स्वातंत्र्यवीरांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर नेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार कृतिशील कार्य करण्याचा लौकिक असलेले मुंबईचेस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकहे सर्वार्थाने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रखरतेने नेत असून यात स्तरातील मंडळी सहभागी होत आहेत. तेव्हा, स्मारकाचे विविध उपक्रम तसेच कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख...

 

मुंबई महानगरपालिकेने सर्वसंमत ठरावाद्वारे स्मारकाची जागा ‘लीज‘ने दिली. दि. २६ फेब्रुवारी, १९७४ ला स्वातंत्र्यवीरांच्या पुण्यतिथीला एका प्रकट समारंभात, तत्कालीन महापौर सुधीर जोशी (शिवसेना) यांच्या हस्ते स्मारक समितीला जागा देण्यात आली. दि. २८ मे, १९७५ रोजी, स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीच्या मुहूर्तावर स्मारकाच्या ‘प्रकल्प कार्यालया’चे उद्घाटन, गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या हस्ते झाले. दि. २० मे, १९७९ ला, तत्कालीन उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम यांच्या हस्ते प्रकट समारंभात भूमिपूजन झाले.

 

रणजित सावरकर यांनी प्रगत आणि सुनियंत्रित प्रशासनातूनस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची धुरा गेल्या एक दशकांहून अधिक काळ यशस्वीरित्या सांभाळली आहे. उच्चशिक्षित आणि नेतृत्वक्षमतेने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असून अनोखी शिस्त व कामाप्रती कमालीचे समर्पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना अधिक प्रगल्भतेने सादर करताना भाषेवरील त्यांची जबरदस्त पकड जाणवते. त्यामुळेच अनेकांसाठी ते प्रेरणा आणि आशेचा स्त्रोत ठरले आहेत. विज्ञाननिष्ठा, विद्याविस्तार यातून त्यांनी स्वातंत्र्यवीरांचे विचार सर्वदूर नेले आहेत. एका सर्जनशील व्यक्तिमत्त्वातून राष्ट्रभक्तीच्या विचारांच्या संस्कृतीला आधार देण्याचे कार्यदेखील यातून त्यांनी साध्य केले आहे.

 

जेएनयुत रोवला राष्ट्रभक्तीचा झेंडा,

दुमदुमला भारतमाता की जय,

वंदे मातरम्चा जयघोष!

 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अभाविप-जेएनयुच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला. कारण होते, ’हे मृत्युंजय’ या हिंदी नाटकाचे जेएनयुमध्ये आयोजन. ’हे मृत्युंजय’ या नाटकाच्या ५८ जोरदार प्रयोगांनंतर सादर झालेला हा हिंदीतला दुसराच प्रयोग विशेष ठरला. तिथल्या ऑडिटोरियममध्ये भरगच्च विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत हा प्रयोग पार पडला. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांच्या विचारांनी सर्वजण भारावून गेले.

 

जेएनयुचे अधिष्ठाता उमेश कदम, ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री निधी त्रिपाठी, अतुल जोहरी, दुर्गेशकुमार, ललित पांडे, तपन बिहारी, अमित मिश्रा, मनीष कुमार, विजय कुमार तसेच स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मंजिरी मराठे, डॉ. सुमेधा मराठे अशा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे नाटक संपन्न झाले. स्वातंत्र्यवीरांच्या अंदमान पर्वावर आधारित ‘हे मृत्युंजय’ या नाटकातील एकेका प्रसंगातून विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उठत होते. अनेक प्रसंगांना उत्स्फूर्तपणे दाद देत जेएनयुच्या विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांचा प्रत्यय वारंवार विद्यार्थ्यांना येत होता आणि नकळत त्यांच्या मुखातून त्यांच्याबद्दल आदर आणि जयघोष उमटत होता.

 

सावरकरांच्या विचारांनी विद्यार्थी एवढे भारावून गेले होते की, त्यांनी संपूर्ण परिसरात या कार्यक्रमाची जोरदार प्रसिद्धी केली, भव्य मिरवणूकही आयोजित केली होती. त्यातून स्वातंत्र्यवीरांच्या विचारांच्या घोषणादेखील दिल्या जात होत्या. संपूर्ण वातावरण सावरकरमय झाले होते आणि त्यांच्या विचारांनी भारावून गेले होते. अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाचा जेएनयुमध्ये आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातून जेएनयुत येऊन अशाप्रकारे होत असलेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि आनंद ओसंडून वाहत होता.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रासाठी प्रस्ताव

