सशस्त्र क्रांतिकारकाची सावली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



 

अप्पा फक्त तात्यारावांचे अंगरक्षकच नव्हे, तर सावरकरांच्या सहवासात राहून त्यांना क्रांतिकारकांप्रमाणे आपणही राष्ट्रस्वातंत्र्यार्थ हौतात्म्य स्वीकारावे अन् जीवन सार्थकी लावावे, असे त्यांना वाटू लागले.

 

ज्यांनी आपल्या कार्याने हिंदुस्थानाला सावरलं, स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वसंरक्षणाचे धडे दिले, ज्यांना या राष्ट्राने ‘तेजोगोल’, ‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी’, ‘भाषाप्रभू’, ‘समाजसुधारक’ अशा विविध विश्लेषणांनी संबोधले, ज्यांची क्रांतिगीते देश-विदेशात गायली गेली, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चारित्र्यसंपन्न चरित्र एवढे शुद्ध की, ते जाणून घेणारा नक्कीच त्या वाटेने चालायला तयार होईल. परंतु, माणूस जेवढा प्रसिद्ध होतो, तेवढाच त्याच्या जीवालाही धोका असतो. या कारणामुळे मुंबईत सावरकरांसोबत अंगरक्षक असणे अतिशय गरजेचे होते. तसे ते स्वतःजवळ जंबिया आणि चिलखत ठेवत. परंतु, अंगरक्षकाचाही शोध सुरू होता. अशावेळी सांगलीवरून का. भा. लिमये यांच्या सांगण्यावरून अन् बाबाराव सावरकर यांच्या परीक्षणात उत्तीर्ण होऊन, त्यांचे ओळखपत्र घेऊन एक तरुण मुंबईत सावरकर सदनात आला.

 

‘अप्पा कासार’ असे या तरुणाचे नाव. अप्पांचा जन्म मिरजचा. सावरकरांच्या परिसस्पर्शाने अप्पांच्या जीवनाचे सोने झाले. सावरकरांची तत्त्वे ही सर्वांसाठी सारखीच होती. त्यांनी अप्पांना अक्षरओळख करून दिली, ज्यामुळे अप्पांनी पुढे अनेक ग्रंथ अभ्यासले अन् ते ‘मराठा’ वृत्तपत्रातून लिहू लागले. अप्पांनी आजन्म सावरकरांची सावलीप्रमाणे साथ दिली.

 

शतसूर्य शतावर्तं शतबिंदू शताक्षिताम् ।

अभेद्य कल्पं मत्स्यानाम् राजाकवच ॥

 

या वर्णनाप्रमाणे अप्पा होते. फक्त अंगरक्षकच नव्हे, तर सावरकरांच्या सहवासात राहून त्यांना क्रांतिकारकांप्रमाणे आपणही राष्ट्रस्वातंत्र्यार्थ हौतात्म्य स्वीकारावे अन् जीवन सार्थकी लावावे, असे वाटू लागले.

 

बिहारमध्ये भागलपूर नगरात हिंदू महासभेचे अधिवेशन होणार होते. परंतु, बिहार सरकारने अधिवेशनावर बंदी घातली. सावरकरांचा गव्हर्नरपासून व्हॉईसरॉयपर्यंत पत्रव्यवहार सुरू होता. पण, त्यातच अप्पा आणि त्यांच्यासारख्या तरुणांना सावरकरांनी गुपचूप बिहारमध्ये जायला सांगितले. संपूर्ण बिहारमध्ये हिंदू महासभेचे लोक घुसले होते. ‘ॐ’ आणि ‘झ’ ज्या घरावर असेल तेथे उतरावे, असे प्रत्येकाला सांगण्यात आले होते. शीख बांधवांनी या मंडळींसाठी लंगर सुरू केले होते. बाबूदेवी आणि इतर धर्मशाळांनीही कार्यकर्त्यांसाठी राहण्याची सोय केली होती. २७ डिसेंबरला अधिवेशन भरण्यापूर्वी गया स्थानकावर सावरकर आणि इतर नेत्यांना अटक करण्यात आली. परंतु, ‘अधिवेशन होणारच’ हा निश्चय करून आधी पोहोचलेल्या तरुणांनी तयारी सुरू केली. अधिवेशनात ध्वजारोहण हा पहिला कार्यक्रम होता, पण तो करणार कोण? कारण, लाला लजपतराय मैदानाभोवती इंग्रज आरक्षकांचे पहारे होते. आतल्या बाजूस इंग्रज पायदळ, तर बाहेरच्या बाजूस घोडेस्वार तसेच ताराही लावलेल्या होत्या अन् सैन्याला आदेश होते की, कोणीही आत शिरण्याचा प्रयत्न केला की, त्यावर गोळी झाडायची.

