सुप्रजा भाग-११

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



गर्भिणी अवस्थेतील काही तक्रारींबद्दल मागील लेखांत आपण माहिती करुन घेतली. उलट्या, मळमळ, मलबद्धता आणि मूळव्याध-भगंदरावर काही सोपे घरगुती उपायही आपण जाणून घेतले. तेव्हा, आजच्या भागात गर्भिणींना प्रामुख्याने जाणवणारे सर्दी-पडसे, खोकला यांसारख्या त्रासांविषयी, त्यावरील घरगुती उपचारांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

 

गर्भिणी अवस्थाही सुकुमार अवस्था असते. म्हणजेच नाजूक अवस्था असते. गर्भिणीच्या स्वास्थ्यावर गर्भाचे स्वास्थ्य व वाढ अवलंबून असते. गर्भिणी अवस्थेत संवेदनशीलताही वाढलेली असते. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टींचा परिणाम गर्भिणीवर पटकन होतो. हे सर्व टाळण्यासाठी सकारात्मक वातावरण, पोषक आहार आणि कायम मन आनंदी ठेवणे महत्त्वाचे. सर्दी-पडसे-गर्भिणी अवस्था ही नाजूक अवस्था असते. ऋतुमानातील बदल, आहारातील बदल इ. कारणांनीही तिच्या प्रकृतीवर परिणाम होतो. नाक वाहणं, डोकं जड होणं, अंग मोडून येणं, अन्नाची चव न कळणं इ. लक्षणे झाली/असली की, सर्दी झाली समजावी. एरवीपेक्षा ही लक्षणे गर्भिणी अवस्थेत चटकन उत्पन्न होतात. ज्यांना वारंवार सर्दी-पडसं होण्याची तक्रार असते, त्यांच्यात हे प्रमाण वाढलेले दिसते. ज्यांना सर्दी-पडसं वरचेवर होतं, त्यांनी आपल्या दिनचर्येतील काही सवयी बदलायला हव्यात.

 

जसे, झोपताना पाणी पिणे (याला ‘निशापान’ असा शब्दप्रयोग आहे) किंवा सकाळी उठून पाणी पिणे (उष:पान). आयुर्वेदात, मुहूर्तावर (म्हणजे सूर्योदयाच्या दीड तास आधी) उठून पाणी प्यायल्यास ते आरोग्यदायी आहे, असे सांगितले आहे. पण, हल्ली एवढ्या भल्या-पहाटे कोणीच उठत नाही, गर्भिणी तर नाहीच नाही. दिवसरात्र शरीरात वात-पित्त आणि कफाचे विशिष्ट काळ असतात. सूर्योदयानंतर कफ आणि पित्त वृद्धीचा काळ असतो. अशा वेळेस पाणी प्यायल्याने सर्दी-पडसं किंवा आम्लपित्ताचा त्रास होतो. काहींना रोज सकाळी पाणी पिऊन उलटी काढायची सवय असते. योगसाधनेत आणि आयुर्वेदात, दोन्हीत ‘वमन’ हे कर्म सांगितले जरूर आहे, पण ते नित्य करावे, असे सांगितलेले नाही. मुखातून अन्न, जल ग्रहण केले जाते, हा खपसशीींळेप (आत घेण्या) चा मार्ग आहे. त्यामुळे रोज उलटी काढणे चुकीचे आहे. गर्भिणीने तर हे अवश्य थांबवावे, टाळावे. रात्री उशिरा जेवणे, तीव्र वातानुकूलित सुरू ठेवणे, रात्रीचे दही खाणे, फळं (विशेषत: केळं, पेरू, सिताफळ आणि चिकू) खाणे किंवा शिळं अन्न खाणे या सर्व कारणांमुळे सर्दी-पडसे होऊ शकतं.

 

जर वरील कारणांचा आस्वाद घेणे सुरूच राहिले, तर कितीही औषधोपचार केले तरी तात्पुरता आराम पडतो. यासाठी पूर्ण त्रास समूळ जाण्यासाठी त्याची कारक कारणे दूर करणे गरजेचे आहे. फक्त नाकातून पाणी वाहत असल्यास, चणे खाऊनही फायदा होतो (गुळ-चणे रोज मूठभर खाल्ले तर उत्तम टॉनिक आहे.) गर्भिणीने रोज दूध पिणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. सर्दी-पडशाचा त्रास असलेल्यांनी त्यात चिमूटभर हळद, वेखंड इ. पैकी काहीतरी घालून प्यावे. उष्ण प्रकृतीच्या गर्भिणीने वेखंड घेऊ नये. ज्यांना धुळीची-धुरीची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी धुळीत जाताना छेीश चरीज्ञ बांधावा किंवा रुमाल बांधावा. रस्त्यावरून चालताना वाहनांचा धूर आणि धूळ यापासून संरक्षण हवे असल्यास, रोज नित्यनियमाने नस्य करावे. नस्य म्हणजे विशिष्ट औषधांचे चूर्ण, तूप किंवा तेल नाकात घालवे. नित्य नस्यासाठी गाईचे तूपही उत्तम आहे किंवा खोबरेल तेल. ज्यांना नस्य माहीत नसेल, त्यांनी ते तज्ज्ञ वैद्यांकडून करून घ्यावं किंवा रोज दोन्ही नाकपुड्यांच्या आतून या तेलाचे किंवा तुपाचे बोट फिरवावे. यामुळे बाह्य वातावरणातील धूलिकण, रज:कण नाकाच्या पोकळीतच अडकतात, पुढे जाऊ शकत नाहीत आणि सर्दी-पडसं वारंवार होणे थांबते. तसेच, मानेच्या वरील वेगवेगळ्या आजारांमध्येही नस्याचा चांगला उपयोग होतो.

