महाकवी आणि महायोगी सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



देहाकडून देवाकडे’ जाताना वाटेमध्ये देश लागतो, याचे सदैव भान असलेले; किंबहुना देशालाच ‘देव’ मानणारे तेजस्वी क्रांतिसूर्य म्हणजे अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापुढे ‘अष्टपैलू’, ‘बहुआयामी’ वगैरे शब्द फिकेच पडतात. ‘शतपैलू’ असंच त्यांचं वर्णन करायला हवं. भाषाप्रभू, वक्ता, नाटककार, इतिहासकार, महाकवी... ही यादी न संपणारी आहे. मात्र, त्यांनी प्रत्येक पैलू मातृभूमीलाच अर्पण केला. देवाला फूल वाहतात तितक्या सहजतेने देशाच्या चरणाशी त्यांनी मन वाहिलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणतात-

 

हे मातृभूमी! तुजला मन वाहियेलें

वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेलें।

तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला

लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला॥

 

हे शब्द मला नेहमीच प्रेरणादायी वाटतात. सावरकरांमधील ‘महाकवी’ आणि ‘महायोगी’ दोघांचं दर्शन या चार ओळीत एकत्र दिसतं. आपल्यापैकी अनेकांकडे कला, प्रतिभा असेलही, पण समाजासाठी, देशासाठी त्याचा उपयोग किती जण करतात? तसा वापर झाला, तर तुमच्या कलेचं सार्थक होतं. सावरकरांनी ते केलं. कारण, मातृभूमी हाच

 

त्यांचा श्वास आणि ध्यास होता.

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण...

 

आपल्या आयुष्याचं सार या दोनच ओळीत ते सांगून जातात. पण, आकाशापेक्षा उत्तुंग असलेले हे शब्द सावरकर जगले आहेत. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि अलौकिक प्रतिभाशक्ती अशी एकरूप झालेली आपल्याला दिसते. ‘महाकवी सावरकर’ आणि ‘महायोगी सावरकर’ हे हातात हात घालून जाताना आपल्याला दिसतात. त्यांना वेगळं नाही करता येत. कारण, शब्दरूपी शस्त्राचा वापर त्यांनी नेहमीच विधायक कामासाठी केलाअर्थात, अनेकदा त्यांचा कल्पनाविलासही आपल्याला थक्क करून टाकतो. लंडनच्या प्रवासात त्यांनी लिहिलेली ‘तारकांस पाहून’ ही कविता घ्या. ते म्हणतात-

 

खरा कोणता सागर यातुनि वरती की खाली

खरे तसे आकाश कोणते गुंग मती झाली...

किती विलक्षण कल्पना!

किंवा ‘तनुवेल’ कविता पाहा-

सकाळीच तू तोडित असता

जाईजुईच्या फुला

फुलवेलीहुनि तनुवेलचि तव

मोहक दिसली मला

 

असे कल्पनाविलास ते करीत राहिले असते, तर ’उपमा कालिदासस्य’ सारखी ’उपमा विनायकस्य’ उक्ती निर्माण झाली असती. पण ते त्यांचं ध्येय कधीच नव्हतं. कारण, त्यांनी मन मातृभूमीला वाहिलेलं होत. आपण तन-मन-धन अर्पण करणं म्हणतो, पण मन अर्पण केल्याशिवाय बाकीचा त्याग कसा संभवेल? म्हणून ’मन वाहियेले’ हे समर्पक शब्द सावरकर सहज लिहून जातात. असे राष्ट्रासाठी झोकून देऊन काम करण्याचे संस्कार त्यांच्या मनावर घरीच बालवयातच झाले. वडील दामोदरपंत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी वाचून दाखवायचे. आई राधाबाई रामायण वाचून दाखवायच्या. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या राष्ट्रभक्ती आणि प्रतिभाशक्तीची चुणूकही बालवयातच दाखवत होते.

 

एकदा अरबस्तानच्या इतिहासाचे पुस्तक त्यांच्या हाती आले, तेव्हा त्या पुस्तकाची सुरुवातीची पाने हरवल्याचे दिसून आले. तेव्हाच त्यांच्या मनात आले, जरी पाने असती, तरी त्याआधी काय हा प्रश्न उरतोच, त्यामुळे इतिहासाला सुरुवात ही नसतेच. ‘इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहायाते, आरंभ तुझा दुसर्‍या पानापासूनि हा शाप याते’ असे ‘सप्तर्षी’ नावाच्या कवितेत ते लिहून जातात. त्यानंतर अजून एक विलक्षण प्रसंग - लहानगा विनायक ‘आरण्यक’ वाचत होता आणि हे पाहून कळवळून दामोदरपंत म्हणाले होते, “बाळा, घरात ‘आरण्यक’ वाचू नये रे, घराचे अरण्य होते.” त्यांच्या महायोगी होण्याची ही चाहूल तर नव्हती?

