सावरकरांचे ब्रिटिश सहकारी डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


 

डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड या सावरकरांच्या ब्रिटिश सहकाऱ्यांनी केवळ सावरकरांची पदोपदी मदतच केली नाही, तर इंग्रजांनी सावरकरांवर केलेल्या अन्यायालाही त्यांनी वाचा फोडली. आत्मचरित्र, वृत्तपत्रे, मासिकांमध्ये या दोघांनी सावरकरांविषयीच्या आठवणी, प्रसंग यांचे यथोचित चित्रण केले आहे. तेव्हा, सावरकरांच्या या फारसा परिचित नसलेल्या दोन ब्रिटिश सहकाऱ्यांविषयी....

 

डेव्हिड गार्नेट

 

माझ्या मातेपुढे किंवा पित्यापुढे ज्या गांभीर्याने मी प्रतिज्ञा घेतली असती, त्याच गांभीर्याने माझी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र मी आपल्याकडे पाठवित आहे,” या पं. श्यामजी कृष्ण वर्मांना पाठविलेल्या पत्राबरोबरच दि. ९ जून, १९०६ रोजी विनायक दामोदर सावरकरांनी भारत सोडला आणि लंडनच्या दिशेने कूच केले. लंडनमध्ये म्हणजे थेट शत्रूच्या शिबिरात धडक मारून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचे, या एका उद्देशाने सावरकर लंडनला आले होते. ‘इंडिया हाऊस’ येथे आपले बस्तान बसविल्यावर १९०६च्या अखेरीस त्यांनी ‘फ्री इंडिया सोसायटी संस्था’ स्थापन करत एकप्रकारे ‘अभिनव भारत’चे पुढचे कार्य चालवायला सुरुवात केली. मग हळूहळू अनेक तरुणांची, विद्वानांची यात भरती व्हायला लागली. यात भाई परमानंद, लाला हरदयाळ, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, व्ही. व्ही. अय्यर, ग्यानचंद वर्मा, सेनापती बापट, एम. पी. टी. आचार्य, सुखसागर दत्त, असफअली इ. असंख्य मंडळी सावरकरांकडे आकर्षित होत होती. क्रांतिकार्यात सामील होत होती.

 

यातच सुखसागर दत्त महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा ‘डेव्हिड गार्नेट’ नावाचा एक हुशार, इंग्रजी साहित्यावर पकड असलेला ब्रिटिश मित्र सर्व भारतीयांच्या संपर्कात येत होता. डेव्हिडला सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे मित्र जमविण्याचा छंद होता. त्यातूनच त्याची ओळख आधी सुखसागरशी झाली, नंतर निरंजन पाल, आशुतोष मित्रा अशा भारतीय राष्ट्रभक्त तरुणांशी त्याचा संपर्क वाढला. अगदी काही दिवसांतच त्याला या साऱ्या तरुणांचा उद्देश कळला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, या एका उद्दिष्टापायी सारेजण इथे जमले आहेत, हे त्याला कळलं. इतकंच नव्हे, तर सुखसागरचा मोठा भाऊ उल्हासकर दत्त भारतात न्यायालयावर बॉम्ब टाकल्यामुळे अटकेत आहे, हेदेखील माहिती होते. एक दिवस दत्तच्या आग्रहावरून डेव्हिड ‘इंडिया हाऊस’मध्ये आला आणि आल्या आल्या त्याचे स्वागत मोठ्या प्रेमाने निरंजन पालने केले आणि शेजारी उभ्या असलेल्या सावरकरांची ओळखदेखील करून दिली. या भेटीविषयी स्वतः डेव्हिड आपल्या आत्मचरित्रात म्हणतो, “उंचीने थोडे लहान असले तरी गरुडासारखे नाक आणि चेहऱ्यावर प्रचंड तेज असलेले सावरकर मला पहिल्यांदा भेटले. ते सुरुवातीलामला अगम्य वाटणाऱ्या अशा भाषेत सभेला संबोधित करत होते. पण, बऱ्याच वेळाने मी लक्षपूर्वक ऐकल्यावर माझ्या कानावर त्यांचा तीक्ष्ण, धारदार आवाज पडला आणि मला लक्षात आलं की, ती भाषा इंग्रजीच होती; फक्त ती उच्चारण्याची पद्धत थोडी वेगळी होती. ते एका योद्ध्याबद्दल, तात्या टोपेच्या युद्धाविषयी सांगत होते.”

