शाळेतील दंगामस्तीचाही विमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019   
Total Views |




जीवन विमा, आरोग्य विमा, गृहविमा, वाहन विमा, अपघात विमा, कृषी विमा या सगळ्यानंतर आता शालेय मुलांच्या दंगामस्तीचाही विमा उतरविला जाणार आहे. आहे ना अनोखी आणि आतापर्यंत न ऐकलेली, न पाहिलेली खबर? जपानच्या ‘येल’नावाच्या एका कंपनीने शालेय मुलांच्या खोड्यांचाही विमा उतरविणार असल्याचे जाहीर केले आहे.

जिनेव्हात झालेल्या जगातल्या पहिल्या ज्ञात विमा करारापासून आजपर्यंत विमा क्षेत्राचा प्रचंड विस्तार झाल्याचे आपल्याला दिसते. सुरुवातीला विम्याकडे गुंतवणूक म्हणून पाहणार्‍यांनी विम्याकडे विमा म्हणूनच पाहायला सुरुवात केली तसेच जगभरात विमासेवेचे जाळे विस्तारले. भारतातही १८७० साली पहिल्यांदा विमासेवेची सुरुवात झाली. ‘बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युरन्स सोसायटी’ने देशातला पहिला विमा उतरवला. तेव्हापासून देशभरात कितीतरी विमासेवा पुरविणार्‍या कंपन्यांचा उदय होऊन त्यांचा व त्यांच्या उत्पादनांचाही विस्तार झाला. पंतप्रधान मोदींनी आपल्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी विमा योजना आणल्या. आज बहुतेक नागरिकांच्या आयुष्यात विमा ही आवश्यक गोष्ट झाल्याचे चित्र सर्वत्रच दिसते. पण आताचे प्रकरण जरा निराळे आहे.

 

कोणाचाही जन्म झाला की, विशिष्ट वयानंतर जन्मलेल्या मुला-मुलींना सगळेच पालक शाळेत दाखल करतात. आपल्या पाल्यांनी उत्तम शिक्षण घ्यावे, अभ्यासात प्रगती करावी आणि स्वतःचे भवितव्य घडवावे, असे प्रत्येकच पालकाला वाटत असते. ही स्थिती आदर्श वाटत असली तरी शालेय जीवन नेमके याच्या उलटही असते. आपण सगळेच बालपणी शाळेत गेलेलो असल्याने तिथली मौज-मजा-मस्ती आणि त्यातला आनंद अवर्णनीयच. मित्रमंडळी, ते खेळ आणि एकमेकांच्या खोड्या काढणे, शिक्षकांनी एक करायला सांगितले की, आपण दुसरेच काही करणे, लहरीपणा, असे सगळेच शाळेत प्रत्येकाने अनुभवले असेल. लहानपण देगा देवा, म्हणत आजही कित्येकजण आपल्या शालेय दिवसांच्या आठवणी ताज्या करताना दिसतात. हे सांगण्याचे कारण म्हणजे आता एका विमा कंपनीने नवीनच सेवा सुरू केली असून ती शालेय मुलांना-पालकांना नक्कीच आवडू शकते.

 

जीवन विमा, आरोग्य विमा, गृहविमा, वाहन विमा, अपघात विमा, कृषी विमा या सगळ्यानंतर आता शालेय मुलांच्या दंगामस्तीचाही विमा उतरविला जाणार आहे. आहे ना अनोखी आणि आतापर्यंत न ऐकलेली, न पाहिलेली खबर? जपानच्या ‘येल’ नावाच्या एका कंपनीने शालेय मुलांच्या खोड्यांचाही विमा उतरविणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनी या सेवेच्या माध्यमातून विमाधारकांच्या मुलांचीही काळजी घेणार आहे. या नवीन प्रकारच्या विमासेवेअंतर्गत ही कंपनी मुलांनी शाळेत केलेल्या तोडफोडीची नुकसानभरपाई देणार आहे. जर मुलांना शाळेत असताना एकमेकांशी भांडणतंटा करताना जखम झाली, इजा झाली, तर संबंधित मुलांवरील उपचाराचा खर्च ही कंपनी उचलणार आहे. केवळ इतकेच नव्हे, तर जर मुलांना शाळा अथवा एखाद्या दुसर्‍या मुलाच्या पालकांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे न्यायालयात जावे लागले, तर त्याचे शुल्कही कंपनीच देणार आहे. इथल्या पालकांना मात्र ही सेवा घेण्यासाठी किंवा आपल्या पाल्यांचा विमा उतरविण्यासाठी १६६५ रु. दर महिन्याला भरावे लागणार आहेत. म्हणजेच पोरासोरांनी आता शाळेत कितीही गोंधळ घातला तरी त्याची जबाबदारी ही कंपनीच घेईल! ‘येल’ नामक ही कंपनी अशाप्रकारे शालेय मुलांचा विमा उतरविणारी जगातली पहिलीच कंपनी आहे.

 

दुसरीकडे जपानच्या शिक्षण, संस्कृती, खेळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका संशोधनानुसार २०१७ मध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांत मुलांच्या बदमाशगिरीशी संबंधित ४ लाख, २ हजार प्रकरणे समोर आली, तर २०१७ मध्ये ही संख्या वाढून पाच लाखांवर पोहोचली, ज्यात अडीच लाख म्हणजे निम्मी प्रकरणे गंभीर होती. ही प्रकरणे अशी होती, ज्यात मुलांच्या खोड्यांनी-भांडणांनी हिंसक रूप घेतले होते. ही प्रकरणे न्यायालयांतही पोहोचली, तर ‘येल’ कंपनीचे म्हणणे आहे की, “आमच्याकडून ही विमासेवा घेतल्यानंतर पालकांना आपल्या मुलांची काळजी करण्याचे कोणतेही कारण राहणार नाही. कंपनीच्या वकील आणि विशेषज्ज्ञांकडून वेळोवेळी आई-वडील सल्ला घेऊ शकतील.”

 

दरम्यान, आपल्या अनोख्या विम्यामुळे ही कंपनी जपानभर चर्चेत आहे. कितीतरी मुलांचे आई-वडील या विम्यामुळे खुश आहेत, तर काहींनी याचा विरोधही केला आहे. विरोधकांच्या मते, ही सेवा देऊ करून कंपनी शाळेत जाणार्‍या मुलांच्या खोडकरपणाला, भांडणतंटा करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहे. ही विमासेवा घेतली की, आई-वडील आपल्या मुलांची देखभाल करणे सोडून देतील, ज्याचा वाईट परिणाम मुलांवर पडेल, असेही विरोधकांचे म्हणणे आहे.

 

आता ही सेवा योग्य की अयोग्य, मुलांच्या, शाळेच्या, समाजाच्या दृष्टीने कितपत उपयुक्त की उपद्रवी याची चर्चाही आपण केलेली बरी. कारण, जागतिकीकरणामुळे हा प्रकारही भारतात यायला वेळ लागणार नाहीच! कदाचित आगामी काही वर्षांतच इथल्या कंपन्याही अशाप्रकारे विमा उतरविताना दिसतील. बच्चेकंपनी मात्र या सेवेमुळे खुश असण्याची शक्यताच अधिक. कारण, यामुळे त्यांच्या दंगामस्ती, खोडकरपणात खंड पडणार नाही, ते त्यांचे मजेदार आयुष्य जसेच्या तसे जगू शकतील. फक्त यामुळे मुलांमधील हिंसक प्रवृत्ती वाढू नये, इतकंच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@