 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अभाविप-जेएनयुसाठी १४ मार्च, २०१९ हा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण, ज्या जेएनयुत, ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा दिल्या गेल्या, त्याच ठिकाणी उच्चरवाने गुंजल्या ’भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा. राष्ट्रभक्तीने फुलून गेलेल्या वातावरणात सादर झालं नाटक ’हे मृत्युंजय.’ या कार्यक्रमाच्या दरम्यान अभाविपने, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव सादर केला. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिले असून हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन तिथे हे केंद्र सुरू होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

 

या केंद्राच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची माहिती, त्यांचे साहित्य यांचे अध्ययन करता येईल. तसेच अभ्यासक्रमासाठी त्याचा उपयोग होणार आहे. पीएच.डी., एम.फिल करणार्‍यांनादेखील संदर्भ तसेच अन्य उपयुक्त माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल. “देशविरोधात चर्चा करणार्या काही विद्यार्थ्यांमध्ये देशहितकारक विचार बिंबवण्यास स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र उपयुक्त ठरेल,” असे मत स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लाखो क्रांतिकारकांच्या त्यागाचा, बलिदानाचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं, ही आज काळाची गरज आहे. जो देश आपला इतिहास विसरतो, त्या देशाचा भूगोल बदलतो, हे सावरकरांचं सांगणं खरं ठरलं. १९४७ मध्ये आपण स्वातंत्र्य मिळवलं, पण आपल्या देशाचा भूगोल बदलला, देशाचे तुकडे झाले. आताही देशाचे तुकडेच नाही, तर आपला देशचं गिळंकृत करायला पाकिस्तान धडपडत असताना आजच्या कन्हैय्यासारखे, कंसाचे वंशज स्वतःच्याच देशावर घाव घालत आहेत, तेव्हा गरज आहे ती जातिवंत कन्हैय्याची, कृष्णनीतीची. सावरकर स्मारकाचं कार्य मुंबईतल्या वास्तुपुरतं मर्यादित न ठेवता ते देशभर पोहोचविण्याच्या प्रयत्नाला आलेलं, जेएनयुतला प्रयोग हे मोठं यश आहे. राजकीय लाभासाठी ‘सावरकर’ हे नावच अनेक ठिकाणी त्याज्य मानलं जात असताना, जेएनयुत, ज्याला ‘कम्युनिस्टांचा मदरसा’ समजलं जातं, तिथे प्रयोग होतो आहे, ही बातमीच अनेकांचा उत्साह वाढवणारी होती. शिकण्याच्या नावाखाली इथे वर्षानुवर्ष राहणारी ही मंडळी, निवडणुकांच्या काळात गुजरात, बिहारमध्ये गोंधळ घालण्यासाठी जातात. शैक्षणिक संस्थांचा वापर देशविघातक कृत्यांसाठी करणार्‍या या मंडळींना चाप लावणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात अभाविपने केली आहेच; पण सावरकर स्मारकही त्यासाठी नेटाने उभं ठाकलं. नाटकाचा प्रयोग करायचं ठरल्यावर विरोधकांनी अनेक अडचणी निर्माण केल्याच, पण त्याला अभाविपचे कार्यकर्ते पुरून उरले. जेएनयुच्या इतिहासातला इतका प्रतिसाद मिळालेला हा पहिला कार्यक्रम ठरला. त्यामुळे प्रोत्साहित होऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचा प्रस्ताव तयार केला असून प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. लवकरच तो या प्रक्रियेतून पार पडून मंजूर होईल, असा विश्वास अभाविपचे सौरभ शर्मा व दुर्गेश कुमार यांनी तसेच स्मारकाचे रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर सुरू

 

राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर सुरू करण्यात आले आहे. निवृत्त सैनिक अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्राला प्रबळ होण्यासाठी तसेच नीती आणि धोरणांसाठी साहाय्यभूत ठरतील, अशा स्वरूपाचे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅट्रेजिक सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘काश्मीर - पुढे काय?’ या चर्चेत ते बोलत होते. यावेळी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, माजी व्हाईस अ‍ॅडमिरल अभय कर्वे, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे राष्ट्रीय सचिव विनायक काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कारागृहांतील बंदीवानांमध्ये रुजविला राष्ट्रभक्तीचा विचार