 

ही डेव्हिडची आणि सावरकरांची पहिली भेट होती. या पहिल्याच भेटीत डेव्हिड सावरकरांचे व्यक्तिमत्त्व पाहून मोहून गेला होता. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याची तळमळ, त्यासाठी निस्सीम त्याग करण्याची त्यांची तयारी या साऱ्या गुणांनी तो भारावून गेला होता. नंतर दत्त, पाल यांच्यामुळे डेव्हिडच्या सतत ‘इंडिया हाऊस’च्या वाऱ्या होत होत्या. सावरकरांशी संपर्कदेखील वाढत होता. या सगळ्या घडामोडींमध्ये सावरकरांपासून प्रेरणा घेऊन दि. १ जुलै, १९०९ रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली या अत्याचारी ब्रिटिश ऑफिसरचा वध केला. यानंतर एकच हाहाकार उडाला. अनेक भारतीयांवर त्यांना मदत करू पाहणाऱ्या काही ब्रिटिश लोकांवर सरकार करडी नजर ठेवू लागले. न्यायालयाने मदनलालला फाशीची शिक्षा ठोठावली. सावरकर त्यावेळी ब्रायटनमध्ये होते आणि त्यांचं लक्ष्य एकच होतं की, काहीही करून मदनलालची शेवटची इच्छा पूर्ण करायची, त्याचं शेवटचं ‘आव्हान’ (challenge) नावाचं पत्रक छापायचं. धिंग्राच्या फाशीला आता अवघे दोन दिवस उरले होते. त्याच्या आत हे काम होणं महत्त्वाचं होतं. लगेचच ग्यानचंद वर्मांनी त्याच्या पुरेशा प्रती छापून घेतल्या. काही अमेरिकन आणि आयरिश वृत्तपत्रांकडे टपालाने पाठवून दिल्या. पण, याहूनही ही बातमी लंडनच्या इंग्रजी वृत्तपत्रात येणं जास्त आवश्यक होतं. त्यासाठीच सावरकरांनी लगेच डेव्हिडला बोलावून घेतलं आणि कोणत्या तरी वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्याची विनंती केली. डेव्हिड ते पत्रक घेऊन रॉबर्ट लिंड या ‘डेली न्यूज पेपर’च्या संपादकीय विभागात काम करणाऱ्या मित्राकडे गेला. रातोरात ही बातमी रॉबर्टने छापून घेतली आणि दि. १६ ऑगस्टला ‘डेली न्यूज’चं वृत्तपत्र म्हणजे संपूर्ण इंग्लंडवर एखाद्या बॉम्बप्रमाणे कोसळलं. मदनलालला याचं केवढं आत्मिक समाधान मिळालं असेल! अर्थात, त्यात डेव्हिडचा वाटा निश्चितच मोठा होता.

 