 

इथे बाबूदेवी धर्मशाळेत हिंदू सभेच्या कार्यकर्त्यांचीही तयारी सुरू होती. ध्वज लावण्यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, ज्यात अप्पांचे नाव निवडले गेले. आत जाण्यासाठी अप्पांनी एक योजना केली. त्यांनी आपल्या इतर कार्यकर्त्यांना सांगितले, “तुम्ही एका बाजूने इंग्रज आरक्षींवर दगडफेक करा आणि मी मैदानाच्या बाजूच्या झाडावरून मैदानात उडी मारतो. ”मैदानाबाहेर लोकांची गर्दी जमलेली होती. इंग्रज आरक्षीही सज्ज होते. आज काय होतंय, याची सर्वांना उत्सुकता होती. दुसरीकडे अप्पा हातात भगवा ध्वज घेऊन निघाले, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या आणि भारतमाता, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार केला. ठरल्याप्रमाणे, अप्पा आधी झाडावर जाऊन बसले. मग, कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू करताच इंग्रज सैन्य त्यांच्यावर धावून गेले. ही संधी साधून अप्पांनी मैदानात उडी मारली अन् ते ध्वजस्तंभाकडे धावत सुटले. एखाद्या घोरपडीप्रमाणे ते ध्वजस्तंभावर चढले आणि ध्वज फडकवला, जयजयकार केला. या भारावलेल्या अवस्थेत ते क्षणार्धात खाली पडले आणि बेशुद्ध झाले. शुद्धीवर आल्यावर कळलं की, त्यांना फरफटत रस्त्यावर आणून टाकलं होतं, सुप्रीटेंडंट, कलेक्टर आणि इतर इंग्रज त्यांच्याभोवती उभे होते. तेव्हा तेथे व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त डी. लॉकमन (दत्तात्रय पटवर्धन) आले आणि त्यांनी सर्व माहिती घेतली. काही वेळा ते सावरकरांना भेटल्यामुळे अप्पा त्यांना ओळखत होते. अप्पांशी बोलून त्यांनी त्यांना मिठी मारली. अखेर भागलपूर कारागृहात अप्पांना नेले. तेथे त्यांना धर्मवीर मुंजे, बाबासाहेब खापर्डे, गोळवलकर गुरुजी भेटण्यास गेले. सावरकर तेथे उपस्थित नव्हते. परंतु, धर्मवीर मुंजेंनी ही वार्ता त्यांना दूरध्वनीवरून कळवताच ते उद्गारले, “डॉक्टर, आज आपले अधिवेशन यशस्वी झाले आणि तेही अप्पाच्या पराक्रमामुळे.”

