अमित शाहंची अपरिहार्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



 

एका लहानशा गुन्हेगाराच्या चकमकीतील मृत्युमुळे एखाद्या गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागते. ही भारतीय राजकारणातील तशी दुर्मीळ घटना. पण, हे अमित शाहंच्या बाबतीत झाले. काँग्रेसविरोधात यश मिळविण्याचा कडवटपणा हा त्यांच्या पूर्वायुष्यात दडलेला आहे.

 

येत्या गुरुवारी नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. हिंदुत्व विचार मानणार्‍यांसाठी हा अत्यंत भावुक क्षण असेल. या क्षणाची भावुकता जितकी उत्कट असेल, तितकेच अमित शाहंना मंत्रिमंडळात कोणते स्थान मिळणार? हा सार्‍या देशासाठी कुतूहलाचा विषय. ‘गुजरात ते दिल्ली’ या प्रवासात आपल्या मित्र, मार्गदर्शक आणि नेत्याच्या मागे सावलीसारखे उभे राहिलेले अमित शाह, या देशातल्या ढोंगी पुरोगामी टोळ्यांच्या लक्ष्यावर मोदींइतकेच होते. अमित शाहंनी घेतलेला निर्णय आज पक्षात तंतोतंत पाळला जातो. तो अव्हेरण्याची हिंमत कुणीही करीत नाही. भारतासारख्या बहुभाषिक आणि भिन्न भिन्न भावविश्वासह कार्यशैलीतही विभिन्न असलेल्या देशात एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असणे सोपी बाब नाही. वरवर कुणी त्यांच्यावर सारे काही ताब्यात असण्याचा आरोप करू शकतो. परंतु, ही महाकाय मानवी रचना एका दिशेने वळविणे व तिच्याकडून अपेक्षित यश साध्य करणे, हे भगीरथाइतकेच मुश्किल काम. अमित शाहंनी ते करून दाखविले. मोदींसाठी तथाकथित पुरोगामी टोळ्यांनी जी विशेषणे लावली, तीच विशेषणे अमित शाहंनाही लावण्यात आली आहेत.

 

‘तडीपार’ हे त्यातले सर्वात मोठे विशेषण. भारतीय लोकशाहीचा इतिहास अशाप्रकारे एका पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकार्‍याला सत्तेचा गैरवापर करून छळले गेल्याचे दुसरे उदाहरण नाही. सोहराबुद्दीन खटल्याचे खोटे बालंट लावून २५ जुलै, २०१० साली अमित शाहंना अटक करण्यात आली. सोहराबुद्दीन शेख नावाच्या एका गुन्हेगाराच्या चकमकीचे इतके भयंकर राजकारण खेळले गेले. एका खंडणीखोर गुन्हेगारावर कारवाईसाठी एका गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागण्याची ही पहिलीच वेळ. सहा महिने तुरुंगात काढल्यानंतर अमित शाहंना जामीन मिळाला तो तडीपारीच्या निकषावर. कुणाही सामान्य माणसाचे मनोधैर्य तोडून टाकेल, असा हा घटनाक्रम आहे. पण, या तडीपारीच्या काळातही अमित शाह जाऊन राहिले ते दिल्लीतच. यावेळी दिल्लीत राज्य होते काँग्रेसच्या शीला दीक्षित यांचे. खरंतर यावेळी भाजप सत्तेवर असलेली काही राज्ये देशात होतीच. मात्र, काँग्रेसशी आतून संघर्ष सुरू झाला, तो खरा काळ हाच असावा. अमित शाहंच्या नावे आज बिरूदावल्या अनेक लावल्या जातात. कुणी त्यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य म्हणते तर कुणी नरेंद्र मोदींचे हनुमान. ज्यात त्यांच्या आतील पोलाद कणखर होत गेले, त्या प्रक्रियेकडे कुणीही पाहात नाही. सरकारी यंत्रणांच्या गैरवापराचा कांगावा काँग्रेससकट सगळ्यांकडून होत असतो. मात्र, अमित शाहंच्या बाबतीत यापैकी कोणीही, कधीही, काहीही बोललेले नाही. तटस्थतेचा आव आणून मोठमोठाल्या गप्पा हाकणार्‍या आणि चॅनलवरच्या चर्चांमध्ये तावातावाने तर्क मांडणार्‍या कुतर्कवीरांनी आजही अमित शाह आणि त्यांना मिळालेली वागणूक यावर मौन बाळगलेले आहे. संघर्ष जितका कडवट असतो, विजय तितकाच शानदार असतो. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत नेमके तेच घडत आले आहे. भारतीय राजकारणाला साटेलोट्यांचाही मोठा अदृश्य पदर आहे.

