अंदमानचा तह !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |

 


हिंद सुंदरा ती, वसुंधरा।

धन्य-प्रसवा ती॥

 

ही पुण्यभूमी ऋषी-वीरांची, ज्ञान-विज्ञान, कला-साहित्याची! अपुले ज्ञान, संस्कृती, स्वातंत्र्य अबाधित राखणार्‍या निरंतर संघर्षाची! लुटण्यासाठी आलेल्या अपरांना जिंकून आपल्यात सामावून घेत, आपले हिंदुत्व जपणार्‍यांची! कृष्णमयी, प्रतापी, शिवमयी, वीरभूमी इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात अनेकानेक विभूतींना जन्म देणारी चेतनामयी ही हिंद सुंदरा!

 

अशा या मातृभूमीच्या चरणी आपली स्फूर्तिप्रद तेजस्वी लेखणी, आपली ओजस्वी वाणी अर्पिलेले एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! प्रज्ञावान तेजस्विता म्हणजे सावरकर! विविध भाषानिपुण साहित्य-प्रतिभा म्हणजे सावरकर! दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ मनोधैर्य म्हणजे सावरकर! प्रखर पुरोगामीत्व म्हणजे सावरकर! असीम देशभक्ती आणि राष्ट्रवाद म्हणजे सावरकर! हिंदुत्व, समता आणि विश्वबंधुता म्हणजे सावरकर! कविता लिहित्या सुकोमल हातांवर क्रांतिकार्याचा जळता निखारा घेऊन अखंड व्रतस्थ योगी म्हणजे सावरकर!

 

वीर सावरकरांचे समग्र कार्य, त्यांचे गहन विचार जाणून न घेता त्यांना माफिवीरम्हणणे, त्यांच्या अतुलनीय, अविरत कष्टांविषयी संदिग्धता निर्माण व्हावी म्हणून सतत विक्षोभक वक्तव्य करणे, हा खरंतर त्यांचा नाही, तर या भारताच्या प्राचीन चेतनेचा अपमान आहे. हा त्या सार्‍या कर्मवीरांचा अपमान आहे, ज्यांनी स्वदेशसेवा करता यावी म्हणून शत्रूपुढे आपल्या सुटकेसाठी युक्तिवाद साधला.

 

आपल्या या मातृभूमीत, धर्मसंस्थापनार्थाय रणछोरम्हणवून घेणारे चक्रधर पुढे पार्थसारथीहोतात; हिंदवी स्वराज्यस्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज बलाढ्य शत्रूस ललकारतात, तर कधी त्याच हिंदुपदपादशाहीच्या महत-ध्येयासाठी आपली शक्ती, सैन्यबळ, खजिना लक्षात घेत संधी करून क्षय टाळतात, अफझलच्या मिठीत धोक्याची चाहूल लागताच, त्या खानानं आपली गर्दन मारायच्या आत त्याचाच कोथळा काढतात, आग्र्याच्या नजरकैदेतून नेमकी वेळ साधून पसार होतात व त्याच बलाढ्य सैतानाच्या छाताडावर पुन्हा उभे राहतात. केवळ भूमातेची अथक सेवा करता यावी म्हणून मृत्यूला गुंगारा देण्याकरिता एखादा क्रांतिकारक जुलमी इंग्रज राजवटीकडे दयेची याचना करतो, तेव्हा मातृभूच्या चरणी आयुष्य वेचणार्‍या या वीरांच्या मुत्सद्देगिरीस माफिवीरसंबोधून हेटाळणी करणार्‍यांस काय म्हणावे?

 

तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरणभारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किलोमीटर दूर समुद्रात एका बेटावर आपल्या आयुष्यातली अमूल्य ५० वर्षे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेविण व्यय जाणार, या विचारानेच व्याकूळ सावरकरांनी अंदमानात पोहोचायच्या आधीच दुहेरी जन्मठेपेची शिक्षा कमी करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले; जेणेकरून शत्रूच्या बंदिवासात झुरण्यापेक्षा शत्रूची माफी मागून नाहीतर शत्रूशी तह करून मायभूमीची निरंतर सेवा करता यावी! स्वदेशस्वातंत्र्यार्थ क्रांतिलढ्यात प्रत्यक्ष भाग घेता आला नाही तरीही देशभर स्वातंत्र्य-मशाल पेटती ठेवता यावी, म्हणून अशी राजनैतिक कूटनीतित्या युगद्रष्ट्याने आधीपासूनच अवलंबिली होती.