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात कारागृहात असताना आपल्या सह-बंदीवानांमध्ये राष्ट्रभक्ती रूजवून त्यांच्यातून अनेक जाज्ज्वल्य देशभक्त निर्माण केले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे त्यांचे विचार बंदीवानांमधून रुजवून आणि निबंधातून ते उतरवून त्यांच्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत करण्याचा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई या स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्रातील कारागृहात राबविला. विशेष म्हणजे, देशात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या बाबतीत साकारला गेला आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, नाशिक रोड, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई मध्यवर्ती, रत्नागिरी विशेष तर भायखळा, सोलापूर, नांदेड, लातूर, अलिबाग, सातारा जिल्हा कारागृहांमध्ये या स्पर्धा महिला आणि पुरुष बंदिवानांसाठी आयोजित करण्यात आल्या. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातून अनेक बंदिवानांमध्ये सुधारणा आणि पुनर्वसन होत आहे. त्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जात आहे.

 

सुमारे दोन हजार महिला व पुरुष स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला. त्यांनी सावरकरांची ग्रंथसंपदा वाचून त्याच्यावर आपले विचार निबंधांच्या माध्यमातून उतरवून काढले. या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये केवळ मराठी भाषिकच नव्हे तर मुस्लीम व ख्रिश्चन महिला व पुरुष देशभक्तदेखील आहेत, हे विशेष. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांमध्ये स्पर्धकांनी निबंध लिहिले. त्याचे निकालदेखील जाहीर झाले आहेत. याकामी त्या त्या कारागृहाचे अधीक्षक, उपअधीक्षक, कर्मचारीवर्ग यांचेही उत्तम सहकार्य मिळाले.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, डॉ. नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मुकुंद गोडबोले, मंदाकिनी भट, डॉ. सुमेधा मराठे, तसेच या उपक्रमाचे संकल्पक व रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि कार्यवाह नयना शिंदे आदींनी त्याचे यशस्वी नियोजन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जनमानसात मोठ्या प्रमाणावर प्रसारित होऊ लागले आहेत. यामागे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा मोलाचा वाटा आहे. हे राष्ट्र देशभक्तीने भारावून गेले पाहिजे तरच आणि तरच आपण जगात महासत्ता म्हणून आपला लौकिक प्राप्त करू शकू, असा विश्वास यामागे रणजित सावरकर यांना असून त्या दृष्टिकोनातून हे कार्य अव्याहतपणे करत आहेत.

 

स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्काराचे वितरण केले जाते. आतापर्यंत वितरित करण्यात आलेले हे पुरस्कार असे : शौर्य पुरस्कार-नायब सुभेदार बानासिंग, साधना पवार (अशोकचक्र), नीला सावंत (अशोकचक्र), संतोष यादव, कंपनी हवालदार मेजर शिवाजी जगताप, ले. कर्नल शांतीस्वरूप राणा, एअर व्हाईस मार्शल माधवराव नाईक, हवालदार बद्रीलाल लुनावत, मिलिंद गाडगीळ, कॅ. विक्रम बत्रा (परमवीरचक्र), ले. मनोजकुमार पांडे (परमवीरचक्र), नाईल तरलोक सिंग, कॅ. सज्जनसिंग मलिक, मेजर मनीष पितांबरे, वीरबाहू तुकाराम ओंबळे, कॅप्टन मनीषसिंग, विंग कमांडर डॅरिल कॅस्टेलिनो, नायक नीरजकुमार सिंह, लान्सनायक मोहननाथ गोस्वामी, पांडुरंग महादेव गावडे

 

विज्ञान पुरस्कार : डॉ. दीप्ती देवबागकर, गजानन गानू, डॉ. बी. बी. सिंग, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. वसंत गोवारीकर, अनिल दातार, डॉ. अमोल गोखले, डॉ. रवींद्र हस्तक, व्यंकटेश परळीकर, डॉ. सतीश कामत, जितेंद्र जाधव.

 

समाजसेवा पुरस्कार : गोविंद हर्षे, भालजी पेंढारकर, माधवराव पाठक, एकनाथ खानोलकर, बाळ जेरे, ज. द. जोगळेकर, पंडित बखले, विनायकराव शिंदे, अरविंद गोडबोले, चंद्रकांत गोखले, मेजर जनरल अनंत नातू.

 

विशेष पुरस्कार : डॉ. अजित फडके, कीर्तनकार क्रांतिगीता महाबळ, स्वामी नरेंद्राचार्य, अ‍ॅड. उज्वल निकम, डॉ. एस. पी. ज्योती.