 

अंगदुखी, डोकं जड होणे अशा सर्दीच्या तक्रारींवर कपाळावर सुंठ-वेखंडाचा लेप लावावा. हा लेप दुधातून किंवा तुपातून उगाळून लावावा. सुंठ-वेखंडाचा जर पाण्यातून लेप करून लावला, तर लावलेल्या भागी लालिमा येऊन तो भाग जळजळू शकतो. क्वचित प्रसंगी सालपटं निघतात, म्हणून पाण्यातून न उगाळता दूध वा तुपातून उगाळावे.मध-हळद चाटण घसा टोचत असल्यास, दुखत असल्यास घ्यावे. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्या गरम पाण्यात हळद व मीठ घालावे. हळद हे उत्तम अ‍ॅण्टीसेप्टिक आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनवर उपयोगी ठरते. म्हणजेच त्रास आटोक्यात ठेवण्यास, वाढू न देता कमी करण्यास मदत करते. बारीक कणकण आणि सर्दी-पडसं असतेवेळी तुळशीचा छान उपयोग होतो. बरेच दिवस कणकण राहिल्यास थकवा येतो. तो घालविण्यासाठीही तुळस उपयोगी आहे. पावसाळ्यातील सर्दीसाठी गवती चहाचा काढा करावा. त्यात थोडे सुंठ, अळशी, ज्येष्ठमध, अडुळसा आणि तुळस घालून काढा करून प्यावा. हे सगळे उपाय सुरू असताना, ताप असल्यास लंघन करावे व भूक लागल्यावर पचायला हलके असे जेवावे. जसे मुगाचे सूप, मूगाच्या डाळीची खिचडी, भाताची पेज, तांदळाचे ताकातले घावण इ.

 

गॅसेस पोट डब्बं होणं (फुगणं) असाही त्रास संभवतो. कारण, गर्भिणीच्या पहिल्या व तिसर्‍या तिमाहीमध्ये पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. पहिल्या तिमाहीमध्ये उलट्या, मळमळ, अरूची ही लक्षणे असतात, तर तिसर्‍या तिमाहीमध्ये गर्भाच्या आकारातील वाढीमुळे त्याचा वरील अवयवास दाब पडू लागतो. म्हणून एकावेळेस खूप जेवण जात नाही, अस्वस्थ वाटते. जर हालचाल, अंगमेहनत संपूर्णतः बंद केली तर खाल्लेले अन्न पचत नाही, ते पोटात अधिक काळ टिकते व त्यानंतर पोटदुखी, पोट डब्बं होणं, फुगणं इ. सुरू होते. हे टाळायचे असल्यास जेवण ताजे, घरगुती व गरम असावे. गरम भातावर तूप (घरी केलेलं अधिक उत्तम) आवर्जून घ्यावे. खूप गॅसेसचा जर त्रास होत असला, तर पहिल्या घासाबरोबर (भाताच्या) थोडं तूप आणि हिंग कालवून खाणे. जळजळ आणि मळमळ होत असताना पोट फुगत असल्यास हिंग-तुपाबरोबर लिंबूही पिळून पहिले दोन घास भाताचे, असे खावे. भात शिजवताना तो शक्यतो कुकरमध्ये न शिजवता पातेल्यात शिजवावा. बासमती, आंबेमोहोर असे तांदळाचे प्रकार पचायला जड असतात. तेव्हा ते खाऊ नयेत. हातसडीचा, बिनापॉलिशचा (हल्ली ऑर्गेनिक तांदूळही मिळतो. पण, तोही वरील प्रकारचा असल्यासच वापरावा.) तांदूळ वापरावा. जुना तांदूळ उत्तम पण, जुना नसल्यास तो भाजून घ्यावा आणि मग भात करावा. याने तो पचण्यास खूप हलका होतो आणि तूप-मीठ-लिंबू इ. घातल्याने चवही छान येते. असा तांदूळ वजन वाढवत नाही, गॅसेसचा त्रास होत नाही आणि थोडा खाल्ला तरी समाधान होते. मन तृप्त होते.

 

याव्यतिरिक्त अन्य पोटाच्या तक्रारी असल्यास (पोट जेवण झाल्यावर दुखणे) किंवा जेवल्या जेवल्या शौचास जावे लागणे तर तुपातून सुुुंठीच्या गोळ्या करून ठेवाव्यात. (छोट्या छोट्या) आणि त्या चघळून खाव्यात किंवा जेवणाआधी छोटा आल्याचा तुकडा सैंधवाबरोबर खावा. याने भूक वाढते आणि पचनशक्ती सुधारते. वारंवार गर्भिणी अवस्थेत जर पोटाच्या तक्रारी उद्भवत असतील तर गरम पाणीच प्यावे. सुंठ घालून पाणी उकळावे आणि ते प्यावे. थोडे तूपही घातले तरी चालेल. गर्भिणीने तिसर्‍या तिमाहीमध्ये थोडे थोड जेवावे. एका वेळेस खूप खाऊ नये, याचे कारण आधीच स्पष्ट केले आहे. झोपही शांत, गाढ आणि पूर्ण होणे गरजेचे आहे. दगदग चिडचिड अधिक होेईल, असे काही असल्यास ते टाळावे. गर्भावस्थेत गर्भाची सर्वांगीण वाढ होत असते आणि त्याचे पोषण सर्वतोपरी मातेच्या आहार-विचार आणि आचरणावर अवलंबून असते. तेव्हा पौष्टिक खा आणि सुदृढ राहा!

 

(क्रमशः)

वैद्य किर्ती देव

9820286429

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@