यानंतर सावरकर काही काळ पॅरिसमध्ये होते. पण तिथे त्यांचं मन काही शांत बसू देईना. दि. १३ मार्च, १९१० रोजी सावरकर पुन्हा लंडनला आले आणि आल्या क्षणी त्यांना अटक झाली. न्यू स्कॉटलंड यार्डचा पोलीस जॉन पार्कर याने त्यांना पकडलं. तिथून त्यांना बो स्ट्रीटच्या तुरुंगात व नंतर ब्रिक्स्टनच्या तुरुंगात हलविण्यात आले. डेव्हिडला मिळालेल्या पहिल्या बातमीनुसार, तो बो स्ट्रीटवर सावरकरांना बघायला गेला. पण, तिथे मात्र त्याला इन्स्पेक्टर पार्करच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. त्या चौकशीत पार्करने बरेच खोदून विचारायचा प्रयत्न केला, पण डेव्हिडने अगदी शिताफीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यातही त्याचं वय कमी दिसत असल्याने पार्करने त्याला सोडून दिले. सावरकरांना ब्रिक्स्टनला ठेवलं आहे, हे डेव्हिडला कळताच तो ब्रिक्स्टनला त्यांना भेटायला आला. सावरकर त्याला पाहताच खूप आश्चर्यचकित झाले. डेव्हिडने या स्थितीचं वर्णन करताना म्हटलं, “ते तुरुंगात होते, बंदिस्त होते तरीही खूप शांत आणि निश्चल होते.” त्यांच्याशी डेव्हिडने त्यांच्या सुटकेविषयी आणि कायदेशीर बाबींविषयी चर्चा केली. त्यासाठी पैसा कसा उभा करता येईल, याबद्दलदेखील चर्चा करून तो बाहेर निघाला. नंतरच्या भेटीत जवळपास प्रत्येक आठवड्यात त्याने सावरकरांना काही स्वच्छ गळपट्ट्या आणि हातरुमालदेखील दिले होते. डेव्हिडने काही पैसेदेखील सावरकरांच्या सुटकेसाठी जमवले होते. एवढंच नाही, तर सावरकरांना १९०६ साली भारतात केलेल्या भाषणांमुळे आता पकडण्यात आलं आहे, हे कारण सरकारने दिल्यावर त्याने ‘डेली न्यूज’ या वृत्तपत्रात ‘Past offence’ अर्थात ‘मागील गुन्हे’ या शीर्षकाखाली ब्रिटिश सरकारच्या न्यायाची थट्टा केली होती. नंतर बहुधा ग्यानचंद वर्मांनी त्याला सावरकरांच्या सुटकेसाठी पॅरिसमध्ये दोन तरुण कट आखत आहेत, असे सांगितले. लगेच डेव्हिड लंडनमधून निमित्त काढून स्वतः पॅरिसला पोहोचला. पण, दुर्दैवाने ही योजना अयशस्वी ठरली. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार, ‘-.-’ (ही ओळख डेव्हिडने लपवून ठेवली आहे.) ने विश्वासघात केल्याने ही योजना असफल झाली. डेव्हिड तुरुंगात पुन्हा सावरकरांना भेटायला गेला होता. आपल्या अयशस्वी प्रयत्नांचे कथनदेखील त्याने केले. ते ऐकल्यावर सावरकरांनी त्याचे आभार मानले आणि म्हणाले, “जय मिळतो की पराजय होतो, यश लाभते की अपयश याला काहीच महत्त्व नाही. सतत लढत राहणे यालाच खरे महत्त्व आहे. तुम्ही आत्तापर्यंत छान काम केले आहे. तरी माझी चिंता करू नका. मी कसातरी निसटून जाईनच.”

 

डेव्हिड गार्नेटची सावरकरांसोबत ही शेवटची भेट ठरली. त्या शेवटच्या भेटीनंतर डेव्हिड लिहितो, “सावरकरांच्या माझ्या आयुष्यातल्या या शेवटच्या अध्यायानंतर मी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप निराश समजतोय. मी त्यांना काही लोकांच्या विश्वासघातामुळे मदत करू शकलो नाही, ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील.” डेव्हिड गार्नेटने स्वतः एक ब्रिटिश असूनसद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांना मदत केली. ही गोष्ट निश्चितच स्पृहणीय होती. पुढे तो एक विख्यात लेखक आणि प्रकाशक म्हणूनदेखील नावारूपाला आला. त्याच्या स्वतःच्या आत्मचरित्रात अर्थात The Golden Echo मध्ये त्याने या साऱ्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

 

गाय अल्ड्रेड

 

