पवारांनी संपून कसे चालेल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2019
Total Views |


 


संकटे आली की हार मानायची नाही, तर लगेच पलटी मारायची हा पवारांचाच स्वभाव आहे. तसेच पवारांचे ‘अजून मी संपलो नाही’ हे वाक्यही खरेच. कारण, महाराष्ट्रातला जातीयवाद टिकवायचा असेल तर, पवारांनी संपून कसे चालेल? आणि सरतेशेवटी बारामतीत सुप्रियाताईंना पडतानाही पवारांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे, मग पवार संपलेले कसे चालेल?

 

भाजप व रालोआतील घटक पक्षांच्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजप संसदीय पक्षाच्या आणि रालोआच्या नेतेपदी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली. तद्नंतर भाषणाला उठल्या उठल्या मोदींनी भारतीय संविधानासमोर नतमस्तक होत अभिवादन केले आणि अवघे सभागृहच नव्हे, तर वृत्तवाहिन्यांचे दर्शकही भारावून गेले. २०१४ सालच्या अभूतपूर्व यशानंतर संसद भवनाच्या पायरीवर डोके टेकवणारे मोदी आताच्या विक्रमी आणि विराट विजयानंतरही तितकेच नम्र व संविधानाप्रति अक्षुण्ण निष्ठा बाळगून असल्याचे यातून स्पष्ट झाले. परिणामी, गेली पाच वर्षे सातत्याने भाजप सरकार लोकशाहीविरोधी, घटनाद्रोही असल्याच्या आणि संविधान बदलाच्या वावड्या उडवणाऱ्या पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, बुद्धीजीवी, विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि पुरस्कारवापसीवाल्यांना सणसणीत चपराक बसली. परंतु, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच्याच भूमिकेत जगणाऱ्यांच्या डोक्यात या प्रसंगातून काही प्रकाश पडला असेल, अशी अपेक्षा करणेच व्यर्थ! मोदींच्या या कृतीनंतरही ही मंडळी कसल्याशा फुटकळ कारणावरून आगामी पाच वर्षांतही आपले उपद्रवमूल्य दाखवून देतीलच, अर्थात त्यांना मूठभर मोदी, भाजप, संघद्वेष्टे वगळता कोण विचारतो म्हणा? मोदींनी आपल्या भाषणातून शनिवारी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले, तसेच घटक पक्षांची आघाडी अभेद्य असल्याचेही सांगितले. गेली ५० वर्षे देशातल्या गरीबांना गरीबच ठेवणाऱ्या प्रवृत्तीला छेद देऊन, व्हीआयपी संस्कृतीचा त्याग करून आणि अल्संख्याकांनाही सोबत घेऊन आपले काम जनसेवा करण्याचेच आहे, हे मोदींनी पटवून दिले. मोदींचे हे वक्तव्य सत्ता आपल्या हाती आली की, मुजोरपणा करणाऱ्या, स्वतःला आपापल्या मतदारसंघाचे वा देशाचे मालक समजणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. कारण, देशाने ७० वर्षांच्या लोकशाही प्रवासात सत्तेवर येण्याआधी मतदारांसमोर हात जोडणारी आणि सत्ता आली की, त्याच मतदाराला लाथा घालणारी कित्येक माणसे पाहिली. केवळ स्वतःचा स्वार्थ पाहून, जितका अधिक भ्रष्टाचार करता येईल, तितका करून जनतेला जास्तीत जास्त लुबाडण्याचा उद्योग करणाऱ्यांहून आपण निराळे आहोत आणि तुमचीही वर्तणूक तशीच असावी, असा मोदींच्या विधानांतील अर्थ होता.

 

