दाभोलकर हत्येप्रकरणी अॅड. पुनाळेकर, भावेला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019
Total Views |



मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज मोठी कारवाई केली. सनातन संस्थेची बाजू सातत्याने न्यायलयात मांडणारा अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली. दरम्यान, पुनाळेकर व भावेला उद्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळते. मात्र या दोघांचा या हत्याकांडात नेमका कसा सहभाग आहे हे अद्याप समजू शकले नाही.

 

सीबीआयने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला होता. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात ते मॉर्निंग वॉक करत असताना जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असेल्या शरद कळसकरच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव पुढे आले होते. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तूलांची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात लवकरच अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

 

'सनातनपुनाळेकर, भावेंच्या पाठिशी

 

तथाकथित पुरोगाम्यांच्या दबावातून पुनाळेकर व भावेंना अटक करण्यात आली आहे. सरकारला खरे आरोपी सापडत नसल्याने अशा पद्धतीची कारवाई केली जात असून आम्ही पुनाळेकर यांच्या पाठिशी उभे राहू, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी स्पष्ट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@