ठाकरे ’आमदार’ होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |




महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास ’ठाकरे’ घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शिवसेनेला जन्म देणारे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरेंशिवाय मराठी राजकारणाचे सार्थ वर्णन केले जाऊ शकत नाही. सर्व ठाकरेंचा राज्याच्या राजकारणावर प्रभाव असला तरी ’ठाकरे’ नेहमीच संसदीय राजकारणापासून फटकून राहिले आहेत. विधानमंडळात किंवा संसदेत जाण्यापेक्षा सत्तेचा ’रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती असावा, या पद्धतीनेच ठाकरेंचे आजतागायतचे राजकारण सुरू आहे. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत हा ’ठाकरे पॅटर्न’ बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे लोकप्रतिनिधी होणारे पहिले ठाकरे ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ’विद्रोही’ ठरून आत्मघात करून घेणारे राज ठाकरे हेही कायम निवडणुकीच्या राजकारणापासून चार हात लांबच राहिले आहेत. २०१४ साली तर त्यांनी राणाभीमदेवी थाटात निवडणूक लढविण्याची घोषणाही केली होती. परंतु, नंतर मात्र त्यांनी आपणहूनच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. मात्र, त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही आदित्य यांच्याप्रमाणेच आगामी काळात प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून संसदीय राजकारणात एन्ट्री घेऊ शकतात. पण, यासाठी मनसैनिकांना २०२४ ची वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत. तसे घडले तर अमित हे दुसरे ठाकरे लोकप्रतिनिधी ठरू शकतात. मुळात आदित्य यांची समज, आवड आणि एकंदर पिंड बघितला तर ते दिल्लीतील राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होतील, असे सुरुवातीपासून म्हटले जात होते. महाराष्ट्रातून खा. पूनम महाजन, प्रीतम मुंडे, हीना गावित अशी बरीच युवा नेतेमंडळी दिल्लीच्या राजकारणात चांगली रमलीही आहेत. तसेच देशातील जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्षातील युवा मंडळी थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरत असताना आदित्य यांनीही ठाकरी परंपरा मोडून निवडणूक लढवावी, अशी बर्‍याच युवासैनिक व शिवसैनिकांची मागणी सुरुवातीपासूनच आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी आदित्य यांनी तशी मानसिक तयारीही केली होती, अशी खात्रीलायक माहिती होती. पण, अचानक कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक, ते लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुसर्‍यांदा खासदार झालेले श्रीकांत शिंदे, आ. योगेश घोलप, माजी आ. अभिजीत अडसूळ, कल्याण-डोंबिवलीचे सभापती दिपेश म्हात्रे, अशी शिवसेनेतील कित्येक नेत्यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय झाली असताना आदित्य ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत, असा प्रश्न शिवसेनेत चर्चिला जात होता. आता कदाचित या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हीच वेळ, हीच संधी...

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक आठवडाही उलटला नसताना आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीच्या चर्चांनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, असे झाल्यास ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आपल्याला विधिमंडळात भाषण करताना, प्रश्न उपस्थित करताना दिसू शकते. पण, या चर्चा सुरू झाली ती सोशल मीडियातील एका पोस्टमुळे. ’हीच वेळ, हीच संधी लक्ष्य विधानसभा २०१९! महाराष्ट्र वाट पाहतोय’ अशी पोस्ट युवासेना सचिव व आदित्य ठाकरेंचे जवळचे शिलेदार वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर टाकली होती. त्यावरून आदित्य ठाकरे यावेळी थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे म्हटले जात आहे. एवढेच नव्हे तर आदित्य यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशीही कुजबूज शिवसेनेअंतर्गत सुरू झाली आहे. विधानसभा सभागृहात शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे, ज्या पक्षाचे अध्यक्ष किंवा प्रमुख सभागृहात नाहीत. त्यामुळे इतर सर्व पक्षांच्या तुलनेत शिवसेना नेहमीच ’फ्लोअर मेनेजमेंट’मध्ये कमी पडते. ’सरदाराविना सैन्य’ अशी काहीशी अवस्था शिवसेनेची विधानसभेत असते. पण, आदित्य ठाकरे आमदार झाल्यास त्यांना सभागृहात प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येईल. त्याचबरोबर संसदीय राजकारणात कोण खरा ’प्रवीण’ ते सुद्धा त्यांना कळेल. उद्धव ठाकरे परंपरेप्रमाणे ’मातोश्री’वरून राजकारण करत असताना आदित्य यांना विधानभवनातून पक्षावर नियंत्रण ठेवता येईल. शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी निवडणूक लढवायला घाबरतात, अशी खोचक टीका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले नेहमीच करतात. त्यामुळे अशी टीका करणार्या विरोधी पक्षांची तोंडे आदित्य ठाकरे यांच्या एन्ट्रीमुळे बंद होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आलेली ’मोदी त्सुनामी’ हाही आदित्य यांच्या विधानसभा एन्ट्रीची चर्चा होण्यासाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या वेळी युती होऊनही सर्व ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे समरसून केलेले काम, शिवसेनेचे निवडून आलेले तब्बल १८ खासदार, यामुळेही शिवसेनेला भाजपबद्दल असलेला विश्वास अजूनच दृढ झाला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे परिवाराशी असलेले घनिष्ठ संबंधही आदित्य ठाकरे यांच्या आमदारकी व त्यानंतरच्या नामदारकीला फायदेशीर ठरणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे संसदीय राजकारणात अत्यंत कुशल मानले जातात. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांच्या तालमीत तयार होण्याची संधीही आदित्य यांना मिळू शकते. आता आदित्य ठाकरे आपला निर्णय नेमका काय घेतात आणि कधी जाहीर करतात, याकडे युवासैनिक व शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@