पुनरागमनायच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


 


स्वतः जिंकले की इव्हीएम बरोबर आणि हरले की, इव्हीएम चूक, अशी यांची प्रवृत्ती असते. तरी अशा लोकांनी इव्हीएमवर खापर फोडण्याऐवजी स्वतःचा नैतिक विजय साजरा करावा, हा एक सल्ला त्यांना द्यायलाच हवा. बाकी इथल्या जनतेने ‘पुनरागमनायच’ म्हणत पुन्हा एकदा चौकीदाराला देशाचा चौकीदार म्हणून निवडले आहे आणि तो देशाला परमवैभवापर्यंत घेऊन जाईलच, हे नक्की!


काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार, जातीधर्माच्या राजकारणाला आणि स्वतःला देशाचे मालक समजण्याच्या अहंकारी वृत्तीला जोरदार चपराक लगावत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या, राष्ट्रवादाच्या, विकासाच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. परिणामी, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीने ३५ वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचा आगळावेगळा इतिहासही रचला. तत्पूर्वी रविवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यम संस्थांनीही एक्झिट पोलच्या माध्यमातून दिल्लीच्या गादीवर कोण विराजमान होणार, त्याची आकडेवारी जाहीर केली. परंतु, इथेही काही काही एक्झिट पोल भाजप वा रालोआला पूर्ण बहुमत द्यायला तयार नव्हते. अशा चाचपडणाऱ्या एक्झिट पोल्सनी भाजप आघाडीला २३६, २४२ आणि २६७ अशा सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमतापेक्षाही कमी जागा मिळतील, असे भाकीत केले तर, अन्य काही एक्झिट पोल्सनी मात्र भाजप आघाडीला थेट ३५० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे सांगितले.


म्हणजेच एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांच्या आकडेवारीचा लंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरल्याचे इथे दिसून येते
. सोबतच एक्झिट पोलमध्ये उल्लेखलेल्या चार-पाच मुद्द्यांची सत्यताही निकालानंतर स्पष्ट झाली. हिंदी-भाषिक राज्यात पुन्हा एकदा मोदीलाट जाणवणार, पश्चिम बंगाल आणि ओडिशात भाजप जोरदार मुसंडी मारणार आणि वाढलेले मतदान भाजपला मिळणार, हे अंदाज खरे ठरल्याचे एकंदरीत चित्र पाहता दिसते. दुसरीकडे विरोधक मात्र एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवू नका, असे म्हणण्यापासून ते ऑस्ट्रेलियातील एक्झिट पोल्सच्या अपयशाच्या आशेवर निकालापर्यंतचे दिवस कंठत असल्याचेही पाहायला मिळाले. अखेरीस मतमोजणीच्या दिवशी जसजसे निकाल येत गेले, तसतसे विरोधकांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आणि संपूर्ण देशभरातून त्यांचा सपशेल धुव्वा उडाला. ही नक्कीच अभूतपूर्व अशी घटना! पण हे घडले कसे? याचेही विश्लेषण व्हायला हवे.

महाराष्ट्राचा विचार करता इथे शरद पवार, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी भाजपविरोधात राळ उडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बारामतीच्या काकांच्या इशाऱ्यावर ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मोदी, शाह यांच्यावर भलतेसलते आरोप करणाऱ्या कृष्णकुंजातल्या पोपटाला प्रसिद्धीही भरपूर मिळाली. शरद पवारांनी चावी फिरवली की, बोलक्या बाहुल्याप्रमाणे बडबडणाऱ्या राज ठाकरेंना व मनसैनिकांना आता राज्यात भाजप-सेनेचे राज्य संपल्याचेही भास होऊ लागले. परंतु, इथल्या जनतेने शरद पवारांचा राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून बाजी पलटविण्याचा डाव हाणून पाडला आणि राज ठाकरेंनी जिथे जिथे सभा घेतल्या, तिथे तिथे भाजप वा शिवसेनेचे उमेदवार निवडून दिले, हे विशेष उल्लेखनीय. म्हणजेच मतदानात राजप्रभाव अजिबात जाणवला नाही, तर उलट राज ठाकरेंनी दुसऱ्यांसाठी सभा घेऊन त्यांनाही घरीच बसवले. प्रकाश आंबेडकरांची तर निराळीच गत. मतमोजणीच्या आधी एक दिवस कसलातरी गांजा मारून आलेल्या या माणसाने ‘आम्हाला राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा मिळतील,’ असा दावा केला. अनुसूचित जाती-जमातीच्या जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, संविधानाच्या नावाने भावनिक करायचे आणि ही सगळी जनता आपल्याच मागे उभी आहे, असे चित्र निर्माण करण्याचे कामही प्रकाश आंबेडकरांनी प्रचारकाळात केले. प्रकाश आंबेडकरांनी या माध्यमातून ठिकठिकाणी उमेदवार उभे केले व त्यांनीही भरपूर मते खेचली. परंतु, त्यांना एकही उमेदवार (भारिपचा) निवडून आणता आला नाही. आता या सगळ्याच पराभूत मंडळींनी स्वतःच्या स्वार्थ आणि इतरांच्या द्वेषाऐवजी जनहिताला प्राधान्य दिले तर ठीक; अन्यथा आगामी विधानसभेतही या लोकांचे तोंडावर आपटणे ठरलेलेच!

