पालघरमधून शिवसेनेच्या राजेंद्र गावितांचा दणदणीत विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |



पालघर : अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित यांचा विजय झाला आहे. मतमोजणीत राजेंद्र गावित यांना ५ लाख ७९ हजार ९८९ मते मिळाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला असून असून, बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार ३९१ मते मिळाली आहेत. गावित यांना ८८ हजार ८८३ मतांची आघाडी मिळाली असल्याने त्यांचा थेट विजय झाला आहे.

 

पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात आ. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप यांनी महाआघाडी केली होती. त्यामुळे पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात प्रमुख लढत होती. पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने ऐनवेळी राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली होती.

 

कारण भाजपचे माजी खा. दिवंगत चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेकडून चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती. मात्र, यावेळी शिवसेना-भाजप यांच्यात युती झाली. त्यामुळे पालघरची जागा शिवसेनेला गेल्याने राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती.

 

२०१४ ची विधानसभा आणि २०१६ ची पालघरची पोटनिवडणूक तसेच २०१८ ची लोकसभेची पोटनिवडणूक पाहता जिल्ह्यात युतीचे पारडे जड होते. मात्र एकंदरीतच राजकीय समीकरणे बदलली पाहतात, ही निवडणूक अटीतटीची बनली होती. महायुतीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र असताना जिल्ह्यातील विविध भागात शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून फटाके ढोलताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.

 

महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टांचे चीज झाले. हा माझा विजय नसून सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. माझा हा विजय मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करतो.“

- राजेंद्र गावित, विजयी उमेदवार

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@