 

जीवनगौरव पुरस्कार : विक्रम नारायण सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार - मामाराव दाते, गणपतराव नलावडे, प्रभाकर कुलकर्णी, ले. जनरल शंकरराव पाटील - थोरात, कमलाबाई हसबनीस, बापूराव साठे, लीलाताई आगाशे, रामकृष्ण ताटके, विष्णुपंत पाटील, रंगनाथ नित्सुरे, विष्णू वळसंगकर, गंगाधर जाधव, प्रेम वैद्य, रामचंद्र बर्वे, अमृतलाल शहा, ना. ल. फणसळकर, श्री सप्रे, संभा चव्हाण, अवधूत शास्त्री, सिंधुताई गोडसे, विक्रम ओक, भार्गव जोशी, मनोरमाबाई जोशी, विष्णू मालशे, महादेव काशीकर, भा. ग. देशपांडे, नानाराव शिंदे, के. कृ. जावडेकर, कुसुमताई आपटे, बबन मोडक, ग. बा. पळसुले, हेमंत विंझे, मोहिते कुटुंब, अरविंद कुलकर्णी, हरिश्चंद्र देसाई, शंकर नांदेडकर, वा. ना. उत्पात, चंद्रशेखर गाडगीळ, इंदुभाई काछिया, जयंतराव चितळे, सुनील देशपांडे, शंकर कुळकर्णी-मंगळवेढेकर, मुरलीधर जोशी, वसंत उदगांवकर, वासुदेव रेडकर, भाऊराव थत्ते, तुकाराम लकडे, अरुणकुमार भट, अनिल हब्बू, खंडेकर केसकर, दिंगबर भानू, दत्तात्रेय हर्षे, कुंदाताई परांजपे, अरुण जोशी, मिलिंद एकबोटे, माधव खाडिलकर, निर्मला वैद्य, विनायक बापट, प्रभाकर माने, सुरेंद्रसिंहजी लोढा, चारुदत्त सरपोतदार, चारूदत्त आफळे, शरद ठकार, राजेश्वर पारवेकर, गणेश वढवेकर, रामदासस्वामी सोनार, प्रताप वेलकर, रमेश डांगे, चंद्रकांत सहासने, सतीश भिडे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्याची ठळक वैशिष्ट्ये

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जाज्ज्वल्य राष्ट्रभक्तीचे विचार आणि त्यांची कृतिशीलता हे देशाच्या विकासप्रक्रियेत अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत त्यांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य राष्ट्रीय पातळीवर करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्ये अनेक असून त्यापैकी काही ठळक बाबींचा संक्षिप्त आढावा हा प्रातिनिधीक म्हणता येईल

 

१. हिमालय पर्वतरांगेत हिमाचल प्रदेशात असलेल्या बातलजवळच्या कर्चा नाला परिसरातील ६,०६० मीटर म्हणजेच १९ हजार, ८८१ फूट उंचीच्या बेलाग हिमशिखराची मोहीम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पूर्ण करण्यात आली. या शिखराला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हिमशिखर’ असे नाव देण्याची प्रक्रिया सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आता अंतिम टप्प्यात आहे.

 

. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल धादांत खोटा प्रचार करणारा लेख ‘दी वीक’ या नियतकालिकाने प्रकाशित केल्याबद्दल त्याचे लेखक, मालक, मुद्रक, प्रकाशक यांच्याविरोधात कारवाई व्हावी, यासाठी सबळ पुरावे देऊन न्यायालयीन लढाई सुरू करण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, यासाठीदेखील त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे.

 

. भारत सरकारच्या वतीने निर्मुद्रीकरण जाहीर झाल्यानंतर रोखमुक्त व्यवहाराला चालना मिळावी, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या प्रयत्नातून धसई (ता. मुरबाड, जि. ठाणे) गावाला भारतातील पहिले रोखमुक्त व्यवहार करणारे गाव होण्याचा मान मिळाला.

 

. अंदमानच्या पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव असून त्या ठिकाणी त्यांचा पुतळा नसल्याचे निदर्शनास येताच स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याची त्या विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच ‘कि न घेतले व्रत अम्हि अंधतेने’ या ऐतिहासिक ओळीही त्या खाली स्थापित करण्यात आल्या.

 

. ‘स्वातंत्र्यवीर’ हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित थ्री डी वॉल मॅपिंग तंत्रावरील ध्वनी-प्रकाशाचा शो’ हा भारतातील एकमेव असावा. त्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून समकालीन तंत्राशी सांगड घालत नव्या पिढीपर्यंत सावरकर प्रभावीपणे पोहोचविले जात आहेत.

