सशस्त्र क्रांतीचे जनक स्वातंत्र्यवीर सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


कडवे राष्ट्रभक्त, सच्चे समाजसेवक, प्रतिभावंत साहित्यिक, नामवंत कवी, हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते, वैज्ञानिक द़ृष्टी लाभलेले बुद्धीवादी, जातीभेद-अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय. सावरकरांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

 

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे धुरीण, विज्ञानाचे पुरस्कर्ते तर जातीभेदाचे कट्टर विरोधक विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे, १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला अन् जणू क्रांतिकारकांचा मुकुटमणी उदयास आला. दामोदर सावरकर यांचे घराणे म्हणजे क्रांतीविरांची खाणच! विनायकसह थोरले बंधू बाबुराव आणि धाकटे बंधू नारायणराव यांनीही भारतभूमीला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावले. सावरकरांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर, तर पत्नीचे नाव यमुनाबाई. वीर सावरकर हे क्रांतिकारक तर होतेच, त्याचबरोबर ते कवी, साहित्यिक व लेखकही होते. सावरकरांचे माध्यमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात, तर उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. याशिवाय लंडन येथे त्यांनी 'बॅरिस्टर' ही पदवीही संपादित केली. बालपणापासूनच त्यांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत धगधगत होती. अशा महान क्रांतिकारकाच्या जीवनचरित्रावर द़ृष्टिक्षेप टाकून त्यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करूया!

 

खरं तर, सावरकरांवर जोसेफ मॅझिनी यांच्या ग्रंथाचा मोठा पगडा होता. त्यांनी मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत पुस्तक लिहिले. या पुस्तकातूनच त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा मिळाली. पारतंत्र्याच्या काळात युवकांमध्ये स्वातंत्र्याची उत्कंठ इच्छा निर्माण होण्यासाठी हे पुस्तक खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरले. कडवे राष्ट्रभक्त, सच्चे समाजसेवक, प्रतिभावंत साहित्यिक, नामवंत कवी, हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते, वैज्ञानिक द़ृष्टी लाभलेले बुद्धीवादी, जातीभेद-अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय. सावरकरांनी '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहून त्यात नमूद केलं की, "१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे केवळ बंड नसून एक स्वातंत्र्यसंग्राम आहे." सावरकरांवर लोकमान्य टिळक व छत्रपती शिवाजी महराज यांचा भारी पगडा होता.

 

दरम्यान चाफेकर बंधूंना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिल्याचे वृत्त कानी पडल्यावर कुलदेवता अष्टभुजादेवीला साकडे घालत त्यांनी, भारताला आझाद करण्यासाठी 'मारिता मारिता मरेतो झुंजेन' अशी शपथ घेतली. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी 'स्वदेशीचा फटका' व 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' या काव्यरचना लिहून आपल्या बुद्धिमत्तेचे रयतेला दर्शन घडविले. अंदमानच्या कालकोठडीत शिक्षा भोगताना भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारे ते जगातील पहिले महाकवी ठरले. ते म्हणत, "हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाला विरोध करणार्‍यांनी अंदमानची भूमी खणून पाहावी, त्यात सापडलेली हुताम्यांची हाडके तपासून पाहावीत, म्हणजे हिंदूंच्या बलिदानाचा इतिहास कळून येईल."

 

सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्याच्या उद्देशाने १ जानेवारी, १९०० रोजी नाशिक येथे 'मित्रमेळा' ही संघटना स्थापन केली आणि त्यातील काही निवडक जहालवादी युवकांची निवड करून त्यांनी १९०४ मध्ये 'अभिनव भारत' ही संघटना उभारून सेनापती बापट यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी संघटनेतर्फे पॅरिसला पाठविण्यात आले. भारतमातेला फिरंग्यांच्या मगरमिठीतून मुक्त करण्यासाठी कोणी सर्वस्वाचा त्याग केला? सर्वाधिक बलिदान कोणी दिले? कुठल्या देशभक्तांनी अंदमानच्या बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली? सत्याग्रहापायी स्वातंत्र्यलढ्यात कोण बळी गेलेत? या सर्व प्रश्नांचे एका शब्दांत उत्तर आहे, ते म्हणजे 'हिंदू' असा निर्वाळा त्यांनी दिला. म्हणूनच सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणार्‍या सावरकरांना लेखक आचार्य अत्रे यांनी 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी दिली. इतकेच नव्हे तर फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड, अमेरिका, जपान येथील क्रांतिकारी संघटनांशी संबंध प्रस्थापित करून परदेशातील अनिवासी भारतीयांची स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मदत घेण्यात आली.

