पुणे लोकसभा मतदारसंघ : पुणेकरांचा कौल बापटांनाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019   
Total Views |



पुण्याची मुख्य लढत ही भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यातच होती. भाजपने आपला जिल्हा पालकमंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवून प्रचाराची जय्यत तयारी सुरू केली आणि काँग्रेसला मात्र पुढचे कित्येक दिवस साधा उमेदवारही शोधता आला नाही. तेव्हाच पुणे लोकसभा मतदारसंघाचा काय निकाल लागणार, हे स्पष्ट झालं होतं. काँग्रेसने जोशी यांच्यासारखा जुनाजाणता, निष्ठावंत चेहरा दिला खरा, परंतु त्यांचं नाव घोषित होऊन त्यांनी तयारीला सुरुवात करेपर्यंत गिरीश बापट यांनी जवळपास सर्व पुणे शहर पिंजून काढलं होतं. परिणाम अर्थातच व्हायचा तोच झाला. पुण्याच्या राजकारणात गेली तीस वर्षं चांगलेच मुरलेले बापट विधानसभेतून आता लोकसभेत प्रवेशकर्ते झाले.

 

२०१४ मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव करत काँग्रेसचा हा एकेकाळचा बालेकिल्ला आपल्या खिशात टाकला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्व आठ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. पुढे महापालिकाही भाजपने काबीज केली. त्यामुळे पाच वर्षांच्या काळात पुण्यात भाजपचं एकहाती वर्चस्व निर्माण झालं, तर लागोपाठ पराभव, परस्पर समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजी यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिकच क्षीण होत गेले. भाजप सरकारच्या काळात पुणे मेट्रो, रिंगरोड, नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले. विद्यमान खासदार शिरोळे यांच्या साथीने, भाजपच्या मजबूत संघटनेच्या जोरावर मग बापटांनी आक्रमक प्रचार सुरू केला. दुसरीकडे काँग्रेस मात्र विश्वजित कदम, प्रवीण गायकवाड, मोहन जोशी अशा अनेक नावांवर कित्येक दिवस खल करत बसली. शेवटी ‘कुणीतरी उमेदवार द्या एकदाचा!’ असं काँग्रेस कार्यकर्तेच उघडपणे म्हणू लागले तेव्हा कुठे मोहन जोशी यांचं नाव जाहीर झालं, परंतु तोवर बराच उशीर झालेला होता. शिवाय, नव्या पुण्याच्या नव्या राजकारणात जोशी यांचं महत्त्व पूर्वीइतकं उरलं नव्हतंच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@