देशपातळीवरही विरोधकांनी भाजपविरोधात आघाडी उघडण्याचा देखावा निर्माण केला. कर्नाटकात कुमारस्वामींच्या शपथविधीवेळी हात उंचावून ‘हम साथ साथ है’ सारखे शब्द ऐकवणाऱ्या विरोधकांनी नंतर मात्र एकमेकांचा चेहरा पाहणेही टाळले. मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, राहुल-सोनिया गांधी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार आदी नेते-पक्षांनी एकच महाआघाडीचा पर्याय देण्याला खो घातला. सर्वच विरोधकांनी एकत्र येत भाजपसमोर उभे राहण्याचे काम केले असते, तर जनतेलाही हे लोक विश्वास ठेवण्यासारखे आहेत, असे वाटले असते. परंतु, एकत्र आल्यास माझ्यापेक्षा दुसरा पुढे जाईल आणि आपली सद्दी संपेल, या स्वतःपुरता विचार करण्याच्या मानसिकतेने त्यांचा घात झाला. काँग्रेसने तर लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका गांधींना मोदीविरोधातील ब्रह्मास्त्र म्हणून समोर आणले.

पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आजीसारख्या नाकाच्या प्रियांकांवर टाकल्याने आपण जणू काही भलामोठा तीर मारल्याच्या प्रतिक्रियाही या काळात काँग्रेसींनी दिल्या. परंतु, मतदारराजाने मात्र काँग्रेसच्या या कथित ब्रह्मास्त्रालाही निष्प्रभ करत मोदी-योगींवरच शिक्कामोर्तब केले. तसेच गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या अमेठीत खुद्द राहुल गांधींचाही पराभव झाला. विशेष म्हणजे बुडणाऱ्या काँग्रेसला तारणारा आता कोणीही नाही, हेही यातून सिद्ध झाले. हिंदी भाषिक पट्ट्यातील उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशातील जातीपातीच्या-धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना-पक्षांना तर भाजपने चांगलाच सुरुंग लावला. आतापर्यंत फक्त जातीचा मुद्दा जनतेसमोर मांडणाऱ्यांविरोधात भाजपने ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चा विचार दिला आणि २०१४ प्रमाणेच भाजपने या राज्यांतही घवघवीत यश मिळवत आपला झेंडा मजबुतीने रोवला. परिणामी जातीपातीच्या-धर्माच्या पलीकडे जाणारे हे निकाल केवळ भाजपसाठीच नव्हे, तर भारतीय राजकारणातलेही निर्णायक वळण ठरल्याचे स्पष्ट होते. सोबतच भारतीय राजकारणाचा गेल्या ७० वर्षांतला बाज उलटविणारी ही घटना ठरली.

सतराव्या लोकसभेत सर्वाधिक चर्चा झाली ती पश्चिम बंगालची आणि तीही हिंसाचारासारख्या नकारात्मक मुद्द्यावर. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेला हिंसाचार, हत्या, बुथ कॅप्चरिंगचा सिलसिला अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरूच राहिला. भाजप अध्यक्ष अमित शाहंच्या कोलकात्यातील रोड शोवेळी तर तृणमूलच्या गुंडांनी हद्दच ओलांडली. ममता बॅनर्जींच्या थयथयाटामुळे चेकाळलेल्या तृणमूल कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत अमित शाहंवर हल्ला केला, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडला. उठसूट छोट्या छोट्या मुद्द्यांवर छाती पिटत, घसा फाडत आरडाओरडा करणाऱ्या बुद्धीजीवी-विचारवंतांना मात्र ही घटना दिसली नाही. डोळे, कान आणि तोंड बंद करून मूग गिळून बसण्यातच त्यांनी शहाणपणा मानला, त्याला मतदारांनी उत्तर दिले. शिवाय ममतांनी सत्तेवर आल्यापासून केलेले मुस्लिमांचे लांगूलचालन, बांगलादेशी घुसखोर-रोहिंग्यांना घातलेल्या पायघड्या, हिंदूंच्या सण-उत्सवांत घातलेला खोडा आणि सर्वच देशविघातक कृत्यांचा हिशोबही मतदारांनी यावेळी केला. आव्हानात्मक ठिकाणे आणि राज्यांत भाजपच्या विजयाचे हे चित्र दिसत असतानाच दक्षिण भारतातही भाजपने चांगली कामगिरी नोंदवली. कर्नाटकात काही महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस-जेडीएस आघाडीला पाणी पाजत भाजपने मुसंडी मारली. तरीही आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, तामिळनाडू या राज्यांतही भाजपने आणखी जोर लावण्याची आवश्यकता असल्याचे इथे दिसते. कारण, केवळ कर्नाटकातल्या विजयाने संतुष्ट होता कामा नये, जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भाजपचा वरचष्मा निर्माण व्हायला हवा. हे झाले पक्ष व राज्यपातळीवर, पण मतदारांनीही पुन्हा एकदा मोदीच का हवे, यावर मोहोर उमटवली. मोदींचे विकासाभिमुख नेतृत्व, गरिबांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी राबविलेल्या योजना व प्रकल्प, आर्थिक आघाडीवरील नोटाबंदी, जीएसटीबाबतचे निर्णय, दहशतवादाच्या मुद्द्यावर घेतलेली खमकी भूमिका जनतेला मोदींच्या मागे घेऊन आली. सोबतच मुस्लीम बहुसंख्येने असलेल्या मतदारसंघातही भाजपने चांगले यश मिळवले.

