दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |

 



अपेक्षेप्रमाणे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीने जिंकला. नुसता जिंकला असे नव्हे तर गेल्यावेळेपेक्षा अधिक मताधिक्क्याने जिंकला. अनेकांसाठी
, खासकरून एक विशिष्ट विचारसरणी मानणार्‍या माध्यमवीरांसाठी हे वाढलेले मताधिक्क्य हे धक्कादायक असले तरी या निकालांचा अंदाज मतदानाच्या दिवशीच आलेला होता. शिवसेनेचे विद्यमान आणि पुननिर्वाचित खा. अरविंद सावंत यांच्याबद्दल शिवसेनेतच नाराजी असली तरी जनतेने मोदींसाठी सावंत यांना मत दिले आहे, हे स्पष्ट दिसते आहे.

माध्यमवीरांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांची पुरेपूर हवा केली होती. मुकेश अंबानी यांनी त्यांना दिलेला पाठिंबाही गाजला. मात्र गेल्या वेळीही अंबानींनी देवरांना पाठिंबा देऊनही ते हरले होतेच. काँग्रेसच्या सवयीप्रमाणे जातीजातीत फूट पडण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतील गुजराती आणि जैन वस्त्यांमध्ये तसेच सर्व जैन मंदिरांसमोर अरविंद सावंत हे मांसाहारी असून ते मांसाहारी लोकांना शाकाहारी लोकांच्या उरावर बसवत आहेत, अशा अर्थाच्या अत्यंत अश्लाघ्य भाषेतील पोस्टर वारंवार लावून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र जैन आणि गुजराती समाजातील तरुणवर्गाने या असल्या फुटपाड्या प्रचाराला बळी पडायचे नाही, असे ठरवले होते, हे लोकांच्या चर्चेतून लक्षात येत होते.

शिवसेनेच्या मध्यंतरीच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते आणि ती कटुता अजूनही मनात बाळगून असलेले काही शिवसैनिक ही युतीपुढे मोठी अडचण ठरेल, असा सर्वच राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. मात्र ही निवडणूक पक्ष नव्हे तर जनताच लढत होती, हे निकालानंतर सिद्ध झाले आहे. अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र या सगळ्यांपासून दूर राहून जनतेने स्वतःला हव्या त्या पद्धतीने मतदान केले. या मतदार संघात असलेली एकगठ्ठा मुस्लीम, बौद्ध आणि जैन मते यांना परस्परांत आणि हिंदूंविरोधात खेळवत राजकारण करण्याचा काँग्रेसचा दशकानुदशके चाललेला कार्यक्रम जनतेने पुन्हा एकदा नाकारला आहे.

दक्षिण मुंबईत नेहमीच कमी टक्केवारीने मतदान होत आले. मात्र, यंदा गेल्या वेळेपेक्षा दीड टक्के जास्त मतदान झाले. मतदान केंद्रावर सकाळी सातपासूनच रांगा लागल्या होत्या. ती गर्दी मतदान संपेपर्यंत कायम होती. मात्र तरीही टक्केवारी कमी राहण्याचे कारण मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्या न होणे, असे सांगितले जाते. मतदान केंद्रासमोरील गर्दीत जशी तरुणांची संख्या जास्त होती, तशीच अत्यंत वयस्कर व्यक्तीही बर्‍याच होत्या. इथे सर्वत्र मतदानाच्या वेळी लोकांच्या गप्पांत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचीच चर्चा होती. या वातावरणाचा अंदाज आल्याने पक्षांतर्गत विरोध असूनही अरविंद सावंत निवांत होते आणि प्रचारासाठी फिरताना आवर्जून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन फिरत होते.

यंदाच्या निवडणुकीतील महत्त्वाचे निरीक्षण असे आहे की, जाती-गट यांचे राजकारण सोडून विकासाच्या बाजूने समाज उभा राहिला आहे. त्याचबरोबर स्थानिक मुद्दे कोणते आणि लोकसभेचे मुद्दे कोणते यावर जनतेत आता बर्‍यापैकी स्पष्टता आलेली दिसते आहे. काँग्रेसकडून स्थानिक गल्लीतील मुद्दे उपस्थित करून केलेल्या प्रचाराला जनतेकडूनच परस्पर उत्तर दिले जात होते, असेही अनेक ठिकाणी दिसले.

- राजेश प्रभु साळगांवकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@