आपण सावरकरांना काय दिले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |




राष्ट्रकार्य हे सतीचं व्रत मानून केवळ देशसेवेत त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आता ही आपली जबाबदारी आहे की, आपण त्यांना जगासमोर 'माफीवीर सावरकर' म्हणून पोहोचवतो की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' म्हणून...

 

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले,

वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,

तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला,

लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला...

ज्यांनी तन, मन, धनासहित आपलं वक्तृत्व, काव्य, लेखणी आणि आपलं सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण केलं, त्यांना आपण काय दिले? आज हा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण, सावरकरांना 'माफीवीर' आणि 'देशद्रोही' म्हणणारे आज 'विचारवंत' म्हणून मिरवत आहेत. अपमान, अर्थहीन आरोप आणि त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त एक राष्ट्र म्हणून आपण त्यांना काहीही दिलेलं नाही. मुळात तशी अपेक्षादेखील त्यांनी कधी केली नाही. पण, एका सशक्त राष्ट्राच्या उभारणीत त्यांच्या विचारांना दुर्लक्षित केले जाऊ नये, एवढीच विनंती आहे. “एक वेळ मार्सेलिसची उडी विसरलात तरी चालेल, पण समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ सावरकरांना कधीही विसरू नका,” असं ते कायम म्हणायचे.

 

दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. घरावर मोठ्या अभिमानाने तिरंगा आणि भगवा ध्वज फडकविणार्‍या सावरकरांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू होते, तर दुसर्‍या डोळ्यात दुःखाश्रू होते. सावरकर एकीकडे आनंद साजरा करत होते, तर भारताच्या विभाजनाचे दुःखदेखील पचवत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात परकीयांकडून आणि स्वातंत्र्योत्तर काळात स्वकीयांकडूनदेखील अन्यायकारक वागणूक मिळणारे सावरकर कदाचित एकमेव नेते असतील. 'वि. दा. सावरकर' नावाच्या झंझावाताला घाबरून त्यांना तब्बल ५० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा देणारं ब्रिटिश सरकार आणि बादरायण संबंध जोडून गांधीवधाच्या आरोपात अडकविण्याचा प्रयत्न करणारे सारखेच दोषी ठरतील. सावरकरांची या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, पण तरीसुद्धा 'लोकशाही खतरे मे हैं' 'न्यायालयाचा अवमान' वर गळे काढून रडणारे आजही हा विषय मुद्दामच चघळत ठेवतात आणि सावरकरांना दोषी ठरवत थेट न्यायालयाच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. या क्रांतिवीराचे विचार आत्मसात करण्याऐवजी आपण त्यांना देऊ शकलो तो केवळ एक अर्थहीन आरोप!

 

हा अपमान सहन करूनदेखील राष्ट्रकार्यासाठी आणि सशक्त भारताच्या उभारणीत ते कायम सरकारच्या पाठीशी उभे राहिले. दि. २६ जानेवारी, १९५० रोजी सार्वभौम लोकशाही भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. त्यावेळी सावरकरांनी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना संदेश पाठवला की, “कोणत्याही राष्ट्रीय कार्यामध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या सेवेला मी सदैव नि संपूर्णतः सादर राहीन. आपल्या नवजात प्रजासत्ताकाचे रक्षण करण्यासाठी भारताची लढाऊ दले शक्य तितकी सुसज्ज आणि भक्कम बनविण्याच्या आद्य कर्तव्याकडे तुम्ही तातडीने लक्ष पुरवाल, अशी मला आशा आहे.” शिवाय त्यांनी सैन्यात भूदल, नौदल नि वायुदलात लक्षावधींच्या संख्येने भरती होण्याचे हिंदू तरुणांना आवाहनदेखील केले. सावरकरांच्या मते, “आपल्या राष्ट्राच्या सीमा हव्या तितक्या सुरक्षित नव्हत्या.

 

केवळ बंधुत्वाचे नारे आणि गाणी गाऊन आपण त्यांची मैत्री संपादन करू शकणार नाही. असली वेडगळ परराष्ट्र धोरणे ठेवली, तर दीर्घकालीन रक्तरंजित लढा देऊन आपण जे काही कमावलं आहे, ते सर्व आपण गमावून बसू. आपले राष्ट्र टिकवायचे असेल नि यशस्वी बनवायचे असेल, तर 'जशास तसे' हेच एकमेव धोरण ठेवण्याखेरीज आपणास गत्यंतर नाही.” दुर्दैवाने त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यांचे शब्द किती खरे ठरले, हे आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळेलच. १९६२ सालचं युद्ध असो किंवा पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न, दहशतवादाचा प्रश्न असो किंवा अवैध प्रकारे होणारे रोहिंग्या मुसलमानांचे अतिक्रमण, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सावरकरांनी दिलं. पण, आपण मात्र त्यांना 'देशद्रोही' म्हणून मोकळे झालो.