मुस्लीम महिलांना माणूसपणाचे हक्क नाकारणाऱ्या तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा यात मोठा वाटा आहे. मोदी सरकारने हा कायदा केला, तेव्हा त्याविरोधात आदळआपट करण्यात स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणविणारेही होते, अशा शरियत समर्थक पुरोगाम्यांना-धर्मनिरपेक्षवाद्यांना मुस्लीम महिलांनी ‘याचि देही याचि डोळा’ जहन्नुमचा रस्ता दाखवला. आजचा निकाल हा जसा भाजपचा विजय असल्याचे दिसते, तसेच ते भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कायकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचेही फळ आहे. प्रचार सुरू झाल्यापासून अमित शाह यांनी सातत्याने आम्ही ३०० पेक्षा अधिक जागांवर विजयी होणार, असा विश्वास आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जागवला. भाजपला अधिकाधिक मते मिळावीत, जनतेपर्यंत पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे जावी म्हणून पक्षकार्यकर्त्यांना बुथ पातळीपर्यंत संघटनाचे जाळे मजबूत करण्याचा कार्यक्रम दिला. अमित शाह यांनी स्वतः यंदाच्या निवडणुकीत लाखो किलोमीटरचा प्रवास केला, कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या, जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला. गांधी घराण्यासारखे उंटावरून शेळ्या हाकण्याचे, दिल्लीतल्या राजमहालात ऐशोआरामात राहून विजयाचे स्वप्न पाहण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. म्हणूनच भाजपच्या या विजयात अमित शाह यांचा सिंहाचा वाटा आहे.

दुसऱ्या बाजूला देशात लोकशाही नाही, संवैधानिक संस्था धोक्यात आल्या, मोदींनी हुकूमशाही आणली-अघोषित आणीबाणी लादली, आदी मुद्द्यांवर कांगावा करत भयगंड पसरवून लोकशाहीला नख लावू पाहणाऱ्या अराजकवाद्यांनाही मतदारांनी दणका दिला. जे स्वातंत्र्यानंतर करण्याची आवश्यकता होती, ते मोदी आज स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी करत आहेत, जे अकार्यक्षमतेचे, निष्क्रियतेचे दाखले काँग्रेसने सातत्याने घालून दिले, ते बाजूला सारण्याचे काम मोदी करत आहेत, तर पुरोगामी, बुद्धीजीवी, विचारवंती गोटातून विरोधाचे हाकारे दिले गेले. अंधार अंधार म्हणणाऱ्यांपासून पुरस्कारवापसी करणाऱ्यांपर्यंतच्या लोकांचा यात भरणा आहे. हिंदूंना हिंसक ठरवून देशात मुसलमान कसे पिडलेले, रंजलेले, गांजलेले आहे, हे दाखवून देण्यात या लोकांनी मागची पाच वर्षे खर्ची घातली. लोकभावना ओळखू न शकणाऱ्या पत्रकार, संपादक आणि राजकीय विश्लेषकांकडून यंदा मोदी लाट नाही, असेही म्हटले गेले. परंतु, इथल्या मतदाराने या लोकांच्या बेतालपणाकडे अजिबात लक्ष दिले नाही व मोदी लाट नव्हे तर त्सुनामी असल्याचे दाखवून दिले. परिणामी, स्वतःच्या डबक्यात बसून उड्या मारणाऱ्या मंडळींचे थोबाड फुटले, मोदी जिंकले! आता पराभूत झालेल्यांपैकी कित्येकांनी निकालाआधीच इव्हीएमच्या नावाने बोंबाबोंब करायलाही सुरुवात केली होती. स्वतः जिंकले की इव्हीएम बरोबर आणि हरले की, इव्हीएम चूक, अशी यांची प्रवृत्ती असते. तरी अशा लोकांनी इव्हीएमवर खापर फोडण्याऐवजी स्वतःचा नैतिक विजय साजरा करावा, हा एक सल्ला त्यांना द्यायलाच हवा. बाकी इथल्या जनतेने ‘पुनरागमनायच’ म्हणत पुन्हा एकदा चौकीदाराला देशाचा चौकीदार म्हणून निवडले आहे आणि तो देशाला परमवैभवापर्यंत घेऊन जाईलच, हे नक्की! त्याबद्दल तमाम जनतेचे, भाजपचे आणि नरेंद्र मोदींचेही अभिनंदन व शुभेच्छा!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@