अनादि मी, अनंत मी स्वा. सावरकर जीवनगाथा ध्वनिनाट्य स्वरूपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



‘अनादि मी, अनंत मी’ या नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून, मराठी भाषेतील सर्वोच्च दर्जाची एक उत्तम नाट्यसंहिता आणि स्वा. सावरकरांची समग्र जीवनगाथा पुन्हा एकदा नव्या पिढीला, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती व्हावी आणि स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या अनमोल, परंतु विसरलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळावा, या उद्देशाने येत्या स्वा. सावरकर जयंती दिनी म्हणजे २८ मे, २०१९ पासून ‘अनादि मी, अनंत मी’ या महानाट्याचे ध्वनिनाट्य स्वरूपात (ऑडियो ड्रामा) रूपांतरण प्रकाशित करण्याचा मी आणि माझ्या तरुण सहकार्‍यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

इसवी सन १९८३-८४चा तो काळ! साधारणपणे ज्या काळात आई-वडील आपल्या चार-सहा वर्षे वयोगटातील लहानग्यांना बागेत किंवा मोकळ्या जागी फेरफटका मारायला नेतात, अशा सुमारास माझे वडील ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी माधव खाडिलकर मात्र एका अनोख्या वैचारिक अग्निकुंडाचा घाट घालत होते. भारताने क्रिकेटचा विश्वचषक अनपेक्षितपणे, परंतु प्रथमच जिंकला होता. पण, बाबा मात्र, मुंबईतील आमच्या विलेपार्ल्याच्या घरात एक अलौकिक ऐतिहासिक कहाणी साकार करण्याची तयारी करत होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिकारक, प्रखर देशभक्त, ज्येष्ठ साहित्यकार, क्रांतिकारकांचे अग्रणी, समाजसुधारक, विज्ञानवादी विचारवंत, द्रष्टे नेते स्वा. सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ज्वलंत आयुष्याचा रंगमंचीय आविष्कार दाखविणारं अनोखं नाट्यशिल्प ते शब्दांकित करत होते. बरोबरीने आई सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर यांच्या सांगीतिक प्रतिभेच्या समिधा त्या शाब्दिक अग्निकुंडाला सतत चेतवत होत्या. रोमांचकारी निवेदन माध्यमातून फुललेल्या नाट्यकलाकृतीच्या प्रत्येक टप्प्याचे जीवंत साक्षीदार होण्याचे आणि त्यामधून नकळत घडणार्‍या संस्कारांना आपलेसे करण्याचे भाग्य आम्हा दोघा भावा-बहिणीला लाभले.

आमची विचारसरणी त्या संस्कारांच्या तेजस्वी प्रभेमध्ये नकळत तावून सुलाखून निघत होती. मनाला प्रज्वलित करणे काय, याचे काहीसे प्रत्यंतर त्या पर्वाने आम्हाला दिले. बाबांनी पार्ल्यातील शाळा-महाविद्यालयामधील तरुण मुलं-मुली हळूहळू एकत्रित केली आणि तीन-साडेतीन महिन्यांच्या अथक, अविरत आणि कधी कधी अविचारी वाटणार्‍या त्या प्रयत्नांचा नाटकीय आविष्कार मे १९८४ मध्ये लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात जवळजवळ एक-दीड हजार लोकांच्या साक्षीने सादर झाला. 'अनादि मी, अनंत मी' या नावानं सावरकर जीवनदर्शनाची तेजस्वी गाथा साकारण्याचं भाग्य माझ्या आई-बाबांना लाभलं.

रोमांचकारी इतिहासाचे दर्शन घडविणार्‍या या नाट्यकलाकृतीचा पहिला व्यावसायिक प्रयोग, २६ फेब्रुवारी, १९८४ रोजी शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे प्रचंड उपस्थितीत सादर झाला. १९८५ साली नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द लंडनमध्ये 'इंडिया हाऊस'च्या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनोळखी भारतीयांच्या उपस्थितीत झाले. पुस्तकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बेधडक आणि दिलखुलास प्रस्तावना तर लाभलीच; पण, महाराष्ट्र शासनाचे विशेष लक्षणीय वाङ्मय निर्मितीसाठी लेखन आणि नाट्यदर्पण प्रतिष्ठानचे संगीत दिग्दर्शनाचे पुरस्कारही या नाटकाला मिळाले. नाटकाचे व्यावसायिक स्वरूपात जवळजवळ १५० प्रयोग १९८५-१९९० कालावधीत झाले, तर नाट्याभिवाचन स्वरूपात इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामधेही प्रयोग सादर झाले. मुंबईच्या दादरमधील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन, भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, २९ मे, १९८९ रोजी याच नाटकाने झाले. त्या प्रयोगात बाल सावरकरांचे 'माझी मातृभूमी' विषयावरचे निबंधात्मक भाषण करण्याचे अहोभाग्य मला स्वतःला लाभले.

