मोदी सरकारला मोठा जनादेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019   
Total Views |

भारतीय मतदार हा भावनिक आहे. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत त्याने भावनिक होत मतदान केले आहे. 26 फेब्रवारी रोजी पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या हवाई कारवाईनंतर, एक सामान्य प्रतिक्रिया होती- भाजपाला आता 300 जागा मिळणार! लोकसभा निकालांनी सामान्य लोकांची ही सामान्य प्रतिक्रिया खरी ठरविली. राज्याराज्यांत भाजपाला व मित्रपक्षांना जेवढ्या जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला जात होता, तो खरा ठरला. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, बंगाल या राज्यांत भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. सर्वाधिक चर्चा सुरू होती ती उत्तरप्रदेशाबाबत.
 
 
निकालाच्या काही दिवस अगोदर उत्तरप्रदेशातील एका महत्त्वाच्या व्यक्तीला या राज्यातील निकालाबाबत विचारले असताना त्यांनी प्रतिप्रश्न केला, तुमचा अंदाज काय? मी उत्तर दिले, 45 ते 50. यावर त्या व्यक्तीचे उत्तर होते, भाजपाला 60 हून अधिक जागा मिळतील. आणि नेमके तसे झाले. सामान्य मतदार मतदान करताना, जातिपातीचा विचार कमी करतो. राजकीय विश्लेषक, पत्रकार, नेते तो विचार अधिक करतात. काही अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत हे दिसून आले आहे. या निवडणुकीत ते पुन्हा दिसले. मतदारांनी जातिपातीचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला कौल दिला.
निर्णायक बहुमत
मागील काही वर्षांत मतदार त्रिशंकू कौल देण्याऐवजी स्पष्ट जनादेश देऊ लागला आहे, हे चित्र काही राज्यांत समोर आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते दिसले. या निवडणुकीत मात्र भाजपाला बहुमत मिळणार नाही, असे काहींना वाटत होते. भाजपा 200 च्या पुढे जाणार नाही, असा दावा केला जात होता. ते सारे दावे मोडीत काढीत जनतेने भाजपा व मोदींना पुन्हा एकदा निवडून दिले. निवडूनच दिले नाही तर गेल्यावेळेपेक्षा 21 जागा अधिकच्या दिल्या. भाजपाकडे आता बहुमतापेक्षा 31 जागा जास्त आहेत. त्यामुळे हा जनादेशही अतिशय मजबूत आहे.
हवाई कारवाईचा प्रभाव
मतदार हा प्रथम देशाचा नागरिक असतो आणि देशाची सुरक्षा म्हणजेच आपली चिंता, ही त्याच्या मनाला भेडसावणारी एक महत्त्वाची चिंता असते. इस्रायलमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी पंतप्रधान बेंजामिन न्येतान्याहू यांना पुन्हा कौल दिला, त्याचे सर्वात प्रमुख कारण होते- देशाची सुरक्षा! न्येतान्याहू यांच्या हाती देश सुरक्षित आहे, असे जनतेला वाटले आणि जनतेने त्यांना कौल दिला. एकप्रकारे त्याची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत झाली. मोदींच्या हाती देश सुरक्षित आहे, असे नागरिकांना-मतदारांना वाटले. मतदारांची ही भावना सार्या देशात दिसली. पाकिस्तानविरोधातील हवाई कारवाई, हा या निवडणुकीला प्रभावित करणारा सर्वात मोठा घटक ठरला. या घटकामुळे इतर सारे मुद्दे मागे पडले. याउलट, कॉंग्रेसने सैन्याच्या कारवाईवर संशय उत्पन्न केला होता. वारंवार पुरावे मागितले होते. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला.
एक महत्त्वाचा फरक
भारतीय मतदार हा आता अधिक परिपक्व झाला असून, तो राज्याची निवडणूक व देशाची निवडणूक यात फरक करू लागला आहे, हेही या निवडणुकीत दिसले. गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेसला विधानसभेच्या 81 जागा दिल्या होत्या. यावेळी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांत मतदारांनी आपली नाराजी राज्य सरकारांवर काढली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या विरोधात मतदान केले. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा भाजपाला मतदान केले. कर्नाटक विधानसभेत मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला राज्यातील 90 टक्के जागा दिल्या. कर्नाटकात भाजपाने 25 जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले आहे. बंगाल-ओडिशात मतदारांनी भाजपाला चांगल्या जागा दिल्या. ओडिशात मतदारांनी राज्यात बीजू जनता दलाला मतदान केले, तर लोकसभेत त्यांनी भाजपाला नऊ जागा दिल्या. बंगालमध्ये भाजपाला 18 जागा मिळाल्या. विधानसभेत कदाचित स्थानिक जनता पुन्हा ममता बॅनर्जींना कौल देऊ शकेल.
 