 

भारत सगळ्यात मोठा लोकतांत्रिक देश म्हणून उदयाला आला, तरीसुद्धा सावरकरांचा तुरुंगवास काही संपला नव्हता. वयाच्या ६७व्या वर्षी स्वतंत्र भारतात त्यांना कारावास भोगावा लागला. नेहरू-लियाकत अली करारानिमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली भारतात येणार होते. लियाकत अलींनी पाकिस्तान लोकसभेत हिंदू महासभेवर जोरदार हल्ला चढवला होता. पूर्व पाकिस्तानमध्ये ज्या काही शोकांत घटना घडल्या, त्याला हिंदू महासभेचा प्रचार आणि सरदार पटेलांनी कलकत्त्याला दिलेल्या भाषणांना कारणीभूत ठरवलं. या पार्श्वभूमीवर चर्चा निर्विघ्नपणे पार पडावी, हे कारण देऊन सरकारने सावरकरांना बेळगाव येथे तुरुंगात ठेवले. मुळात या काळात सावरकरांचं वास्तव्य होतं मुंबईत आणि चर्चा होणार होती ती दिल्लीत. शिवाय सावरकर सक्रिय राजकारणातून पूर्णपणे निवृत्त झाले होते. त्यामुळे सावरकर कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणतील, याची तीळमात्रही शक्यता नव्हती. तुरुंगात असताना २६ एप्रिल, १९५० रोजी सावरकरांनी मुंबई उच्च न्यायालयाला आवेदन पाठवले. त्यात त्यांनी पोलीस आयुक्तांनी केलेले सगळे आरोप खोडून काढले व विनाअट मुक्तता करण्याची मागणी केली.

 

पुढे त्यांनी लिहिले, “पाकिस्तानशी जो करार झाला आहे, त्यामुळे सार्‍या जगभर शांतता पसरेल, अशी माझी भावना आहे. पुढे जाऊन मी असंही सांगतो की, या करारामध्ये जी भूमिका अपेक्षित आहे, त्या वृत्तीने या कराराचे पालन करण्यासाठी मी लोकांना आव्हान करण्याचा प्रयत्न करीन.” अखेर १३ जुलै, १९५० रोजी सावरकरांची मुक्तता करण्यात आली. एक स्वातंत्र्यसैनिक स्वतंत्र भारतात जवळपास तीन महिने तुरुंगात राहतो, ही एक राष्ट्र म्हणून आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ही होती अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पहिली गळचेपी! भारताच्या अत्यंत निर्णायक काळात सावरकरांसारख्या थोर नेत्याचं मार्गदर्शन भारताने गमावलं!

 

सावरकरांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना हाती घेतलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्यदेखील दुर्लक्षित आहे. इतर समाजसुधारकांनी आपल्या समाजाच्या उद्धारासाठी केलेलं कार्य उल्लेखनीय आहेच; पण ब्राह्मण म्हणून जन्माला आलेल्या सावरकरांनी आपल्याच समाजबांधवांच्या विरोधात जाऊन हे कार्य हाती घेतलं. हे अत्यंत जोखमीचं आणि धाडसाचं कार्य होतं. या वेळी अनेक सनातनी मंडळींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली, पण सावरकर थांबले नाहीत. त्यांच्या मते, अस्पृश्यता जातीव्यवस्थेचा परिणाम होती आणि आपल्या एकतेत अडथळादेखील होती.

 

'आसिंधू सिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका ।

पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिति स्मृत:॥'

 

अर्थात, जो मनुष्य या भारतभूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो 'हिंदू' होय. हिंदुत्वाची इतकी व्यापक व्याख्या या आधी कुणीही केली नव्हती. 'एक राष्ट्र, एक संस्कृतीवरच आपली एकता आधारित आहे,' असं ते म्हणत, त्यामुळे ही राष्ट्रभक्तीची ज्योत प्रत्येक धर्मीयाच्या मनात प्रज्वलित करणं आवश्यक आहे. लेख, कविता व नाटकातून त्यांनी अनिष्ट चालीरिती, रुढी-परंपरा व समाजातील इतर दोषांवर कडाडून टीका केली. ते नुसती टीका करून थांबले नाहीत, तर या चळवळीत स्वतः सक्रियपणे सहभागी झाले. सर्व जातीधर्मीयांसाठी खुलं असलेलं पतितपावन मंदिर रत्नागिरीत उभारण्यात आलं. सर्वांसाठी एकच उपाहारगृह सुरू करण्यात आलं. अनेक विहिरी खुल्या केल्या. सावरकरांच्या पत्नी माईंनी एकमेकींच्या सावलीलाही विटाळ मानणार्‍या स्त्रियांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकत्र आणलं. राष्ट्रवादाचा आणि एकतेचा संदेश सावरकरांनी आपल्याला दिला. पण, आपण मात्र सावरकरांचं हे कार्य जाणूनबुजून दुर्लक्षित केलं. हा इतिहास सांगण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावरकरांना या पंक्तीत आदराचं स्थान मिळवून देण्यात आपण कमी पडलो.