नाटकाच्या तालमीत बाजूला समूहगान करता करता हळूहळू मीही बाल सावरकरांचे वक्तृत्व आत्मसात केले आणि काही ठराविक प्रयोगांमध्ये कामही केले. मी आणि माझी बहीण शाळा-महाविद्यालयांमध्ये गेलो आणि नेहमीचे शैक्षणिक जीवन सुरू झाले. मात्र, खरं सांगायचं तर, त्या काळाचा खरा प्रभाव आम्हा भावा-बहिणीला उमगेपर्यंत मध्यंतरी बराच काळ उलटून गेला. नंतर आम्ही नोकरी-व्यवसायात मग्न झालो. पण, सावरकर या अकल्पित प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे आमच्या वाढत्या वयावरील मनामध्ये कायमचे घर करून राहिले हे मात्र खरं! अथक त्याग, बलिदान, क्रियाशीलता, सचोटी, जिद्द, धैर्य, निश्चयी, साहित्यिक, विज्ञानवादी विचारसरणीचे संस्कार आम्हाला पुढे आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर मदतीचा आणि मार्गदर्शक हात देत राहिले.

बहुतेक सामान्य नागरिकाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला का, हा विचार ज्याने त्याने सतत करणे जरूरीचे आहे. मनमिळावू वृत्ती जपून आणि परिश्रम चालू ठेवून, काही पराभवांच्या चटक्यातून सावरून समर्थपणे अविरत पुढे चालण्याची भावना आपल्या बहुतेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय राहणीमानामध्ये अजूनही दिसत नाही. आपल्या सर्वधर्मसहिष्णुतावादी अखंड भारतात ब्रिटिशांनी भारतीयांना एकत्रित येण्यापासून परावृत्त करून १५० वर्ष जखडून ठेवलं आणि स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७० वर्षांच्या टप्प्यावर येऊनही आपण अजूनही एकमेकांना दूर करून, जातीभेदांना साकडे घालत, देशाच्या संरक्षणाबाबत दूरदर्शी न राहता, आपल्याच गौरवशाली इतिहासाकडे दुर्लक्ष करत, आपापले घोडे पुढे दामटविण्याच्या प्रवृत्तीला अजूनही आळा घालू शकलेलो नाही. 'ईस्ट इंडिया' कंपनीच्या नावाने गवसणी घातला गेलेला भारत आणि विशेषतः तरुण पिढी आज हळूहळू 'वेस्टर्न इंडिया' होण्याच्या मार्गावर आहे.

२०१६ साली स्वा. सावरकरांच्या ५०व्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्ताने 'अनादि मी, अनंत मी' नाटकाचे नाट्याभिवाचन स्वरूपात पुनर्निर्माण करण्याच्या इर्षेने मला चेतना दिली. मग त्यानंतर पुण्या-मुंबईतील २५-३० तरुण हौशी कलावंतांना, गायक-वादकांना आणि तंत्रज्ञांना हाताशी धरून या नाटकाची उलाढाल नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही जमेल तशी सुरू केली. आमचे प्रयत्न आणि बर्‍यापैकी चांगला होत असलेल्या तालमी पाहून बाबांनी मला याचे पुन्हा पूर्ण स्वरूपात नाटक सादर कर, असे प्रोत्साहन आणि विश्वास दिला.

पहिल्याच प्रयोगाला पुण्याच्या ऐतिहासिक भरत नाट्य मंदिर येथे रसिकांनी हाऊस फुल्ल असा अनपेक्षित, परंतु प्रचंड प्रतिसाद दिला की, जवळजवळ ३०० लोकांना आम्हाला नाट्यगृहाबाहेरूनच परत पाठवावे लागले. तेव्हा आम्हाला थोडी जाणीव झाली की, आपण जे काही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, ते सर्वसामान्यांना आवडत आहेत. त्याबरोबरीनेच माझ्या पिढीतील किमान २० तरुण हौशी कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत स्वा. सावरकरांचे पूर्ण जीवनचरित्र आपण या माध्यमातून पोहोचवू शकलो याचे मनोमन समाधानही मिळाले. त्यानंतर आतापर्यंत पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, सांगली, औरंगाबाद, वाई, पारनेर, रत्नागिरी अशा विविध प्रमुख केंद्रांवर सादर झालेल्या जवळजवळ २० पेक्षा जास्त प्रयोगांमधून कुठलीही प्रापंचिक, आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ जास्तीत जास्त लोकांना या अनोख्या जीवन कहाणीचा अनुभव घेता यावा आणि खर्चाची तोंड मिळवणी व्हावी इतपत अपेक्षा ठेवून हे प्रयोग सादर झाले आणि प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांनी उचलून धरला! अमेरिकेत बे एरिया, कॅलिफोर्निया आणि सिएटल, वॉशिंग्टन येथेही या कलाकृतीचे एकपात्री नाट्याविष्कार सादर झाले आहेत.