सोबतच माध्यमे, तिथला झगझगाट पाहिला की, अनेकजण भान विसरून बोलू लागतात, अशावेळी विवेकाने वागण्याचा सल्लाही मोदींनी दिला. गुजरात दंगलीवरून गेली १८-१९ वर्षे मोदींच्या विरोधात राळ उडविण्याचा उद्योग देशातल्या प्रमुख माध्यमांनी चांगलाच केला. मोदींचे एखादे विधान, एखादी कृती, एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कसा घातक आहे, हे आपल्या दर्शकांना सांगण्याचा आटापिटा या लोकांनी केल्याचे सर्वांनीच पाहिले. मोदींनी आपल्या नव्या सहकाऱ्यांना दिलेला सल्ला या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठरतो. शनिवारी भाजप व रालोआची बैठक सुरू असतानाच काँग्रेसचीही ‘चिंतन’ की ‘चिंता’ बैठक झाली. २०१४ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीतही सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीसमोर पक्षाच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. परंतु, अपेक्षेप्रमाणे तो फेटाळला गेला. जसे जवाहरलाल नेहरूंनी भारतरत्न पुरस्कारासाठी जवाहरलाल नेहरूंचे नाव सुचवले व जवाहरलाल नेहरूंनी जवाहरलाल नेहरूंना भारतरत्न पुरस्कार दिला, असे विनोदाने (सत्यही असेल!) म्हटले जाते, तसेच हे झाले. काँग्रेसमध्ये ‘सबकुछ गांधी परिवार’ असताना कार्यकारिणी तरी त्यापासून कशी अलिप्त असेल? म्हणजेच राहुल गांधींनी राहुल गांधींच्या व पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींकडे राजीनामा सुपूर्द केला व काँग्रेस पक्षाचे तारणहार केवळ गांधी घराणेच असल्याने राहुल गांधींनी पक्षहितासाठी राहुल गांधींचा राजीनामा फेटाळून लावला, असेच या घटनेचे वर्णन करावे लागेल. कार्यकारिणी वगैरे तर निव्वळ फार्सच. तिथे मनमोहन सिंग वा अन्य कोणी ज्येष्ठ नेता काय बोलला याला महत्त्व नाही, तिथे महत्त्व फक्त गांधी परिवार शरणतेला! कार्यकारिणीतील सदस्य आणि अन्य नेत्यांचा जन्म केवळ गांधी परिवाराचे आदेश शिरसावंद्य मानण्यासाठीच झालेला असतो, त्यामुळे त्यांनीही तोळामासा झालेल्या काँग्रेसचे धूड स्वतःच्या खांद्यावर घेण्याऐवजी राहुल गांधींच्याच माथी मारण्याची कृती केली. गाळात अडकलेल्या काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी राहुल गांधींचीच कशी आवश्यकता आहे, हेही सांगितले आणि राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिले. पण, यातून ना काँग्रेसची अवस्था सुधारणार ना राहुल गांधींची देशव्यापी प्रतिमा तयार होणार! कारण, देशाला गांधीपरिवाराच्या नावावर भुलवण्याचे, फिरवण्याचे चाळे आता चालणारे नाहीत. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी प्रचारकाळात काँग्रेसच्या घराणेशाहीवर कडाडून टीका केली होती. गांधी परिवारातील व्यक्तीशिवाय अन्य कोणी का काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी विचारला होता. परंतु, त्यावर काही कार्यवाही करण्याऐवजी काँग्रेसने पुन्हा एकदा पक्षाची कमान गांधी परिवाराकडेच सोपवली. म्हणूनच कोणी कितीही टीका केली तरी काँग्रेस पक्ष गांधी परिवाराचा गुलाम झाल्याची व तो त्यातून बाहेर पडू इच्छित नसल्याची खात्रीच या घटनाक्रमातून पटते. दरम्यान, राहुल गांधींनी पक्षनेत्यांनी आपापल्या पोरासोरांना निवडणुकीत उभे केल्यानेच फटका बसल्याचेही म्हटले. एकाच घरात सत्तापदे जाणार असतील तर अशा नेत्यांच्या मागे जाण्यात तथ्य नाही, हे लोकांना चांगलेच कळते. राहुल गांधी आज असे बोलताना दिसत असले तरी त्यातून काही ठोस निष्पन्न होण्याची शक्यता नाही. उलट हा प्रकार ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो,’ असल्याचेही लवकरच स्पष्ट होईल.

 

काँग्रेसची ही तर्हा तर सोनियांच्या विदेशीपणावरून पक्षाबाहेर पडत देशी काँग्रेस काढणाऱ्या शरद पवारांची निराळीच कथा. “थकलो आहे जरी अजून मी झुकलो नाही, जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही, अरे संकटांनो, अजून दम लावा, कारण कमी पडलो असलो तरी अजून मी संपलो नाही,” अशा शब्दांत शरद पवारांनी पक्षाच्या पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. वस्तुतः पवारांसारख्या अनुभवी आणि कुशल नेतृत्वाची कारकिर्दीच्या संधिकाळी इतकी वाईट अवस्था होणे शोकांतिकेसारखेच. पण, ही शोकांतिका खुद्द पवारांनीच घडवून आणलेली, त्याला अन्यांपेक्षा ते स्वतःच जबाबदार! आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात एक बारामती वगळता पवारांनी इतरत्रच्या जनतेकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ साखरसम्राट, शिक्षणसम्राटांच्या गढ्या सांभाळायच्या, जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने, कुरापती करायच्या आणि त्यावर राजशकट हाकायचा, हा पवारांचा खाक्या होता व आहे. मात्र, जनता आता या सगळ्यापासून कित्येक मैल दूर विकासाच्या पथावर गेली आहे, हे पवारांना कधी कळलेच नाही. आपल्या लावालावीच्या खेळ्या आताच्या काळात उपयोगाच्या नाहीत, हेही त्यांना समजले नाही. ते आपल्या जुन्याच उद्योगांच्या आधाराने सत्तापदांवर पोहोचण्याची स्वप्ने पाहत राहिले आणि राज्याच्या सत्ताकारणातून बेदखल झाले. मात्र, शरद पवारांचे असे राजकीयदृष्ट्या निष्प्रभ झाल्याचे दिवस पाहून समाधान वाटणाऱ्यांची संख्याही राज्यात अजिबात कमी नाही. लोकांना असे का वाटत असावे, याचेही कधी पवारांनी आत्मपरीक्षण करायला हवे. शिवाय वरच्या ओळींतील काही वाक्ये नक्कीच खरी आहेत. कारण संकटे आली की हार मानायची नाही, तर लगेच पलटी मारायची हा पवारांचाच स्वभाव आहे. तसेच पवारांचे अजून मी संपलो नाही, हे वाक्यही खरेच. कारण महाराष्ट्रातला जातीयवाद टिकवायचा असेल तर, पवारांनी संपून कसे चालेल? आणि सरतेशेवटी बारामतीत सुप्रियाताईंना पडतानाही पवारांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे, मग पवार संपलेले कसे चालेल?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@