मानवता हाच सावरकरांचा समाजसुधारणेमागील उद्देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019   
Total Views |



 


सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक २८ मे, २०१९ मृत्युंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील संक्षिप्त भाग देत आहोत.

 

हिंदुराष्ट्रासाठी सावरकरांचा समाजसुधारणेचा अट्टहास होता. म्हणजे समाजसुधारणेमागील त्यांचा हेतू मानवता नव्हता. हिंदुत्व, हिंदुराष्ट्र आणि हिंदू संघटन हे ध्येय साध्य करण्यासाठी एक अपरिहार्य साधन म्हणून सावरकरांनी समाजसुधारणेचा उपक्रम हाती घेतला, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. ‘हिंदुत्व’ मांडायच्या आधी म्हणजे लहानपणापासून सावरकरांनी कधीही जातीभेद, अस्पृश्यता पाळली नाही. लहानपणी गावातले राणूशेट शिंपी यांची मुलं परशुराम व राजाराम, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी हे सावरकरांचे स्नेही. त्यांच्या घरी जाऊन ताजी भाकर व लसणाचे तिखट खाण्यात सावरकरांना कसलाही संकोच वाटत नसे. पुढे रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना सहभोजनाच्या केलेल्या महान कार्याची सुरुवात त्यांनी बालपणीच केली होती. त्यामागे रत्नागिरीला आल्यावर राजकारणात भाग घेता येणार नाही म्हणून हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, हिंदू संघटनेच्या दृष्टिकोनातून सावरकरांनी अस्पृश्यता निवारण केलेले नसून त्यामागील बालपणापासून मनात असलेला समतेचा व मानवतेचा भाव हीच प्रेरणा होती.

 

आधी स्वराज्य की, समाजसुधारणा यावर सावरकर म्हणतात, “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही.” “मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका,“ असे सांगणाऱ्या सावरकरांना आपल्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा समाजसुधारणेचे कार्य किती महत्त्वाचे वाटत होते, याची प्रचिती येते. ब्रिटिशांची परदेशी शृंखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या सात स्वदेशी शृंखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात. आपले सामाजिक विचार मांडण्यासाठी सावरकरांनी ‘संगीत उ:शाप’ हे नाटक, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘क्ष’ किरणे, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ यासारखे ग्रंथ तसेच कविता, कथा असे विविध वाङ्मयीन प्रकार हाताळले. सावरकर एक कृतिशील विचारवंत होते.त्यामुळे सावरकर नुसते विचार मांडून थांबले नाहीत. सहभोजन, मंदिरप्रवेश, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या मुलांना शाळेतून एकत्र बसवणे, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांसह घरोघरी दसरा व संक्रांतीला अनुक्रमे सोने व तिळगूळ वाटप, बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेला पूर्वास्पृश्यांचा बँड, १९२९ पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवातील भंगीबुवांचे कीर्तन, हरिजन भजन मंडळ, महिलांची प्रकट भाषणे असे अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी यशस्वी केले.

 

