सावरकर काँग्रेसमध्ये का गेले नाहीत ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |

 
 
सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. परंतु, काँग्रेस ही निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, ‘हिंदुत्वया मुद्द्यावर काँग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा, ब्रह्मचर्य, मुस्लीम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या काँग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले.

१९२४ ते १९३७ असा प्रदीर्घ काळ स्वा. सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध अवस्थेत व्यतित करावा लागला. गुप्तहेर हे आयुष्यभर सावलीसारखे मागे होतेच. हा सर्व काळ सावरकरांनी समाजसुधारणा, अस्पृश्यता बंदी, हिंदूंच्या हितप्रद गोष्टींचा प्रचार व प्रबोधन करणारे लेखन यात घालवला.

अंतिमत: मे १९३७ साली रत्नागिरीतून सावरकरांची संपूर्ण मुक्तता होऊन ते राजकारण प्रवेश करणार हे निश्चित झाले. प्रथम लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदू महासभेत गेले. पूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये यावे असा आग्रह करणारे नेते होते सुभाषचंद्र बोस, वीर नरिमन, डॉ. ना. भा. खरे, सर मानवेंद्रनाथ रॉय इत्यादी. विलक्षण गोष्ट अशी की, सावरकरांना त्यावेळी काँग्रेस प्रवेशाचा आग्रह धरणारे नेते नंतर या ना त्या कारणाने काँग्रेसमधून बाहेर पडले किंवा काढले गेले. गांधीजींच्या नेतृत्वाखालील चाललेल्या अहिंसक गांधीगोंधळात आणि अल्पसंख्य मुसलमानांचे वर्चस्व आणि अनुनय चालू असलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या विरुद्ध सावरकरांचा कल त्यांच्या सत्काराच्या सभांमधील भाषणांतून स्पष्ट होत गेला. सावरकर म्हणत, “राष्ट्रीय सभेविषयी मला आदर आहे. पण, ‘हिंदू संघटनहे माझे उद्दिष्ट आहे, ते मी सोडू शकत नाही.सावरकर पुढे असेही म्हणत असत, “काँग्रेस जर निर्भेळ राष्ट्रवादी असती, तर मी काँग्रेसमध्येच गेलो असतो, पण ती तशी राहिली नाही व ती एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्त्वावर चालत नाही. मुसलमानांना प्रमाणाबाहेर झुकते माप देते.या कारणांमुळेच सावरकरांच्या काँग्रेसप्रवेशाचा विषय काही काळ चर्चेचा बनला.

 
सत्कार आणि विरोध
 

सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. परंतु, काँग्रेस ही निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, हिंदुत्व या मुद्द्यावर काँग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा, ब्रह्मचर्य, मुस्लीम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या काँग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले. सावरकर काँग्रेसमध्ये येतील ही अपेक्षा ठेवून सुरुवातीला त्यांचा काही ठिकाणी सत्कार करणारी काँग्रेस, सावरकर काँग्रेसमध्ये येत नाहीत, हे स्पष्ट झाल्यावर त्यांचा निषेध करू लागली. केवळ सत्कारावर बहिष्कार एवढेच स्वरूप न राहता, इतरांनी आयोजित केलेल्या सत्कार सभा उधळून लावणे, सभांवर चिखलफेक करणे, दगडफेक करणे इ. प्रकार त्यांनी सुरू केले. सोलापुरात तर याचा कडेलोट होऊन सावरकरांचा सत्कार करणार्‍यांवर हल्ले केले गेले, काहींची डोकी फुटली. सुमारे १८ -२० काँग्रेसी अहिंसक (!) गुंडांना अटक होऊन शिक्षा झाल्या. या प्रसंगी सावरकरांना मारण्यासाठी अंदमानातून सुटलेल्या एका गुन्हेगाराची नेमणूक झाली होती पण त्या इसमाने सावरकरांना ओळखून, “ये तो हमारे (अंदमानके) बडे बाबू है,” असे म्हणत त्यांच्यावर हल्ला करण्याचे नाकारले, असे काही लेखकांनी लिहून ठेवले आहे.

 

१० ऑगस्ट, १९३७ या दिनांकला आपण काँग्रेसमध्ये का गेला नाहीत?” या प्रश्नाला उत्तर देताना सावरकर म्हणाले, “हिंदुत्वाच्या प्रश्नावर काँग्रेसशी माझा मतभेद आहे. काँग्रेस मुसलमानांची मनधरणी करीत राहते, हे मला मान्य नाही. तेथे सर्वांना सारखी वागणूक मिळत असती, तर मी काँग्रेसमध्ये गेलो असतो. पण, माझ्याच मतांशी प्रतारणा करून काँग्रेसमध्ये जाणे मला योग्य वाटत नाही.