 

सावरकरांचे विचार अप्पांमध्ये असे भिनले होते की, ते त्यातच जगत असत. १९४५च्या फेब्रुवारीत जेव्हा शांताबाई (ताई) सावरकरांचे, “बाबाराव अत्यवस्थ आहेत आणि ते तुमची सारखी आठवण काढतात, तरी त्वरित निघावं,” असे पत्र मिळताच सावरकरांनी अप्पांना हाक मारून निघायची तयारी कर, असे सांगितले. माईंनाही काही बोलू दिले नाही. तसं इतर वेळी कुठे बाहेर जायचे असेल, तर सावरकरांची तयारी ही खूप आधीच झालेली असे. परंतु, आता प्रसंगही असाच होता की, घाई करावी लागली. सांगलीला बाबारावांची भेट होताच दोघांनाही डोळ्यात अश्रू अनावर झाले. तेव्हा तात्यारावांनी बाबांना वचन दिले, “बाबा, मृत्यूची खंत बाळगू नका, आपण आजवर फाशीचे खांब गदागदा हलवले. मृत्यूला कोण भितो? हे मृत्यू, तू येणार असशील तर ये. आतापर्यंत आपण मृत्यूला आव्हान केले. आता आवाहन करायचे. बाबा, मी तुम्हाला वचन देतो, हिंदुस्थान स्वतंत्र झालेलापाहिल्यावाचून मी मरणार नाही.” एवढे म्हणून तात्यारावांनी बाबांचे पाय धरले आणि पुढे दोन वर्षांनीच म्हणजे १९४७ ला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घरी खोलीत बसलेले असताना सावरकर माईंना म्हणाले, “माई, आज मी बाबांना दिलेल्या वचनातून मुक्त झालो. दिलेला शब्द खरा झाला. मी स्वातंत्र्य पाहिले, मी कृतार्थ झालो, धन्य झालो.” हे दोन्ही प्रसंग डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडत असताना पाहणाऱ्या अप्पांची तेव्हा काय भावना असेल? अवर्णनीय!!

 

वर उल्लेखिल्यानुसार, अप्पा अगदी कठोर आणि सावध अंगरक्षक होते. महनीय व्यक्तीचे संरक्षण करणे हे जोखमीचे, परंतु अतिशय महत्त्वाचे कार्य असते. तसा विश्वासू अंगरक्षकही असावा लागतो, नाहीतर काय होतं, हे आपण इतिहासात बघतोच. अप्पांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे धीर, उदार, गंभीर, शूर क्रियेसी तत्पर. एकदा अमरावतीत एक कार्यक्रम उरकून परतत असताना बडनेरा स्थानकावर गाडी बदलण्यासाठी ते उतरले आणि प्रथम श्रेणीच्या प्रतीक्षागृहात थांबले. तेथे ढेकणांचा त्रास होऊ लागल्यामुळे सावरकर, अप्पा अन् दामले यांनी फलाटावर जाण्याचे ठरविले. तात्याराव पथारीवर झोपले अन् अप्पा आणि दामले त्यांच्या बाजूस बसून होते. इतका वेळ फलाटावर शांतता होती. परंतु, गाडी आल्यावर लोकांची गर्दी वाढली आणि लोकांनी सावरकरांच्या नावाचा जयजयकार केला. दामलेंनी सर्व सामान गाडीत ठेवले. लोक सावरकरांना हार घालत होते. अप्पा अर्थातच त्यांच्या शेजारी उभे होते. सर्व लोक सावरकरांना हार घालायला, आशीर्वाद घ्यायला पुढे येत होते. त्यातच एक माणूस हार घेऊन पुढे येत होता. अप्पांची नजर प्रत्येकावर होतीच. त्यांचं ते पोलादी शरीर आणि नजर बघून तो दचकला, अप्पांनाही संशय आला. तो सावरकरांच्या जवळ पोहोचताच अप्पांनी सावरकरांना हाताने मागे करून त्या माणसावरउडी मारली. डाव्या हाताने त्याच्या उजव्या मनगटाच्या सांध्याची पकड घेत उजव्या हाताने त्याच्या डोक्यावर दंडुका हाणला. “अप्पा थांब,” असे सावरकर मागून ओरडले. लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. त्याच्याकडची गुप्ती आधीच अप्पांनी काढून घेतली होती. तो क्षमायाचना करू लागला अन् सावरकरांनीही त्याला सोडून दिलं.