 

सावरकरांच्या निधनानंतरदेखील जाणूनबुजून अर्थहीन वाद उत्पन्न करण्याचा छंद काही लोकांना लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक तथाकथित पुरोगामी मंडळी सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्यासाठी आपली लेखणी आणि वाणी झिजवत आहेत. या मंडळींच्या मते, एकतर व्यक्ती अहिंसावादी असतो किंवा सावरकरवादी किंवा गोडसेप्रेमी असतो. यांच्यासाठी एक समतोल विचारसरणी जणू अस्तित्वात नाहीच. मुळात सावरकरांनीदेखील अहिंसावादी तत्त्वांना व्यक्तिशः कधी विरोध दाखवला नाही, पण आपल्या व्यक्तिगत प्रयोगाच्या तराजूत राष्ट्राला ठेवण्यापूर्वी देशाचं हित आणि अहित राष्ट्रनेत्यांनी ओळखावं, एवढंच सावरकरांचं मत होतं. 'अहिंसा परमो धर्म:' असा अर्धवट श्लोक सांगून सामान्य जनतेची दिशाभूल करणार्‍यांना 'धर्म हिंसा तदैव च' असा हा श्लोक पूर्ण करून अहिंसेचा खरा अर्थ समजावून सांगितला. विश्वशांततेच्या दृष्टीने अहिंसावादी विचार आदरणीय आहेतच, पण राजकीयदृष्ट्या अनुकरणीय नाहीत. सावरकर श्रेष्ठ की तथाकथित राष्ट्रनेते श्रेष्ठ, हा प्रश्नच नाही. पण, काही राष्ट्रीय नेत्यांना श्रेष्ठत्व बहाल करण्यासाठी सावरकरांना कमी लेखण्याची गरज का भासते, हा मुख्य प्रश्न आहे. एकदा एका कार्यक्रमात सावरकर म्हणाले की, “बंदिवासापूर्वीचे सावरकर बरोबर होते, हे समजायला १०-२० वर्षे लागली, तर विज्ञाननिष्ठ आणि हिंदुत्ववादी सावरकर बरोबर आहेत, हे समजायला अजून बराच काळ धीर धरावा लागणार.” सावरकरांचे विचार प्रत्येक युगात, कुठल्याही प्रसंगी अगदी अचूक बसतात, सार्थ ठरतात इतके ते विचार जिवंत आणि चिरंतन आहेत. त्यामुळे मणिशंकर अय्यरसारख्या नेत्यांनी अंदमानात जाऊन त्यांचे विचार पुसले तरी ते इतक्या सहजासहजी पुसले जाऊ शकणार नाहीत.

 

स्वार्थ, सत्ता किंवा स्वतःला माहात्म्यपद बहाल करून घेण्यासाठी सावरकरांचे विचार नाहीत, तर राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन स्वीकारलेले ते तत्त्व आहे. तुमच्या तथाकथित नेत्यांची उंची दाखवताना तुम्हाला सावरकरांशी तुलना करावीशी वाटते, यातच सावरकरांचं आणि त्यांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. सावरकरांवर प्रेम करा, त्यांच्यावर टीका करा. पण, सावरकरांना दुर्लक्षित नाही करता येणार, हे या वादातून सिद्ध होतं. भारताला पारतंत्र्याच्या बेड्यांतून मुक्त करणार्‍या एका स्वातंत्र्यसैनिकाच्या विचारांना अनेक वादांच्या बेड्यात आपण जखडून ठेवलं आहे. हा कारावास ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी खर्‍या अर्थाने आपण सावरकरांना मानवंदना दिली, असं म्हणता येईल! सावरकरांनी तर आपल्यासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांनी ना सत्तेची लालसा ठेवली ना आपल्याकडून कुठल्या माहात्म्यपदाची अपेक्षा ठेवली. राष्ट्रकार्य हे सतीचं व्रत मानून केवळ देशसेवेत त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आता ही आपली जबाबदारी आहे की, आपण त्यांना जगासमोर 'माफीवीर सावरकर' म्हणून पोहोचवतो की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' म्हणून पोहोचवतो.

 

त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला

त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही

त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी॥

 

- शर्वरी जोशी

9373862977

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@