफी, दाखवा’ असे सांगताच यातील बहुतेकांची भंबेरी उडते. आपण आक्षेप घेतो, त्याबाबतचे संदर्भही आपल्याकडे नाहीत. मात्र, कांगावा जोरदार हे या जमातीचे वैशिष्ट्य. अंदमानातून सुटका झाल्यास त्याने राष्ट्रहित साधता येईल, ही सावरकरांची भूमिका त्यांनी स्वतःच ‘माझी जन्मठेप’ मध्ये नोंदवून ठेवली आहे. ‘कारागृहात राहून जी करता येत आहे त्याहून काही प्रमाणात अधिक, प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल, अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे, हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे, तर समाजहिताच्या दृष्टीनेही आमचे परमकर्तव्य आहे.’ असे ते स्पष्ट नमूद करतात. मात्र, त्याचसोबत “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की, जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल. म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते म्हणजे, विश्वासघातपणा, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण, त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वत:च्या उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी होणारी होती. तेव्हा असे वर्तन टाळून जर मुक्तता मिळण्याची निश्चित संधी मिळत असेल, तर ती साधावयाची. ती निश्चित संधी मिळेपर्यंत त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल, ते साधण्याचा प्रयत्न करीत दिवस कंठावयाचे. त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष व तीव्र दृष्टी नाही, तोवर त्यांच्याकडून ती कृत्ये करवावयाची. जेव्हा आपणावाचून त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतके इच्छुक वा समर्थ नसेल, तेव्हा ती प्रकरणे स्वत: करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून दवडावयाचा नाही. पण, तो निश्चित संभव नसता केवळ आशाळभूत भ्याडपणाने नाही तर सोडणार नाहीत, असे म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहतही बसावयाचे नाही,” असेही ते परखडपणे म्हणतात. कोणाही सुज्ञ व्यक्तीस या विचारांचा अर्थ लागेल. ‘जमात-ए-पुरोगामी’ला मात्र या विचारांनी बौद्धिक अतिसार सुरू होतो. ज्या ‘Amnesty petition’ चा उल्लेख करून काहीतरी मोठे गवसल्याचा आव हे लोक आणतात; ती नेमकी काय होती? कोणी पाठवली? कोणासाठी पाठवली? आणि तिचे साध्य काय? यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे लोक देत नाहीत. ‘Amnesty petition’ ही केवळ सावरकरांसाठी नसून सर्वच राजबंद्यांसाठी होती. त्यानुसार हेमचंद्र दास, बारिंद्र कुमार घोष, सचिंद्रनाथ संन्याल इत्यादींची सुटकादेखील करण्यात आली. उलटपक्षी सावरकरांना सोडण्यात येऊ नये यासाठी तीन तीन वेळा लेखी आदेश दिल्याचे ‘source material for history of freedom movement in india’ मध्ये असूनही ‘जमात-ए-पुरोगामी’ त्याकडे दुर्लक्ष करून आपले असत्याचे प्रयोग सुरूच ठेवते. विशेष म्हणजे, या प्रयोगांना देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील बळी पडतात. हा त्यांचा बालीशपणा म्हणावा की सावरकर द्वेष?

 

सावरकर हे गायीला ‘पूजनीय’ न मानता, ‘एक उपयुक्त पुशू’ असे म्हणत, हे जगजाहीर आहे. मात्र, त्यांच्या ‘गोपूजक की गयाळ?’मधील वाक्ये संदर्भहीनपणे सांगत ‘जमात-ए-पुरोगामी’ असेही बिनधास्तपणे ठोकून देते की, ‘सावरकर हे गोहत्येचे समर्थन करीत!’ मथुरेच्या कत्तलखान्याच्या विरोधात हेच सावरकर उभे राहिले होते आणि ‘गाय ही पूजनीय आहे अथवा नाही हा विषय नसून ती रक्षणीय निश्चित आहे,’ असे ठाम मत मांडतात, याकडे मात्र हे लोक सोयीस्करपणे कानाडोळा करतात. सय्यद अहमद खान यांनी मांडलेला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतदेखील हे लोक थेट सावरकरांच्या माथी मारतात. हे सारे उद्योग पाहता सावरकरांची वाक्ये, वचने, परिच्छेद हे संदर्भ वगळून मांडून बुद्धिभेद करत राहणे, हेच या लोकांचे जीवनकार्य असावे, अशी शंका येऊ लागते.