५० वर्षांची दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावल्यावरसुद्धा जे सावरकर भावनिक झाले नाहीत, तेच सावरकर १९३१ ला ‘मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवास मला पाहू द्याहे पूर्वास्पृश्यांसाठी मंदिरप्रवेशाचे गीत लिहिताना अत्यंत भावनिक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ब्रिटिश शासनाकडून मिळणारे तुटपुंजे वेतन व इतर चरितार्थाची साधने अल्प असतानाही सावरकरांनी एका पूर्वास्पृश्य मुलीला दत्तक घेतले होते. सन १९२९च्या डिसेंबर महिन्यात ज्या रत्नागिरी हिंदू सभेतर्फे सावरकर कार्य करीत होते, तिच्यापाशी केवळ सव्वा रुपया शिल्लक होता, यावरून आपल्या लक्षात येईल की किती आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांनी समाजकार्य केले होते. अंदमानात कष्टप्रद अशी ५० वर्षांची जन्मठेप भोगत असतानाही सावरकरांना जातीप्रथा व अस्पृश्यता याची चिंता होती. अंदमानातही सावरकरांनी अस्पृश्यतानिवारणाचे कार्य केले होते. सावरकरांनी हिंदू महासभावाद्यांसाठी सांगितलेल्या तात्कालिक कार्यक्रमात अस्पृश्यता दूर करणे, याला अग्रस्थान दिले होते. ‘केवळ जन्मावर आधारलेल्या अस्पृश्यतेच्या आधारावर कोणत्याही रीतीने आपले अस्पृश्य बांधव कोठेही पिडले जात असतील तर आपण त्यांचा पक्ष घेऊन विरोधास तोंड द्यावे नि तसे करण्यास त्यांनाही प्रवृत्त करावे आणि अवश्य तर न्यायालयापर्यंतही हा प्रश्न न्यावा.... मुसलमान नि इतर अहिंदू लोकांना आपण ‘हिंदू’ ज्या सामाजिक समानतेने वागवितो, तितकीच समानता कोणत्याही जातीच्या आपल्या हिंदू बांधवास न्यायानेच प्राप्त झाली पाहिजे. याच्या विपरीत वर्तन करणे म्हणजे वस्तुतः आपल्या सामान्य हिंदुत्वाचा अवमान करण्यासारखे आहे.’

 

अस्पृश्यता पाळणे म्हणजे हिंदुत्वाचा अवमान होय म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व-हिंदुराष्ट्र हे अस्पृश्यताविरोधी व पुरोगामी आहे. १९३९च्या कोलकाता, १९४१च्या भागलपूर व १९४२च्या कानपूरच्या हिंदू महासभा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी ‘अस्पृश्यता निर्मूलनाचा’ तात्कालिक कार्यक्रमात समावेश केला होता. सावरकरांचा समाजसुधारणेमागील हेतूसुद्धा मानवता हाच होता. १२ ऑगस्ट, १९४१ दरम्यान सावरकर आजारी होते. तरीही ठिकठिकाणांहून त्यांना भाषणासाठी निमंत्रणे येत होती. या भाषणाच्या निमंत्रणाला सावरकरांनी एक प्रकट उत्तर दि. १६ ऑगस्ट १९४१ ला दिले. त्यात त्यांनी लिहिले की, “भाषणाची सर्वच निमंत्रणे स्वीकारणे मला शक्य होणार नाही. दुसरे असे की, काहीतरी अल्पस्वल्प का होईना, परंतु विधायक कार्य घडत नसताही नुसती व्याख्यानेच देत राहण्याचा मला खरोखरीच वीट आला आहे. यासाठीच मुंबईतील जे गणेशोत्सव मंडळ हिंदू राष्ट्रीय निधीला किंवा सामान्यत: हिंदू संघटन कार्यास साहाय्य म्हणून निदान शंभर रुपये तरी देईल आणि माझे व्याख्यान हा सार्वजनिक कार्यक्रम असल्याने त्या व्याख्यानाच्या स्थानी सर्व हिंदूंना स्पृश्य-अस्पृश्य हा भेद न मानता प्रवेश मिळतो की नाही, हे अजमावण्यासाठी माझेसमवेत असणाऱ्या अस्पृश्य बांधवांनाही जेथे प्रवेश असेल, त्याच ठिकाणी काय ती मी भाषणे देईन.” सावरकरांच्या या अटी पाळूनही त्यांना पाच गणेशोत्सव मंडळांनी भाषणासाठी निमंत्रणे दिली. या पाच भाषणांतून हिंदू राष्ट्रीय निधीला १२०० रु. मिळाले. ही भाषणे साधारणतः पन्नास सहस्त्र लोकांनी तरी ऐकली. तसेच या पाच गणेशोत्सवाच्या चालकांनी भाषणाच्या स्थानी पूर्वस्पृशांना उघडपणे प्रवेश दिला. सावरकरांच्या या पूर्वस्पृशांना प्रवेश देण्याच्या अटीसंबंधी अनेक गणेशोत्सवांतून चर्चा झाली. या प्रश्नाला चालना मिळाली.