 

चाफेकर बंधूंच्या बलिदानाने प्रेरित झालेल्या सावरकरांनी शपथ घेतली- ‘सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.’ ’मरेतो झुंजेन’ म्हणण्यासाठी हृदय किती विशाल हवं? वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांच्याजवळ ते होतं. खरंच असं वाटून जातं की, सावरकर तर महाकवी होतेच, पण त्यांचं आयुष्य हेच एक महाकाव्य होतं. एका महायोग्याचं महाकाव्य! त्यांच्या आयुष्यावर, विचारांवर ज्या शिवरायांचा प्रभाव होता, त्या छत्रपतींचं वर्णनही समर्थ ‘श्रीमंतयोगी’ असं करतात. समाजात श्रीमंत अनेक असतात, पण त्यातले किती धनवान योगी असतात? शिवरायांनी आपली सगळी संपत्ती, बुद्धी स्वराज्यासाठी वापरली. तोच आदर्श सावरकरांनी ठेवला. ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी लंडनला गेले खरे, पण देशकार्याच्या हेतूने, परदेशातील भारतीयांचे संघटन करण्याच्या उद्देशाने.

 

सावरकर स्वत: स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटले होतेच. पण, हीच देशप्रेमाची ज्योत त्यांनी मनामनात जागविली. मग ती नाशिकमधली ‘मित्रमेळा’ संघटना असेल किंवा पुण्यातील ‘अभिनव भारत’ चळवळ; आपल्या सहकार्‍यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी आपलं कवित्व कामी आणलं. ज्या वयात आपण गडकिल्ल्यांवर जाऊन मौजमजा करतो, त्या वयात सावरकर गडावर ओजस्वी वाणीने आपला देदीप्यमान इतिहास सांगायचे. बाजीप्रभू, तानाजीचे पोवाडे गाऊन प्रेरित करायचे. स्वातंत्र्यदेवीचं स्तोत्र हे यासाठीच रचलं गेलं. ‘स्वातंत्र्य’ ही ‘देवी’ आहे आणि ‘शिवरायांची आरती’ करावी या कल्पनाच किती भव्य आहेत.

 

साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया

भगवन भगवदगीता सार्थ कराया या...!

शिवरायांचं चरित्र सांगून जातात सावरकर!

परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

 

कधीतरी कुठेतरी भगवंत अवतार घेईल, असा अर्थ घेतो आपण. पण, आपल्या आत असलेल्या त्याच्या अंशाला जागं ठेवून सत्याची साथ देत अन्याय दूर करायचा हा अर्थ जगले ते शिवराय आणि सावरकर! तसं जगण्यासाठी ‘महायोगी’ असावं लागतं. सावरकरांनी स्वदेशीचा फटका रचला. पुढे ‘दीपावलीचे लक्ष्मीपूजन’ ही स्वदेशीचा पुरस्कार करणारी कविता लिहिली. पण, सावरकर फक्त लिहिणारे नव्हते. पुण्यात परदेशी कापडाची भव्य होळी त्यांनी घडवून आणली आणि याचे परिणामही त्यांनी भोगले. त्यांना यासाठी त्याकाळी दहा रुपये दंड झाला. तो सर्वांनी मिळून भरू असे सगळे म्हणत होते. पण, जमवलेली वर्गणी सावरकरांनी दान केली आणि दंड स्वतः भरला. प्रत्येक घटनेत दिसतं त्यांचं समर्पण. लंडनला जाणार्‍या ‘पर्शिया’ बोटीवर आईच्या आठवणीने व्याकूळ होऊन परत निघालेल्या हरनामसिंगाला सावरकरांनी प्रेरित केलं. राष्ट्रमाता ही असंख्य मातांची माता आहे. तिच्यासाठी जगलं पाहिजे, हे पटवलं आणि सावरकरांचंही कुटुंब होतंच की. दोन्ही बंधू तुरुंगात आणि सावरकर लंडनला. त्यांच्या वहिनी आणि बायकोच्या काळजीने त्यांचा जीव किती तुटला असेल, तरीही पत्रातून त्यांनी वहिनीचे ’सांत्वन’ केले तेसुद्धा ओवीबद्ध कवितेत! अवघ्या चार वर्षे वयाचा मुलगा प्रभाकर. त्याच्या मृत्यूची बातमी सावरकरांनी कशी सहन केली असेल? इथेही ते ‘प्रभाकरास’ या कवितेतून व्यक्त झाले आणि मातृभूमीच्या आठवणीने तळमळत ब्रायटनच्या किनार्‍यावर सूर्य अस्ताला जाताना हळव्या झालेल्या क्रांतिसूर्याला ‘सागरा प्राण तळमळला’ हे अजरामर काव्य त्यांना स्फुरले.