नायडूंचा सफाया
आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा, तेलगू देसमचा लोकसभा-विधानसभा दोन्ही निवडणुकीत सफाया झाला. माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या मुलाने- जगनमोहन रेड्डीने- दोन्ही निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले.
घराणेशाहीचा अस्त आणि उदय
उत्तरप्रदेश व बिहार या दोन राज्यांत दोन्ही यादवांना जबर तडाखा बसला. सपानेते अखिलेश यादव यांनी मोठ्या तयारीने सपा-बसपा युती केली होती. कागदावर ही युती अभेद्य होती. सपा-बसपा-राष्ट्रीय लोकदल यांच्या महागठबंधनाला राज्यात 55-60 जागा मिळतील, असे या पक्षाच्या नेत्यांना, राजकीय समीक्षकांना वाटत होते. पण, तसे झाले नाही. युतीला धक्का बसला आणि यादव घराणेशाहीलाही जबर धक्का बसला. बिहारमध्ये यादव घराण्याला तडाखा बसला. मात्र, तामिळनाडूत करुणानिधींचे सुपुत्र स्टॅलिन यांनी चांगली कामगिरी बाजावली. आंध्रातही घराणेशाहीचा विजय झाला.
विरोधकांची गफलत
विरोधी पक्षांना पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या हवाई कारवाईचे महत्त्व कळले नाही. काही पक्षांनी जातीच्या आधारावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी या मुद्यांवर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. हे सारे मुद्दे या निवडणुकीत गौण ठरले.
डाव्यांची दैना
बंगालवर 34 वर्षे राज्य करणार्या डाव्या पक्षांना राज्यातील 42 पैकी 41 मतदारसंघांत आपली जमानत गमावण्याची वेळ आली. फक्त जादवपूर मतदारसंघात डावे उमेदवार बिकास रंजन बॅनर्जी यांना आपली जमानत वाचविता आली. या निवडणुकीत बंगाल खर्या अर्थाने डाव्यांच्या विचारधारेतून मुक्त झाला आहे. केरळमध्येही डाव्या आघाडीचा सफाया झाला आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक डाव्या पक्षांची शेवटची निवडणूक ठरावी! बिहारचे लेनिनग्राड मानल्या जाणार्या बेगूसराय मतदारसंघात कन्हैयाकुमार पराभूत झाला, ही जागा भाजपाचे गिरिराजिंसह यांनी जिंकली.
 
इव्हीएमचे वादंग
विरोधी पक्षांनी इव्हीएमवर वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी कुणालाही या यंत्राचा गैरवापर करणे शक्य नाही. एखाद्दुसर्या मतदान यंत्रात गडबड होऊ शकते. तो एक तांत्रिक भाग आहे. मात्र, इव्हीएम मशीन सेट करून एखाद्या पक्षाला विजयी करणे वा पराभूत करणे, हे अशक्य मानले जाते. तरीही व्हीव्हीपॅट म्हणजे मतदानाची शहानिशा करणारी यंत्रणा जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात करण्यात आली होती. ही सारी व्यवस्था पाहता, मतदान यंत्रे हॅक करून काही करणे कुणालाही शक्य नाही.
 
प्रत्येक निवडणुकीनंतर पराभूत होणारा पक्ष इव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असतो. निवडणूक आयोगाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून त्यांच्या शंकांचे कायमस्वरूपी निरसन केले पाहिजे. निवडणूक आयोगाजवळ पुरेशी व्हीव्हीपॅट यंत्रे नव्हती, या कारणाने या यंत्राचा पुरेसा वापर करता आला नाही. यापुढे होणार्या प्रत्येक निवडणुकीत 50 टक्के मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला गेल्यास, इव्हीएमवर उपस्थित केल्या जाणार्या प्रश्नांना कायमचा पूर्णविराम लागेल!
@@AUTHORINFO_V1@@