सामान्य ते असामान्य...प्रवास सर्जनशीलतेचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


आपण आयुष्यात एन्ट्री घेतल्यावर आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक दैनंदिन गोष्टी आपण सतत करत असतो. या बर्‍याच गोष्टी आपण पारंपरिकदृष्ट्या करत असतो. आपण स्वच्छता राखतो, विद्यार्जन करतो, नोकरी करतो, संसार करतो. जगाने ठरवून दिलेल्या जगरहाटीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पारंपरिक व ऐहिक गोष्टी करत राहणे, हा आपला निसर्गत: कार्मिक व धार्मिक नियम ठरून जातो. अनेक गोष्टी आपल्या समाजात, आपल्या धर्मात आणि संस्कृतीत इतर लोक करत असतात. तसेच आपणही करायला पाहिजे, हा स्थायीभाव लोकांमध्ये असतो. आपण अनेक गोष्टी करताना आपल्याला सामाजिक व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक म्हणून लोकांनी स्वीकारायला पाहिजे, ही माणसाची प्राथमिक गरज मानली जाते.

 

आपल्या समाजाला जे स्वीकारायचे असते, तेच आपण स्वीकारतो. या रोजच्या जीवनातील गोष्टी तसे पाहिले तर अगदी साधारण, सर्वसामान्यच असतात. या जगात जास्तीत जास्त जनता सर्वसामान्य जगण्यात धन्यता मानते. सामान्य असण्यात परमसुख मानते. आपले जीवन तसा एक कोरा, रिकामा असा कॅनव्हास आहे आणि आपण रोज तेच तेच चित्र त्यावर रेखाटण्यात धन्यता मानतो. तेच आकाश, तीच नदी, तेच झाड, तोच सूर्य आणि या सगळ्यांचा तोच आकार, तेच रंग, तशीच व्याप्ती आणि तोच थांग म्हणून तर सगळेच कलाकार महान कलाकार बनू शकत नाही. खरंतर हे सगळं विषण्ण करणारं आहे. आपण आपल्या अवतीभवती फक्त त्याच त्याच रटाळपणाला व विधींना महत्त्व देत राहतो. तसं पाहिलं तर त्याच देखाव्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या खास गोष्टी पाहू शकतो. त्यासाठी गरज असते खास नजरेची आणि खास नजर विकसित व्हायला गरज असते, ती विशेष विचारांची आणि सर्जनशील मनाची. सर्जनशील मन ही परमेश्वराची देणगी आहे, असे आपण मानतो. अर्थात आहेच ती, निसर्गदत्त देणगी. कारण, त्याच परिघात राहणारी काही माणसे असामान्य दृष्टीने

 

जगाकडे का व कशी पाहतात, याचे उत्तर आपल्याला विनासायास सापडत नाही. असे अनेक लोक जगात आहेत की, त्यांचे जीवन अचाट, विलक्षण आणि चमत्कारी गोष्टींनी व प्रसंगांनी भरलेले असते. पण, तरीसुद्धा ती मंडळी अलौकिक भासत नाहीत. आपल्याला बर्‍याच वेळा वाटते की, आपण एखादे चमत्कारी काम केले की, कुणीतरी वेगळे असामान्य इसम बनू शकतो. अर्थात, ते तितकेसे खरे नाही. आपण जे काही करतो, त्यामुळे लोकोत्तर होऊ शकत नाही. पण, आपण ते कसे करतो, हे खूप महत्त्वाचे आहे. पण, मूळ प्रश्न हा आहे की, सामान्यत: बहुतेक माणसांना साधारण वा सर्वसामान्यच राहायला का आवडते? सर्वसामान्य माणसे जगात एक विशिष्ट सामान्य जीवनशैलीने जगणे का पसंत करतात? अर्थात ‘सामान्य माणसे’ ही संकल्पना तशी चुकीचीच आहे. जगात ‘सामान्य माणूस’ नसावा, पण, असामान्य माणसाचा दृष्टिकोन विशेषत: जीवनविषयक दृष्टिकोन हा इतर सामान्य समजल्या जाणार्‍या माणसाच्या दृष्टिकोनापेक्षा भारी असतो, असामान्य असतो. सामान्य आयुष्य असणार्‍या माणसाची वृत्ती गूढ असते. गूढ अशासाठी की, ही माणसे अवतीभवती अस्तित्वात असणार्‍या गोष्टींना, प्रसंगांना आणि माणसांना एकाच नजरेने पाहतात.

 

आपण थोड्या हुशारीने आयुष्यातील अनुभवांकडे पाहिले तर विविधतेत मिळणारा आनंद आपल्याला भावतो. आपण इतर करत असलेल्या गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर, नाविन्य आणि सृजनशीलतेचा संतोष मनाला शांत करतो, पण मग बहुतेक जण ‘सामान्य’ अस्तित्वाकडेच का झुकतात? का त्यांना असामान्य व्हायचे नसते? कारण, आपण सामान्य जनांच्या संपर्कात राहतो. आपण सगळे तसे पाहिले तर आपल्या अवतीभवती असलेल्या विचारांचे व भूमिकांचे प्रतीक आहोत.

 

‘सामान्य’ अस्तित्वाकडे खेचणारा चुंबक आपल्याला कायम तिथेच खेचतो. आपल्यात जर या सामान्य चुंबकाला विरोध करत त्यांच्याकडे आकर्षित न होता आपले ऐहिक वा पारमार्थिक अस्तित्व टिकवायची इच्छा नसेल, प्रेरणा नसेल व त्याबरोबर लागणारी ऊर्जा नसेल तर आपण त्या ‘सामान्य’च्याच नादी लागणार. याशिवाय अतिशय महत्त्वाचे म्हणजे, सामान्य विचारधारेला नव्या अनुभवातून शिकता येण्याची क्षमता नसते. मनाची तितकी खोली नसते. सामान्यातून असामान्याकडे जाण्यासाठी अपयशाला पचविण्याची ताकद व्यक्तीकडे असावी लागते आणि ती फार कमी लोकांकडे असते. सामान्य मनाच्या वा दृष्टीच्या लोकांकडे आपण काहीतरी वेगळे करू शकतो व लोकोत्तर होऊ शकतो, असा आव्हानात्मक विचारच नसतो आणि आपलाच आपल्यावर विश्वास नसेल तर, आपल्याला काहीही मिळणार नाही. पण, असामान्य, अलौकिक आयुष्य प्राप्त करायचे असेल तर आपल्याला अनेक सामान्य गोष्टींपासून दूर राहाता येणे आवश्यक आहे.

 
- डॉ. शुभांगी पारकर  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@