बंगालात भगव्याचा पुन्हा उदय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019
Total Views |



आधी 35 वर्षांच्या सत्तेत डाव्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांनी भरून ठेवलेले प्रशासन आता ममतांचे मिंधे असल्याचे दाखवत स्वत:चा हिंदुत्वविरोधी अजेंडा राबवितानाही याच निवडणुकात प्रकर्षाने दिसले. अत्यंत उच्च पदांवरचे अनेक अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यात उतरून भाजपविरोधी कारवाया करताना आणि ममतांच्या प्रचारात भाग घेताना दिसले.

नुकत्याच पार पडलेल्या सतराव्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल बरेचसे अपेक्षेनुसारच लागले. मात्र, समाजाचा काडीचा संबंध उरला नसलेल्या डाव्या पत्रकार जमातीने शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसल्याने त्यांना जनमताचा कल कळला नाही, म्हणून त्यांच्यादृष्टीने मात्र हे निकाल धक्कादायक ठरले. श्रीरामजन्मभूमीसाठी प्रथम बलिदान देणाऱ्या कोठारी बंधूंचा हा प्रांत आहे, हे माध्यमे सोईस्करपणे विसरतातया निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारेल, असे मानले जात होतेच, तरीही भाजपला अपेक्षित 24-25 जागा न मिळता केवळ 18 जागाच मिळाल्या. आजवर डाव्यांच्या आणि नंतर ममतांच्या दहशतीखाली असल्याने या बुद्धीमान प्रांतात मात्र भाजपसारख्या वैचारिक अधिष्ठानाच्या शुद्ध राष्ट्रवादी पक्षालाही गेली पाच दशके पाय रोवणे कठीण झाले होते. या निवडणुकांत भाजपला पश्चिम बंगालमध्ये मिळालेले यश म्हणूनच ‘ऐतिहासिक’ म्हणून नोंदले जाईल. भाजपने तब्बल 40.25 टक्के मते मिळवत 18 जागा मिळवल्या, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूलने उघडउघड मतदान केंद्रे ताब्यात घेऊनही 43.28 टक्के मते आणि 22 जागाच मिळविल्या. 2014 मध्ये भाजपला फक्त 17 टक्के मते आणि केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत जबरदस्त वाढ झालेली आहे. तृणमूल आणि भाजपमध्ये जागा आणि टक्केवारीचे अंतर फार कमी आहे. कोलकातासारख्या शहरात भाजपला सहापैकी केवळ दोनच जागा जिंकता आल्या. हरलेल्या सर्व ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

 

पश्चिम बंगाल या एकेकाळी डाव्यांचा गड असलेल्या राज्यात आज डाव्यांची वाताहत झालेली दिसते. कोलकाता शहर भाग सोडला तर राज्यात इतरत्र कम्युनिस्टांना केवळ एक ते चार टक्केच मते पडली आहेत. कोलकाताच्या शहरी भागात आणि दार्जिलिंगमध्ये मात्र आजही कम्युनिस्टांना आठ ते 13 टक्के मते मिळाली. डाव्यांची विचारसरणी ज्यांना माहीत आहे, त्यांना ही चिंतेची बाब का आहे ते कळेल. दहशतीच्या जोरावर तब्बल 35 वर्षे पश्चिम बंगालवर राज्य करणाऱ्या डाव्यांना संपवणे सोपे नव्हते, ते काम ममता बॅनर्जी यांनी अतिशय हिकमतीने केले. मात्र, डाव्यांच्या दहशतीला जशास तसे उत्तर देताना स्वत: सत्तेवर आल्यावर कुठे थांबायचे ते मात्र ममतांना कळले नाही, आणि डाव्यांच्या वैचारिक प्रभावाखाली जाणे त्यांनी पसंत केले. मुस्लीम लांगूलचालन करत बांगलादेशी घुसखोरांची पाठराखण केली. त्यांचा आक्रस्ताळेपणा दिवसेंदिवस वाढत गेला. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरीविरुद्ध वातावरण असताना ममतांनी मात्र डाव्यांनीही कधी जे केले नाही ते केले. त्यांनी वंगभूमीची ओळख असलेल्या अष्टमीच्या दुर्गापूजेवरच बंदी आणली. ममतांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये हिंदूद्वेषाची प्रशासनिक पराकाष्ठा होताना दिसली. अनेक हिंदू वस्त्या/ गावांवर बांगलादेशी मुसलमानांकडून जीवघेणे हल्ले होतात. त्या भागात हिंदूंना संरक्षण देण्यात ममता कमी पडल्या. संघपरिवाराच्या कार्यकर्त्यांवर डाव्यांच्या काळात होत असत तसेच हल्ले ममतांच्या गुंडांनी सुरू केले. मात्र, आता समाज दबून राहणार नाही, हे ममतांनी लक्षात घेतले नाही. उलट बांगलादेशातील सिनेकलाकार स्वत:च्या प्रचारात उतरवून ममतांनी ध्रुवीकरणास हातभारच लावला.