 

इंग्रज राजवट वीर सावरकरनावाच्या या झंझावाती वादळाला अंदमानातल्या कोठडीत कोंडू पाहत होती. भारतीय राजकारणाच्या मुख्य धारेपासून अलग, बारमाही दमट, रोगट वातावरणात ५० वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगत हा तारा लवकरच आपसूक विझेल याची खातरजमा वेळोवेळी करत होते. वर्षानुवर्षे आप्तजनांची भेट नाही, पत्रसंवादाचा पाऊस नाही, घरून धाडलेल्या आवडीच्या फराळाची चवही चाखू दिली नाही, त्यांच्या वाट्यास आले ते फक्त अवजड कोलू, सहा महिने भयाण एकांतवास, १५ -१५ दिवस हातपाय जखडून ठेवणारी दंडा-बेडी, शरीराला १२ तास भिंतीशी टांगणारी खडा-बेडी, उपासमार, आजारी गलितगात्र शरीराला कच्ची पोळी अथवा पाणी-भात देऊन रोज मारणारी ही जन्मठेप! जुलमी राजवटीच्या या जीवघेण्या अत्याचाराने आपले मनोबल तर सावरकरांनी खचू दिले नाहीच, उलट त्या अंधारकोठडीत आपल्या अभिव्यक्तीला बहरत वाग्देवीची उपासनाही त्यांनी केली. हातात कागद-लेखणी नसताना बंदीखान्याच्या भिंतींत एका लोखंडी खिळ्याच्या साहाय्याने प्राण फुंकत कमलाहे पाच हजार पंक्तींचे महाकाव्य त्यांनी रचले, मुखोद्गत केले. याचा काव्यपरिचय लिहिताना सावरकर म्हणतात, “नृशंसक गुहांच्या अंधुक उजेडात एखाद्या संगत काव्याची माळ पूजेसाठी गुंफावी म्हणून एकत्र केलेली ही रानफुले व पाने...शरीराच्या आणि मनाच्या या अग्निपरीक्षेत स्फुरलेल्या या काव्यात दुःखाचा लवलेशही नव्हता आणि तरीही जर कोणी आरोप करत असेल की, मनोधैर्य खचले म्हणून सावरकरांनी शरणागती पत्करली, तर त्यास काय म्हणावे?

 

कारागृहात राहून जी करता येत आहे, त्याहून अधिक प्रमाणात, मातृभूमीची प्रत्यक्ष सेवा करता येणे हे समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,’ अशी सावरकरांची धारणा होती. मात्र, त्या दृष्टीने केलेले प्रयत्न फोल ठरत होते! इंग्रज सरकार या बुद्धितेजास पार ओळखून होते!! १९१४ साली पहिल्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले गेले आणि सावरकरांनी बलाढ्य शत्रूला नीतीने मारण्याच्या प्रयत्नाने पुन्हा जोर धरला. पण, स्वतःची सुटका होणार नसली तरीही देशभर आणि देशाबाहेर तुरुंगात अडकून पडलेल्या तमाम राजबंदीवानांना मुक्त करावे, हिंदुस्थानाला Colonial Self Governmentम्हणून मान्यता, स्वायत्तता द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधींचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात देशातील क्रांतिकारक इंग्रज फौजात युद्धशास्त्राचे धडे घेऊन इंग्लंडला महायुद्धात साहाय्य देतील, अशी मुत्सद्दी भूमिका या चाणाक्ष वीराने मांडली. एवढेच नव्हे, तर धाकट्या नारायणरावांस पत्र धाडून देशात ठिकठिकाणी परिषदा बोलावून ब्रिटिशांवर राजबंदीवानांच्या सुटकेसाठी दबाव आणण्यात आला, देशभर स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली.