 

सावरकरांबाबत या लोकांकडून बुद्धिभेद कसा केला जातो, याचे आणखी एक उदाहरण मध्यंतरी एका विद्वेषी व्यक्तीने अशा आशयाचे मत मांडले की, “सावरकरांना ब्रिटिशांकडून भत्ता मिळत होता आणि तो ते कर्जाऊ रक्कम म्हणून इतरांना व्याजावर देत. यात कसला आला त्याग?” धनंजय कीर लिखित सावरकर चरित्रातील संदर्भ तोडून-मोडून असे विकृत लिखाण करणाऱ्या या व्यक्तीला हेदेखील माहिती नसावे की, स्थानबद्धतेत असणाऱ्या व्यक्तीची उत्पन्नाची साधनेच नसल्याने त्यांना तसा भत्ता दिला जातो. तो केवळ सावरकरांनाच नव्हे, तर अन्यांनादेखील मिळत होता. त्याकाळी ‘बँक’ हा विषय प्रचलित नसल्याने अशा तर्‍हेने उसने व कर्ज म्हणूनच पैसे दिले जात असत. त्यातही गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी नमूद केलेल्या आठवणीनुसार सावरकरांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना दिलेली कर्जाऊ रक्कम परतफेड करण्यास दीदी गेल्या तेव्हा सावरकरांनी “दीनानाथांना आवश्यकता होती म्हणून पैसे दिले. तू तर माझ्या मुलीसारखी आहेस. तुझ्याकडून कसले पैसे घ्यायचे?” असे सांगत ती रक्कम घेणे नाकारले. कित्येकांनी त्यांच्याकडून घेतलेले पैसे बुडवले; तेव्हा त्यांनी तगादा न लावता चक्क आपल्याकडील नोंदी फाडून टाकल्या! त्याच ग्रंथात ही सारी माहिती येऊनही हे लोक सूर्यावर थुंकण्याचा प्रताप करत असतील, तर त्याचे परिणाम वेगळे सांगावयास नकोत. याच मानसिकतेचे फलित म्हणून सावरकरांची अंदमानातील वचने काढण्याचा उर्मटपणा मणिशंकर अय्यरने केला होता. याच मानसिकतेचे द्योतक म्हणजे अटलजींच्या काळात संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावण्यावरून काँग्रेसने हैदोस घातला होता. याच मानसिकतेचे प्रतीक म्हणजे राहुल गांधींनी केलेला ‘तुमचे सावरकर, आमचे गांधी’ हा उल्लेख होय. या दांभिक लोकांना वैचारिक विरोध करता येत नाही म्हणून ते इतकी पातळी सोडतात की, नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात समलिंगी संबंध होते, असे दात विचकत सांगण्यास त्यांना काही गैर वाटत नाही. मात्र, ज्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ नामक पुस्तकातून ही थाप पहिल्यांदा मारली गेली, त्याच पुस्तकात नेहरूंच्या लैंगिकतेबाबत केलेले उल्लेख वाचले तर त्यांची दातखीळ बसेल. अशा गलिच्छ पातळीवर उतरण्याचा सावरकर अभ्यासकांचा स्वभाव नसणे, ही त्यांची कमजोरी नसून तेच सावरकरांच्या संस्कारांचे फलित आहे.

 

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराने आलेली सूज्ञता, अभ्यासात पडत असलेली भर आणि मुळातून संदर्भ अभ्यासण्याची प्रवृत्ती वाढीला लागल्याने सध्याच्या काळात सावरकरद्वेषाचे हे उद्योग तग धरणारे नाहीत. मात्र, सर्वच सावरकरप्रेमी अभ्यासकांनी आपापल्या परीने योग्य संदर्भ देत आणि साक्षेपी लेखन करीत या ‘जमात-ए-पुरोगामी’चे पितळ उघडे पाडणे, ही काळाची गरज आहे. हा विषय केवळ सावरकरद्वेषापुरता मर्यादित नसून एकंदर राष्ट्रद्रोहाचा आहे!

 
- डॉ. परीक्षित शेवडे 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@