 

रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सुटून प्रकट राजकारणात पडल्यावर समाजसुधारणेच्या कार्याकडे सावरकरांनी विशेष लक्ष दिले नाही, असे म्हणणाऱ्यांनी वरील अटीची विशेष नोंद घ्यावी. धुळ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘दलित सेवक’चे संपादक वि. न. बरवे यांना १ जानेवारी, १९४७ ला लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, “जर क्वचित माझी प्रकृती सुधारून सार्वजनिक कार्यात पडण्याइतकी शक्ती आली, तर या अस्पृश्यतेच्या नि पोथिजात जातीभेदाच्या उच्चाटनाचे कार्यच निदान एक दोन वर्ष तरी करावे आणि त्या घातक रूढीवर आणखी एक अखिल भारतीय चढाई करावी, असे वारंवार मनात येते. इतके हे कार्य मला केवळ हिंदू संघटनार्थच नव्हे, तर मानवी संघटनार्थही निकडीचे वाटते.“ रत्नागिरी येथील साप्ताहिक ‘बलवंत’ला पाठविलेल्या एका पत्रात सावरकर म्हणतात, ”रत्नागिरीची बहुतेक प्रमुख देवालये पक्षनिरपेक्ष अखिल हिंदू समाजाने पूर्वास्पृश्यांसह सर्व हिंदूंना खुली केली, हे वाचून आनंद झाला. त्याविषयी रत्नागिरीच्या बांधवांना धन्यवाद! आता हे योग्य दिशेने पुढे पडलेले पाऊल कोणच्याही चोरवाटेने मागे घेण्यात येऊ नये. याविषयी मात्र निदान आणखी दहा वर्षे तरी आपण सर्वांनी जपले पाहिजे. रत्नागिरी नगराने हे पुण्य कृत्य जसे केले तसे ते सर्व राज्यभरही त्या त्या ठिकाणच्या हिंदूंनी केले पाहिजे. येत्या तीन-चार महिन्याचे आत रत्नागिरी जिल्ह्यातही सर्व मंदिरे अखिल हिंदूंना उघडी झाली पाहिजेत; अशी वार्ता येऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या एक महतकार्यी तरी रत्नागिरी जिल्ह्याने अग्रपूजेचा मान मिळवावा, अशी माझी उत्कट इच्छा आहे.” म्हणजे रत्नागिरीहून सुटल्यावर राजकारणाच्या धामधुमीत व भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाही सावरकरांच्या मनात मानवतेच्या दृष्टिकोनातून जातिभेदाचे समूळ उच्चाटन हाच विचार होता.

 

अस्पृश्यता नष्ट केली जात आहे. कोणत्याही प्रकारे ती आचरली जाता कामा नये. अस्पृश्यताजन्य अशी कोणचीही हीनता कोणावरही लादणे हा निर्बंधानुसार एक दंडनीय अपराध समजला जाईल.’ (भारतीय राज्यघटना, छेदक १७) जेव्हा अस्पृश्यता पाळणे, हा निर्बंधान्वये गुन्हा ठरविण्यात आला, तेव्हा सावरकरांनी त्याचे वर्णन ‘सुवर्णदिन’ असे केले. तसेच त्यावर ‘जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख (पूर्वार्ध व उत्तरार्ध) असे दोन लेख लिहिले. त्यात ते म्हणतात, “अशोकस्तंभासारख्या एखाद्या चिरंतन स्तंभावर कोरून ठेवण्याइतक्या महत्त्वाची आहे ही महोदार घोषणा. गेली कित्येक शतके ज्या शतावधी साधुसंतांनी, समाजसुधारकांनी नि राजकारणधुरंधुरांनी ही जन्मजात अस्पृश्यतेची बेडी तोडून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांच्या त्या साऱ्या प्रयत्नांचे, ही घोषणा ज्या दिवशी केली गेली त्या दिवशी साफल्य झाले.”राजकारण असो वा समाजकारण, सावरकरांनी सदैव मानवतेचा विचार केला होता.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@