 

मनावर असे आघात झेलताना देहालाही त्यांनी देशासाठी झोकून दिलं, शब्दशः झोकून दिलं. मार्सेलिस बंदरात बोटीवरून मारलेली ती त्रिखंडात गाजलेली उडी मारली. जगाला दिपवून गेलं हे सागरदिव्य. कवी मनमोहन नातू याबद्दल लिहितात.

 

दुनियेत फक्त आहेत

विख्यात बहाद्दर दोन

जे गेले सेवेकरिता

सागरास पालांडून

हनुमंतानंतर आहे

या विनायकाचा मान...

 

अपघात आणि शत्रू असे दोन्ही धोके पत्करून खरचटलेल्या देहाने खाऱ्या पाण्यात मारलेली उडी. इथेही त्यांनी कवचमंत्रच धारण केला होता- ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला.’ आणि हे कमी म्हणून की काय, अंदमानचं यातनामय जीवन. काथ्या कुटून, कोलू फिरवून हाल झाल्यावर हीन दर्जाचं अन्न खायचं. तरीही स्वत: प्रेरित राहून इतरांना प्रेरित करायचं, साक्षर करायचं, त्यांच्यात ऐक्य घडवायचं. हे सगळं करणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं. पण, सावरकर त्याही पलीकडे जाऊन कागदाचा कपटाही नसताना तेथील भिंतीवर घायपात्याच्या काट्याने काव्य लिहीत होते. पुसलं जाणार म्हणून मुखोद्गत करावं नि पुन्हा लिहावं. याविषयी कवी मनमोहन नातूंनी कल्पना अशी केली की, सावरकर खिडकीतून दिसलेल्या आकाशाला विचारतात, “मी तुझ्यावर लिहू का कविता?” आकाश आणि जमीनही ‘नाही’ म्हणते. शेवटी भिंत पुढे होईन म्हणते, ‘’मी कागद झाले होते.” निर्जीव भिंत दोन महाकवींसाठी सजीव झाली - महाकवी ज्ञानेश्वर आणि महाकवी सावरकर!

 

अंदमाननंतर सुरू झालं रत्नागिरी पर्व. इथेही समाजकार्याला त्यांनी वाहून घेतलं. अस्पृश्यता निर्मूलन चळवळ करून सर्व जातींसाठी खुलं असणारं ‘पतितपावन मंदिर’ उभारलं. ‘महायोगी’ आणि ‘महाकवी’ या दोन्ही उपाधी धारण करतील असं हे व्यक्तिमत्त्व! तरी महाकाव्य लिहिण्यापेक्षा जगण्यावर भर, म्हणूनच साहित्य संमेलनात ’लेखण्या मोडा नि बंदुका हाती घ्या’ असा संदेश साहित्यिकांना देण्याचं त्यांनी एकप्रकारे धाडसंच केलं. कारण, लेखणी ही लेखकांसाठी जणू सरस्वती. पण, हे विधान विसंगत नव्हतं, तर त्या काळाची तीच गरज होती. शस्त्रगीतातही रामचंद्र चापपाणी आणि श्रीकृष्ण चक्रपाणि असल्याचं सांगून शस्त्र आपल्या संस्कृतीला त्याज्य नव्हतं आणि वापरण्याच्या हेतूनुसार शस्त्र योग्य-अयोग्य ठरतं, असा मार्मिक विचार सावरकर मांडतात. अशा या महायोग्याची स्वतंत्र भारतात अवहेलनाच अधिक झाली. स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांनी ‘अभिनव भारत’चा सांगता सोहळा घडवला. कारण, ज्या कार्यासाठी संघटना स्थापन केली, ते कार्य पूर्ण झालं होतं. कुठलाही पक्ष त्यांनी स्थापन केला नाही, हीसुद्धा वैचारिक उदात्तताच! आयुष्याच्या शेवटीही त्यांनी निर्णय घेतला तो आत्मार्पणाचा. मृत्युला शरण न जाता त्यालाच आमंत्रित केलं आणि २३ दिवसांच्या प्रायोपवेशनानंतर महायोग्याच्या महाकाव्याची इतिश्री झाली. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!

 

- ऋचा थत्ते

9921466996

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@