डेव्हिड गार्नेटप्रमाणेच मूळचा ब्रिटिश असलेला गाय अल्ड्रेड. हा लंडनमधल्या Anarchist (शासनविरोधक) समूहाचा सुरुवातीपासूनचा सदस्य होता. तसेच ‘डेली क्रोनिकल’ या वृत्तपत्रासाठी कामदेखील करत होता. यापूर्वीच म्हणजे साधारण जानेवारी १९०५ मध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’ हे नियतकालिक चालू केले होते. हे नियतकालिक मोठं जहाल होतं. यातून भारतीय क्रांती, स्वातंत्र्य अशा गोष्टींना खूप प्रोत्साहन दिले जात होते. त्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य होते, 'An organ of freedom, and of political, social and religious reform.' स्पेन्सरसारख्या विचारवंताचा श्यामजींवर प्रचंड प्रभाव होता. पुढे १९०७ साली श्यामजी पॅरिसला निघून गेले. १९०७ पासून लंडनमध्ये हे नियतकालिक छापण्याचे काम गाय अल्ड्रेड याने घेतले आणि ते वर्ष होते १९०९. मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला मारले ते हे वर्ष, त्या वर्षीच ऑगस्ट महिन्याच ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’ अल्ड्रेडने छापले. त्यात मदनलाल धिंग्राचे समर्थन करणारे लेख होते. त्या पत्राने पुन्हा हाहाकार उडाला आणि अर्थात, ‘न्यू स्कॉटलंड यार्डच्या चीफ इन्स्पेक्टर जॉन मॅकार्थीचं लक्ष अल्ड्रेडवर गेलं. (यापूर्वीदेखील अल्ड्रेडला त्याने सरकार विरुद्धच्या प्रक्षोभक भाषणांसाठी पकडले होते.) दि. २५ ऑगस्ट, १९०९ रोजी गाय अल्ड्रेडला भारतीय क्रांतीला खतपाणी देणारे पत्र छापले म्हणून अटक झाली. नंतरच्या चौकशीत कळले की, जवळपास त्याच्या दीड हजार प्रती त्याने छापल्या होत्या. त्यातल्या एक हजार पॅरिसला पाठवून दिल्या होत्या. हे सारे आरोप सिद्ध झाल्यावर अल्ड्रेडला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सश्रम कारावास भोगणारा गाय अल्ड्रेड हा पहिला ब्रिटिश नागरिक होता. कदाचित यापूर्वीच किंवा यादरम्यानच तो सावरकरांना ओळखत असावा. सावरकर म्हणजे नेमके कोण आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांचीदेखील त्याला माहिती असावी. शिवाय या ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’ पत्रामुळे ‘इंडिया हाऊस’मधल्या अनेक जणांची त्याच्याशी ओळख झाली असावी. कारण, दि. २ जुलै, १९१० रोजी अल्ड्रेड एक वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला.

 