मात्र, कोणत्याही नाटकाला प्रेक्षक उठून नाट्यगृहात जावेत ही किमान अपेक्षा असतेच. त्यामुळे जरी कोणताही नाट्यप्रयोग विनामूल्य सादर केला तरीही, किती प्रयोग, कोणत्या ठिकाणी, किती प्रेक्षक अनुभवू शकतील यालाही मर्यादा आलीच. दुर्दैवाने स्वा. सावरकर हे महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणात, समाजकारणात तसेच शैक्षणिक जीवनात विविध कारणांमुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्व. अजूनही शालेय इतिहासाच्या पुस्तकात केवळ 'क्रांइकार्य', 'अंदमानचा बंदिवास', 'जयोऽस्तुते' आणि 'बोटीतून उडी मारलेले एक स्वातंत्र्यसेनानी' इतपत त्यांची क्षुल्लक माहिती विद्यार्थी आणि जनसामान्यांमध्ये आहे. त्यापलीकडे त्यांचे शतपैलू व्यक्तिमत्त्व आणि विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न काही अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक सोडता कोणाला पचनी पडत नाही.

आताचा काळ तर सोशल मीडिया, स्मार्ट फोन्स, संगणकीय तंत्रज्ञानाचा आहे. स्वा. सावरकरांचा कल नेहमीच अद्ययावत गोष्टी आणि तंत्रज्ञान आत्मसात करून उपयागोत आणण्यामागे राहिला होता. तेव्हा 'अनादि मी, अनंत मी' या नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून, मराठी भाषेतील सर्वोच्च दर्जाची एक उत्तम नाट्यसंहिता आणि स्वा. सावरकरांची समग्र जीवनगाथा, पुन्हा एकदा नव्या पिढीला, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती व्हावी आणि स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या अनमोल परंतु विसरलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळावा, या उद्देशाने येत्या स्वा. सावरकर जयंती दिनी म्हणजे २८ मे, २०१९ पासून 'अनादि मी, अनंत मी' या महानाट्याचे ध्वनिनाट्य स्वरूपात (ऑडियो ड्रामा) रूपांतरण प्रकाशित करण्याचा, मी आणि माझ्या तरुण सहकार्‍यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

ओघवत्या निवेदनाद्वारे सावरकरांच्या धगधगत्या आयुष्याचे नाट्यपूर्ण कथन करतानाच, आरती, देशभक्तीपर गीते, भाषणे, ओव्या, फटके, पोवाडे, नाट्यप्रवेश, अंदमानातील विविध प्रसंग अशा पैलूंनी सजलेले हे ध्वनिनाट्य तरुणांना, इतिहासतज्ज्ञांना आणि सावरकर अभ्यासकांना माहीत नसलेले अनेक पैलू प्रकाशात आणेल. सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ध्वनिसंयोजक मंदार कमलापूरकर या मित्रवर्य कलाकारांच्या तांत्रिक परिसस्पर्शाने उजळून निघालेले नव्या स्वरूपातील 'अनादि मी, अनंत मी' हे ध्वनिनाट्य सर्व इतिहासप्रेमी, राष्ट्राभिमानी आणि कलाप्रेमी रसिकांना आवडेल याची खात्री आहे. हे ध्वनिनाट्य उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि 'Reverb Katta' या वेब मीडिया चॅनेलच्या सहकार्याद्वारा संपूर्णत: विनामूल्य स्वरूपात विविध ऑडियो एप्स आणि युट्युब चॅनेलवर उपलब्ध असणार आहे. मूळ नाटक जरी अडीच तासाचे असले तरी सर्वांना ते सलग ऐकणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन सुमारे १५ मिनिटांच्या १२ भागात एखाद्या नाट्यपूर्ण गोष्टीसारखे हे ध्वनीनाट्य रसिकांना, त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अनुभवता येईल. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन मुलांनी ही नाट्यपूर्ण गाथा आवर्जून ऐकावी आणि आत्मसात करावी अशा पद्धतीने कथन केले जाते.

या नाट्यगाथेच्या रूपाने प्रत्येकातील कुठेतरी लपलेल्या राष्ट्राभिमानी वृत्तीला जागविण्याकडे या कलाकृतीचा एक जरी शब्द आणि क्षण कामी आला आणि स्वा. सावरकरांचे खरे समग्र धगधगते आयुष्य आणि विचार श्रोत्यांना समजले तरी, आमचा संकल्प सिद्धीस गेला असे समजतो. या ध्वनिनाट्याच्या उपलब्धतेविषयी अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट देऊन अधिकाधिक मराठी भाषिकांपर्यंत ही बातमी पोहोचविण्यास प्रवृत्त करावे ही नम्र विनंती. http://www.facebook.com/-M-MSavarkarDarshan , युट्युब चनेल 'Reverb Katta' आणि 'अनादि मी अनंत मी' माहितीसाठी संपर्क : (अनादि मी, अनंत मी ध्वनिनाट्य निर्माता आणि विश्वस्त - उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट) ८८०५९८२५४८

- ओंकार खाडिलकर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@