 

. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझलांचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर आधारितहम ही हमारे वाली हैं’ ही संगीतमय ध्वनीफित निर्माण करण्यात आली आहे. यात सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना असून ‘पद्मश्री’ अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, जसविंदर नरुला, वैशाली सामंत, शान अशा देशातील नामांकित गायकांनी त्यातील गाणी गायली आहेत.

 

. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निवडक ग्रंथसंपदा स्मारकाच्या वतीने १२ भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रेलमध्येदेखील रुपांतरित करण्यात आली आहे. लवकरच स्मारकाच्या बहुभाषिक संकेतस्थळावर ती निःशुल्क उपलब्ध होईल. या भारतीय भाषांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीशिवाय गुजराती, पंजाबी, आसामी, उडिया, बंगाली, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम् अशा भाषांचा समावेश आहे.

 

. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी शौर्य, विज्ञान व समाजसेवा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. ही परंपरा गेली अनेक वर्षे कायम असून स्वातंत्र्यवीरांची शस्त्रसज्जता, विज्ञानवाद यांच्या विचारांना बळकटी दिली जाते.

 

. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या रत्नागिरी कारागृहात कारावास सहन करावा लागला, तिथे त्यांच्या कोठडीबाहेरील दालनात स्मारकाच्या वतीने स्मृतिदालन निर्माण करण्यात आले. त्याचे अनावरण रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांनी २८ मे, २०१८ या दिवशी केले.

 

१०. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर (जि. नाशिक) येथील वाड्याला दत्तक घेण्याची प्रक्रिया स्मारकाने सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे.

 

११. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अलौकिक साहित्यकृतींवर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ हा संगीतमय कार्यक्रम नियमितपणे महाराष्ट्र तसेच देशभरात आयोजित करण्यात येतो. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. अशाच प्रकारे संगीतमय कार्यक्रमांतून आदरांजली वाहण्याचे अन्य कार्यक्रमदेखील स्मारकाने नवी दिल्ली तसेच गेट वे ऑफ इंडिया यासारख्या ठिकाणी आयोजित केले.

 

१२. साहित्यिक उपक्रमांतून स्वातंत्र्यवीरांचे विचार प्रसारित करण्यासाठी अंदमान, बडोदा, नागपूर येथील सावरकर संमेलनांमध्ये स्मारकाचा सक्रिय सहभाग राहिला आहे. मोडी लिपीचे संवर्धन करण्यासाठी ‘माझी जन्मठेप’ या मोडी लिपीतील ग्रंथाचीदेखील निर्मिती करण्यात आली.

 

१३. स्वातंत्र्यवीरांच्या विचारांवर आधारित राज्यस्तरीय चित्रकला तसेच मोडी लिपी स्पर्धेचे नियमित आयोजन करण्यात येते. त्याला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळतो.

 

१४. स्मारकाच्या वतीने बाबाराव सावरकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले असून हा ठेवा सावरकरभक्त तसेच देशप्रेमी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

 

१५. महाराष्ट्रातील आदिवासी, वनवासी, ग्रामीण तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीपर ग्रंथवितरण नुकतेच करण्यात आले.

 

१६. ‘सावरकर श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धादेखील नियमित आयोजित केली जाते. त्याशिवाय मुष्टियुद्ध, धनुर्विद्या, नेमबाजी आदींमध्ये स्मारकाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी केली असून अनेक पदके प्राप्त केली आहेत.

 

१७. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पण वर्षाचे औचित्य साधून ५० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

 

१८. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे क्रांतिकारी सहकारी मदनलाल धिंग्रा यांच्या मैत्रीवर आधारित सध्या गाजत असलेले ‘चॅलेंज’ हे रंगभूमीवरील नाटक महाराष्ट्रातील २५ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी स्मारकाच्या वतीने निःशुल्क आयोजित करण्यात येत आहे.

 

१९. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सनदी अधिकार्‍यांची निर्मिती व्हावी, यासाठी स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतात.

 

२०. राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक प्रबोधन, आधुनिकतावाद, शस्त्रसज्जता या विषयांवरील परिसंवाद तसेच व्याख्यानांचे स्मारकाच्या वतीने नियमित आयोजन करण्यात येते तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक नामांकित मान्यवरांचेही स्वागत करून त्यांना स्मारकाच्या उपक्रमांची माहिती दिली जाते.

 

- अशोक शिंदे

९८२१३७४६२६

(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे प्रसिद्धीप्रमुख आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@