बाहेर आल्या आल्या त्याला पहिली बातमी समजली की, सावरकरांना लंडनच्या न्यायालयात काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर झाली. या गोष्टीने तो प्रचंड अस्वस्थ झाला. त्याने लगेचच ‘सावरकर डिफेन्स कमिटी’ नावाची कमिटी स्थापन केली. या कमिटीमध्ये ग्यानचंद वर्मा, व्ही. व्ही अय्यर, चट्टोपाध्याय या महत्त्वाच्या लोकांचा समावेश होता. या कमिटीने सावरकरांना सोडविण्याचा, त्यासाठी पैसे जमविण्याचा बराच प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना दुर्दैवाने यश आले नाही. तोपर्यंत ८ जुलै, १९१० रोजी सावरकरांनी मार्सेलिसला ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. या घटनेने तर गाय अल्ड्रेडच्या मनात सावरकरांविषयीचा पूज्यभाव अधिकच वाढला. त्याने सावरकरांच्या संपूर्ण केसचा बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली. ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’चं काम बंद पडल्यावर अल्ड्रेडने Herald of Revolt’ नावाचे नियतकालिक चालू केले. याचे ब्रीदवाक्यदेखील थोडेसे ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’प्रमाणे ‘An organ of coming social revolution’ असे होते. ऑक्टोबर १९१२चा ‘कशीरश्रव’ चा अंक लंडनमधल्या सगळ्या भारतीयांचं लक्ष वेधून घेणारा होता. कारण, तो संपूर्ण अंक अल्ड्रेडने सावरकरांना अर्पण केला होता. त्यात बरोबर मध्यभागी सावरकरांचा फोटो होता, त्याखाली लिहिले होते, “the Hindu Patriot who will be released from the Andaman Prison. Dec.२४th १९६०.शिवाय त्या दीर्घलेखामध्ये सावरकरांवर ब्रिटिश सरकार कसे अन्याय करत आहे, याचे विश्लेषणदेखील केले होते. या पत्रात दस्तुरखुद्द सावरकरांचा १८५७च्या स्वातंत्र्यसमराचादेखील लेख समाविष्ट करण्यात आला होता. गाय अल्ड्रेडने अयशस्वी का होईना, पण सावरकरांना सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या केसचा अभ्यास करून संपूर्ण एक पत्र काढले. लंडनमध्ये राहून ब्रिटिश नागरिक असूनदेखील त्याने दाखवून दिले की, ब्रिटिश सरकार जर अन्यायकारक पद्धतीने भारतावर राज्य करत आहे, तर त्या भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ, त्यांच्या क्रांतिकारकांच्या समर्थनार्थ तो उभा राहू शकतो आणि योग्य वेळी त्याने ते केलेसुद्धा. हे त्याचे योगदान न विसरण्यासारखे आहे. नंतर तर त्याची आणि सावरकरांची भेटसुद्धा झाली नाही. वास्तविक, आता तर त्याचा आणि भारताचा तसा अर्थाअर्थी संबंधदेखील राहिला नव्हता. तरी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याने आपल्या The Word’ मासिकातून पुन्हा सावरकरांवर एक विशेषांक काढला. एवढंच नव्हे, तर दुर्दैवाने १९४८ मध्ये गांधीहत्येच्या प्रकरणात निष्कारण स्वा. सावरकरांना गोवण्यात आले. त्यावेळीसुद्धा गाय अल्ड्रेडने पुढाकार घेऊन सावरकरांची बाजू मांडणारा विशेषांक काढला होता. असे वाटते तो काहीच विसरला नव्हता; ना ते सावरकरांचे लंडनमधील वास्तव्य, ना ते सावरकरांचे वक्तृत्व, त्यांचे बेधडकपणे अंदमानच्या शिक्षेला सामोरे जाणे, हे सारे सारे त्याला आभाळासारखे काम वाटले असावे. म्हणूनच नंतरसुद्धा त्याने आपले भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे आणि सावरकरांसोबतचे ऋणानुबंधसुद्धा अगदी तितकेच घट्ट ठेवले. अखेरीस दि. १६ ऑक्टोबर, १९६३ रोजी गाय अल्ड्रेडचे वेस्टर्न इनफर्मरी, ग्लासगो या हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी समजल्यावर सावरकरांना अतिशय दु:ख झाले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी तुरुंगवास पत्करणारा तो पहिला ब्रिटिश नागरिक होता. गाय अल्ड्रेडने भारताविषयी जे प्रेम दाखवले होते नि भारतीय स्वातंत्र्याचा जो पुरस्कार केला होता, त्यासाठी भारताने त्याच्याशी कृतज्ञ असले पाहिजे, असे सावरकरांनी उद्गार काढले होते. गांधीहत्येच्या अभियोगातून निष्कलंक सुटल्यावर सावरकरांनी १९५०च्या दरम्यान गाय अल्ड्रेडला एक पत्र लिहिले होते, ते पत्र सर्वार्थाने सावरकरांच्या विचारांचा ठेवाच म्हटले पाहिजे. सावरकर त्या पत्रात म्हणतात, “मानवतेच्या कामासाठी तुम्ही नि:स्वार्थी निष्ठेने जे अविरत कार्य चालविले आहे, ते अत्यंत भूषणास्पद आहे. माझ्या निर्दोष मुक्ततेमुळे भारतातील लक्षावधी अंतःकरणे निर्भर आनंदाच्या अलोट ऊर्मीने थरारून गेली आहेत.”

 

भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहताना डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड यांनी नि:स्वार्थपणे केलेली ही सेवा न विसरण्यासारखी आहे.

 
- प्रणव शरदजोशी  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@