 

लढण्याआधी सोडण्याच्या म्हणूनही काही जागा असतातच. कुठलाही राजकीय पक्ष या अप्रत्यक्षपणे केल्या जाणार्‍या राजकारणापासून अलिप्त राहू शकलेला नाही. अमेठीत स्मृती इराणींनी मिळविलेला विजय हा सर्वांसमोर आहे. पण, अनेक वर्षे तिथे काँग्रेस आणि सपा किंवा बसपा यांच्यात मिलीभगत होती. राहुल गांधी सहज निवडून जातील यासाठी समोरून चांगला उमेदवारच दिला जायचा नाही. स्मृती इराणींच्या रूपाने भाजपने तिथे कडवे आव्हान उभे केले. बदलत्या स्थळकाळात भाजपच्या कार्यकर्त्यांना कडव्या संघर्षासाठी तयार करण्याचे सारे श्रेय अमित शाह यांचे. २०१९च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये जे घडले, तिथल्या संभाव्य परिणामांची कल्पना अमित शाह यांच्या मनात शंभर टक्के होती. ममतांनी दाखविलेला रानटीपणा आणि त्यासमोर तितक्याच ठामपणे उभे राहिलेले भारतीय जनता पक्षाचे संघटन ही आज इतिहासात नोंदली जाणारी घटना असली तरी त्याची सुरुवात कोलकात्याला युवा मोर्च्याच्या महाकाय मेळाव्यापासून झाली होती. युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन आणि अमित शाह यांनी या ठिकाणी एका महाकाय सभेला एकत्र संबोधित केले होते. माध्यमे, मतदार, सर्वसाधारण नागरिक यांच्यासमोर काल तापलेला पश्चिम बंगाल दिसला असला तरी त्याची सुरुवात ११ ऑगस्ट, २०१८ रोजी पाच लाख लोकांच्या उपस्थितीत झाली होती.

 

संघटन कौशल्य आणि संघटनात्मक बळावर विश्वास ठेवणार्‍या अमित शाहंनी संघटनेत अनेक संकल्पना राबविल्या आणि तितक्याच निकराने त्या अमलातही आणल्या. माणसे निवडणे, ती नेमणे आणि त्यांच्याकडून योग्य ते यश मिळविणे यात अमित शाह यांचा हातखंडा. पुन्हा, इथे जवळचा-दूरचा असे काहीच नाही. ‘गेल्या दहा वर्षांच्या काळात मी अमित शाह यांचा खास माणूस आहे,’ असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यांनी जेव्हा भाजपच्या सदस्य नोंदणीची मोहीम सुरू केली, तेव्हा ती सोशल मीडियावरच्या मीम्सचा हमखास विषय होती. मात्र, नंतर जेव्हा नव्याने झालेला सदस्यांचा मोठा आकडा समोर आला, त्यावेळी सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. देशभरातील ६०० जिल्ह्यांत कार्यालये उघडण्याचे आणि आपले स्थावर अस्तित्व निर्माण करण्याची रणनीतीही अमित शाहंच्या कार्यशैलीचाच भाग होती. विस्तारक निघणे ही भाजपची मातृसंस्था असलेल्या रा. स्व. संघांची परंपरा. अमित शाहंनी नेमकी ती इथेही अमलात आणली. देशभरातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक यानिमित्ताने आपल्या कार्यक्षेत्राबाहेर गेले.

 

पक्षाचा विचार नव्या कार्यक्षेत्रात रूजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘मेरा बुथ सबसे मजबूत’, पन्नाप्रमुख, ‘एक बुथ पंधरा युथ’ सारख्या घोषणा आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी त्यांच्याच काळातील. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपचे आजच्या काळातील देदीप्यमान यश समोर येत आहे. अनपेक्षित निकाल देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशवर भाजपने आपली पकड जमविली ती अमित शाह यांच्याच कारकिर्दीत. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी मानणार्‍या विचारांचा वारसा संघ परिवाराला लाभला आहे. मात्र, राजकारणासारख्या क्षेत्रात एक ठोस चेहरा समोर उभा राहावा लागतो. भाजपचे यश असे की, कालानुरूप अशी माणसे पक्षात उभी राहात राहिली. जोपर्यंत नरेंद्र मोदी राजकारणाच्या क्षितिजावर तळपत राहतील, तोपर्यंत अमित शाहंचे संघटन कौशल्यही चर्चिले जातच राहील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@