 

व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी सावरकरांना चर्चेसाठी बोलावले होते, तेव्हा भेटीनंतर संध्याकाळी रामलीला मैदानावर विराट सभा झाली. या सभेत भावी पाकिस्तान निर्मितीचा विरोध झाला. त्या सभेत बांधण्यात आलेल्या व्यासपीठाची लाकडं कमकुवत होती अन् योगायोग असा की सभेनंतर जेव्हा सर्व मंडळी व्यासपीठावरून खाली उतरली, त्याचक्षणी ते व्यासपीठ कोसळले. अप्पांनी सावधानता दाखवून तात्यारावांना हाताचा विळखा घातला आणि तिथून बाहेर काढलं. पुढे सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अप्पांनी अनेक कार्यांत सहभाग घेतला. गांधीवधानंतर पुढच्या आठच तासांत अप्पा कासार आणि कार्यवाह गजानन दामले यांना अटक झाली. ७७ दिवस त्यांना छळण्यात आले. त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवले जाई, बेशुद्ध झाले की खाली उतरवायचे अन् पुन्हा शुद्धीवर आले की पुन्हा बर्फाच्या लादीवर झोपवून मारहाण करायचे. कशासाठी? तर त्यांनी सावरकरांविरुद्ध खोटं लिहून द्यावं. परंतु, अप्पा म्हणाले,“माझे प्राण घेतले तरी मी लिहून देणार नाही.” पुढे सावरकर निर्दोष सुटले. अप्पा अटकेत असताना सावरकर सदनावर हल्ले झाले. धनंजय कीर लिहितात, “सावरकरांचे अंगरक्षक अप्पा कासार हे जर या प्रसंगी त्याठिकाणी उपस्थित असते, तर सावरकर सदनाच्या अंगणात रक्ताचा सडाच शिंपला गेला असता.” ती वेळच तशी होती. स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी अनेक चळवळींत सहभाग घेतला. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी धडाडीने कार्य केले. पुढे ते विक्रमराव सावरकर यांच्यासोबत अनेक आंदोलनात होते. अध्यात्माकडे पुढच्या काळात वळलेल्या अप्पांनी राष्ट्रकार्य कधी सोडले नाही. हिंदू सभेच्या कार्यालयातही त्यांचे जाणे असे. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. ते सावरकरांवर व्याख्यान द्यायला उभे राहिले की, एवढा उत्साह त्यांना चढायचा की, श्रोत्यांच्या डोळ्यासमोर साक्षात सावरकर उभे राहत. त्याकाळी राष्ट्रपर अथवा कोणतेही बौद्धिक कार्यक्रम असल्यास ते लहान मुलांना तेथे आवर्जून नेत. मुलांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. एकदा गावाकडची जमीन विकल्यावर त्यांच्याकडे दोन लाख रुपये आले. लोकांनी ते त्यांना स्वतःजवळ ठेवायला सांगितले. परंतु, “मी जिवंत आहे, तोवर हे पैसे राष्ट्रकार्यास लागू दे,” असे म्हणून त्यांनी एक लाख स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकास, तर उरलेले एक लाख बाळाराव सावरकर, विक्रमराव सावरकर आणि अशा काही राष्ट्रकार्य करणाऱ्या इतर मंडळींमध्ये वाटून टाकले.

 

अप्पा म्हणत, “सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभो जयजयोहा गीतेचा संदेश सावरकरांनी आपल्या जीवनात तंतोतंत अनुभवला होता. तो अनुभवत असताना आयुष्यातला किती काळ निघून गेला कळलंच नाही.

 

राष्ट्रकार्य हेच जीवन अन् सावरकर हीच जीवननिष्ठा!

 

- हर्षल देव

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@