 

ममतांचा हा आक्रस्ताळेपणा नंतर इतका वाढला की ‘फनी’ वादळाबद्दल इशारा देण्यासाठी आणि मदतीच्या नियोजनासाठी पंतप्रधान म्हणून मोदींनी केलेले फोनही त्यांनी घेतले नाहीत. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या इतर केंद्रीय नेत्यांची हेलिकॉप्टर उतरविण्यास वेळोवेळी परवानगी नाकारून ममतांनी प्रचारात खोडा घालण्याचाही प्रयत्न केला. मोदींच्या एका सभेत स्वत:चे कार्यकर्ते घुसवून बॉम्बच्या अफवेने चेंगराचेंगरी घडविण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यातील रोड-शोवर तर प्रत्यक्ष पेट्रोलबॉम्ब आणि दगडफेक करत हल्ला झाला. आपण केवळ सीआरपीएफच्या जवानांमुळे वाचलो, असे अमित शाह यांनी पत्रकारांना सांगितले. देशाच्या सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांवर हल्ला होत असताना या देशातील स्वतंत्र म्हणून मिरवणारी डावी माध्यमे मात्र शांत होती, हेही सत्य या देशाने या निवडणुकांत ममतांच्या कृपेने पाहिले.

 

आधी 35 वर्षांच्या सत्तेत डाव्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांनी भरून ठेवलेले प्रशासन आता ममतांचे मिंधे असल्याचे दाखवत स्वत:चा हिंदुत्वविरोधी अजेंडा राबवितानाही याच निवडणुकात प्रकर्षाने दिसले. अत्यंत उच्च पदांवरचे अनेक अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यात उतरून भाजपविरोधी कारवाया करताना आणि ममतांच्या प्रचारात भाग घेताना दिसले. अखेर हे प्रकार अति झाले तेव्हा निवडणूक आयोगाने गृह सचिवांसह अन्य एका सचिवाला निलंबित केले. मुख्य सचिवांना वारंवार निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या. तरीही प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा हिंसाचार झालाच. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झालेच, अनेक ठिकाणी गावेच्या गावे मुस्लीम गुंडांनी उद्ध्वस्त केली. तरीही पश्चिम वंगचे प्रशासन शांत बसले. मतदान केंद्रे ताब्यात घेणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर प्रशासनाकडून आजतागायत काही कारवाई झालेली नाही. ममतांना मिळालेल्या 43 टक्के मतांचे हे उघड रहस्य आहे.

 

मात्र, ममतांच्या या दहशतीपुढे यावेळी मोदी-शाह यांचा भाजप पाय रोवून, न घाबरता उभा राहिला. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मदतीला अन्य राज्यांतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि मंत्री प्रचार यंत्रणेत उतरविण्यात आले. तृणमूलच्या अत्यंत आक्रस्ताळ्या आणि दहशतगर्द प्रचाराला भाजपकडून संयत पण अत्यंत ठाम उत्तर दिले गेले. भाजपने ज्या 18 जागा जिंकल्या, त्यातील 10 मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. त्याबद्दल तृणमूलचे राज्य सचिव आणि आसनसोल, पुरुलिया, बणकुरा आणि मालदा या मुस्लीमबहुल मतदारसंघांचे निवडणूक प्रभारी कर्नल दिप्तांशू चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले की, “मतदारांमध्ये ममतांची मुस्लीमधार्जिणी प्रतिमा इतकी भिनली की, या मुस्लीमबहुल मतदारसंघात हिंदूंचे एकही मत तृणमूलला मिळालेले नाही, हिंदूंनी एकगट्ठा भाजपला मतदान केले. ही निवडणूक तृणमूलसाठी एक धडा आहे,” असेही कर्नल दिप्तांशू यांनी म्हटले आहे.

 

भाजपच्या या जबरदस्त प्रचार यंत्रणेची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष, प्रांत प्रभारी केंद्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अरविंद मेनन, केंद्रीय सह महासचिव (संघटन) शिवप्रकाश, खा. मुकुल रॉय, सुनील देवधर आणि खा. हेमंत विश्व सर्मा अशा दिग्गजांच्या टीमवर होती. त्यांनी 2014 पासूनच प. बंगाल प्रांत ढवळून काढायला सुरुवात केली होती. प्रत्यक्ष हल्ला होऊनही अमित शाह यांच्यासह राज्यातले अनेक कार्यकर्ते पाय रोवून उभे राहिले. येणाऱ्या काळात या देशाचे बौद्धिक आणि राजकीय नेतृत्व रामकृष्ण, विवेकानंद, टागोर, नेताजी यांची ही भूमी पुन्हा एकदा करेल, असे मानायला हरकत नाही. लाल-बाल-पाल यांनी इंग्रजांना सळ की पळो केले. त्यातला आता फक्त पंजाबच राजकीयदृष्ट्या मागे राहिला आहे. महाराष्ट्र आणि वंगभूमी या देशाच्या पूर्व आणि पश्चिम बाजू भगव्या झाल्या आहेत. मतांच्या टक्केवारीनुसार डाव्यांचा वंगभूमीतूनही पूर्ण अस्त झाला असला, तरीही प्रशासनातले डावे हे आव्हान अजून बाकी आहे, हे प. बंगालमधल्या घटनांनी दिसून आले.

 
- राजेश प्रभू साळगावकर 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@