 

दुसर्‍या बाजूला 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून देशांतर्गत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 'प्रिन्स ऑफ रिव्होल्युशनरी' या शब्दात गौरविले गेले. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही वीर सावरकरांच्या कार्याचा, त्यांच्या योगदानाचा मोठा गवगवा झाला. भारतीय जनतेत स्वातंत्र्यप्राप्तीची भावना निर्माण व्हावी, यासाठी क्रांतिवीर भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांचा महिमा जागोजागी लोकांना सांगण्यात आला. त्यातून युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. स्वातंत्र्यलढ्यात आपण खारीचा वाटा उचलावा, असा विचार त्यांचा मनात निर्माण झाला. त्यातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनआंदोलन उभे राहून लोकांच्या मनात क्रांतीची ज्योत प्रज्वलित झाली. जनमत जुलमी राजवटीविरोधात खवळून उठले. चाफेकर बंधूंनी पुण्यात आयुक्त रँड व आयर्स्ट यांचा वध केला, तर नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टर जॅक्सन याचा वध क्रांतिवीर अनंत कान्हेरे, कर्वे व देशपांडे या विशीतील युवकांनी केला. अॅन्ड्र्यू फेझर या जुलमी अधिकार्‍याला मदनलाल धिंग्राने गोळ्या झाडून ठार केले.

 
बंगालमध्ये खुदीराम बोस व प्रफुल चाकी यांनी युवकांच्या मदतीने बंगालच्या फाळणीविरुद्ध् उठाव करून फोर्टवर बॉम्बहल्ला केला. अशा तर्‍हेने एकापाठोपाठ सशस्त्र हल्ले करून क्रांतिवीरांनी ब्रिटिश सरकारला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या घटनांमुळे ब्रिटिश सरकार पार हादरले. देशांतर्गत अराजकता पसरविणे, प्रक्षोभक भाषण करणे, बॉम्बहल्ले करणे या आरोपांखाली वीर सावरकरांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. त्याचबरोबर अन्य क्रांतिकारकांची धरपकड करण्यात आली. सावरकरांना १ जुलै, १९१० रोजी इंग्लंडहून सागरीमार्गे मुंबईस नेत असताना मोठ्या शिताफीने बोटीमधून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून उडी घेऊन ते पसार झाले आणि सावरकरांची ही उडी त्रिखंडात प्रचंड गाजली. आजही सावरकरांच्या या ऐतिहासिक उडीची चर्चा होताना दिसते.
 

दरम्यान, ब्रिटिश व फे्ंरच पोलिसांनी सावरकरांना अटक करून राजद्रोहासह विविध गुन्ह्यांखाली ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यातील १० वर्षे अंदमानच्या बेटावर त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. तथापि, सावरकरांना सुनावलेल्या अन्यायकारक व जुलमी शिक्षेविरुद्ध प्रचंड जनप्रक्षोभ उठल्याने ब्रिटिश सरकारने घाबरून सावरकरांची सुटका केली. रत्नागिरीतही त्यांची १३ वर्षे स्थानबद्धता होती. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान काही काळ सावरकरांना ठाण्याच्या कारागृहात कैदेत ठेवले होते. सावरकरांना ठाणे येथून नेत असताना रस्त्यावर ठाणेकरांची एकच झुंबड उडाली होती. याप्रसंगी सावरकरांचे दर्शन घडणं, हा क्षण ठाणेकरांच्या द़ृष्टीने अतिशय भाग्याचा क्षण होता. सन १९२१ पर्यंतचा कालखंड 'सावरकर पर्व' म्हटला गेला. दरम्यान मदनलाल धिंग्रांना फाशी देण्यात आली, तर क्रांतिवीर कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली. केशव चांदवडकर, गोपाळ पाटणकर, पुरुषोत्तम दांडेकर, वि. म. भट, बळवंत बर्वे, सखाराम काशीकर, श्रीधर शिंदे, विष्णू केळकर, नारायण सावरकर, गणेश दामोदर, बाबा सावरकर आदी असंख्य क्रांतिवीरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

 

वीर सावरकरांच्या नेतृत्वात एवढी ताकद होती की, देशासह परदेशातही भारतीय स्वातंत्र्यासाठी जागोजागी उठाव, चळवळी, जन-आंदोलने झालीत. सावरकरांनी लिहिलेली 'माझी जन्मठेप', 'अथांग', 'तेजस्वी तारे', 'हिंदुत्व', 'काळेपाणी', 'हिंदूपदपादशाही', 'भारतीय इतिहासातील सहा सुवर्ण पाने', 'कमला', 'गोमांतक', 'सप्तर्षी' आदी कादंबर्‍या अन् काव्य साहित्य त्या कालखंडात खूप गाजून त्याने स्वातंत्र्यलढ्याला धार आली. याशिवाय वीर सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्तृत्वावर आचार्य अत्रे, विद्याधर करंदीकर, नीळकंठ खाडिलकर, विद्याधर गोखले, मुकुंदराव किर्लोस्कर, व्यं. गो. अंदूरकर, पु.भा. भावे, पंडित बखले, य. दि. फडके आदी असंख्य ख्यातनाम लेखकांनी कादंबर्‍या लिहिल्या. जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेम व निस्सीम देशभक्तीचे प्रतीक असलेल्या सावरकर लिखित 'सागरा प्राण तळमळला' आणि 'जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे। स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे।' हे स्वातंत्र्यतेचे स्तोत्र आजही आम्हा भारतीयांना प्रेरणास्पद आहे. कृतज्ञतेच्या भावनेतून केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'मरणोत्तर भारतरत्न' हा किताब बहाल करण्यात यावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! जय हिंद, जय महाराष्ट्र।

 

- रणवीर राजपूत

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@