महाराष्ट्राच्या निकालाचा अन्वयार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2019
Total Views |


 


महाराष्ट्रातल्या आणि एकंदरीतच देशभरातील राजकीय पंडितांना अवाक् करायला लावणारा असा हा निकाल होता. महाराष्ट्रातला अशासाठी की, मुंबई-महाराष्ट्रात जे घडते त्याचे परिणाम देशभरात उमटत असतात.


आपलेच मागील आकडे मोडीत काढत नरेंद्र मोदींनी पर्यायाने भारतीय जनता पक्षाने इतिहास रचला. बिगरकाँग्रेसी व्यक्ती आणि संघटना यांना अशाप्रकारे पुन्हा एकदा बहुमत मिळणे, हे सर्वार्थाने ऐतिहासिक मानावे लागेल. उत्तर प्रदेशात काय होईल, हे वारंवार चर्चिले जात होते. मात्र, त्यावर मात करून भारतीय जनता पक्षाने आपली वाटचाल सुरूच ठेवली. याउलट पश्चिम बंगाल व ओडिशासारख्या राज्यातही आपली दणदणीत खाती उघडली. महाराष्ट्रातल्या आणि एकंदरीतच देशभरातील राजकीय पंडितांना अवाक् करायला लावणारा असा हा निकाल होता. महाराष्ट्रातला अशासाठी की, मुंबई-महाराष्ट्रात जे घडते त्याचे परिणाम देशभरात उमटत असतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ यासारख्या मध्य भारतातील राज्यांनी भाजपची एकहाती सत्ता अनुभवली आहे. तिथल्या राजकीय कार्यकर्त्यांनीही आपल्या पक्षाला मिळणारे राजकीय यश अनुभवले आहे. महाराष्ट्रात मात्र जे घडले ते नवलच म्हटले पाहिजे. यापूर्वी महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. मात्र, त्याचे नेतृत्व शिवसेनेच्या हाती होते. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांसारखे अत्यंत कर्तृत्ववान नेते त्यावेळच्या सरकारमध्ये होते. परंतु, युतीच्या काळात त्यांना जो काही वाव मिळाला, त्यातही उत्तम कामागिरी करून या मंडळींनी आपले नाव जनमानसात कोरून ठेवले. २०१४ ला नरेंद्र मोदींची लाट आली आणि या लाटेत अनेकांना संधी मिळाली. मात्र, या संधीचे सोने केले, असे हमखास ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गेल्या चार-पाच वर्षांत विरोधकांच्या काळजात धडकी भरवेल, असे राजकीय यश फडणवीसांनी महाराष्ट्रात मिळविले. दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती वाट्याला असतानादेखील फडणवीसांनी त्यावर मात केलीच; पण महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी छापही पाडली. आज जेमतेम चार-पाच वर्षांत फडणवीसांची तुलना शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला धोबीपछाड देणारा नेता, अशी झाली आहे. ‘युती’ ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची अपरिहार्यता आणि त्यात शिवसेनेसारखा आक्रमकतेचा आव आणत कागाळ्या करणारा पक्ष साथीला. अशा स्थितीत फडणवीसांनी शिवसेनेला अत्यंत मुरब्बीपणे सांभाळले.

 