 

यावर एकाने म्हटले, “आपण काँग्रेसमध्ये गेला असतात, तर आपले यापेक्षा अधिक भव्य सत्कार झाले असते.त्याला उत्तर देताना सावरकर म्हणाले, “अशा भव्य सत्कारांसाठी आपली देशहिताची मते सोडणे मला मान्य नाही. मी मवाळ बनून ब्रिटिशांची सेवा केली असती तर यापेक्षाही मोठे सत्कार तेव्हाच झाले असते. तसे मला अनेक जण सांगतही असत. पण, तरुणपणी ज्या प्रवृत्तीने देशहितासाठी मी त्या सत्काराच्या मोहांना न फसता देशहिताचा मार्ग पत्करला, त्याच कारणासाठी आजही देशहितासाठी, हिंदूहितासाठी काँग्रेसमध्ये जात नाही. माझा सन्मान झाला नाही तरी, मला त्याची चिंता नाही, दुःख नाही.

 

स्वा. सावरकर व सुभाषचंद्र बोस यांची पहिली भेट

 

सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर सावरकरांशी त्यांची पहिली भेट ४ मार्च, १९३८ या दिनांकास झाली. याच भेटीत सुभाषचंद्र बोसांनी सावरकरांना काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा आग्रह धरला. या पहिल्या भेटीच्या आधी म्हणजे २७ फेब्रुवारीला १९३८ ला सेनापती बापट यांनी, “मी व सावरकर एकाच वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत व त्यासाठी मी प्रयत्न करत आहे,” असे जाहीर केले होते. ४ मार्चला केसरी’, ‘मराठाचे संपादक ग. वि. केतकर यांनी मुंबईत एक अल्पोपाहार देऊ केला. या समारंभाला स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, बॅ. जमनादास मेहता, रामभाऊ मंडलिक, अधिवक्ते का. ना. धारप उपस्थित होते. या भेटीच्या वेळी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे नुसते नेतेच नाही, तर नवनिर्वाचित अध्यक्षही होते.

 

या भेटीच्या वेळी सुभाषचंद्र बोसांनी सावरकरांना आपण काँग्रेसमध्ये सामील व्हावे, असे आमंत्रण दिले. या आमंत्रणावर सावरकर सुभाषचंद्र बोसांना म्हणाले, “काँग्रेस हिंदू महासभेला जातीय संस्था मानते व जातीय संस्थेच्या सभासदाला काँग्रेसमध्ये कोणत्याही पदावर बसता येत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून मला माझ्या मतांचा प्रचार करण्याची संधीच उरत नाही.यावर सुभाषचंद्र बोसांनी उत्तर दिले की, “मला व्यक्तीश: हा नियम मान्य नाही.या भेटीचे छायाचित्र व बातम्या त्यावेळच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या.

 

सेनापती बापट यांच्याकडे केलेला सविस्तर खुलासा परंतु, या भेटीनंतरही सेनापती बापट सावरकरांना काँग्रेस प्रवेशाचा आग्रह धरत होते. त्यावर सावरकरांनी आपण काँग्रेसमध्ये का जात नाही, याचे सविस्तर उत्तर सेनापती बापटांना पत्र पाठवून दिले. सेनापती बापटांना लिहिलेल्या उत्तरात, सावरकरांनी मुख्यत्वे काँग्रेसच्या हिंदूहितविरोधी धोरणांचा उल्लेख केला आहे. त्याचा सारांश पुढील प्रमाणे-

 

१. मुस्लीम लीगचा सभासद हा काँग्रेसचा सभासदही राहू शकतो, मुख्य पदांपर्यंतही पोहोचू शकतो. मात्र, हिंदूसभेच्या सभासदाला मुस्लीम लीगच्या सभासदाप्रमाणे ही समानतेची वागणूक मिळत नाही. त्यास काँग्रेसमध्ये मतप्रचाराला बंदी येते. 


२. काँग्रेस अध्यक्षांनी
, काँग्रेसमधील लोकांनी हिंदू महासभेच्या चळवळीत भाग घेता कामा नये, अशी सूचना दिली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये जाणे म्हणजे हिंदू कार्याचा विश्वासघात करणे.


३. मला हवे असणारे स्वराज्य माझ्या स्वत्वाशी म्हणजेच हिंदुत्वाशी सुसंगत असले पाहिजे. राष्ट्रीयदृष्ट्या हिंदुत्वासाठी केलेले कार्य योग्य असतानासुद्धा अशा कार्याला मनाई असेल आणि मुसलमानांच्या मागण्या नुसत्या राष्ट्रीयदृष्ट्या नव्हे
, तर मानवी दृष्टिकोनातही विघातक असताना ज्या संस्थेत मान्य होतात तेथे जाणे मला अशक्य आहे.