 

क्रांतिकारकांना शत्रूच्या गोटात विनासायास शिरून सैनिकीशास्त्राचे धडे मिळतील, देशविदेशातले असंख्य राजबंदीवान मुक्त होतील आणि हे सारे कर्मयोगी पुन्हा देशसेवेस कार्यरत होतील, या एकमेव उद्दात हेतूने सावरकरांनी आपल्या सुटकेवर पाणी सोडले. सावरकरांच्या या वाटाघाटीवर प्रतिवृत्त लिहिताना ब्रिटिश अधिकारी सर रेजिनाल्ड क्रॅडॉक म्हणतात, “सावरकर हे असे महत्त्वाचे पुढारी आहेत की, हिंदी अराजकवाद्यांचा युरोपीयन विभाग त्यांच्या सुटकेसाठी कट करील... त्यांना अंदमानातही तुरूंगाच्या बाहेर जाऊ दिले तर ते निसटून जातील, त्यांचे मित्र याच बेटावर दबा धरून बसण्यासाठी एखादी नौका सहज भाड्याने मिळवू शकतील आणि स्थानिक लोकांमध्ये थोडेसे पैसे वाटले की, बाकीचे कार्य पार पडेल.

 

सावरकरांचा हा दरारा लक्षात न घेता त्यांच्या नीतीचा, त्यांच्या स्वार्थत्यागाचा जर कोणी शरणागतीम्हणून उपहास करीत असेल तर त्यास काय म्हणावे?

 

सावरकरांचे जे पत्र क्षमापत्रम्हणून दाखवले जात, ते पत्र खुद्द सावरकरांच्याच अंदमानच्या अंधेरीतूनया पुस्तकात प्रकाशित झाले आहे. त्यातील महत्त्वाचा मायना हा असा- त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देतं किंवा चौकशीचे जे नाटक करीत, त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे. या प्रशस्तिपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण, त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जीवंत सोलीत, त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जीवंत जाळीत! आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल, तर त्यांनीही आश्वस्त असावे की, परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली, तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल!

 

या परखड शब्दांस, या आवेगास कोणी क्षमापत्र,’ ’माफीनामाम्हणत असेल तर त्यांस काय म्हणावे?

 

अंदमानात अखेरीस सावरकरांना तुरूंगाच्या आवारात फिरण्याची मुभा मिळाली; लेखन साहित्य देण्यात आले. अलीकडेच अंदमानात त्यांच्या १९२१ साली केलेल्या उर्दू व हिंदी काव्यरचनेचे हस्तलिखित सापडले. अंदमानचे फाटके आभाळ, भयाण समुद्री वारा आणि तुरूंगाधिकार्‍याचे अत्याचार ११ वर्षे भोगूनही त्यांच्या विचारांचे खच्चीकरण करू शकले नाहीत, ते सह्याद्रीइतकेच दृढ राहिले. स्वदेशसेवेत आलेल्या मृत्यूत त्यांना अमरत्वाची शांती तेव्हाही जाणवत होती आणि ते म्हणतात-

तेरी सेवामें ऐ भारत अगर

सर जाये तो जाये

तो मैं समझू कि हैं मरना

हयाते-जाविदाँ मेरा

 

अखेर ’Indian Jails Committee १९१९ -२०' च्या अहवालानुसार अंदमानचा सेल्युलर जेल बंद करण्याची शिफारस करण्यात आली आणि अंदमानातल्या ११ वर्षांच्या करावासानंतर सावरकरांना कलकत्ता, मुंबई, रत्नागिरी व येरवडा कारागृहात स्थलांतरीत करत नंतर राजकारणात भाग घेणार नाही आणि रत्नागिरी बाहेर जाणार नाही, या अटीवर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आले.

 

अंदमानातून भारतातल्या इतर कारागृहात झालेल्या स्थलांतरास जर कोणी अंदमानातून सुटकासमजत असेल तर त्यास काय म्हणावे?

 

सावरकरांची नि:स्वार्थ, चाणाक्ष बुद्धी, ध्येयासक्ती, कूटनीति, प्रगाढ देशप्रेम समजणे मूढमतीचे काम नव्हे हेच खरे!

अखेरीस त्यांच्याच शब्दांतले एकच मागणे

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जीवां, लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुजला

- प्रिया सामंत

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@