आज राज्यातले निकाल तपशीलवार पाहिले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की, जिथे भाजपचे उमेदवार होते आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार होते, त्या दोन्ही ठिकाणचे मतदानाचे आणि निकालानंतर युतीच्या पारड्यात पडलेले मतदान यांच्यात गुणात्मक आणि मूल्यात्मक फरक आहे. आनंद अडसूळ, चंद्रकांत खैरे, अनंत गीते यांसारखे शिवसेनेचे दिग्गज नेते आज पराभूत झाले आहेत. ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघातले मतदानही दोन्ही पक्षांच्या चिंता वाढविणारे होते. सेना-भाजप एकत्र लढल्यास २.५ टक्के अधिकची मते मिळून युती आघाडीवर मात करू शकते, अशी एक राजकीय मांडणी होती. मात्र, ही मांडणी लोकसभेच्या आधीची होती. आता प्रश्न असा निर्माण होतो की, लोकसभेनंतर काय? राजकारणात कुणीही प्रदीर्घ काळ मित्र किंवा शत्रू नसते. शिवसेना कितीही काळ आपल्या मैत्रीच्या कथा सांगत असली, तरी शिवसेनेचे वागणे प्रामाणिक मित्राचे नाही, हे अनेक प्रसंगांतून सिद्ध झाले आहे. अगदी परवा झालेल्या लोकसभा मतदानानंतर राहुल गांधींचे कौतुक सेनेच्या मुखपत्रातून ओथंबले होतेच. त्यामुळे शिवसेना युतीधर्मात किती प्रामाणिक राहील, याचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही. ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात सेनेला पडलेली मते आणि त्यांचे विश्लेषण केले तर लक्षात येते की, निवडून आलेेले खासदार हे पुन्हा मोदी लाटेवर स्वार होऊन आलेले आहेत. ज्या प्रकारच्या मताधिक्क्याची अपेक्षा शिवसेनेला होती ती मिळालेली नाही; उलट हातचेही गेलेले आहे. अर्थात, याला शिवसेनाच जबाबदार आहे. युतीचा म्हणून एक मतदार आहे आणि तो काही मूल्यांचा पाठिराखा आहे. हिंदुत्व हाच त्याचा गाभा आहे. या दोन्ही पक्षांत हा मतदार भावनिकरित्या गुंतलेला आहे. शिवसेेनेने त्यांना गृहित धरण्याचे पाप केले. भाजपशी सत्तेत सहभागी होऊनही शिवसेना गेली पाच वर्षे विरोधात असल्यासारखीच वागत होती. अनेकांना हे विचित्र वाटले. सेनेची योजना स्पष्ट होती. सतत कांगावा करून अधिकाधिक मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे. मात्र, हे करीत असताना शिवसेनेचा मूळ चेहरा अत्यंत भेसूर झाला. एखाद्याला एका विशिष्ट पद्धतीने काही मिळते, असे वाटू लागले की प्रत्येक वेळी तो तशाच पद्धतीने वागू लागतो. लोकसभा निवडणुकीच्या आधीचे चित्र आणि आताचे चित्र निराळे आहे.

 

शिवसेना पुन्हा पूर्वीसारखी वागू शकते आणि त्याला अनेक कारणेही आहेत. सत्तेच्या आकांक्षेने भाजपकडे येणाऱ्यांचा ओढा वाढलेला आहे. शिवसेनेला स्वत:चा सत्तेचा आकडा टिकवता आला नाही तर बरेचसे लोक सेनाच सोडून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज ठाकरे नामक प्रकरण काँग्रेस-राष्ट्रावादीने पुरेपूर वापरले असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. राज ठाकरेंचा उपयोग झालेला नसल्याने विधानसभेत त्यांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच राहील. ‘राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोण करतो,’ असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा हिरीरीने पुढे येऊन शरद पवारांनी ‘आणीबाणीच्या काळात पु. ल. देशपांडेच्या सभांचा खर्च कोण करीत होता,’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे ‘राज ठाकरेंच्या सभेचा खर्च कोणी केला,’ या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज मिळून गेले होते. ज्या पवारांनी या सगळ्या उठाठेवी केल्या, त्यांची स्थिती चिखलात रुतलेल्या हत्तीसारखी झाली होती. माढा, मावळ जाणार याची पवारांना माहिती होती. पार्थ पवार हरणार होता, याची आपल्याला कल्पना होती, याची सरळ कबुली पवारांनी दिलीच. आपल्या कन्येला निवडून आणण्याकरिता पवारांना आपल्या आयुष्यात कमावलेल्या राजकीय वजनाचा पुरेपूर वापर करावा लागला. कोकणातून नारायण राणे प्रकरणही निकालात निघाले. या सगळ्या घटनाक्रमाचा अन्वय चार-पाच महिन्यात महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत लागलेला पाहायला मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@