४. ज्याप्रमाणे हिंदू महासभा आपल्या सभासदांना काँग्रेसमध्ये जाण्यापासून परावृत्त करत नाही
, त्याचप्रकारे काँग्रेसनेही आपल्या सभासदांना हिंदू महासभा प्रवेशाचे द्वार मुक्त ठेवल्यास मला काँग्रेसमध्ये जाण्यास कसलाही संकोच वाटणार नाही.


५. ब्रिटिश साम्राज्याविरोधात एकजूट करण्यासाठी मला असे सांगायचे आहे की
, माझ्यासारखा हिंदू स्वभावाला कोणत्याही खर्‍या राष्ट्रीय अथवा मानवीय चळवळीत सहभागी होण्यास मागेपुढे पाहणार नाही. ती चळवळ काँग्रेसने सुरू केलेली असो किंवा अन्य कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने सुरू केलेली असो. मात्र, काँग्रेसनेही याच पद्धतीने हिंदू संघटन आणि परधर्मीयांचे हिंदूकरण करण्यास मुभा दिली आहे की नाही, हे अधिक स्पष्ट करायला हवे. त्यानंतरच मी काँग्रेस प्रवेशाचा विचार करू शकेन.

 

हिंदूहित त्यागून मिळणारे इंद्रपदही नको

 

त्या मुद्द्यांवरून सावरकर किती जागृकपणे हिंदूहिताचे राजकारण करत होते ते स्पष्ट होते. सावरकर काँग्रेसमध्ये सामील होते, तर कदाचित आजवर वाट्याला आलेली उपेक्षा दूर झाली असती. एखादे मंत्रिपद, मानमरातब मिळाला असता. पण, हिंदुत्व त्यागून मला इंद्रपद मिळाले तरी नको ही तत्त्वनिष्ठा सावरकरांनी शब्दात मांडली होती, तशीच प्रत्यक्ष आचरणात आणून गांधी-नेहरू घराण्यांच्या छत्रछायेखाली राहण्याचे नाकारले. काँग्रेसमध्ये सावरकरांनी सामील होणे हा राजकीयदृष्ट्या आत्मनाशच ठरला असता हे उघड आहे.

 

१९३७ साली स्वातंत्र्यवीरांना राजकारण प्रवेशाला मुक्त प्रवेशद्वार मिळाले. त्यावेळी स्वातंत्र्याच्या प्रश्नाभोवती सर्वात मोठा अडथळा होता तो हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि त्यात होण्यार्‍या अधिकारांच्या वाटणीबाबत! ब्रिटिश आज ना उद्या जाणार हे निश्चितच होते. त्यावेळी काँग्रेस हिंदूहिताला खुशाल तिलांजली देत होती, अशा वेळी काँग्रेसमध्ये आपल्या मतांच्या प्रचाराला आणि काँग्रेसचे सभासद राहून त्याच वेळी हिंदूहिताचे कार्य करण्याला बंदी असल्याने सावरकरांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे नाकारले आणि हिंदूंचा एक दबाव पक्ष काँग्रेस आणि ब्रिटिशांसमोर उभा केला.

 

पुढे उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर लखनौ येथे सावरकर त्यांच्याबरोबर अंदमानात असलेल्या काकोरी कटातले प्रमुख क्रांतिकारक शचिंद्रनाथ संन्याल यांना भेटले. त्यावेळी समाजवादी गटाचे नेते आचार्य नरेंद्र देव हेसुद्धा सावरकरांना भेटण्यास आले. त्यांनी सावरकरांना प्रश्न केला की, “आज हिंदू सभेत तालुकदार, धनिक हे प्रामुख्याने असताना महासभेला प्रगतिकारक संस्था बनवण्याचा तुमचा हेतू कसा साध्य होणार?” यास सावरकरांनी उत्तर दिले की, “मी नुकताच हिंदू सभेत आलो आहे. येताक्षणीच महासभेचे ध्येय बदलून पूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय करवले. पुढे मी काय करतो ते आपण धीर धरा आणि पाहा. महासभा पूर्ण पालटून तिला प्रगत आणि जीवंत करण्याचा माझा संकल्प आहे.

 

याच महासभेत पुढे बॅ. निर्मलचंद्र चटर्जी व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सामील करून घेण्यात सावरकरांना यश आले. आशुतोष लाहिरी, भाई परमानंद, रासबिहारी बोस या क्रांतिकारकांनासुद्धा हिंदूमहासभेत सावरकरांनी आणले. आधी काहीशा प्रभावहीन असलेल्या राजकीय संस्थेला केवळ सहा वर्षात. अपुर्‍या साधनांनीशी एक लहानसा का होईना, पण हिंदूहिताचा प्रभावी पक्ष म्हणून उभे करण्यात सावरकरांना यश आले.

 

- चंद्रशेखर वि. साने

९३७००३७७७३

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@